'मुलीचा जन्म होईपर्यंत मी गरोदर असल्याचंच नाकारत होते', वैद्यकीय भाषेत याला आहे असे नाव

शॅनन सिनियर यांची ही जी मानसिक स्थिती होती, किंवा जो अनुभव होता त्याला 'Affective Denial Of Pregnancy' अर्थात 'गर्भधारणेला भावनिक नकार' या नावाची स्थिती म्हणून ओळखलं गेलं.
फोटो कॅप्शन, शॅनन सिनियर यांची ही जी मानसिक स्थिती होती, किंवा जो अनुभव होता त्याला 'Affective Denial Of Pregnancy' अर्थात 'गर्भधारणेला भावनिक नकार' या नावाची स्थिती म्हणून ओळखलं गेलं.
    • Author, आयडा फोफाना
    • Role, वेस्ट मिडलँड्स
    • Author, ट्रिश अडुडू
    • Role, बीबीसी रेडिओ डब्ल्यूएम
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

शॅनन सिनियर यांनी 14 वर्षं नर्स म्हणून काम केलं होतं. पण 2023 मध्ये जेव्हा त्या पहिल्यांदा गरोदर राहिल्या, तेव्हा जे काही घडत होतं ते त्यांना अजिबातच स्वीकारता येत नव्हतं, असं त्या सांगतात.

"मला वाटलं की ही गोष्ट आता माझं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे. आणि मला त्याचा पूर्णपणे धक्का बसला होता. पूर्ण नऊ महिने माझ्यासाठी जणू काही ही गोष्ट अस्तित्वातच नव्हती."

सोलिहलमधील राहणाऱ्या शॅनन सिनियर आता आई झालेल्या आहेत. त्यांना एक मुलगी आहे.

त्या सांगतात की, त्यांनी बाळाच्या स्वागताची तयारी करणं, जसं की, बाळाच्या खोलीची सजावट करणं इत्यादी गोष्टी टाळल्या.

शिवाय, शरीरातील बदल लपवण्यासाठी त्यांनी रुग्णालयातलाच 'स्क्रब' अर्थात वैद्यकिय गणवेशाचा वापर अधिक केला.

"माझ्या शरीरानं जणू स्वतःचा बचाव करायला सुरुवात केली होती आणि विचार केला होता की, 'तू जे काम सर्वात उत्तम करतेस, म्हणजेच नर्सचं काम, त्यावरच लक्ष केंद्रित कर'.

त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलमध्ये जे स्क्रब्स (वैद्यकिय गणवेश) घालतो, त्याचा वापर करून मी पोटाचा फुगवटा अगदी चांगल्या प्रकारे लपवू लागले."

शॅनन सिनियर यांची ही जी मानसिक स्थिती होती त्याला 'Affective Denial Of Pregnancy' अर्थात 'गर्भधारणेला भावनिक नकार' या नावाची स्थिती म्हणून ठरवलं गेलं.

त्यामध्ये एखादी व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या आपण गर्भवती आहोत, हे मान्य करते. परंतु, भावनिकदृष्ट्या ते मान्य करत नाही किंवा स्वीकारू शकत नाही.

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

शॅनन सिनियर यांना 'प्री-एक्लॅम्प्सिया' झाला. त्यांचा रक्तदाब 170 पर्यंत पोहोचला आणि त्यांची तातडीनं सिझेरियन शस्त्रक्रिया करण्यात आली.

"मी हॉस्पिटलच्या डबल यलो लाईन्सवर माझी गाडी पार्क केली होती. मी फक्त असा विचार केला होता की, मी धावत आत जाईन, माझा रक्तदाब तपासून घेईन आणि लगेच घरी येईन. पण, मी दोन दिवसांनी एका बाळाला घेऊनच बाहेर पडले."

"जेव्हा मी संमतीपत्रावर सही केली, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे काय चाललं आहे आणि खरं तर मी पूर्णपणे गोंधळून गेले होते."

मुलगी लिलीच्या जन्मानंतर, आपल्याला अपेक्षित असलेला मातृत्वाचा अनुभव मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला, असंही सिनियर सांगतात.

