'बाटलीतला राक्षस बाहेर पडलाय'; जाणून घ्या कृत्रिमरित्या मानव निर्मितीच्या प्रयोगाबाबत

माणसाचा DNA तयार करून कृत्रिमरित्या मानवी आयुष्य निर्माण करण्याचा प्रयोग आहे तरी काय?
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

तुम्ही अगदी पहिला 'ज्युरासिक पार्क' सिनेमा पाहिलाय का?

त्यामध्ये डायनॉसोरचा डीएनए सिक्वेन्स पूर्ण करून कृत्रिमरित्या डायनॉसोरची निर्मिती केल्याचं दाखवलं गेलं आहे.

असाच माणसाचा डीएनए तयार करून कृत्रिमरित्या मानवी आयुष्य निर्माण केलं जाऊ शकतं का?

प्रत्यक्षात या वादग्रस्त प्रयोगावर काम सुरू झालं आहे. काय आहे हा प्रयोग आणि त्यावरचे आक्षेप काय आहेत? जाणून घेऊयात.

डीएनए म्हणजे काय?

सगळ्यात आधी थोडक्यात समजून घेऊ डीएनए म्हणजे काय?

डीएनए हे 'Deoxyribonucleic Acid' या शब्दाचं संक्षिप्त रूप आहे. या इंग्रजी शब्दाचा उच्चार होतो, 'डिऑक्सीरायबोन्यूक्लेयक ॲसिड.'

आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये एक रेणू असतो त्याला डीएनए म्हणतात. यामध्ये त्या व्यक्तीबद्दलची सगळी जनुकीय माहिती साठवलेली असते.

हा डीएनए चार लहान ब्लॉक्स किंवा ठोकळ्यांचा बनलेला असतो. ए, जी, सी आणि टी असे ते चार ठोकळे होत.

डीएनए

डीएनएमध्ये पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कॉम्बिनेशन्समध्ये हे ब्लॉक्स रिपिट होतात. याच डीएनएमुळे प्रत्येक व्यक्ती शारीरिक दृष्ट्या वेगवेगळी होते.

याच डीएनएचा अभ्यास करण्यासाठी 'द ह्यूमन जीनोम प्रोजेक्ट' हा एक प्रोजेक्ट राबवण्यात आला.

जसा आपण एखादा बारकोड वाचतो, तसं या प्रोजेक्टमुळे संशोधकांना डीएनएचं मॅपिंग करता आलं. मानवी जनुकं वाचता यायला लागली. या प्रोजेक्टला 25 वर्षं पूर्ण झाली आहेत.

ज्या 'वेलकम ट्रस्ट'ने या संशोधनाला मोठं पाठबळ दिलं होतं, त्यांनीच आता एका नव्या प्रोजेक्टलाही 10 दशलक्ष पाऊंड्सचं पाठबळ दिलं आहे.

त्याचं नाव 'सिंथेटिक ह्यूमन जीनोम प्रकल्प' असं आहे. यामध्ये डीएनएचे अंश तयार करण्यासाठीचं संशोधन केलं जाणार आहे आणि कदाचित भविष्यात हे अंश जोडून संपूर्ण डीएनएदेखील तयार करता येईल.

या प्रयोगामध्ये काय केलं जाईल?

मानवी डीएनएमध्ये असणारे ब्लॉक्स विकसित करणं, हे संशोधकांचं प्राथमिक उद्दिष्ट असेल. हेच करून पुढे संशोधकांना मग कृत्रिमरित्या मानवी क्रोमोझोम्स तयार करता येतील.

क्रोमोझोम्स म्हणजे प्रोटीन आणि डीएनएच्या एका रेणूपासून तयार झालेली एक साखळी होय. याच साखळीद्वारे जीनोमबद्दलची माहिती (जीनोम इन्फॉर्मेशन) एका पेशीकडून दुसऱ्या पेशीकडे जाते. 'जीनोम इन्फोर्मेशन' म्हणजे डीएनएबद्दलची सगळी माहिती.

डीएनए

आपल्या शरीराचा विकास, झीज भरून येणं, कार्यक्षमता राखणं या सगळ्यांवर याच जनुकांचं नियंत्रण असतं. म्हणूनच ही जनुकं आणि डीएनए आपल्या शरीरावर नेमके कसे नियंत्रण ठेवतात, हे जाणून घेण्यासाठी याविषयीचा अभ्यास आणि प्रयोग करण्यात येत आहेत.

जनुकांमध्ये बिघाड होतो, तेव्हा अनेक आजार होतात. त्यामुळे अशा प्रकारच्या संशोधनातून आणखीन चांगल्या उपचार पद्धती विकसित होऊ शकतात. संशोधकांना अगदी शून्यातून असा डीएनए विकसित करता आला, तर त्यामुळे डीएनए नेमके कसे काम - परिणाम करतात हे समजेल. सध्या हे संशोधन टेस्ट ट्यूब्सपुरतंच मर्यादित असेल आणि कृत्रिमरित्या आयुष्य निर्मितीचा प्रयत्न करण्यात येणार नाही.

