इटलीत वाइनच्या 30 हजार बाटल्यांची चोरी; किंमत तब्बल 54 कोटी रुपये

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images
- Author, पारुल गुप्ता
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
इटलीतील एका नामांकित वाइन कंपनीतून चोरट्यांनी तब्बल 30 हजार वाइनच्या बाटल्यांची चोरी केली आहे. या बाटल्यांची एकूण किंमत सुमारे 50 लाख युरो (सुमारे 54 कोटी रुपये) असल्याचं वृत्त इटलीतील प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
इटलीतील कौटुंबिक मालकीच्या सर्वात मोठ्या वाइन कंपन्यांपैकी एक असलेल्या मार्केसी अँटिनोरीने सांगितलं की, शनिवारी (3 ऑक्टोबर) टस्कनी येथील त्यांच्या गोदामातून वाइनच्या बाटल्यांची चोरी झाली. परदेशातील ग्राहकांना वाइन पाठवण्याची तयारी सुरू असतानाच ही चोरी झाली.
मास्क घातलेल्या किमान 7 चोरट्यांनी आधी गोदामातील अलार्म बंद केले आणि सीसीटीव्ही कॅमेरे निष्क्रिय केले, असा अंदाज आहे.
त्यानंतर कंपनीच्या फोर्कलिफ्टचा वापर करून त्यांनी 2 मोठे ट्रक भरून वाइनच्या बाटल्या चोरल्या. यात कंपनीच्या प्रसिद्ध टिग्नानेलो, सोलेया आणि ग्वाडो अल टॅसो या वाइनचा समावेश होता.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रेन्झो कोटारेला यांनी 'कोरिएरे डेला सेरा' या वृत्तपत्राला सांगितलं की, इटलीमध्ये अशा प्रकारे झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी आहे.
"इतक्या मोठ्या प्रमाणात आणि एवढ्या किमतीच्या वस्तूंची चोरी इटलीमध्ये यापूर्वी कधीही झालेली नाही," असं ते म्हणाले.
चोरीला गेलेली वाइन शोधून काढण्यात तपास यंत्रणांना यश येईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
"वाइनने भरलेले 2 ट्रक अचानक गायब होऊ शकत नाहीत. टस्कनीमधील रस्त्यांवर अनेक सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यामुळे नशीबाने साथ दिली, तर चोरीला गेलेल्या बाटल्यांपैकी काही बाटल्या तरी आम्हाला परत मिळतील, अशी आशा आहे," असंही त्यांनी नमूद केलं.

फोटो स्रोत, Bloomberg via Getty Images
त्यांनी 'फायनान्शियल टाइम्स'ला सांगितलं, "या वाइनची किंमत खूप जास्त आहे. त्यामुळे जगभरात ही वाइन विकताना चोरटे कोणाच्याही नजरेस कसं पडणार नाहीत, हेच मला समजत नाही."
या बाटल्यांची निवड पाहता चोरट्यांना वाइनची चांगली माहिती असावी आणि कंपनीच्या आतील माहितीही त्यांच्याकडे असावी, असं कंपनीला वाटतं.
या वाइनच्या एका बाटलीची किंमत साधारण 150 ते 500 युरो (सुमारे 16 हजार ते 54 हजार रुपये) आहे.
सोमवारी (5 ऑक्टोबर) सकाळी कर्मचारी गोदामात पोहोचले, तेव्हा ही चोरी झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
मार्केसी अँटिनोरी या वाइन कंपनीची स्थापना 1385 मध्ये झाली. ही कंपनी जगातील 170 देशांमध्ये वाइनची निर्यात करते. गेल्या वर्षी कंपनीचे उत्पन्न 26.3 कोटी युरो (सुमारे 2,800 कोटी रुपये) होते.
या वर्षी इटलीमध्ये वाइन चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. उत्तरेकडील पिडमाँट भागात अशा 2 चोऱ्या झाल्या. या घटनांमध्ये लाखो युरो किमतीच्या वाइनच्या बाटल्या चोरीला गेल्याचं वृत्त आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























