राहुल गांधी नेहा बोरा यांना इतकं महत्त्व का देत आहेत? त्याही कन्हैयाप्रमाणे काँग्रेसमध्ये जातील?

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
- Author, रजनीश कुमार
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
दिल्लीच्या रस्त्यांवर सोमवारी (12 ऑक्टोबर) प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत हातात हात घालून चालणाऱ्या तरुण नेत्यांमध्ये नेहा बोरा एकमेव होत्या.
नेहा बोरा यांनी गेल्या 4 महिन्यांच्या कठोर परिश्रमातून हे स्थान मिळवले आहे. काँग्रेसच्या विद्यार्थी आणि युवा शाखेतील कोणताही नेता नेहाबद्दल नाराजी व्यक्त करू शकतो की, त्यांना हेच यश का मिळवता आले नाही.
2015-2016 च्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटना निवडणुकीत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लिबरेशनची (मार्क्सवादी-लेनिनवादी) विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेकडून (आयसा) शेहला रशीद उपाध्यक्षपदी निवडून आल्या.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाची विद्यार्थी संघटना असलेल्या ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनचे कन्हैया कुमार यांनी अध्यक्षपद जिंकले.
कन्हैयासोबत शेहलासुद्धा त्यावेळी बऱ्याच लोकप्रिय झाल्या होत्या आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारविरोधात आक्रमक होत्या. मात्र नंतर शेहला 'आयसा'मधून बाहेर पडल्या आणि नंतर नरेंद्र मोदी सरकारबद्दल सहानुभुतीने बोलू लागल्या. दरम्यान, कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये सामील झाले.
जेएनयूमधील कम्युनिस्ट पक्षांच्या विद्यार्थी संघटनांच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये सामील होणे ही काही नवीन गोष्ट नाही, पण शेहला रशीद यांची भाजपबद्दलची सहानुभुतीपूर्ण भूमिका आश्चर्यकारक होती.
अशा परिस्थितीत प्रश्न निर्माण होतो की, नेहा बोरा यांची भूमिका काय असेल? दुसरा प्रश्न असा आहे की, काँग्रेस नेहा बोरा यांच्याकडे इतके लक्ष का देत आहे? तिसरा प्रश्न असा आहे की, काँग्रेस पक्षातून नेहा बोरा किंवा कन्हैया कुमार यांच्यासारखे तरुण नेते पुढे का येत नाहीत?
नेहा काँग्रेसमध्ये जाणार का?
सीपीआयचे (एम) पॉलिटब्युरो सदस्य अभिजीत मजुमदार म्हणतात की, नेहा पक्षात जे ठरले आहे आणि पक्षाच्या ज्या सूचना आहेत त्यानुसारच काम करत आहेत.
अभिजीत मजुमदार म्हणाले, "पक्षही नेहाच्या धैर्याला प्रोत्साहन देत आहे. ती हे सर्व पक्षाच्या चौकटीबाहेर जाऊन करत आहे असे नाही. यात नेहा एकटीच नाही. कदाचित तिचे धैर्य आणि तिचा उत्साह सध्या मोठ्या प्रमाणात लोकांसमोर येत आहे. प्रसारमाध्यमेही याला प्रसिद्धी देत आहेत. नेहाने कधीही म्हटले नाही की, ती इतरांपेक्षा वेगळी आहे. आम्ही लोकशाही चळवळीचे नेतृत्व करत आहोत, याचा अर्थ असा नाही की आम्ही साम्यवादी (कम्युनिस्ट) नाही."
"प्रियंका गांधी खांद्यावर हात ठेवून चालत आहेत, याचा अर्थ असा नाही की नेहा उद्या काँग्रेसमध्ये जाईल. पक्षाला नेहाबद्दल अशी कोणतीही भीती नाही. भूतकाळातील घटनांवरून असं वाटू शकतं, पण आताची परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. इथे नेहाचे बोलणे ऐकून तुम्हाला कधीच वाटणार नाही की ती स्वतःचा प्रचार करत आहे. तसे काहीही नाही. ती केवळ साम्यवादी चळवळीचा वारसा पुढे नेत आहे," असं अभिजीत मजुमदार यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Getty Images
सीपीआय(एम)ची विद्यार्थी संघटना असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या (एसएफआय) नेत्या दीपसिता धर यांचाही असा विश्वास आहे की, नेहा बोरा कन्हैया कुमार यांच्यापेक्षा वेगळ्या आहेत कारण त्या व्यक्तिवादी नाहीत.