"लिलीच्या आयुष्यातील पहिल्या नऊ आठवड्यांमध्ये, मी ती आई नव्हते जशी सगळ्यांना अपेक्षित असते."

"मला सगळे म्हणायचे की, 'बाळंतपणानंतर तुझ्यात बाळाबद्दल प्रचंड प्रेम निर्माण होईल,' पण माझ्या बाबतीत तसं कधीच घडलं नाही. जेव्हा त्यांनी लिलीला माझ्या शरीरावर ठेवायचा प्रयत्न केला, तेव्हा माझी मानसिकता साधारण अशी होती की, 'मला तिला घ्यायचं नाही, तिला माझ्याकडे देऊ नका.'

'मी सहनशक्तीच्या पलीकडे गेले होते'

डिसेंबर 2024 पर्यंत तर त्यांच्या मानसिक आरोग्यात आणखीनच बिघाड झाला होता, असं सिनियर सांगतात.

अत्यंत तणावानंतर ट्रॉमा युनिटमध्ये शिफ्ट केल्यानंतर त्यांनी स्वत:चाच जीव घेण्याचा प्रयत्न केला.

"मला वाटलं, 'जर मी रुग्णांची शुश्रूषासुद्धा करू शकत नसेल, मी एक चांगली आई सुद्धा बनू शकत नसेल, आणि माझ्या स्वतःच्या मुलीला देखील शांत करू शकत नसेल, तर मग माझ्या इथं असण्याला देखील काहीच अर्थ नाही'," असं त्या आता सांगतात.

अखेरीस त्यांनी दाई आणि आरोग्य सेविकांकडून व्यावसायिक मदत घेतली. त्यामुळे त्यांना स्थिर होण्यास मदत झाली.

"माझ्या आरोग्य सेविका सोन्यासारख्या होत्या," असं त्या सांगतात.

"मी ठरवलं की, मला स्वतःला प्राधान्य द्यायलाच हवं. मी स्वत:ला समजावलं की, 'एनएचएस' माझ्याशिवाय चालू शकतं. आणि आश्चर्य म्हणजे, मी तिथं जाऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत, तरीही ते आजही टिकून आहेच."

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

'ही वेळ पूर्णपणे वेगळी आहे.'

आता शॅनन सिनियर पुन्हा सहा महिन्यांच्या गरोदर आहेत. त्यांना मुलगा होणार आहे.

त्या या गर्भधारणेचं वर्णन त्यांच्या 'पहिल्या गर्भधारणेपेक्षा पूर्णपणे वेगळा अनुभव' अशा शब्दात करतात.

आणि त्या पुढे सांगतात की, या वेळी त्या आपली गर्भधारणा स्वीकारू शकल्या आहेत व आपल्या बाळासाठीची आवश्यक ती सगळी तयारी करू शकल्या आहेत.

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

स्वतः मानसिक आरोग्याच्या संकटाचा अनुभव घेतल्यामुळे, सिनियर यांची अशी इच्छा आहे की, गरोदरपणात किंवा बाळंतपणानंतर अशा प्रकारचा संघर्ष करणाऱ्या इतर स्त्रियांनी टोकाची परिस्थिती निर्माण होण्यापूर्वीच मदत घ्यावी.

"मदत मागायला घाबरू नका. तुम्हाला मनोरुग्णालयात दाखल केलं जाणार नाही. तुम्हाला उचलून नेलं जाणार नाही आणि तुमच्या मुलांना तर नक्कीच नेलं जाणार नाही."

"जेव्हा तुम्ही त्या टोकाच्या मर्यादेपर्यंत पोहोचता, तेव्हा असं होण्याची शक्यता असते. त्यामुळे, जसं तुमच्या लक्षात येईल की असं काहीतरी होत आहे, तसं तुम्ही लगेच मदत घेतली पाहिजे. आणि खरं सांगायचं तर, त्यामुळे माझं आयुष्यच बदलून गेलं," असं त्या सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)