तुमचा स्मार्टफोन तुमचं बोलणं गुपचूप ऐकतो का? मनात विचार आलेली गोष्ट स्क्रीनवर दिसण्यामागचं नेमकं कारण काय?

फोटो स्रोत, Getty Images
मोबाईल फोनशिवाय जगणं सोपं राहिलेलं राहिलेले नाही, यात शंकाच नाही. एका सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, बहुतांश तरुण दिवसातील सरासरी 4 तास आणि 37 मिनिटे आपल्या फोनवर घालवतात.
पण आपण हातात घेतलेला, खिशात ठेवलेला किंवा सोबत घेऊन फिरणारा हा मोबाईल आपल्यावर पाळत म्हणजे ट्रॅक ठेवतोय का? आपण बोलतोय ते गुपचूप ऐकतोय का? बीबीसीने या सगळ्या मागचं नेमकं सत्य काय आहे, हे सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो आणि तुमच्या मनात काय चाललंय हे ओळखतो, असा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट्स सोशल मीडियावर सतत फिरत असतात. उदाहरणार्थ तुम्ही मित्रांशी एखाद्या वस्तूविषयी सहज बोललात, की लगेच त्याच वस्तूची जाहिरात तुमच्या फेसबुक-इन्स्टावर झळकू लागते, असा अनुभव अनेकांना येतो. तुम्हालाही कधी असा अनुभव आलाय का?
या प्रकारामुळे अनेक सोशल मीडिया युझर्सनी चिंता व्यक्त केली आहे. वेगवेगळ्या ॲप्सच्या माध्यमातून टेक कंपन्या आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय अनेकांना येतो. तर काहींना ही गोष्ट खरीच वाटते.
एखाद्या विषयावर मित्रांशी गप्पा मारल्यानंतर सोशल मीडियावर नेमकी त्याच गोष्टीची जाहिरात दिसणे हा निव्वळ एक योगायोगही असू शकतो. पण 'असं नेमकं घडतं कसं?' हा प्रश्न मात्र प्रत्येकाला चक्रावून टाकतो.

फोटो स्रोत, Getty Images
आपला मोबाईल फोन आपलं बोलणं गुपचूप ऐकतोय अनेक लोक अशी शंका व्यक्त करत आहेत.
तुम्ही एखाद्या विषयाच्या पोस्टवर किती वेळ थांबता किंवा त्यावर कसा प्रतिसाद देता यावरूनच तुम्हाला त्याच विषयाशी जोडलेल्या इतर पोस्ट्स वारंवार दिसू लागतात.
तुम्ही काय पाहता, काय शेअर करता आणि कशाला लाईक करता, यावरून सोशल मीडियाचे अल्गोरिदम तुमच्या ऑनलाइन सवयी ओळखतात आणि त्यावरूनच तुमच्या स्क्रीनवर काय दाखवायचं हे ठरवलं जातं.
काही सोशल मीडिया क्रिएटर्स असा दावा करतात की ही ॲप्स युझर्सचा डेटा गोळा करत असतात. फोनच्या सेटिंग्समध्ये थोडे बदल केले तर हे थांबवता येतं, असंही त्यांचं म्हणणं आहे. अर्थात या दाव्यात कितपत तथ्य आहे याला अजूनही कुठलाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
काहींनी तर अशी कॉन्स्पिरसी थिअरी मांडली आहे की, सरकार आणि टेक कंपन्या आपल्याला पत्ताही लागू न देता आपल्यावर पाळत ठेवून गुप्तपणे हेरगिरी करत आहेत.
गुपचूप ऐकतोय का?
इन्स्टाग्रामचे म्हणणे आहे की, तुम्ही ज्या विषयावर मित्रांशी बोलत असता नेमकी त्याच विषयाची जाहिरात तुमच्या स्क्रीनवर दिसण्यामागे इतर अनेक तांत्रिक कारणे असतात.
इन्स्टाग्रामनुसार, "हा निव्वळ योगायोग असू शकतो. किंवा तुम्ही त्या वस्तूशी संबंधित एखाद्या पोस्टवर क्लिक केले असेल अथवा इंटरनेटवर त्याबद्दल काही सर्च केले असेल."

फोटो स्रोत, Getty Images
इन्स्टाग्रामने पुढे सांगितले की, ते अनेक जाहिरातदार कंपन्यांसोबत मिळून काम करतात. या कंपन्या वेबसाइटवर जाणाऱ्या लोकांचा डेटा इन्स्टाग्रामला देतात. आणि याच माहितीच्या आधारे युझर्सच्या पसंतीस उतरेल आणि त्यांच्या गरजांशी जुळेल असा मजकूर किंवा जाहिराती स्क्रीनवर दाखवल्या जातात.
जर मोबाईल आपले संभाषण ऐकत असेल तर काय करावे?
मोबाईल फोन खरोखर युझर्सच्या गप्पा ऐकतात का, याविषयी काही अधिकृत माहिती समोर आली आहे का हे जाणून घेण्यासाठी बीबीसीने युकेच्या विज्ञान, इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी विभागाशी संपर्क साधला.
या मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले, "सोशल मीडिया असो किंवा इतर कोणतेही ॲप्स, तुम्ही ज्या गोष्टींची परवानगी देता फोनच्या फक्त त्याच फिचर्सचा वापर ते करू शकतात. उदाहरणार्थ मॅप्ससाठी कॅमेरा किंवा लोकेशन. यासाठी त्यांना आधी तुमची संमती घ्यावी लागते आणि त्यांना ही परवानगी का हवी आहे याचे कारणही सांगावे लागते. तुम्ही तुमच्या फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन या परवानग्या कधीही बंद किंवा बदलू शकता."

फोटो स्रोत, Getty Images
तरीही तुम्हाला प्रायव्हसीची काळजी वाटत असेल तर या काही सोप्या टिप्स नक्की फॉलो करा:
- नेहमी स्ट्राँग पासवर्ड ठेवा आणि तो कोणालाही सांगू नका.
- ई-मेलसारख्या महत्त्वाच्या खात्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी 'टू-स्टेप व्हेरिफिकेशन' नक्की चालू ठेवा.
- कोणतेही नवीन ॲप डाऊनलोड करताना ते नेमकी कसली परमिशन मागत आहे हे आधी तपासा.
- तुमची वैयक्तिक माहिती केवळ खात्रीशीर आणि सुरक्षित वेबसाइट्सवरच शेअर करा.
- इंटरनेटवर आपली वैयक्तिक माहिती टाकण्याआधी काळजीपूर्वक विचार करा.
- सोशल मीडियावरील प्रायव्हसी सेटिंग्सचा योग्य वापर करा.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)




























