घरात 298 सोन्याच्या विटा, 20 लाख डॉलर्सची रोकड; माजी सीआयए अधिकाऱ्याने केली 1900 कोटींची फसवणूक

डेव्हिड रश
फोटो कॅप्शन, डेव्हिड रश
    • Author, मॅक्स मॅत्झा
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

घरात सोन्याच्या शेकडो विटा लपवून ठेवल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका माजी सीआयए अधिकाऱ्याने आता अमेरिकन सरकारची सुमारे 20 कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 1900 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे.

या प्रचंड मोठ्या घोटाळ्यासाठी बनावट करार आणि रिअल इस्टेटचे व्यवहार करण्यात आले होते.

49 वर्षीय डेव्हिड रशला करारानुसार अमेरिकन सरकारला नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.

त्याचबरोबर, या गुन्ह्यातून मिळवलेली आलिशान घरं, गाड्या, महागडी घड्याळं आणि इतर मालमत्ताही सरकारकडे जमा करावी लागणार आहे.

रशने दुसऱ्या एका देशाच्या सरकारला गोपनीय माहिती पुरवल्याची कबुलीही दिली आहे. सरकारी वकिलांच्या मते, या माहितीमुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला 'गंभीर धोका' निर्माण झाला असता.

सरकारी वकिलांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रात या कराराच्या अटी सांगितल्या आहेत. त्यानुसार, 'आरोपी दोषी असल्याने तो आपला गुन्हा कबूल करणार आहे.'

बीबीसीने रशच्या वकिलांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला.

रशवर सुरुवातीला सरकारी पैशांची अफरातफरी केल्याचा आरोप होता. पण, आता त्याने वायर फ्रॉड म्हणजेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फसवणूक केल्याचा गुन्हा कबूल केला आहे.

अटकेच्या वेळी रशच्या घरावर छापा टाकला असता 298 सोन्याच्या विटा सापडल्या होत्या. 'कामाशी संबंधित खर्चा'साठी या सोन्याच्या विटा आपल्याला मिळाल्या होत्या, असं दावा त्याने केला आहे.

गुप्त माहिती उघड केली

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या कराराशी संबंधित न्यायालयीन कागदपत्रांमधून या प्रकरणाची काही नवीन माहिती आता समोर आली आहे. त्यानुसार, रशने एका परदेशी अधिकाऱ्याला अमेरिकेच्या 'गुप्त मानवी स्रोताची' माहिती आणि त्याची ओळख उघड केली होती.

सरकारी वकिलांनी कागदपत्रात म्हटलं आहे की, ही माहिती उघड झाल्यामुळे त्या गुप्त स्रोताच्या आणि त्याच्यासोबत काम करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि जीव धोक्यात येऊ शकतो. तसेच, भविष्यात अशा गुप्त स्रोतांची मदत घेण्याच्या अमेरिकन सरकारच्या क्षमतेवरही याचा परिणाम होऊ शकतो.

एका प्रसिद्धीपत्रकामध्ये सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी म्हटलं की, रशने आपल्या पदाचा गैरवापर केला आणि नागरिकांचा विश्वासघात केला आहे. त्याने केलेल्या कृत्यांसाठी त्याला संपूर्णपणे जबाबदार धरलं पाहिजे.

एफबीआयच्या तपासकर्त्यांच्या मते, नोव्हेंबर 2025 ते मार्च 2026 या काळात रशने 'कामाशी संबंधित खर्चासाठी' मोठ्या प्रमाणात परकीय चलन आणि कोट्यवधी डॉलर्सच्या सोन्याच्या विटांची वारंवार मागणी केली.

न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांनुसार, रशने दक्षिण फ्लोरिडात आलिशान घरं खरेदी करण्यासाठी एक अतिशय गुप्त सरकारी कार्यक्रम असल्याचं खोटं कथानक रचलं होतं. नंतर ही घरं विकून वैयक्तिक नफा मिळवण्याचा त्याचा हेतू होता.

या कागदपत्रांनुसार, "रश स्वतःच व्यवहारांना मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्याची भूमिका बजावत होता." त्यामुळे त्याच्यावर कोणतीही देखरेख नसल्याने त्याला अमेरिकन सरकारचा मोठा पैसा आपल्या मर्जीनुसार खर्च करण्याची संधी मिळाली.

यानंतर त्याने 'फसवणुकीतून मिळालेल्या' सरकारी पैशांचा वापर दक्षिण फ्लोरिडात आलिशान मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, या घोटाळ्यात एका घरासाठी इंटिरियर डिझायनर नेमणे आणि 40 हजार डॉलर्सचे स्वयंपाकघरातील उपकरणं खरेदी करण्याचाही समावेश होता.

