'आर्थिक वादळ येतंय आणि आमचे पंतप्रधान इटलीमध्ये टॉफी वाटत आहेत'; राहुल गांधींची टीका, भाजपचे प्रत्युत्तर

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, x.com/GiorgiaMelon

फोटो कॅप्शन, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात इटलीमध्ये पोहोचले. तिथे त्यांनी इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांची भेट घेतली.

त्यानंतर इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी एक्स या सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करत लिहिलं, या गिफ्टसाठी धन्यवाद. व्हीडिओमध्ये पंतप्रधान मोदी त्यांना टॉफी (चॉकलेट)चं एक पॅकेट देताना दिसत आहेत.

यावर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून पंतप्रधान मोदींवर टीका केली.

"आर्थिक वादळ येतं आहे आणि आमचे पंतप्रधान इटलीमध्ये टॉफी वाटत आहेत! शेतकरी, तरुण, महिला, मजूर आणि छोटे व्यापारी सर्वजण त्रस्त आहेत. पंतप्रधान हसून रील बनवत आहेत आणि भाजपावाले टाळ्या वाजवत आहेत. हे नेतृत्व नाही, तर नौटंकी आहे," असं राहुल गांधींनी लिहिलं आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, ANI

याआधी इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी यांनी एक्स या सोशल मीडियावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा त्यांचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "वेलकम टू रोम, माय फ्रेंड!"

पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधी जून 2024 मध्ये जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी इटलीला गेले होते.

'भारत आणि भारतात तयार झालेल्या प्रत्येक वस्तूबाबत इतका तिरस्कार का' पीयूष गोयल यांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एक्सवर पोस्ट करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

पीयूष गोयल यांनी एक्सवर लिहिलं आहे, "राहुल गांधी यांना भारत आणि भारतात तयार झालेल्या प्रत्येक वस्तूबद्दल इतका तिरस्कार का आहे? भारत आज मेड इन इंडिया आणि लोकल गोज ग्लोबलच्या माध्यमातून जगाचं विश्वासार्ह केंद्र बनला आहे. मात्र काँग्रेसला प्रत्येक भारतीय कामगिरीमध्ये समस्याच दिसते."

पियूष गोयल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पियूष गोयल

त्यांनी पुढे लिहिलं आहे, "ज्या जागतिक सन्मान, गुंतवणूक आणि विश्वासाची देश अनेक दशकं वाट पाहत होता, ते आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत साध्य करतो आहे. ही गोष्ट राहुल गांधी यांना सहन होत नाही."

रायबरेलीतील सभेत राहुल गांधी काय म्हणाले?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे रायबरेली या त्यांच्या लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. 20 मे रोजी राहुल गांधी यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर भाषण केलं.

राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा तुम्ही घरी परत जाल आणि आरएसएसचे कार्यकर्ते तुमच्यासमोर येतील, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याबद्दल बोलतील, तेव्हा त्यांना तुम्ही सांगा की तुमचे पंतप्रधान गद्दार आहे, तुमचे गृहमंत्री गद्दार आहे, तुमची संघटना गद्दार आहे."

"तुम्ही भारताला विकण्याचं काम केलं आहे. तुम्ही आमच्या राज्यघटनेवर हल्ला केला आहे. तुम्ही आंबेडकरजी, गांधीजी यांच्यावर हल्ला केला आहे."

'नरेंद्र मोदींनी देशाची आर्थिक व्यवस्था विकली आहे'

रायबरेलीमध्ये पंतप्रधान मोदींवर आरोप करत राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदींनी भारताची आर्थिक व्यवस्था विकली आहे."

"नरेंद्र मोदी आणि भारत सरकार तुम्हाला वाचवू शकणार नाही. दोन-तीन महिन्यांमध्ये तुमच्या लक्षात येईल की किती जबरदस्त धक्का बसणार आहे. नरेंद्र मोदी जसं कोरोना आणि नोटबंदीच्या वेळेस रडले होते, तसंच आता रडतील आणि म्हणतील की 'माझी चूक नाही.' मी तुम्हाला सांगतो की चूक फक्त नरेंद्र मोदी, अमित शाह आणि आरएसएसची आहे. कारण त्यांनी देशाची राज्यघटना संपवली आहे."