दीपसिता म्हणाल्या, "नेहा काँग्रेसमध्ये न जाता साम्यवादी चळवळ मजबूत करेल, अशी मला आशा आहे. नेहा साम्यवादी चळवळीसाठी वचनबद्ध आहे आणि ती मला कन्हैयापेक्षा पूर्णपणे वेगळी वाटते. साम्यवादी नेते सत्तेसाठी काँग्रेस पक्षात जातात कारण त्यांना तिथे निवडणुका जिंकणे कठीण जाते."
"काँग्रेस पक्ष भविष्यातही नेहाची साम्यवादी भूमिका स्वीकारेल, एक काँग्रेस सदस्य म्हणून नाही, अशी मला आशा आहे," असं दीपसिता यांनी नमूद केलं.
अभिजीत मजुमदार म्हणाले की, नेहाकडे कन्हैयाच्या दृष्टिकोनातून पाहता येणार नाही. ते म्हणतात, "कन्हैया आणि नेहाची कार्यसंस्कृती पूर्णपणे वेगळी आहे. कन्हैया जसजसा लोकप्रिय झाला, तसतसे त्याचे सीपीआयपासून अंतर वाढत गेले. नेहा 'आयसा'ला मजबूत करत आहे."
"ती स्वतःला पक्षापेक्षा श्रेष्ठ समजत नाही. नेहा कन्हैयापेक्षा जास्त कटिबद्ध आहे. खुद्द दिपांकरने म्हटले आहे की, नेहाचे अनुयायी त्याच्यापेक्षा जास्त आहेत. पण ही आमच्यासाठी चिंतेची बाब नाही. हे आमचे यश आहे. एक तरुण कम्युनिस्ट म्हणून नेहा स्वतःच्या पायावर उभी राहिली आहे. शेहलाच्या बाबतीत, आम्ही तिला खऱ्या अर्थाने कटिबद्ध करू शकलो नाही, याबद्दल आम्हाला स्वतःवरच शंका वाटते," असंही मुजुमदार यांनी नमूद केलं.
नेहा बोरांना इतकं महत्त्व का दिलं जात आहे?
जुलैमध्ये जंतर मंतरवरील आंदोलन संपल्यानंतर राहुल गांधी यांनी नंतर डाव्या संघटनांच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. नेहा बोराही या कार्यकर्त्यांमध्ये होत्या. तेव्हाही, राहुल यांनी सीजेपी नेत्यांपासून अंतर राखले होते. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी नेहा बोरांना इतकं महत्त्व का देत आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.
यावर अभिजीत मुजुमदार म्हणाले, "त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. काँग्रेसने सुरुवातीला कॉक्रोच जनता पार्टीला (सीजेपी) धोका मानले होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा अनुभव काँग्रेसच्या मनातून गेलेला नाही. अभिजीत दिपके आणि आशुतोष रांका हेही 'आप'शी संबंधित आहेत. त्यामुळे यामागे आरएसएसचा हात असावा असा संशय काँग्रेसला होता."
"अशा परिस्थितीत नेहा आणि इतर कम्युनिस्ट तरुणांना सोबत ठेवण्यात राहुल गांधींना कोणताही धोका दिसला नाही. नेहा ज्या प्रकारे मुद्दे मांडत आहे हे पाहून तिच्यासोबत उभे रहायला हवे, असे त्यांना वाटले. आम्हाला राहुल गांधींमध्येही काही वेगळ्या गोष्टी दिसत आहेत. कधीकधी त्यांचे बोलणे डाव्या विचारांसारखे वाटते. राहुल यांचा त्यांच्या पक्षाशी किती ताळमेळ आहे याबद्दल मला शंका आहे," असंही ते नमूद करतात.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसला स्वतःच्या पक्षात नेहा बोरा किंवा कन्हैया कुमार यांच्यासारखे तरुण नेते का निर्माण करता येत नाही? या प्रश्नाचं उत्तर देताना, दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक अपूर्वानंद म्हणतात, "स्वातंत्र्यापासून, गेल्या 60-70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष सत्ताधारी पक्ष राहिला आहे. त्यामुळे काँग्रेस हा संघर्ष करणारा पक्ष नव्हता, असे म्हणायला काहीच हरकत नाही."
"60-70 वर्षे काँग्रेस सत्तेत असलेला पक्ष होता. त्याला कशासाठीही संघर्ष करावा लागला नाही. संघर्ष केल्यावरच माणूस विचार करू लागतो. संघर्षातूनच तुमच्या बुद्धीचा विकास होतो. असे नेहमीच दिसून आले आहे की, सत्तेत असताना तुमची बुद्धी क्षीण होते. संघर्ष केल्यावर तुमची बुद्धी अधिक तीक्ष्ण होते."
