सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, नेमकं प्रकरण काय? मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

सुखबीर सिंग बादल

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, सुखबीर सिंग बादल
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला करण्यात आलाय.

एएनआय या वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, सुखबीर सिंग बादल यांच्या हाताला दुखापत झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुखबीर सिंग बादल हे पंजाबमधून आपल्या कुटुंबीयांसोबत नांदेडमधील श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथे दर्शनाला आले होते. त्यावेळी सकाळी 11 च्या सुमारास हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.

सुखबीर सिंग बादल यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस निरीक्षक संतोष केंद्रे यांच्यावरही हल्ला करण्यात आला असून ते जखमी झाले आहेत, अशीही माहिती समोर येत आहे.

हा हल्ला कुणी केला आणि त्यामागचे कारण काय, याचा तपास नांदेड पोलीस करत आहेत.

दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडून या घटनेची माहिती घेतली.

हल्लेखोराला तातडीने अटक करण्यात आली असून, या हल्ल्यामागील कारणाचा तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वीही झाले होते हल्ले

सुखबीर बादल यांच्यावर यापूर्वीही हल्ल्याचे प्रयत्न झाले आहेत.

डिसेंबर 2024 मध्ये, सुखबीर सिंह बादल यांच्यावर सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर गोळीबार झाला होता. या हल्ल्यातून ते थोडक्यात बचावले.

पोलिसांनी या हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला आणि हल्लेखोर नारायण सिंह चौरा याला अटक केली. चौरा याने काही करण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला पकडलं असल्याचं तेव्हा पंजाबच्या मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितलं होतं.

डिसेंबर 2024 मध्ये सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार झाला होता.

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, डिसेंबर 2024 मध्ये सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुखबीर बादल यांच्यावर गोळीबार झाला होता.

हा हल्ला झाला तेव्हा सुखबीर बादल यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते व्हीलचेअरवर बसून दरबार साहिबबाहेर सेवा करत होते.

पोलिस आयुक्तांनी सांगितले होते की, नारायण सिंह चौरा खलिस्तान आंदोलनाच्या काळात सक्रिय होता.

तसेच, 2 फेब्रुवारी 2021 रोजी काही अज्ञात व्यक्तींनी जलालाबाद येथे त्यांच्या वाहनावर दगडफेक आणि गोळीबार केला होता.

झेड-सिक्युरिटी असलेल्या त्यांच्या वाहनावर अनेक गोळ्यांच्या फैरी झाडण्यात आल्या. या गोळीबारात अकाली दलाचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले होते.

नांदेडमध्ये यापूर्वीही झाली होती हिंसा

30 मार्च 2021 रोजी नांदेडमध्ये शीख समुदाय आणि पोलिसांमध्ये संघर्ष उफाळून आला होता.

शीख समुदायातील लोक 'होला मोहल्ला' कार्यक्रमांतर्गत 'हल्ला बोल' मिरवणूक काढत होते. मात्र, त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने याला परवानगी दिली नव्हती.

अशा परिस्थितीत गुरुद्वारा प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने गुरुद्वाराच्या परिसरातच मिरवणूक काढण्यावर सहमती दर्शवली होती.

मात्र, शीख समुदायातील एका गटाला ही यात्रा पारंपरिक मार्गानेच काढायची होती. दरम्यान या गटातील काही लोक जबरदस्तीने गुरुद्वारा हजूर साहिबच्या बाहेर आले.

यानंतर त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली. या प्रकरणी पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतलं होतं.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.