You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाशिक लैंगिक छळ प्रकरण : पीडितांच्या तक्रारी, आरोपींची बाजू आणि तपासाची दिशा
नाशिकमधील लैंगिक शोषणाच्या आरोपांचं प्रकरण सध्या चर्चेत आहे. यातील पीडित आणि आरोपी टीसीएसचे कर्मचारी आहेत.
बळजबरी, लैंगिक शोषण, लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे अनेक आरोप कंपनीतील 8 पीडित महिलांनी आणि एका पुरूषाने केले आहेत.
या प्रकरणी, नऊ एफआयआर दाखल झालेले असून एका महिलेसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक महिला आरोपी अद्याप फरार आहे.
'हे निव्वळ प्रेमप्रकरण असून बाकी सगळे धर्माच्या अनुषंगाने झालेले धर्मांतराचे आरोप हे खोटे आहेत,' असा दावा आरोपीच्या नातेवाईकांनी केले आहेत.
ज्या मूळ तक्रारीपासून या प्रकरणास सुरूवात झाली, त्या लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या दानिश शेख या आरोपीच्या आईने आणि वकिलांनीही त्यांची बाजू मांडून काही दावे केले आहेत. त्यावर पोलिसांनी मात्र तपास सुरू असल्याचं उत्तर दिलं आहे.
प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) ने अंतर्गत चौकशी सुरू केली असून, स्वतंत्र तज्ज्ञ आणि कायदेशीर सल्लागारांची मदत घेतली जात असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.
टीसीएस चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक के. कृतिवासन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी डेलॉइट (Deloitte) आणि नामांकित कायदेविषयक संस्था ट्रायलीगल (Trilegal) यांची स्वतंत्र सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही अंतर्गत चौकशी टीसीएस च्या अध्यक्षा आणि सीओओ आरती सुब्रमणियन यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
तसेच नाशिकमधील टीसीएस युनिट बंद झाल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.
नाशिक युनिट सध्या सुरू असून ते नियमितपणे ग्राहकांना सेवा देत आहे, असं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणात सगळ्यांत आधी, दानिश शेखवर लग्नाचे आमिष दाखवून 2022 पासून लैंगिक शोषण केल्याचा तसंच धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप एका महिलेने केला.
यासंदर्भात, दानिश शेख या आरोपीच्या आई तब्बसुम शेख यांनी यासंदर्भात आपली बाजू मांडली आहे.
लग्नाचं वचन देऊन लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांवर बोलताना आरोपीच्या आईनं म्हटलंय की, "कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याचं दोन वर्षात लग्न झालंय. जर तो आधीच विवाहित असेल तर तो लग्नाचं वचन कसं काय देईल?" शिवाय, "माझा मुलगा स्वत: शाकाहारी आहे. तो स्वत:चं मांस खात नसेल तर दुसऱ्याला मांस खायला कसं काय देईल?" असंही त्या म्हणाल्या.
'हे संबंध आरोपीच्या पत्नीलाही माहिती होते'- दानिश शेखचे वकील
या प्रकरणामध्ये, अॅड. उमेश वालझाडे हे आरोपी दानिश शेखचे वकिल आहेत. ते म्हणाले की, "दानिश कुठल्याही सिंडिकेटसोबत काम करत नाही, कुठल्याही धर्मपरिवर्तन करणाऱ्या संघटनेसोबत काम करत नाही. याचं कॅरेक्टर क्लिअर आहे, आणि आधी एकही गुन्हा नाहीये."
शिवाय, आरोपी आणि पीडितेमधील संबंधांबाबत आरोपीच्या पत्नीलाही माहिती होतं, असा दावासुद्धा त्यांनी केला आहे.
या प्रकरणातील दुसऱ्या एका आरोपीच्या पत्नीनं ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर 16 एप्रिलला त्यांची बाजू मांडली.
त्या म्हणाल्या की, "इथं दोन प्रकरणं एकत्र करण्याचा प्रयत्न केला जातोय. कंपनीतील एका पुरुष कर्मचाऱ्याचं महिला कर्मचाऱ्यासोबत 4 वर्षांपासून अफेअर सुरू होतं. हे सर्व कॅम्पसला माहिती होतं. टीसीएसमध्ये हे सगळ्यांना माहिती होतं. ते दोघेही प्रौढ होते."
