माशाच्या स्पर्मपासून पक्ष्यांच्या विष्ठेपर्यंत; सुंदर त्वचेसाठी काहीही? वैज्ञानिकांनाही प्रश्न पडणारे स्किनकेअर ट्रेंड्स

    • Author, डेव्हिड कॉक्स
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

चेहऱ्यासाठी क्रिम, फेसपॅक, उटणं, साबण एवढंच असतं, असं वाटत होतं? थांबा जरा! आजच्या स्किनकेअर ट्रेंडमध्ये सॅल्मन माशाचे शुक्राणू, पक्ष्यांची विष्ठा, आणि स्वतःच्या रक्ताचा फेशियल हे सगळं अगदी आत्मविश्वासाने चेहऱ्यावर थापलं जातंय.

इन्स्टाग्राम रील्स आणि सेलिब्रिटींच्या मुलाखती पाहिल्या तर हे खरंच सौंदर्योपचार आहेत की इंटरनेटवरचा वेडेपणा?' असा प्रश्न पडणं सहज आहे.

मात्र गंमत म्हणजे, ऐकायला जरी हे उपाय विचित्र वाटले तरी, त्यांच्या मागे थोडं‑फार शास्त्र दडलेलं आहे. मग प्रश्न उरतोच तो म्हणजे, हे ट्रेंड फक्त फॅड आहेत की भविष्यातल्या स्किनकेअरची एक झलक?

चला तर मग, किडे‑मासे‑रक्ताच्या या सौंदर्यविश्वात डोकावूया...

आता आधी जाऊया दक्षिण कोरियाची राजधानी असलेल्या सोल शहरात. दक्षिण कोरियात सौंदर्य प्रसाधनांचं किती वेड आहे हे तुम्हाला माहिती असेलच. अनेक सौंदर्य प्रसाधनं इथं तयार होतात.

तर सोलमध्ये 'यू अँड आय' नावाचं एक क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये त्वचेचा पोत सुधारावा म्हणून एकप्रकारचे उपचार केले जातात.

या उपचाराला भरपूर मागणी आहे. यात सॅल्मन माशाच्या वीर्यातील डीएनएचे सुक्ष्म भाग त्वचेच्या डर्मिस या थरात इंजेक्शनद्वारे सोडले जातात. डर्मिस हा आपल्या त्वचेचा मधला थर असतो. या थरामध्ये रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि इतर ग्रंथी अशतात.

याबद्दल या क्लिनिकमधले सौंदर्यतज्ज्ञ आणि यॉन्सेई विद्यापीठातील प्राध्यापक क्यू-हो यी माहिती देतात. ते म्हणाले, "हा उपचार काही त्वचेला आकार देणाऱ्या फिलरसारखा नाही. या उपचाराचा उद्देश त्वचा तयार करणं म्हणजे स्किन प्रायमिंग आणि तिला जैविक उत्तेजन देणं म्हणजे बायोस्टिम्युलेशन घडवून आणणं हा आहे. म्हणजेच त्वचेच्या आतली परिस्थिती अधिक निरोगी करणं, त्वचेच्या दुरुस्ती प्रक्रियेला मदत करणं हे घडवून आणलं जातं."

आता पहिल्यांदाच ऐकत असाल तर हे जरा विचित्रच वाटेल. पण यी सर सांगतात, "या पद्धतीचा उगम रिजनरेटिव्ह मेडिसिन म्हणजे पुनरुत्पादक वैद्यकशास्त्र आणि जखम भरुन येण्याच्या क्रियेत आहे."

यामध्ये संशोधकांचं लक्ष युद्धात जखमी झालेल्या सैनिकांच्या चेहऱ्यावरील व्रण भरुन काढण्यासाठी मासळीतील डीएनएचे सूक्ष्म भाग वापरले जाऊ शकतात याकडे गेलं. तसेच डीएनएचे हे भाग उतींच्या म्हणजे टिश्यूंच्या दुरुस्तीला मदत करू शकतात याकडे त्यांचं लक्ष गेलं.