वायर फ्रॉडचा आरोप जानेवारी 2026 मध्ये रशने केलेल्या 4.5 कोटी डॉलर्सच्या एका व्यवहाराशी संबंधित आहे. या करारानुसार, "रशने एका परदेशी सरकारच्या अशा अधिकाऱ्याला 'टॉप सिक्रेट' (अत्यंत गोपनीय) माहिती दिली, ज्याला ती माहिती पाहण्याची परवानगी नव्हती आणि त्याला तिची काही गरजही नव्हती."

मे महिन्यात रशच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या होत्या.
फोटो कॅप्शन, मे महिन्यात रशच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याच्या विटा जप्त करण्यात आल्या होत्या.

सोन्याच्या विटांशिवाय रशकडे 20 लाख डॉलर्सची रोकड आणि 35 महागडी घड्याळंही सापडली होती.

सरकारी वकिलांनी म्हटलं की, रश पैशांचं रूपांतर सहज खरेदी-विक्री करता येणाऱ्या वस्तूंमध्ये करत होता. हे पैसे लपवण्याचा तो प्रयत्न करत असल्याचे 'भक्कम पुरावे' असल्याचंही त्यांनी सांगितलं.

या करारानुसार, रशला ही घड्याळं आणि 2 बीएमडब्ल्यू कारही सरकारकडे सोपवाव्या लागतील. याशिवाय, 20 लाख डॉलर्सची रोख रक्कम आणि त्याच्या बँक खात्यातून जप्त केलेले सुमारे 3.9 कोटी डॉलर्सही सरकारकडे जमा करावे लागणार आहेत.

फेडरल (संघीय) न्यायालयाचे न्यायाधीश नंतर रशला किती शिक्षा द्यायची हे ठरवतील. या गुन्ह्यासाठी त्याला जास्तीत जास्त 20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. परंतु, फेडरल कायद्यानुसार ही शिक्षा आणखी वाढू शकते, असं सरकारी वकिलांनी म्हटलं आहे.

सीआयएमध्येही केले काम?

जूनमध्ये अमेरिकेचे मॅजिस्ट्रेट जज विल्यम फिट्झपॅट्रिक यांनी रशच्या व्यावसायिक पार्श्वभूमीचा विचार करून तो फरार होऊ शकतो, असं म्हटलं. त्यामुळे खटल्याची सुनावणी होईपर्यंत त्याला तुरुंगात ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यांनी म्हटलं, "तो तपास यंत्रणांच्या हातावर तुरी देऊन सहजपणे निसटू शकतो."

न्यायालयीन कागदपत्रांमध्ये रशने सीआयएसाठी नेमकं काय काम केलं, याची फारशी माहिती दिलेली नाही. पण, त्याला व्हर्जिनियातील एका अमेरिकन सरकारी संस्थेचा माजी वरिष्ठ अधिकारी म्हणून सांगण्यात आलं आहे. त्याच्याकडे 'टॉप सिक्रेट' सुरक्षा परवानगी होती आणि गोपनीय माहिती पाहण्याचीही परवानगी होती.

अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी रशने यापूर्वी सीआयएमध्ये काम केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

'द वॉशिंग्टन पोस्ट'च्या वृत्तानुसार, रश सीआयएच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागात वरिष्ठ अधिकारी होता. हा विभाग हेरगिरीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणं विकसित करतो.

यापूर्वीही रशवर अमेरिकन नौदलातून सन्मानाने निवृत्त झाल्यानंतर पगारासह मिळणारी लष्करी रजा फसवणुकीने घेतल्याचा आरोप होता. 2009 मध्ये नोकरीसाठी अर्ज करताना त्याने आपल्या शिक्षण आणि लष्करी सेवेसंदर्भात खोटी माहिती दिल्याचाही त्याच्यावर आरोप होता. न्यायालयीन कागदपत्रांनुसार, त्याने नोकरी देणाऱ्या कंपन्यांना आपण नौदलातील पायलट असल्याचं खोटं सांगितलं होतं.

कराराशी संबंधित कागदपत्रात म्हटलं आहे की, "रशने त्याच्या लष्करी आणि शैक्षणिक कामगिरीबाबत केलेले हे आणि इतर दावे खोटे होते."

त्याने अर्जात खोटी माहिती दिली होती, तरीही तो तपासणीतून कसा बाहेर पडला, हे स्पष्ट झालेलं नाही.

'द वॉशिंग्टन पोस्ट'नुसार सीआयएच्या काही अधिकाऱ्यांना सध्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. रशची पार्श्वभूमी तपासणी कशी झाली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सरकारने मोठ्या रकमेचा अजूनही हिशोब लागलेला नसल्याचा यापूर्वी दावा केला होता. परंतु, रशच्या वकिलांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.