या संशोधनावर काय आक्षेप घेण्यात येत आहेत?

या संशोधनामुळे भविष्यात 'डिझायनर बेबीज' म्हणजे आपल्याला हवी ती जनुकीय खासियत निवडून, त्यानुसार कृत्रिमरित्या तयार केलेली बाळं जन्माला घातली जातील, असं काहींचं म्हणणं आहे.

या प्रकारच्या संशोधनाचा वापर करून 'मॉडीफाईड ह्यूमन्स' तयार करण्याचा प्रयत्न होण्याची भीतीही व्यक्त केली जातेय.

डीएनए

'बियॉन्ड जीएम' या जेनेटिकली मॉडिफाईड फूड - म्हणजे जनुकीय बदल करण्यात आलेल्या अन्नाबद्दल जनजागृती करणाऱ्या मोहीमेचे संचालक डॉ. पॅट थॉमस म्हणतात, "चांगल्या हेतूने संशोधन करण्याचा सगळ्या संशोधकांचा मानस आहे, असा विचार जरी केला तरी विज्ञानाचा वापर हा वाईट गोष्टींसाठी वा युद्धासाठीही केला जाऊ शकतो."

हा प्रोजेक्ट वैद्यकीय फायदे डोळ्यांसमोर ठेवून करण्यात येत असला, तरी या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्यापासून रोखणं कठीण होऊ शकतं.

'बाटलीतला राक्षस बाहेर पडलाय'

म्हणजे याचा वापर 'बायोलॉजिकल वेपन्स' तयार करण्यासाठी, माणसांमधल्या क्षमता वाढवण्यासाठी किंवा मग माणसासारखा डीएनए असणारे जीव निर्माण करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं एडिंबरा विद्यापीठामधले अत्यंत दिग्गज मानले जाणारे संशोधक प्रा. बिल अर्नशॉ म्हणतात.

ते म्हणतात, "राक्षस बाटलीतून बाहेर पडलाय. आता काही निर्बंध घातले, तरी योग्य मशिनरी मिळवणं शक्य असणाऱ्या संघटनेने कृत्रिम निर्मिती करायची ठरवली, तर त्यांना थांबवता येईल, असं मला वाटत नाही."

या संशोधनावर आधारित उपचार पद्धतींचा विकास करणाऱ्या कंपन्या त्याचा व्यावसायिक वापर कसा करतील याबद्दलही काळजी व्यक्त करण्यात येतेय.

डीएनए
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसरीकडे आतापर्यंत उपचार उपलब्ध नसलेले वा अत्यंत अवघड उपचार असलेले जनुकीय दोष कदाचित या संशोधनामुळे बरं करणं, शक्य होणार असल्याचं वेलकम ट्रस्टचं म्हणणं आहे.

केंब्रिजमधल्या 'एमआरसी' लॅबोरेटरी ऑफ मॉलेक्युलर बायोलॉजीच्या डॉ. ज्युलियन सेल यांनी बीबीसीला सांगितलं, "ही जीवशास्त्रातली मोठी झेप ठरू शकते. अशा थेरपी अस्तित्वात येतील ज्याने वय वाढत असतानाही लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकेल."

"तुम्ही म्हातारे होताना कदाचित तुम्हाला कमी आजार होतील. नुकसान झालेल्या अवयवांमध्ये रोगाला विरोध करणाऱ्या पेशी वापरून कदाचित यकृत - हृदय आणि रोग प्रतिकारक शक्तीमध्ये सुधारणा करता येतील."

मग या तंत्रज्ञानाचा गैरवापर होण्याच्या इतक्या शक्यता असताना वेलकम ट्रस्टने या संशोधनासाठी फंडिंग का दिलं? तर हा निर्णय विचारपूर्वक घेण्यात आल्याचं डॉ. टॉम कॉलिन्स म्हणतात.

बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "असं करण्याचे परिणाम काय असतील याचा विचार आम्ही केला. एक ना एक दिवस हे तंत्रज्ञान विकसित होणार आहेच. आता हे संशोधन करून आम्ही हे शक्य तितक्या काळजीपूर्वक मार्गाने करण्याचा प्रयत्न करतोय आणि याबद्दलचे तात्विक आणि नैतिक प्रश्नही हाताळण्याचा प्रयत्न करतोय."

या वैज्ञानिक संशोधनाच्या जोडीने एक सामाजिक संशोधनही करण्यात येईल. तज्ज्ञ, सामाजिक संशोधक आणि लोकांना या तंत्रज्ञानाबद्दल काय वाटतं, त्याचा फायदा काय होईल असं वाटतं आणि कशाची काळजी वाटते, याचा अभ्यास यात केला जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)