याबद्दलची शास्त्रीय माहिती अजुनही तुलनेत मर्यादित आहे. मात्र काही अभ्यासातून सॅल्मनच्या वीर्यातून शुद्ध केलेल्या पॉलिन्युक्लिओटाइडसचा वापर चेहऱ्यावरच्या सुक्ष्म सुरकुत्या कमी दिसाव्यात यासाठी केला जाऊ शकतो.

अमेरिकेतल्या माऊंट सायनाय हॉस्पिटलमध्ये जोशुआ झाईखनर त्वचारोगतज्ज्ञ म्हणून काम करतात. ते सहयोगी प्राध्यापकही आहेत. त्यांनी याआधी अनेक स्किनकेअर कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम केलंय.

ते सांगतात, "या उपचारांमुळे त्वचेमधला जलांश/ओलावा म्हणजे हायड्रेशन, तिचा पुष्टपणा, पोत तसेच सुरकुत्या सुधारण्यासाठी मदत होते, असं आढळलंय."

ते पुढं सांगतात, "आता त्वचेच्या उपचारांसाठी सर्वप्रथम कोणी कसं वापरायचा निर्णय घेतला हे माहिती नाही. पण सध्या याचा भरपूर वापर केला जातोय हे नक्की."

दक्षिण कोरिया आता सौंदर्योपचारांच्या जगतात ट्रेंडसेटर म्हणून ओळखला जाऊ लागलाय. यालाच 'के ब्युटी क्रेझ' असं म्हटलं जातं. त्यामुळे सॅल्मन किंवा इतर माशांच्या वीर्याच्या इंजेक्शनचे कथित फायदेही जगभरात गेले आहेत. याला चार्ली XCX पासून जेनिफर अ‍ॅनिस्टनपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या चर्चेमुळे चालना मिळाली आहे.

या उपचारांची लोकप्रियता वाढत असतानाच, पक्ष्यांच्या विष्ठेपासून बनवलेले फेसमास्क आणि रक्ताचा वापर करणारे 'व्हॅम्पायर फेशियल' अशा इतरही विचित्र वाटणाऱ्या स्किनकेअर उपचारांचा वापर वाढला आहे.

पण हे सगळे अनोखे आणि ट्रेंडी स्किनकेअर उपचार खरंच परिणामकारक आहेत का? हा प्रश्न आहेच.

प्राचीन सौंदर्यपरंपरा

इतिहासाची पुस्तकं चाळली तर त्वचेसंदर्भातल्या सौंदर्य उपचारांची परंपरा किती जुनी आणि अनेकदा विचित्र वाटणारी आहे हे सहज लक्षात येईल.

इजिप्तची क्लिओपात्रा राणी गाढविणीच्या दुधानं अंघोळ करे अशी आख्यायिका आहे. म्यानमारमध्ये गेली अनेक शतकं 'थनाका' नावाचा लेप चेहऱ्यांवर लावत आहेत. हा लेप झाडाच्या सालीपासून तयार केला जातो.

हा लेप सौंदर्यासाठी वापरला जातोच त्याहून तो उन्हापासून संरक्षण करण्यासाठीही वापरला जातो.

रोमन काळात एक एकदम कुप्रसिद्ध उपाय होता. त्वचेवरचे डाग घालवण्यासाठी लहान मगरीची आतडी वाटून लावली जायची.

या प्राचीन उपचारांपैकी काही काळाच्या कसोटीवर पास झाले आहेत असं आधुनिक त्वचाविज्ञान सांगतं.

हळद, टायगर ग्रास, समुद्री शेवाळ यासारख्या पदार्थातली घटकद्रव्यं दाहशामक आहेत तसेच त्वचेतला ओलावा टिकून राहाण्यासाठी त्यातले घटक उपयोगी पडतात. त्यामुळे आजही त्यांचा वापर स्किनकेअर उत्पादनांमध्ये होतो.

2022 साली एक अभ्यास करण्यात आला यामध्ये 12 व्या शतकापासून इटलीत त्वचेसंबंधी जे उपचार करण्यात आले होते त्याचा अभ्यास केला गेला.

या उपचारांचा उल्लेख मध्ययुगीन महिला वैद्यकतज्ज्ञ 'ट्रोटा ऑफ सालेर्नो'च्या लेखनात आढळतो.

