कलेजी खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट? 'या' लोकांनी कलेजी खाणं टाळावं

कलेजी
    • Author, सिराज
    • Role, बीबीसी तमिळ
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"बोकडाची कलेजी (यकृत) खाल्ल्यानं आपल्या यकृताला झालेलं नुकसान भरून निघतं", एका चित्रपटातील हा संवाद आहे. पण तो विनोदाच्या स्वरुपात वापरण्यात आला आहे.

खाद्य पदार्थांमध्ये यकृताला 'कलेजी' असा शब्दप्रयोग वापरला जातो.

मात्र खरोखरंच यात काही तथ्य आहे का?

कोंबडी (चिकन) किंवा बोकडाचं यकृत (लिव्हर) किंवा कलेजी खाल्ल्यामुळे आपल्या यकृताची झालेली हानी किंवा नुकसान भरून निघतं का?

अमेरिकेतील, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या मते, यकृत किंवा कलेजी फक्त कोंबडी किंवा बोकडाचंच नसतं. तर गाय आणि डुकराचीदेखील कलेजी असते. त्यात जीवनसत्त्व, लोह, प्रथिने आणि इतर पोषक घटक असतात.

कलेजी खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?

"आपल्याला सहजपणे उपलब्ध होणाऱ्या चिकन किंवा बोकडाच्या कलेजीमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक असतात. उदाहरणार्थ, त्यात 'हीम आयर्न' मोठ्या प्रमाणात असतं. ते आपल्या शरीरात सहजपणे शोषलं जातं. यामुळे शरीरातील रक्ताभिसरणाला मदत होते आणि ॲनिमिया टाळता येतो," असं डॉक्टर आणि मधुमेह तज्ज्ञ प्रशांत अरुण म्हणाले.

ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय, यात लाल रक्तपेशींचं प्रमाण कमी होतं आणि त्यामुळे अशक्तपणा, थकवा येतो.

डॉक्टर आणि मधुमेह तज्ज्ञ प्रशांत अरुण असंही म्हणतात की, कलेजीमध्ये व्हिटामिन बी12 असतं. ते लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये, मज्जासंस्थेचं आरोग्य, मेंदूचा विकास आणि स्मरणशक्तीच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावतं.

कलेजी खाणं आरोग्यासाठी चांगलं की वाईट?
फोटो कॅप्शन, प्राण्यांच्या यकृतामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात.

"प्राण्यांच्या कलेजीमध्ये उच्च दर्जाची प्रथिनं (प्रोटीन) मोठ्या प्रमाणात असतात. स्नायूंची दुरुस्ती होण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी ते महत्त्वाचं असतं. आजारपणानंतर शरीर सावरण्यासाठीदेखील या प्रथिनांची मदत होते," असं प्रशांत अरुण म्हणाले.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, यकृत किंवा कलेजीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन ए असतं.

आजार आणि संसर्गाच्या विरोधात, शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीचं कार्य योग्यप्रकारे होण्यासाठी व्हिटामिन ए ची मदत होते.

याव्यतिरिक्त, निरोगी दृष्टीसाठी, त्वचेच्या आरोग्यासाठी आणि नाकासारख्या आपल्या शरीरातील काही भागांच्या आवरणांचं आरोग्य राखण्यासाठीदेखील, व्हिटामिन ए उपयोगी ठरतं.

ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या अहवालानुसार, दूध, चीज, अंडी आणि सॅल्मन व सार्डिनसारख्या चरबीयुक्त माशांमध्ये व्हिटामिन ए आढळतं. मात्र प्राण्यांच्या कलेजीमध्ये ते सर्वाधिक प्रमाणात आढळतं.

मुलांना कलेजी खाण्यास देणं योग्य असतं का?

