36 हजार मृत्यू, दोन दिवस सूर्य झाकला, पृथ्वीचं तापमान घटलं; इतिहासातील 'तो' भयानक ज्वालामुखी

क्राकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकात 36 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

फोटो स्रोत, Hulton Archive/Getty Images

फोटो कॅप्शन, क्राकाटोआ ज्वालामुखीच्या उद्रेकात 36 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
    • Author, डेझी स्टीफन्स
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

इंडोनेशियातील 'अनाक क्राकाटाऊ' या ज्वालामुखीय बेटावर काही दिवसांपूर्वी अनेक वेळा उद्रेक झाला. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्वालामुखीच्या उद्रेकातून निघालेले राखेचे लोट आकाशात सुमारे 250 मीटर उंचीपर्यंत गेले होते.

वृत्तानुसार, इंडोनेशियाच्या भूवैज्ञानिक संस्थेने सांगितलं की, अनाक क्राकाटाऊमध्ये दोन ते तीन वेळा उद्रेक झाले.

तरीसुद्धा या भागातल्या ज्वालामुखीच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या एका टीमने सांगितलं आहे की, सध्या तिथे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना कोणताही धोका नाही.

अनाक क्राकाटाऊ हे बेट 1927 मध्ये समुद्राच्या पोटात तयार झालेल्या एका महाकाय खड्ड्यामुळे (ज्याला काल्डेरा म्हणतात) अस्तित्वात आलं होतं.

हा खड्डा 1883 मध्ये झालेल्या क्राकाटोआ ज्वालामुखीच्या अत्यंत भीषण स्फोटानंतर तयार झाला होता. इतिहासातील सर्वात भयानक आणि जीवघेण्या ज्वालामुखीच्या घटनांमध्ये याची गणना होते.

1883 मध्ये झालेल्या या भयानक उद्रेकाने अवघ्या 48 तासांच्या आत 36 हजारांहून अधिक लोकांचे प्राण घेतले होते आणि यामुळे 165 गावं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती.

इतकेच नाही तर या उद्रेकातून निर्माण झालेला आवाज हा आजही जगातील सर्वात मोठा नोंदवला गेलेला आवाज मानला जातो. याचा प्रचंड आवाज हजारो मैल दूरपर्यंत ऐकू गेला होता.

त्यावेळी या ज्वालामुखीची राख हवेत एवढी पसरली होती की, पुढची कित्येक वर्षे संपूर्ण जगाच्या हवामानावर याचा परिणाम झाला आणि पृथ्वीचं सरासरी तापमान खाली घसरलं होतं.

इतिहासातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तींपैकी एक असलेल्या या घटनेच्या थरारक कहाणीचा आढावा बीबीसीच्या या रिपोर्टमध्ये घेण्यात आला आहे.

दोन दिवसांहून जास्त काळ नुसता काळोख होता

मे 1883 मध्ये या भयानक संकटाची चाहूल लागण्यास सुरुवात झाली होती. अमेरिकेच्या 'नॅशनल सेंटर्स फॉर एन्व्हायरनमेंटल इन्फॉर्मेशन'च्या माहितीनुसार, त्या काळात तिथून प्रवास करणाऱ्या एका जर्मन युद्धनौकेच्या कॅप्टनला क्राकाटोआ ज्वालामुखीमधून आकाशात झेपावणारे राख आणि धुळीचे महाकाय लोट दिसले होते.

विशेष म्हणजे, तोपर्यंत हे ज्वालामुखीचे बेट जवळपास 200 वर्षे पूर्णपणे शांत अवस्थेत होते.

त्यानंतरच्या काही महिन्यांत तिथून जाणाऱ्या व्यापारी आणि इतर जहाजांवरच्या खलाशांनाही असेच भयानक दृश्य पाहायला मिळाले.

शेवटी 26 ऑगस्टला विनाशाचे असे सत्र सुरू झाले ज्याने इतिहासातील सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती म्हणून स्वतःची नोंद केली.

राखेच्या महाकाय विळख्यामुळे संपूर्ण भागात दोन दिवसांपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचू शकला नाही आणि चारही बाजूंना अंधार पसरला होता.

फोटो स्रोत, DEA / BIBLIOTECA AMBROSIANA / Contributor via Getty Images

फोटो कॅप्शन, राखेच्या महाकाय विळख्यामुळे संपूर्ण भागात दोन दिवसांपर्यंत सूर्याचा प्रकाश पोहोचू शकला नाही आणि चारही बाजूंना अंधार पसरला होता.

क्राकाटोआच्या पहिल्याच विशाल उद्रेकामुळे निघालेला लाव्हा, हलके सच्छिद्र दगड (प्युमिस) आणि राखेचा मोठा प्रवाह समुद्रात कोसळला. परिणामी समुद्रात एक महाकाय सुनामी आली जी उत्तरेच्या दिशेने वेगाने सरकली आणि त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला.