राहुल गांधी आणि अमेठीचे काँग्रेसचे खासदार किशोरी लाल शर्मा

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, राहुल गांधी आणि अमेठीचे काँग्रेसचे खासदार किशोरी लाल शर्मा

राहुल गांधी म्हणाले, "नरेंद्र मोदी तुम्हाला सांगत आहेत की परदेशात जाऊ नका, सोनं खरेदी करू नका, इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करा. आगामी काळात शेतकऱ्याकडे खतंदेखील नसतील. आर्थिक वादळ येतं आहे. तुम्ही पाहा, काही महिन्यातच महागाई कुठे पोहोचते. पेट्रोल, डिझेल, गॅस, डाळी आणि तांदळाच्या किमती कुठे पोहोचतात. पंतप्रधान उघडपणे म्हणतात की परदेशात जाऊ नका आणि मग स्वत: हजारो कोटी रुपयांच्या विमानातून परदेशात जातात."

भाजपा नेत्यांची राहुल गांधींवर टीका

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आणि त्यांचे नेते सातत्यानं राहुल गांधीवर टीका करत आहेत. राहुल गांधी यांचं वक्तव्यं म्हणजे देशातील 140 कोटी लोकांचा अपमान असल्याचं भाजपानं म्हटलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन नबीन यांनी वक्तव्यं जारी केलं आहे की "राहुल गांधी यांचं आजचं वक्तव्यं अत्यंत दुर्दैवी आहे. त्यातून त्यांची अराजकतावादी मानसिकता दिसून येते."

ते म्हणाले, "भारतीय राजकारणात, प्रामाणिकपणा, सामाजिकता आणि एकमेकांचा आदर करण्याची प्रक्रिया आहे, अशावेळी त्यांचं हे विधान अतिशय दुर्दैवी आहे, असं मला वाटतं. सातत्यानं होत असलेला पराभव आणि नैराश्य त्यांच्या स्वभाव आणि चारित्र्यामध्ये दिसतं आहे, असं मला वाटतं."

"मला विचारायचं आहे की राहुल गांधीजी, तुमच्या पूर्वजांनी या देशाची जमीन आणि स्वाभिमान नेहमीच गहाण ठेवण्याचं काम केलं. आमच्या सैनिकांचं मनोधैर्य वाढवण्याचं काम कधीच केलं नाही. मात्र आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली या देशाची जमीनदेखील सुरक्षित झाली आणि देशातील लोकांचा स्वाभिमानदेखील मजबूत झाला," असं ते म्हणाले.

भाजप अध्यक्ष नितीन नबीन

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, भाजप अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

राहुल गांधी यांच्यावर आरोप करताना नितीन नबीन म्हणाले, "तुमच्या सरकारच्या कार्यकाळात, तुमच्या लोकांनी जेव्हा जेव्हा या देशावर राज्य केलं, तुमचं संपूर्ण सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडालेलं होतं. आज आम्ही भ्रष्टाचाराबाबत झीरो टॉलरन्सच्या धोरणावर काम करतो आहोत. आज आमच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली दहशतवादासारख्या समस्यांना पूर्णपणे वेसण घालण्याचं काम केलं गेलं आहे. आमचे शेजारीदेखील आमच्या या धोरणासमोर झुकल्याचं दिसून येतं."

"राहुल गांधीजी, तुमचं विधान खूपच दुर्दैवी आहे. तुम्ही फक्त नरेंद्र मोदीजींचाच अपमान केला नाही, तर देशातील 140 कोटी जनतेचा देखील अपमान केला आहे," असं ते पुढे म्हणाले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स या सोशल मीडियावर लिहिलं, "विभाजनवादी आणि लांगुलचालनाच्या राजकारणाची जननी असलेल्या काँग्रेसच्या 'युवराजा'च्या असभ्य वक्तव्यामधून त्यांचं नकारात्मक राजकारण, अनियंत्रित विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांबद्दलचा अनादर दिसून येतो."

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर त्यांनी केलेलं अत्यंत निंदनीय वक्तव्य हा 145 कोटी देशवासियांचा जनादेश, विश्वास आणि लोकशाही संस्कारांचा देखील अपमान आहे," असं त्यांनी पुढे लिहिलं आहे.

"काँग्रेसच्या 'युवराजां'नी त्यांच्या आक्षेपार्ह, असंसदीय आणि हताश वक्तव्याबद्दल संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे," असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लिहिलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.