फावा बिन्स, व्हिनेगर सारखी त्याकाळात सुचवलेली द्रव्यं आजही चेहरा स्वच्छ करण्यासाठी, त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यासाठी आणि कोरडी त्वचा दुरुस्त करण्यासाठी आजही परिणामकारक मानली जातात.

टार्टर ऑइलमधलं 'टार्टरिक आम्ल' आजच्या आधुनिक त्वचेसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांत वापरलं जातं.

गिशा फेशिअल्स आणि मासिक पाळीतल्या द्रवाचे मास्किंग

ही गोष्ट फक्त निसर्गात आढळणाऱ्या वनस्पती, औषधी वनस्पती किंवा खनिजांपुरती मर्यादित नाही. तथाकथित 'गिशा फेशिअल'मध्ये नाइटिंगेल (रानकोंबडीसारखा एक पक्षी) पक्ष्यांच्या विष्ठेचा वापर केला जातो.

ही विष्ठा प्रखर अशा अल्ट्राव्हायोलेट प्रकाशाच्या साहाय्याने निर्जंतूक केली जाते, त्यात एक्सफोलिएंट आणि ब्राइटनर यांसारखी इतर रसायने मिसळली जातात आणि मग ती फेस मास्कप्रमाणे चेहऱ्यावर लावली जाते.

ही विष्ठाकेंद्री (कॉप्रीसेंट्रिक) पद्धत जपानमधील शतकानुशतके जुन्या शोधातून उदयास आली.

जपानी बूश वॉर्बलर (नाइटिंगेलचा एक प्रकार) पक्ष्यांच्या विष्ठेचा वापर कापडावरील रंग काढून टाकण्यासाठी करता येतो, असे तेव्हा लक्षात आलंहोतं.

पुढे याच कारणामुळे जपानी महिला कलाकारांनी त्वचा गोरीपान करण्यासाठी आणि चेहऱ्यावरचा दाटसर केलेला मेकअप काढण्यासाठी या विष्ठेचा वापर करायला सुरुवात केली.

आजकाल ही पद्धत जगभरातील विविध क्लिनिकमध्ये त्वचा उजळवण्यासाठी लोकप्रिय झाली आहे आणि यामागे काही प्रमाणात शास्त्रीय आधारही असू शकतो.

झाईखनर यांच्या मते, "नाइटिंगेल पक्ष्यांच्या विष्ठेमध्ये युरियाचं प्रमाण खूप जास्त असते. युरियामध्ये त्वचा मऊ करण्याचे अत्यंत प्रभावी गुणधर्म असतात, म्हणूनच ते अनेक मॉइश्चरायझरमध्ये वापरले जातं."

यामध्ये ग्वानिन नावाच्या अमिनो आम्लाचे प्रमाणही जास्त असते. "अमिनो आम्लांमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि ती उजळण्यास मदत होते, असे आढळून आले आहे," असे झाईखनर सांगतात.

"पण हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की या उपचारांमध्ये नाइटेंगल पक्ष्यांची शुद्ध व बदललेली विष्ठाच वापरली जाते. रस्त्यावर पडलेली पक्ष्यांची विष्ठा उचलून ती चेहऱ्यावर चोळू नये." असं सांगायला ते विसरत नाहीत.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या उपचारांवरील अनेक अभ्यास सौंदर्यप्रसाधन उद्योगाकडून निधी मिळालेल्या किंवा त्या कंपन्यांमध्येच काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केलेले आहेत.

दरम्यान, संशोधक मात्र आणखी एका तथाकथित 'डू-इट-युअरसेल्फ' स्किनकेअर ट्रेंडबाबत फारसे उत्साही नाहीत. हा ट्रेंड म्हणजे 'मेंस्ट्रुअल मास्किंग' म्हणजेच मासिक पाळीचे रक्त चेहऱ्यावर लावण्याचा मास्क.

मासिक पाळीच्या द्रवातून मिळणारे प्लाझ्मा जखम भरून येण्यास मदत करू शकते, असं 2018 साली करण्यात आलेल्या एका अभ्यासात सुचवलं गेलं होतं. मात्र किंग्स कॉलेज लंडनमधील त्वचारोग संशोधक 'बेईबेई ड्यू-हार्पर' यांना याबाबत अजून शंका आहे.

