प्रेम, एकटेपणा आणि ऑनलाइन धोका; आईच्या 'प्रियकरा'चा शोध घेताना मुलाला काय सापडलं?

कार्लोस बॅरागन इकोटुन जिल्ह्यातील, लागोस, नायजेरिया

फोटो स्रोत, Carlos Barragán

फोटो कॅप्शन, कार्लोस बॅरागन इकोटुन जिल्ह्यातील, लागोस, नायजेरिया
Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

ते मला ना फार व्यावसायिक वाटले, ना फार हुषार ठग... आणि नेमकं तेच माझ्यासाठी सर्वात धक्कादायक होतं.

जेव्हा कार्लोस बरागान आपल्या आईला प्रेमाच्या नावाखाली फसवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी नायजेरियात पोहोचले, तेव्हा त्यांना वाटलं होतं की त्यांचा सामना एखाद्या अत्यंत कुशल ठगाशी होईल.

त्यांच्या आईला फसवणारे ईमेल सीरियातून एखाद्या अमेरिकन सैनिकाने पाठवले नव्हते, तर ते नायजेरियातून पाठवले गेले होते. मात्र त्या व्यक्तीने स्वतःला सीरियात असल्याचा दावा केला होता, हे सगळं त्यांना एका IP ॲड्रेसच्या आधारे त्यांना समजलं होतं.

आपल्या आईला फसवणाऱ्या त्या हुशार गुन्हेगाराचा पर्दाफाश करावा, अशी कार्लोस यांची इच्छा होती. मात्र या प्रयत्नात ते चार वर्षांच्या एका दीर्घ प्रवासावरच गेले, त्यामुळे त्यांना नायजेरियातील 'याहू बॉईज'च्या जगाला जवळून समजून घेण्याची संधी मिळाली.

हे असे तरुण ठग आहेत ज्यांना ना व्यवस्थित शिक्षणाची संधी मिळाली, ना पैसा, ना पुढे जाण्याच्या संधी.

या अनुभवाने केवळ कार्लोस यांच्या त्या व्यक्तीबद्दलच्या पूर्वग्रहांना आव्हान दिलं नाही, तर आधुनिक जगातल्या एकाकीपणाच्या गंभीरतेबद्दलही त्यांना विचार करायला भाग पाडलं.

ब्रायनशी भेट

कार्लोस सांगतात, त्यांची आई स्वावलंबी आणि खंबीर होती. त्या उच्चशिक्षित होत्या आणि स्वतःचं दंतचिकित्सालय चालवत होत्या. त्यामुळे त्या एखाद्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकतील, असं वाटणंही कठीण होतं.

याच कारणामुळे जेव्हा कार्लोस आणि त्यांच्या भावंडांना संशय आला की त्यांच्या आईची एखाद्या ठगाशी ओळख झाली असावी, तेव्हा त्यांना काळजी वाटू लागली. पण त्यांच्या आईने तिच्या 'प्रियकर' 'ब्रायन'ला पाठवलेल्या एका ईमेलमधून त्या भावनिकदृष्ट्या किती कमकुवत झाल्या होत्या याची झलक मिळते.

त्यांनी त्या ईमेलमध्ये लिहिलं होतं, "सुरुवातीला मी माझ्या आईची काळजी घेतली, त्यानंतर माझ्या धाकट्या बहिणीची. मग माझ्या नवऱ्याची आणि मुलांची काळजी घेतली. संपूर्ण आयुष्य मी इतरांची काळजी घेत राहिले, पण आता मला असं वाटतं की कुणीतरी माझीही काळजी घ्यावी."

घटस्फोटित असलेल्या त्यांच्या आईला एकटेपणा जाणवत आहे, हे काही महिन्यांपूर्वी कार्लोसच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे त्यांनी आईला टिंडरवर खाते उघडण्याचा सल्ला दिला.

तिथे त्यांची भेट ब्रायनशी झाली. तो सुमारे 50 वर्षांचा आकर्षक अमेरिकन पुरुष होता. त्याचा दावा होता की तो सीरियात तैनात आहे.

कार्लोसच्या आईने आपले संपूर्ण आयुष्य इतरांची सेवा करण्यात घालवले.

फोटो स्रोत, Carlos Barragán

फोटो कॅप्शन, कार्लोसच्या आईने आपले संपूर्ण आयुष्य इतरांची सेवा करण्यात घालवले.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कार्लोसचे मोठे भाऊ सैन्यात काम करून आले होते, त्यांना सुरुवातीपासूनच या नात्याबद्दल संशय होता.

त्यांनी आईला सांगितलं, "त्याचं बोलणं काहीसं विचित्र वाटतंय. आई, ही कदाचित फसवणूक असू शकते."

त्यानंतर त्यांच्या आईनं या नात्याबद्दल बोलणं जवळपास बंदच केलं. मात्र त्या अधूनमधून कार्लोसला ब्रायनचे ईमेल दाखवत असत.

त्या ईमेलमध्ये प्रेम आणि भावनांचा ओघ होता. ब्रायनने लवकरच स्पेनमध्ये येऊन एकत्र राहण्याच्या गोष्टी करायला सुरुवात केली, ज्यामुळे स्वतः कार्लोस यांच्या आईलाही आश्चर्य वाटलं.