उद्रेक झाल्यानंतर अवघ्या एका तासाच्या आत राखेचे लोट सुमारे 48 किलोमीटर उंचीपर्यंत पोहोचले आणि चारही दिशांना पसरू लागले. हा राखेचा विळखा आकाशात जवळपास 80 किलोमीटरपर्यंत पसरला होता. एनसीईआईनुसार, या राखेने सुमारे 3 लाख चौरस मैल परिसर पूर्णपणे झाकून टाकला होता. ज्यामुळे या संपूर्ण भागात दोन दिवसांहून अधिक काळ नुसता काळोख दाटला होता.

स्फोटाचा आवाज ऑस्ट्रेलियापर्यंत ऐकू आला

सिडनी बेकर जेव्हा लहान होते तेव्हा त्यांनी आपल्या वडिलांच्या जहाजावर असताना क्राकाटोआचा तो थरकाप उडवणारा स्फोट स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवला होता.

आपल्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी त्या वेळची परिस्थिती आठवून आपली कहाणी सांगितली.

1946 मध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, "हवेत राख आणि धूळ एवढ्या मोठ्या प्रमाणावर पसरली होती की, आता आपला श्वास कोंडून जीव जातो की काय, अशी भीती आम्हाला वाटत होती."

त्यांनी सांगितलं, "सगळीकडे इतका दाट अंधार पसरला होता की स्वतःचा हातही समोर दिसत नव्हता. राख सतत जहाजावर, समुद्रात आणि आमच्या अंगावर पडत होती. संपूर्ण जहाजावर साधारण 6 ते 7 इंच जाडीचा राखेचा थर जमा झाला होता."

हे छायाचित्र 2018 मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हे छायाचित्र 2018 मध्ये झालेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचे आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

बेकर यांनी सांगितले की, त्या स्फोटांचे आवाज इतके प्रचंड होते की त्यावर विश्वास बसणे कठीण होते.

ते म्हणाले, "तो भयानक आवाज आणि विनाशाचे वर्णन करण्यासाठी शब्दही अपुरे पडतात."

'क्राकाटोआ: द डे द वर्ल्ड एक्स्प्लोडेड' या पुस्तकाचे लेखक सायमन विनचेस्टर यांच्या मते, 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 2 मिनिटांनी झालेल्या एका 'महाभयंकर स्फोटा'आधीही तिथे एकापाठोपाठ एक कित्येक मोठे स्फोट झाले होते.

अमेरिकेच्या 'एनसीईआई'च्या (NCEI) माहितीनुसार, त्या स्फोटाचा आवाज थेट ऑस्ट्रेलिया आणि मॉरिशसपर्यंत ऐकू गेला होता, जे तिथून सुमारे 4,600 किलोमीटर दूर आहेत.

2010 मध्ये बीबीसीच्या 'विटनेस हिस्टरी' पॉडकास्टमध्ये बोलताना सायमन विनचेस्टर म्हणाले होते की, "या स्फोटात संपूर्ण बेटाचे कित्येक किलोमीटरचे खडक जणू वाफेसारखे उडून गेले. प्युमिस दगड आणि राख आकाशात 17 ते 18 मैल उंचीपर्यंत पोहोचली आणि ते संपूर्ण बेट जणू नाहीसे झाले."

ते पुढे म्हणाले, "काही सेकंदांसाठी समुद्राच्या मधोमध एक महाकाय खड्डा पडला होता. त्यानंतर त्यात अब्जावधी टन पाणी वेगाने जमा झाले. समुद्राचा तळ इतका तापलेला होता की ते पाणी क्षणार्धात वाफेसारखं उडून गेलं आणि त्यामुळेच एकामागून एक भयानक सुनामीच्या लाटा उसळल्या."

36 हजार जणांना जीव गमवावा लागला

या पूर्ण दुर्घटनेत सगळ्यात जास्त विध्वंस सुनामीच्या लाटांनी घडवला. यामध्ये एकूण 36 हजार लोकांचा मृत्यू झाला. ज्यातील तब्बल 34 हजार लोकांचे प्राण फक्त आणि फक्त सुनामीमुळे गेले होते.

सिडनी बेकर यांनी आठवण सांगताना म्हटलं की, ते आपल्या वडिलांसोबत इंडोनेशियाच्या बांतेन प्रांतातल्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या अंजर शहराकडे गेले होते.

ते म्हणाले, "ते अख्खं शहर समुद्राच्या पाण्यात बुडून गेले होते."

2018 मध्येही या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता

फोटो स्रोत, FERDI AWED/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, 2018 मध्येही या ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता

वडिलांच्या आठवणी सांगताना बेकर म्हणाले, "ते ज्या हॉटेलमध्ये राहिले होते, ते हॉटेल पाण्याखाली एवढं खोल गेलं होतं की, त्याच्यावरून एखादं अख्खं जहाज तरंगत जाऊ शकलं असतं आणि जहाजाचा नांगर थेट हॉटेलच्या चिमणीला अडकवता आला असता."

काही जण सुनामीच्या तडाख्यातून कसेतरी वाचले आणि त्यांनी जीव वाचवण्यासाठी टेकड्यांचा रस्ता धरला.