"याचा अर्थ असा नाही की, जे काही झालं त्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्याशी ज्यांची ओळख आहे, ती व्यक्तीही यात सहभागी आहे. दोघेही प्रौढ होते. ही त्यांची वैयक्तिक गोष्ट आहे. पण या दोघांचं ब्रेकअप झालं किंवा त्यांचं नातं पुढे गेलं नाही. त्या कारणामुळे माझे पती आणि त्यांच्यासोबतच्या लोकांना यात ओढलं गेलंय. हिंदू-मुस्लीमचं प्रकरण तयार करण्यात आलंय. आणि त्यालाच पुढे ताणलं जात आहे."
'हे प्रेमप्रकरण आहे, आरोप खोटे'
एका आरोपीचे काका अय्याज काझी यांनी आरोप करत म्हटलं की, "एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला दोष देऊ नये. हे मूळ प्रेमप्रकरण आहे. आणि त्यानंतर लावण्यात आलेले सगळे आरोप हे खोटे आहेत. इतर सर्व प्रकरणे खोटी आहेत. या प्रकरणात माझ्या भाच्याची फसवणूक होत आहे."
आरोपींच्या नातेवाईंकांच्या म्हणण्याप्रमाणे हे खरंच फक्त प्रेम प्रकरणच आहे का हे जाणून घेण्यासाठी आम्ही या प्रकरणाचा तपास करणारे एसआयटी प्रमुख एसीपी संदीप मिटके यांच्याशी संपर्क केला.
बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं आहे की, "आरोपीच्या कुटुंबीय असे दावे करणारच कारण शेवटी आरोपी अशा गोष्टी आपल्या कुटुंबाला सांगणार नाहीत."
पुढे ते म्हणाले की, "आम्ही सखोल तपास करीत आहोत, दावे प्रतिदावे होणारच. शेवटी कोर्टात पुरावे सादर करत आम्हाला गुन्हा सिद्ध करायचा आहे. त्यानुसारच, आम्ही काम करत आहोत. एक आरोपी फरार आहे. सध्या तिचा शोध घेत आहोत."
नाशिक पोलीस आयुक्त काय म्हणाले?
या प्रकरणावर 15 एप्रिल रोजी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली होती.
ते म्हणाले होते, "नाशिक शहर पोलिसांकडे 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं, कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार यासदराखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एका पुरुष तक्रारदारानं धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे."
ते पुढे म्हणाले, "एका महिला पीडितेनं नोकरी लावून देतो आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, तसंच धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावणं तसंच ॲट्रोसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. तर 3 महिलांनी रिलीजियस हॅरेसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार म्हणजे सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत."
पीडितेने FIR मध्ये काय सांगितलं होतं?
तक्रार करणारी महिला 2023 पासून नाशिकमधील टीसीएस कंपनीत असोसिएट या पदावर कार्यरत आहे.
एफआयआरनुसार, 2022 मध्ये त्यांची एका आरोपीशी भेट झाली होती.आरोपी त्यांचा मित्रच होता. ते एकाच महाविद्यालयात शिकलेले होते. मैत्री असल्यानं ते भेटू लागले. आरोपीनं महिलेला तो काम करत असलेल्या कंपनीत नोकरी लावून द्यायचं आश्वासन दिलं होतं.
दरम्यान, जुलै 2022 मध्ये या आरोपीनं एकदा महिलेकडं शारीरिक सबंध ठेवण्याची मागणी करत तिच्यावर बळजबरीही केली होती. महिलेनं विरोध केल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेनं विचार करून सांगते असं म्हटलं.
पुढे अनेकदा आरोपी महिलेला कॉलेज संपल्यानंतर भेटायला बोलवायचा. आरोपीनं महिलेला बीसीएची पदवी पूर्ण झाल्यानंतर या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीस जाण्यास सांगितलं आणि तिची असोसिएट पदावर निवड झाली. एकाच कंपनीत असल्यानं त्यांचं तिथंही नेहमी भेटणं बोलणं व्हायचं.
याच कंपनीत आरोपीच्या ओळखीचा आणखी एक पुरुष आणि एक महिला यांच्याशी महिलेची ओळख झाली. हे चौघं अनेकदा सोबत असायचे. कॅन्टिनमध्ये किंवा फिरायला ते सोबत जायचे.
