ममता बॅनर्जी यांच्यावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, तृणमूल काँग्रेसचा दावा

ममता बॅनर्जी
फोटो कॅप्शन, ममता बॅनर्जी
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर एका महिलेने चाकू हल्ला करण्याचा केल्याचा दावा साकेत गोखले यांनी केलाय. साकेत गोखले हे तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते आणि माजी खासदार आहेत.

साकेत गोखले यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं की, "व्यसनाधीन असलेली एक महिला ममता बॅनर्जी यांच्या घरापर्यंत पोहोचली आणि तिने त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला."

साकेत गोखले यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिलंय की, "पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती अशी आहे की, झेड-प्लस सुरक्षा असलेल्या आणि तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्या देखील सुरक्षित नाहीत. दिल्लीत भाजपला आव्हान देण्याचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला आहे, त्यामुळे भाजपने हा सुनियोजित कट रचला होता का?"

साकेत गोखले यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीची प्रतही एक्सवरून शेअर केली आहे.

या पोलीस तक्रारीनुसार, 'आज संध्याकाळी सुमारे सहा वाजता एक महिला आक्रमक अवस्थेत तिथे पोहोचली आणि तिने ममता बॅनर्जी यांच्यावर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.'

तक्रारीनुसार, या महिलेने आपण ममता बॅनर्जी यांची भाची असल्याचा दावाही केला.

दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाहीय.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)