"तुम्ही याकडे सोव्हिएत युनियनच्या इतिहासातूनही पाहू शकता. सोव्हिएत युनियनमध्ये कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर येण्यापूर्वीची परिस्थिती पाहा. 1905 ते 1917 पर्यंत सर्व लेखक, कवी आणि कलाकार कम्युनिस्ट पक्षाचे होते. लेखक, कलाकार आणि विचारवंत हे सर्व सरकारच्या विरोधात असतात," असं अपूर्वानंद नमूद करतात.
काँग्रेसमध्ये नेहा बोरांसारखे तरूण नेते तयार का होत नाही?
पण कन्हैया कुमार, उमर खालिद आणि नेहा बोरा हे गेल्या 12-13 वर्षांच्या या सरकारच्या काळात पुढे आले आहेत. काँग्रेसमध्ये असे का घडले नाही?
प्राध्यापक अपूर्वानंद म्हणतात, "मोठा काळ सत्तेत राहिल्यामुळे काँग्रेसचा स्वभाव तयार झाला आहे तो अद्यापही विरोधी पक्षाप्रमाणे झालेला नाही. काँग्रेस पक्षाला संघर्ष करणारा पक्ष करण्यासाठी राहुल गांधींना 13-14 वर्षे लागली. अलीकडच्या काळापर्यंत आपण काँग्रेसकडे पाहिलं तर तो सत्ताधारी पक्ष वाटत होता."
"काँग्रेस पक्षाला वाटते की, भाजप सत्तेतून गेला तर सत्तेत कोण येईल? आम्ही येऊ. आम्ही सत्ताधारी पक्ष आहोत. आपलं काम सत्तेत टिकून राहणं नाही, तर लढणं आहे हे पटवून देण्यासाठी राहुल गांधींना खूप प्रयत्न करावे लागले," असं ते नमूद करतात.

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेसमध्ये आलेले तरुण कम्युनिस्ट नेत्यांचा स्वभाव मवाळ का होतो? यावर प्राध्यापक अपूर्वानंद म्हणतात, "जेव्हा कन्हैया काँग्रेसमध्ये जाईल, तेव्हा त्याचा सूर आणि स्वभाव बदलेल. मी कन्हैयावर कोणताही आरोप करत नाहीये. मी फक्त निरीक्षण करत आहे. प्रश्न हा आहे की, कन्हैयाने काही तडजोड केली आहे का? त्याने धर्मनिरपेक्ष तत्त्वांशी तडजोड केली आहे का? त्याने लोकशाही तत्त्वांशी तडजोड केली आहे का? हाच खरा प्रश्न आहे. आता लोक म्हणू शकतील की तो धार्मिक वाटू लागला आहे. पण धार्मिक तर राहुल गांधीही वाटतात. तेही स्वतःला शिवाचा भक्त म्हणतात."
"कन्हैया कुमार यांची रस्त्यावर लढण्याची ओळख कमकुवत झाली आहे, कारण त्यांच्यावर इतर जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत. साम्यवादी पक्षांचा मूलभूत गाभा 'क्लास पॉलिटिक्स' राहिला आहे. क्लास पॉलिटिक्सचा अर्थ एकाच वर्गाला संबोधित करण्यासारखा बनला आहे. जेव्हा तुम्ही लोकशाही राजकारणात असता, तेव्हा तुम्हाला वाटाघाटींसाठी एक मोठी जागा निर्माण करावी लागते. जर तुमची भाषा अशीच राहिली, तर तुम्ही एकाच वर्गाला संबोधित करत नाही. दुर्दैवाने ही परिस्थिती केवळ कम्युनिस्ट पक्षाचीच नाही, तर सामाजिक न्यायावर आधारित राजकीय पक्षांचीही आहे."
"जसे लालू यादव यांचा आत्मविश्वास वाढला, मुलायम सिंह यादव यांचा आत्मविश्वास वाढला आणि नंतर ते अपयशी ठरले. यामुळे कम्युनिस्ट पक्षांमधून बाहेर पडणाऱ्या लोकांना नंतर तिथे खूप बंधनात अडकल्यासारखे वाटते. कारण तिथे लोकशाही राजकारणाला जागा नसते," असं अपूर्वानंद नमूद करतात.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