पण या दरम्यान आरोपीसह ते दोघं असे तिघे मिळून महिलेला तुझा धर्म कसा वाईट आणि आमचा कसा चांगला असं सांगत असायचे. महिलेला तिच्या धर्माबाबतही अनेक वाईट गोष्टी बोलायचे.
ऑगस्ट 2024 मध्ये एकदा आरोपी या महिलेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी शारीरिक संबंधांसाठी बळजबरी केली.
त्यानंतर त्याचा कंपनीतील मित्र महिलेच्या घरी गेला आणि दोघांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगण्याची धमकी देत त्यानंही महिलेकडं शारीरिक सबंधाची मागणी केली. नंतर तो महिलेसोबत ऑफिसमध्ये अनेकदा लैंगिक चाळे करू लागला.
दोन्ही मित्र मिळून महिलेला तिचा धर्म वाईट असल्यानं तिनं त्यांचा धर्म स्वीकारावा असं सांगू लागले. त्याचे फायदे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. हे सर्व सुरू असलताना महिलेशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असायचा. नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेचा पीडितेला फोन आला.
ती महिला आरोपीची पत्नी असून त्यांना दोन मुलं असल्याचंही तिला समजलं. त्यावर महिलेनं आरोपीला "पहिली पत्नी असताना माझी फसवणूक का केली?" अशी विचारणा केली. त्यावर आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं दिली. शिवाय "तुझ्याबरोबर लग्न करण्यात कधीच रस नव्हता", असंही म्हणाला.
टीसीएस कंपनीचे निवेदन
या प्रकरणानंतर टीसीएस कंपनीने निवेदन जारी केलं आहे.
या निवेदनात संबंधित कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, "आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूमाविरुद्ध दीर्घकालीन शून्य-सहनशीलता धोरण आहे. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांची खात्री केली आहे."
"नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे."
तसंच, "आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी प्राधिकरणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. पुढील कोणतीही कारवाई या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल", असंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी नमूद केलं आहे.
17 एप्रिल रोजी टीसीएसनं नवं निवेदन जाहीर करुन आणखी माहिती दिली आहे. त्यानुसार काही पावलं उचलल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. ती पुढीलप्रमाणे-
स्वतंत्र निरीक्षण समिती
कंपनीने एक निरीक्षण समिती (Oversight Committee) स्थापन केली असून, तिचं अध्यक्षपद टीसीएसचे स्वतंत्र संचालक केकी मिस्त्री यांच्याकडे देण्यात आलं आहे. अंतर्गत चौकशीतील निष्कर्ष या समितीसमोर सादर केले जाणार असून, त्यावर पुढील निर्णय घेतले जातील, असं टीसीएस ने स्पष्ट केलं आहे.
एचआर मॅनेजर असल्याचा दावा फेटाळला
प्रसारमाध्यमांमध्ये एचआर मॅनेजर म्हणून उल्लेख होत असलेल्या आरोपी या टीसीएसच्या एचआर मॅनेजर नसल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. त्या भरती प्रक्रियेशी संबंधित नव्हत्या.
त्या केवळ 'प्रक्रिया सहयोगी' (Process Associate) म्हणून काम करत होत्या आणि त्यांच्याकडे कोणतीही व्यवस्थापकीय जबाबदारी नव्हती, असं टीसीएस चं म्हणणं आहे.
तक्रारींबाबत प्राथमिक तपास
टीसीएस च्या म्हणण्यानुसार, सध्या सविस्तर तपास प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्राथमिक पाहणीत नाशिक युनिटशी संबंधित प्रणाली आणि नोंदींमध्ये कंपनीच्या एथिक्स किंवा POSH या ठिकाणी अशा स्वरूपाच्या कोणत्याही तक्रारी आढळून आलेल्या नाहीत.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर भर
कंपनीनं म्हटलं आहे की, टीसीएस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि कल्याणासाठी कटिबद्ध आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाबाबत टीसीएस आणि एचआरची झिरो टॉलरन्स भूमिका कायम आहे, असं निवेदनात सांगण्यात आलं आहे.
सर्व ठिकाणी सुरक्षित आणि सन्मानजनक कार्यस्थळ राखण्यासाठी कंपनी प्रयत्नशील असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणाचा सखोल आणि पारदर्शक तपास व्हावा, यासाठी कायदा अंमलबजावणी यंत्रणांना पूर्ण सहकार्य केलं जाईल, असं टीसीएस कडून सांगण्यात आलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.