'तिच्या पोटात 13 पेन, 5 चमचे आणि एक मेणबत्ती होती...' हे सगळं बाहेर काढल्यावर डॉक्टरांनी काय म्हटलं?

'तिच्या पोटात 13 पेन, 5 चमचे आणि एक मेणबत्ती होती...' हे सगळं बाहेर काढल्यावर डॉक्टरांनी काय म्हटलं?
    • Author, कोटेरू श्रावणी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

त्या महिलेच्या पोटात 13 पेन, 5 लाकडी चमचे आणि एक मेणबत्ती होती. त्या पेनांपैकी एक पेन 25 सेंटीमीटर लांबीचा होता.

डॉक्टरांनी हे सर्व यशस्वीपणे काढून त्या महिलेचा जीव वाचवला.

पण प्रश्न असा आहे की, हे सगळं एका महिलेच्या पोटात गेलं तरी कसं?

सहसा, खाद्यपदार्थांव्यतिरिक्त अशी कोणतीही लहानशी गोष्ट खाल्ल्यावर देखील तीव्र पोटदुखी किंवा जुलाबाचा त्रास होतो.

पण पोटात असलेल्या या सर्व वस्तूंमुळे त्या महिलेला नेमक्या कोणत्या समस्येचा सामना करावा लागला?

या वस्तू नेमक्या कशाप्रकारे बाहेर काढल्या, याची माहिती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी बीबीसीला दिली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेसातील पालनाडू जिल्ह्यातील नरसारावपेट येथील एका 33 वर्षीय विवाहित महिलेला छातीत डाव्या बाजूला तीव्र वेदना होत होती.

त्यानंतर, तिच्या कुटुंबीयांनी तिला माताश्री खाजगी रुग्णालयात दाखल केलं.

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डॉक्टरांनी तत्काळ तिची ईसीजी आणि एंडोस्कोपी केली. डॉ. रामचंद्र रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं की, ईसीजीमध्ये सगळं काही ठीक होतं. परंतु, एंडोस्कोपी दरम्यान तिच्या पोटात पेन, चमचे आणि मेणबत्त्या यांसारख्या काही बाहेरच्या वस्तू आढळल्या.

डॉ. रामचंद्र रेड्डी यांनी सांगितलं की, सीटी स्कॅन करून तात्काळ खात्री केल्यानंतर, त्यांनी एंडोस्कोपी आणि लॅपरोस्कोपी शस्त्रक्रियेचं नियोजन केलं.

त्यांनी सांगितलं की या शस्त्रक्रियेद्वारे सर्व पेन, मेणबत्त्या आणि लाकडी चमचे काढण्यात आले.

लहान मुलं वापरत असलेल्या 25 सेंटीमीटर लांबीच्या पेनाने त्या महिलेच्या पोटाला छिद्र पडल्यानं, 'न्यूमोमेडियास्टिनम' नावाची स्थिती निर्माण झाली.

त्यांनी सांगितलं की, त्या महिलेला वेदना होत असल्यामुळे ती त्यांच्याकडे आली होती.

डॉ. रामचंद्र रेड्डी यांनी सांगितलं की, त्यानंतर लॅपरोस्कोपीद्वारे त्या महिलेच्या पोटातून या वस्तू काढण्यात आल्या.

त्यांनी तिच्या पोटातून एकूण 13 पेन, एक मेणबत्ती आणि 5 लाकडी चमचे काढल्याचं सांगितलं. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

या प्रकारची समस्या सहसा मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांमध्ये उद्भवते.

डॉ. रामचंद्र रेड्डी म्हणाले की, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींची काळजी घेणं आणि ते गोळ्या घेत आहेत की नाही हे तपासणं ही पालकांची जबाबदारी आहे.

'तिच्या पोटात 13 पेन, 5 चमचे आणि एक मेणबत्ती होती...' हे सगळं बाहेर काढल्यावर डॉक्टरांनी काय म्हटलं?

संबंधित महिलेनं सांगितलं की, वर्षभरापूर्वीही तिनं याचप्रकारे चार पेन गिळले होते आणि शस्त्रक्रिया करून ते बाहेर काढण्यात आले होते.

डॉ. रामचंद्र रेड्डी यांनी सांगितलं की, ती मानसिक समस्यांनी त्रस्त होती आणि तिला मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवण्यात आलं होतं. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत.

मात्र, प्रत्येकजण अशा वस्तू गिळू शकत नाही. केवळ मानसिक त्रासाने ग्रस्त असलेले रुग्णच तसे करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

ते म्हणाला की, 25 सेंटिमीटर लांबीची वस्तू पोटात जाणं खूप दुर्मिळ आहे. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच कुणी तरी इतके मोठे पेन गिळलेले पाहिलेले आहे.

डॉक्टर म्हणाले की, तिचं तिच्या वडिलांशी भांडण झालं होतं आणि त्यानंतर मग तिने या वस्तू गिळल्या होत्या.

मात्र, रामचंद्र रेड्डी म्हणाले की, अनेक लोक अशा न पचणाऱ्या गोष्टी, जसे की, केस वगैरे खातात.

अशा प्रकारच्या प्रकरणांना ट्रायकोबेझोअर्स म्हणतात.

त्यांनी सांगितलं की, केवळ मानसिकदृष्ट्या विकृत असलेले लोकच पेनासारख्या वस्तू गिळतात.

गिळताना आतमध्ये कुठेही छिद्र न पडल्यास, आतड्यांमध्ये अडथळा निर्माण होऊन उलट्या होतात.