"कलेजीमध्ये 'हीम आयर्न' मोठ्या प्रमाणात असतं. सामान्यपणे ते मांसाहारी पदार्थांमध्ये आढळतं. त्यामुळे 5 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून एकदा 50 ग्रॅम शिजवलेल्या स्वरुपातील आयर्न किंवा लोह खायला दिलं जाऊ शकतं. तर 10 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना आठवड्यातून एकदा 50 ते 100 ग्रॅम शिजवलेल्या स्वरुपातील लोह दिलं जाऊ शकतं," असं पोषणतज्ज्ञ तारिणी कृष्णन म्हणतात.

त्या असंही नमूद करतात की कलेजीमध्ये असलेलं व्हिटामिन बी12 मुलांच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. तरीदेखील मुलांना ते मर्यादित स्वरुपात देणंच योग्य ठरतं.

डॉक्टर आणि मधुमेह तज्ज्ञ प्रशांत अरुण
फोटो कॅप्शन, डॉक्टर आणि मधुमेह तज्ज्ञ प्रशांत अरुण.

मात्र तारिणी कृष्णन यांचं म्हणणं आहे की मुलांना तेलात तळलेली कलेजी देऊ नये. त्या म्हणतात, "कारण तळल्यावर त्यातील व्हिटामिन बी12 नष्ट होतं. त्यामुळे ते ग्रेव्ही किंवा सूपच्या स्वरुपात शिजवणं अधिक योग्य ठरतं."

त्याचप्रमाणे, तारिणी कृष्णन म्हणतात की प्रौढांसाठी आठवड्यातून एकदा 100 ते 200 ग्रॅम कलेजी खाणं पुरेसं ठरतं.

कलेजी कोणी खाऊ नये?

युकेची नॅशनल हेल्थ सर्व्हिस सल्ला देते की, गरोदर महिलांनी कलेजी खाणं टाळलं पाहिजे. कारण त्यामध्ये व्हिटामिन ए मोठ्या प्रमाणात असतं. खूप अधिक प्रमाणात व्हिटामिन ए चं सेवन केल्यास त्यामुळे गर्भातील बाळाला अपाय होऊ शकतो.

व्हिटामिन ए चा विचार करता, 19 ते 64 वर्षे वयोगटातील प्रौढ पुरुषांसाठी दररोज 700 मायक्रोग्रॅम आणि महिलांसाठी दररोज 600 मायक्रोग्रॅम व्हिटामिन ए चं सेवन करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे.

प्राण्यांच्या यकृतामध्ये उच्च दर्जाचे प्रोटीन मोठ्या प्रमाणात असतात

काही अभ्यासातून सुचवण्यात आलं आहे की अनेक वर्षे दररोज सरासरी 1500 मायक्रोग्रॅमहून अधिक व्हिटामिन ए चं सेवन केल्यास त्याचे हाडांवर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे वाढत्या वयात हाडं सहजपणे मोडण्याची शक्यता वाढते.

विशेषकरून ज्या वृद्धांना, त्यातही ज्या महिलांना ऑस्टिओपोरोसिसचा मोठा धोका आधीच आहे, त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ऑस्टिओपोरोसिस या आजारात हाडं कमकुवत होतात.

"ज्या लोकांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त आहे, अशा लोकांनी कलेजी खाणं टाळलं पाहिजे. त्याचप्रमाणे, 2 वर्षांखालील मुलांनी कलेजी खाणं टाळलं पाहिजे. ज्या लोकांना ॲलर्जी आहेत, त्यांनीदेखील हे न खाणंचं योग्य ठरतं," असं डॉ. प्रशांत अरुण म्हणाले.

बोकडाची की चिकनची, कोणती कलेजी चांगली असते?

"प्राण्यांच्या कलेजीमध्ये पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. जे काही सहजपणे उपलब्ध असेल, त्याचं माफक स्वरुपात सेवन करणं सर्वोत्तम ठरतं," असं पोषणतज्ज्ञ तारिणी कृष्णन म्हणाल्या.