पण तिथे पोहोचूनही ते पूर्णपणे सुरक्षित नव्हते. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेला 'पायरोक्लास्टिक फ्लो' म्हणजेच ज्याला गरम वायू, राख आणि दगडांचा जमिनीवरून वेगाने वाहणारा जीवघेणा प्रवाह त्यांच्या दिशेने आला आणि त्यात कित्येकांचा मृत्यू झाला.

काही जाणकारांच्या मते, एडवर्ड मंक यांनी त्यांच्या 'द स्क्रिम' या गाजलेल्या पेंटिंगमध्ये आकाशाचा जो रंग दाखवला आहे. तो क्राकाटोआच्या स्फोटानंतर होणाऱ्या लाल भडक सूर्यास्तापासून प्रेरित होऊन दिला होता.

फोटो स्रोत, Didier Lebrun / Photonews via Getty Images

फोटो कॅप्शन, काही जाणकारांच्या मते, एडवर्ड मंक यांनी त्यांच्या 'द स्क्रिम' या गाजलेल्या पेंटिंगमध्ये आकाशाचा जो रंग दाखवला आहे. तो क्राकाटोआच्या स्फोटानंतर होणाऱ्या लाल भडक सूर्यास्तापासून प्रेरित होऊन दिला होता.

क्राकाटोआचा परिणाम केवळ त्या 48 तासांपुरता मर्यादित राहिला नाही.

उद्रेकातून बाहेर पडलेली राख संपूर्ण जगात पसरली. सूर्य आणि चंद्राच्या आजूबाजूला एक चमचमणारं वलय तयार झालं आणि हवेतल्या राखेमुळे सूर्याची किरणं जशी गाळून येऊ लागली.

अमेरिकेच्या एनसीईआयच्या मते, यामुळे पृथ्वीचं सरासरी तापमान जवळपास 0.5 अंश सेल्सिअसने कमी झालं होतं. हवामान पुन्हा पहिल्यासारखं सामान्य होण्यासाठी तब्बल 5 वर्षांचा काळ लागला.

हवेत पसरलेल्या या बारीक कणांमुळे जगभरात सूर्य उगवताना आणि मावळताना आकाशात भडक लाल रंग उमटू लागला होता. कारण हे कण सूर्यप्रकाश नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने चहूकडे पसरवत होते.

वातावरणात पसरलेल्या या सूक्ष्म कणांमुळे जगभरात सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग कमालीचा गडद लाल दिसू लागला होता. कारण हे कण प्रकाश नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने विखरत होते.

त्या काळातील अनेक पेंटिंग्समध्ये हे लाल आकाश स्पष्टपणे दिसून येते. काही तज्ज्ञांचं तर असं ही मत आहे की, प्रसिद्ध चित्रकार एडवर्ड मंक यांच्या 'द स्क्रिम' (The Scream) या गाजलेल्या पेंटिंगधील जे लाल आकाश दाखवलं आहे ते क्राकाटोआच्या याच भयानक स्फोटातून प्रेरित होऊन रेखाटलं होतं.

वैज्ञानिकांना शिकवली नवीन गोष्ट

एवढा मोठा विनाश घडवून आणल्यानंतरही क्राकाटोआच्या या उद्रेकाने वैज्ञानिकांना आपल्या पृथ्वीबद्दल एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवली.

या उद्रेकापूर्वी जगाला 'जेट स्ट्रीम' (Jet Stream) बद्दल कोणतीही माहिती नव्हती. हे हवेचे असे अत्यंत वेगवान आणि अदृश्य प्रवाह असतात जे वातावरणात खूप उंचावर वाहत असतात आणि जगाचं हवामान ठरवण्यात मोठी भूमिका बजावतात.

पण जेव्हा क्राकाटोआच्या स्फोटानंतर त्याची राख आणि त्याचे पडसाद जगभर उमटले तेव्हा कुठे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की वातावरणात खूप उंचावर हवेचे असे प्रचंड वेगवान प्रवाह वाहतात जे या बारीक कणांना हजारो किलोमीटर दूरपर्यंत घेऊन जाऊ शकतात.

विनचेस्टर म्हणतात, "ही अशी पहिलीच घटना होती ज्याने वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या जगाला याची जाणीव करून दिली की याचा परिणाम संपूर्ण पृथ्वीवर झाला आहे."

ते पुढे म्हणतात, "इथूनच लोकांना हे समजू लागले की संपूर्ण जग एकमेकांशी जोडलेले आहे. आज आपण ज्या ग्लोबल वॉर्मिंगबद्दल, समुद्राची पातळी वाढण्याबद्दल आणि संपूर्ण पृथ्वीवर होणाऱ्या पर्यावरणाच्या बदलांबद्दल बोलतो त्या विचारांची खरी सुरुवात कुठेतरी क्राकाटोआच्या याच उद्रेकामुळे झाली होती. या एका घटनेने जगाकडे एक अखंड आणि परस्परांशी जोडलेली व्यवस्था म्हणून बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.