बोल्ट व पेन यांसारख्या टोकदार वस्तूंमुळे आतड्यांना छिद्रदेखील पडू शकतं.

पुढे त्यांनी स्पष्ट केलं की, शौचामधून काही लहान वस्तू बाहेर पडू शकतात. लहान मुलं नकळत नाणी गिळतात, ती त्यांच्या पालकांनाही ठाऊक नसते आणि मग शौचावाटे ती बाहेर पडतात.

'तिच्या पोटात 13 पेन, 5 चमचे आणि एक मेणबत्ती होती...' हे सगळं बाहेर काढल्यावर डॉक्टरांनी काय म्हटलं?

आतड्यांना छिद्र पडल्यास काही रुग्णांना संसर्ग होऊन सेप्टिक शॉक येऊ शकतो, जो जीवघेणा ठरू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.

गुंटूरचे डॉ. साई कृष्णा यांनी बीबीसीला सांगितलं की, अशी प्रकरणं अधूनमधून समोर येतात आणि यापैकी 90 टक्के प्रकरणांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या असलेले रुग्णच असतात.

त्यांनी सांगितलं की, अशाप्रकारचे रुग्ण एकाच वेळी सगळ्या वस्तू गिळत नाहीत. आणि कधीकधी ते जे काही गिळतात ते सर्व पोटातच राहतं. पुढे त्यांनी सांगितलं की, जेव्हा या वस्तू पोटात अडकतात तेव्हाच वेदना होतात आणि या वस्तू पोटातून त्वरित काढण्यासाठी एंडोस्कोपी आणि लॅपरोस्कोपीसारख्या शस्त्रक्रिया केल्या जातात.

नुकतंच त्यांनी एका रुग्णाच्या पोटातून 20 बॅटरी काढल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, गिळल्यानंतर या वस्तू कधीकधी महिनोनमहिने पोटात राहू शकतात आणि एकदा पोटात गेल्यावर त्या आतड्यांमध्ये जात नाहीत. जर त्या गेल्या, तर त्यांचा एक्स-रे काढावा लागतो आणि शस्त्रक्रिया करावी लागते.

अशा प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेदरम्यान लॅपरोस्कोपी केली जाते.

डॉ. साईकृष्ण म्हणाले की, ट्रायकोबेझोअरच्या बाबतीत केस पोटातच राहतात आणि ते शस्त्रक्रियेनं काढून टाकण्याची गरज असते.

त्यांनी सांगितलं की, नरसारावपेटमध्ये घडलेल्या घटनेत रुग्णाच्या शरीरात एक छिद्र पडलं होतं. ही एक खूप मोठी समस्या होती. त्यामुळे डॉक्टरांना त्या महिलेवर तातकाळ शस्त्रक्रिया करावी लागली.

'तिच्या पोटात 13 पेन, 5 चमचे आणि एक मेणबत्ती होती...' हे सगळं बाहेर काढल्यावर डॉक्टरांनी काय म्हटलं?

अशी प्रकरणे यापूर्वी कधी नोंदवली गेली आहेत का?

टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार, 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील हापूर येथील एका रुग्णालयात एका 40 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून 29 स्टीलचे चमचे, 19 टूथब्रश आणि दोन पेन काढण्यात आले.

शस्त्रक्रियेच्या किमान एक महिना आधी त्याला गाझियाबाद येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आलं होतं, असंही त्या रिपोर्टमध्ये म्हटलंय.

मात्र, टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रुग्णानं सांगितलं की व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झाल्यानंतर कुणीही त्याची योग्य काळजी घेतली नाही आणि त्याला व्यवस्थित जेवणही देण्यात आलं नाही.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, संतप्त आणि हताश झालेल्या त्या व्यक्तीनं स्वतःला इजा पोहोचवण्यासाठी या वस्तू गिळल्या.

'तिच्या पोटात 13 पेन, 5 चमचे आणि एक मेणबत्ती होती...' हे सगळं बाहेर काढल्यावर डॉक्टरांनी काय म्हटलं?

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननंही अशाच प्रकारच्या एका प्रकरणाचा हवाला देत म्हटलं आहे की, इराणमधील अहवाज येथील इमाम खोमेनी रुग्णालयातील डॉक्टरांनी 2024 मध्ये एका 36 वर्षीय पुरुषाच्या पोटातून 450 हून अधिक धातूच्या वस्तू यशस्वीपणे काढल्या होत्या.

तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणं आणि द्रव किंवा घन पदार्थ खाणं-पिणं शक्य न होणं या लक्षणांनंतर त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णाच्या एक्स-रे आणि एंडोस्कोपीमध्ये त्याच्या पोटात अनेक धातूच्या वस्तू आढळून आल्या.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिननं आपल्या अहवालात म्हटलं आहे की, रुग्णावर गॅस्ट्रोस्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या पोटातून 2900 ग्रॅम वजनाचे 452 स्क्रू, नट, चाव्या, दगड आणि धातूच्या इतर वस्तू काढण्यात आल्या.

नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, गिळलेले अन्नपदार्थ यशस्वीपणे बाहेर काढता येणं, ही बाब देखील दुर्मिळ आहे.

वस्तू गिळणं ही एक गंभीर आरोग्य समस्या असून ती मुलांमध्ये सर्वाधिक आढळते, असंही अहवालात म्हटलं आहे. मात्र, काही प्रौढांमध्ये, विशेषतः मानसिक आरोग्य समस्या असलेल्यांमध्ये आणि तुरुंगांमध्येही ही समस्या सामान्यपणे आढळते.

महत्त्वाची सूचना

औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.

हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212

सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)

इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000

विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)