त्या म्हणतात, "कोणताही डॉक्टर किंवा तज्ज्ञ कधीच याची शिफारस करणार नाही,"

"माझ्या मते हा फक्त धक्कादायक वाटावा आणि जास्त व्ह्यूज मिळावेत म्हणून TikTokवर निर्माण झालेला एक ट्रेंड आहे.",असं त्या सांगतात.

व्हॅम्पायर फेशियल्स आणि प्लेटलेटयुक्त प्लाझ्मा (PRP)

ड्यू-हार्पर यांच्या मते, त्वचेचं तारुण्य टिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्लेटलेट-समृद्ध प्लाझ्मा (PRP) इंजेक्शन्सबाबत (ज्यांना कधी कधी "व्हॅम्पायर फेशियल" असंही म्हणतात) काही प्रमाणात आशादायक संकेत दिसत आहेत.

या प्रक्रियेत रुग्णाचं रक्त घेतात आणि ते सेंट्रीफ्यूज मशीनमध्ये फिरवून त्याचे विविध घटक वेगळे केले जातात.

या प्रक्रियेत प्लाझ्मामधील 'ग्रोथ फॅक्टर्स' म्हणजे पेशींना वाढायला, विभाजित व्हायला आणि दुरुस्ती करायला सूचना देणाऱ्या विशेष प्रकारच्या प्रथिनांची सकेंद्रितता (कॉन्सट्रेशन) वाढवली जाते. नंतर हे रक्त मायक्रोनीडल्सच्या मदतीने चेहऱ्याच्या त्वचेत पुन्हा इंजेक्ट केलं जातं.

शरीरातील स्वतःचे ग्रोथ फॅक्टर्स पुनरुत्पादक (रिजनरेटिव्ह) पद्धतीने वापरण्याची क्षमता सध्या वैद्यकशास्त्रातील अनेक क्षेत्रांमध्ये अभ्यासाचा विषय ठरत आहे.

यात ऑस्टिओआर्थरायटिस आणि सांधेदुखीचे इतर आजार, टक्कल पडणे (अ‍ॅलोपेशिया) आणि जखम भरून येणे यांसारख्या समस्यांचा समावेश आहे.

त्वचेच्या आरोग्यावर PRP चा ठोस परिणाम होतो का, याबाबतचे पुरावे सध्या संमिश्र स्वरूपाचे असले, तरी काही अभ्यासांत 50 आणि 60 या वयोगटातील लोकांमध्ये त्वचेची लवचिकता (इलॅस्टिसिटी) वाढल्याचे, तसेच सुरकुत्या आणि रंगछटा (पिग्मेंटेशन) कमी झाल्याचे आढळले आहे.

"PRP लोकांमध्ये किती यशस्वी ठरते, यामध्ये बराच फरक दिसून येतो," असे ड्यू-हार्पर सांगतात.

त्यांच्या मते, यामागे सेंट्रीफ्यूज प्रक्रियेसाठी वापरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या मशिन्समधील फरक, तसेच काही लोकांच्या रक्तामध्ये ग्रोथ फॅक्टर्सची मात्रा नैसर्गिकरीत्या जास्त किंवा कमी असणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रोथ फॅक्टर्स अधिक प्रमाणात असणेही कारणे असू शकतात.

"म्हणूनच काही वेळा ही पद्धत खूप प्रभावी ठरते, तर काही वेळा तितकी प्रभावी ठरत नाही," असं त्या सांगतात.

स्किनकेअरचं भविष्य

स्किनकेअरमध्ये अगदी विचित्र वाटणाऱ्या ट्रेण्ड्सनाही काही प्रमाणात वैज्ञानिक आधार असू शकतो, मात्र पुढच्या पिढीतील स्किनकेअर उपचारांमध्ये इतर गोष्टींसह कोलेजन सप्लिमेंटेशन अधिक परिणामकारक कसे करता येईल, यावर भर दिला जाईल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.

