पायधुनीतल्या एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यूप्रकरणी जेजे रुग्णालयाचा अहवाल पोलिसांकडे सादर

- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 2 मिनिटे
मुंबईतील पायधुनी परिसरातील डोकाडिया कुटुंबाच्या चार सदस्यांचा मृत्यू कसा झाला याचे कारण सांगणारा अहवाल जेजे रुग्णालयाने पोलिसांकडे सादर केला आहे.
फॉरेन्सिकच्या अहवालनंतर आता जेजेकडून मृत्यूचं कारण स्पष्ट करण्यात असून या चौघांचा मृत्यू झिंक फॉस्फाइड या विषामुळेच झाल्याचे म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी ही माहिती दिली.
फॉरेन्सिक आणि जेजेच्या अहवालानंतर आता सारं लक्ष आता पोलिसांच्या तपासाकडे आहे.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील पायधुनीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चारही जणांचा मृत्यू झाल्याची घटना 25 एप्रिलच्या रात्रीच्या जेवणानंतर घडली होती. कुटुंबातील सर्वांना जुलाब आणि उलटीचा त्रास झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता.
पायधुनी परिसरातील जुनी इमारत असलेल्या मोघल इमारतीत पहिल्या मजल्यावर हे कुटुंब राहत होतं.
अब्दुल्ला डोकाडिया(40 वर्षे), त्यांच्या पत्नी नसरीन डोकाडिया (35वर्षे) तसंच 16 आणि 13 वर्षे वयाच्या दोन मुली असं हे कुटुंब होतं.
या कुटुंबानं 25 एप्रिल रोजी रात्री साधारण दहा ते साडे दहा वाजता काही नातेवाईकांसह जेवण केलं होतं.
त्यानंतर नातेवाईक गेल्यानंतर रात्री उशिरा सुमारे दीड वाजता त्यांनी कलिंगड खाल्ल्याची माहिती असल्याचं पोलिसांनी सांगितलं होते.
फॉरेन्सिकच्या अहवालात काय सांगण्यात आले होते?
या प्रकरणी जेजे पोलीस ठाण्यात अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
त्यांनी खाल्लेल्या पदार्थांचे नमुने पोलिसांनी जप्त केले होते. कलिंगडाचेही नमुने आणि त्यांच्या शरीरातील नमुनेही घेतले होते.
फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार सर्व मृत व्यक्तींच्या व्हिसेरा नमुन्यांमध्ये यकृत, मूत्रपिंड आणि प्लीहा तसेच पोटातील घटक, पित्त आणि पोटातील मेदाच्या नमुन्यांमध्ये झिंक फॉस्फाइड आढळले.
झिंक फॉस्फाईड हे एक अतिशय विषारी रासायनिक संयुग आहे.
ते प्रामुख्याने उंदीर, घुशी आणि इतर कृंतक प्राणी(रोडंट) मारण्यासाठी वापरलं जातं. हा पदार्थ शेती आणि धान्य साठवणुकीत कीटकनाशक (Rodenticide) म्हणून वापरला जाते.

FDA च्या अहवालात काय आढळलं होतं?
पायधुनी येथील डोकाडिया कुटुंबातील चारही जणांच्या मृत्यूनंतर FDA कडून कलिंगडाच्या सालीचे नमुने तपासण्यासाठी दिले होते.
त्याबाबत घेतलेल्या नमुन्यांमध्ये कोणतीही भेसळ आढळली नाही, असं स्पष्ट झाल्याची माहिती एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.
दरम्यान, ही चाचणी कोणत्याही प्रकारच्या विषबाधेसंदर्भात तपासण्यासंदर्भात नव्हती, असंही त्यांनी स्पष्ट केलेलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