त्याच वेळी, चिकन आणि बोकडाच्या कलेजीमध्ये समान प्रमाणात पोषक घटक असतात, असं इरोडमधील बालरोगतज्ज्ञ अरुण कुमार म्हणाले.

"विविध घटकांचा विचार करता, चिकन आणि बोकड या दोघांच्याही प्रत्येकी 100 ग्रॅम कलेजीमध्ये 160-170 कॅलरी असतात. तसंच 20-25 ग्रॅम प्रोटीन असतात, 5 ग्रॅम चरबी असते आणि 400-500 मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल असतं," असं डॉ. अरुण कुमार म्हणाले.

प्राण्यांच्या यकृताचं अती प्रमाणात सेवन केल्यास त्यामुळे मानवी यकृतावर ताण पडतो
फोटो कॅप्शन, प्राण्यांच्या यकृताचं अती प्रमाणात सेवन केल्यास त्यामुळे मानवी यकृतावर ताण पडतो.

बोकडाच्या कलेजीमधील व्हिटामिन ए बद्दल ते म्हणाले, "बोकडाच्या 100 ग्रॅम कलेजीमध्ये व्हिटामिन ए चे 6000 युनिट्स असतात. आपल्याला दररोज 5000 युनिट्स व्हिटामिन ए ची आवश्यकता असते. त्यापेक्षा हे प्रमाण अधिक आहे."

मात्र, चिकनच्या कलेजीमध्ये व्हिटामिन ए चे 16,000 युनिट्स असतात. "हे प्रमाण आपल्या दैनंदिन आवश्यकतेपेक्षा तिप्पट आहे," असं ते म्हणाले.

"व्हिटामिन ए किंवा कलेजीचे अती प्रमाणात सेवन केल्यास, त्यामुळे 'हायपरविटामिनोसिस ए' हा आजार होऊ शकतो किंवा त्यामुळे मानवी यकृतात पोषक घटकांचा अतिरिक्त साठा होऊ शकतो. त्यामुळे यकृताचं नुकसानदेखील होऊ शकतं," असा इशारादेखील ते देतात.

"त्यामुळे, बोकडाच्या कलेजीऐवजी लहान मुलांना प्राधान्य दिलं जाऊ शकतं. आठवड्यातून एकदा 50 ग्रॅमहून अधिक प्रमाणात कलेजी खाणं खाऊ नये," असं अरुण कुमार म्हणतात.

प्राण्यांची कलेजी खाल्ल्यामुळे, मानवी यकृताची झालेली हानी, भरून निघू शकते का?

"अर्थातच, प्राण्यांची कलेजी खाल्ल्यामुळे मानवी यकृताची झालेली हानी भरून निघू शकत नाही. कोणताही वैज्ञानिक पुरावा नसतानाही अनेकांचा तसा समज आहे," असं डॉ. प्रशांत अरुण म्हणाले.

"याकडे डिटॉक्सिफिकेशन म्हणून पाहू नये. यामागचं कारण असं की फक्त यकृतच शरीरातील अशुद्धी काढून त्याला स्वच्छ करू शकतं. ते स्वत:लादेखील स्वच्छ करू शकतं. त्यासाठी, प्राण्यांच्या वेगळ्या यकृत किंवा कलेजीची कोणतीही आवश्यकता नसते," असं ते म्हणाले.

डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीर शुद्धीची क्रिया.

"संतुलित, आरोग्यदायी आहार, व्यायाम आणि पुरेशी झोप या गोष्टी यकृताचं रक्षण करतात," असं प्रशांत अरुण म्हणतात.

त्यामुळे प्राण्यांचं यकृत किंवा कलेजी आणि मानवी यकृत यामधील एक महत्त्वाचा संबंध म्हणजे, जर तुम्ही अती प्रमाणात प्राण्यांच्या कलेजीचं सेवन केलं, तर त्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात असलेल्या 'व्हिटामिन ए' मुळे मानवी यकृतावर नक्कीच ताण पडू शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)