अलीकडील एका उद्योग-प्रायोजित (इंडस्ट्री-फंडेड) अभ्यासात कोलेजनची भरपाई करण्यासाठी खास तयार करण्यात आलेल्या अमिनो अ‍ॅसिड्स असलेल्या सप्लिमेंट्सचा वापर करण्यात आला.

सहा महिन्यांच्या कालावधीत त्वचेचा पोत, ओलावा (हायड्रेशन) आणि लवचिकता सुधारलीच, पण रुग्णांच्या लाळेवरील DNA चाचण्यांनुसार जैविक वयात सरासरी 1.4 वर्षांची घट झाल्याचेही आढळले.

या विशिष्ट प्रमाणातील अमिनो अ‍ॅसिड्स असलेली कोलेजन सप्लिमेंट्स केवळ त्वचेचे आरोग्यच नव्हे, तर आरोग्याच्या इतर बाबींसाठीही फायदेशीर ठरू शकतात; असा संशोधकांनी निष्कर्ष काढला.

आतापर्यंत त्वचेची आपल्या आरोग्याच्या एकूण आरोग्यात मोठी भूमिका असल्याचे जे संशोधन झाले आहे, त्याच्याशी हे निष्कर्ष मिळतेजुळते आहेत. मात्र या प्रक्रियांबाबत अधिक सखोल संशोधनाची गरज असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

इतर काही नव्या उपचारांमध्ये त्वचेच्या मायक्रोबायोममध्ये म्हणजे आपल्या चेहऱ्यावर राहणाऱ्या आणि त्वचेत होणाऱ्या दाहावर (इन्फ्लमेशन) मोठा परिणाम करणाऱ्या सूक्ष्म जंतूंच्या समूहात नव्या पद्धतीने बदल कसे करता येतील, याचा अभ्यास केला जात आहे.

संभाव्य उपचारांमध्ये त्वचेतील उपयुक्त जीवाणूंना पोषण देण्यासाठी तयार केलेले प्रीबायोटिक्स, तसेच जीवाणूंनी नैसर्गिकरीत्या तयार केलेली रसायने म्हणजेच पोस्टबायोटिक्स यांचा समावेश आहे, असे झाईखनर सांगतात.

गेल्या वर्षी दक्षिण कोरियातील संशोधकांनी रक्तात आढळणाऱ्या एका जीवाणूचा शोध लागल्याचं जाहीर केलं. हा जीवाणू त्वचेच्या पेशींमध्ये जळजळ, ऑक्सिडेटिव्ह ताण आणि कोलेजनचे नुकसान कमी करण्याची क्षमता असलेलं उपयुक्त पोस्टबायोटिक्स तयार करतो पण हा प्रयोग सध्या केवळ प्रयोगशाळेतच यशस्वी ठरला आहे.

झाईखनर सांगतात, "मात्र हे उपचार अधिकृत आणि व्यापक वापरात येण्यासाठी, बाजारात गेल्या अनेक दशकांपासून उपलब्ध असलेल्या पारंपरिक आणि परीक्षित स्किनकेअर उपायांपेक्षा ते अधिक प्रभावी आहेत, हे सिद्ध करणे आवश्यक आहे."

मूळ प्रश्न अजूनही तोच आहे, तो म्हणजे हे ट्रेण्डी किंवा फॅड उपचार खरोखरच आपल्या बाजारात उपलब्ध पारंपरिक स्किनकेअर उत्पादनांपेक्षा अधिक फायदे देतात का?

झाईखनर म्हणतात. "अजून हे कोडं पूर्ण सुटलेलं नाही."

त्वचेला एका वेळचा ओलावा मिळावा यासाठी आणि ती चमकदार होण्यासाठी जवळपास 45,000 रुपये देऊन फेशियल करून घेण्यापेक्षा, सकाळी सनस्क्रीन वापरून त्वचेला पर्यावरणीय क्षतीपासून संरक्षण देणे आणि रात्री नाईट मॉइश्चरायझरसोबत रेटिनॉलसारखा कोलेजन वाढवणारा घटक सातत्याने वापरणारी त्वचा-देखभाल दिनचर्या पाळणे अधिक योग्य ठरेल, असे झाईखनर सुचवतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)