कार्लोस म्हणतात, "मला वाटतं की तिलाही तेव्हा थोडाफार संशय आला होता."

ब्रायननं त्यांच्या घरी सोन्याच्या विटा पाठवणार असल्याचं सांगितलं तेव्हा कुटुंबात वाद सुरू झाले. पण कार्लोसनं हस्तक्षेप करण्याचा निर्णय तेव्हा घेतला, जेव्हा त्यांच्या आईने दोन अंगठ्या घरी आणल्या आणि सांगितलं की ते लवकरच एकत्र राहणार आहेत.

कार्लोसनं त्यांच्या आईला हे इमेल लागोस (नायजेरिया)मधून पाठवले जात असल्याचे पुरावे आईला दाखवले, तेव्हा त्यांनी त्यावर फारशी प्रतिक्रिया दिली नाही. काही दिवसांनी त्यांनी बहुतेक ईमेल डिलीट केले, पण त्या खूप दुःखी होत्या.

आपल्या आईला एकाकीपणाशी झुंजताना पाहून कार्लोस यांच्या मनात अनेक विचार येऊ लागले. त्यांनी नायजेरियात जाऊन त्या रहस्यमय ठगाचा शोध घेण्याचा निर्णय घेतला.

बिगी, इकोटुन आणि त्याचे 'याहू बॉईज'

एका स्थानिक मध्यस्थामार्फत कार्लोसची बिगी नावाच्या एका ठगाशी ओळख झाली. बिगीने त्याला आपल्या मित्रांशी भेट घडवून आणण्यास आणि इकोटुन परिसर दाखवण्यास होकार दिला. इकोटुन हे लागोसमधील गजबजलेलं उपनगर आहे, तिथं "प्रत्येकजण मेहनत करतो, प्रत्येकजण पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो", असं सांगतात.

बिगी साधारण 25 ते 30 वर्षांचा होता, म्हणजे जवळपास कार्लोसच्या वयाचा. तो बुद्धिमान आणि "अत्यंत विनोदी" होता.

दोघे जवळजवळ दररोजचा बहुतांश वेळ एकत्र घालवू लागले आणि आपल्याला बिगी आवडू लागला आहे, याचं कार्लोसला आश्चर्य वाटलं.

"मी सतत विचार करत राहायचो... त्याच्यासारखा माणूस ठग कसा बनतो? तो कसाकाय इंटरनेटवर एकाकी लोकांशी बोलण्यात अख्खी रात्र घालवू शकतो?"

स्थानिक लोकांशी बोलताना कार्लोसला जाणवलं की ठगांचं एक मोठं जाळं अस्तित्वात आहे. शेकडो तरुण पुरुष, ज्यांना 'याहू बॉईज' म्हणून ओळखलं जातं. सुरुवातीच्या काळात ते वापरत असलेल्या ईमेल सेवेमुळे त्यांना हे नाव पडलं.

फक्त एका टोपणनावाच्या आणि बनावट ईमेल पत्त्याच्या आधारे 24 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशात आपल्या आईची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणं जवळपास अशक्य होतं, हे कार्लोसला हळूहळू समजलं.

कार्लोसने इकोटुनमधील स्थानिकांशी ओळख करून घेण्यात वेळ घालवला.

फोटो स्रोत, Carlos Barragán

फोटो कॅप्शन, कार्लोसने इकोटुनमधील स्थानिकांशी ओळख करून घेण्यात वेळ घालवला.

गोरे युरोपीय असल्यामुळे कार्लोस कुठेही गेले तरी वेगळे दिसत होते.

ते सांगतात की लोक त्यांना कधी FBI एजंट समजत, तर कधी एखादा चिनी व्यापारी. ते त्यांना 'मागा' म्हणत असत. हा शब्द सहज फसवता येणाऱ्या भोळ्या व्यक्तीसाठी वापरला जातो.

पण बिगीच्या ओळखीमुळे त्यांना 50 'याहू बॉईज'शी संवाद साधण्याची संधी मिळाली.

त्यांपैकी एकानं स्वतःला अमेरिकन व्यावसायिक कुस्तीपटू कोडी रोड्स असल्याचं भासवून एका महिलेला 25 विमानतिकिटांसाठी पैसे पाठवायला तयार केलं होतं. त्या तिकिटांचा वापर कधी होणारच नव्हता.

त्या महिलेनं पहिल्यांदा 300 युरो पाठवले होते. ती रक्कम त्या तरुणासाठी प्रचंड मोठी होती. कारण कारखान्यात 18 महिन्यांहून अधिक काळ काम करूनही त्याने तेवढी कमाई केली नव्हती.

मात्र अशी यशस्वी फसवणूक सहजपणे घडत नसे.

कार्लोस म्हणतात, "ते याला 'बॉम्बिंग' म्हणतात. म्हणजे तुम्ही शेकडो, किंबहुना हजारो लोकांवर प्रयत्न करत राहता."

कार्लोसची ओळख अझीझ नावाच्या आणखी एका याहू बॉयशी झाली. त्यानं वयाच्या 14व्या वर्षी फसवणूक सुरू केली होती. तो आपल्या गावातून लागोसमध्ये आला होता आणि आई व धाकट्या बहिणीसोबत एका छोट्या अपार्टमेंटमध्ये राहत होता.

अझीझ अमेरिकन पुरुषांशी बोलताना स्वतःला "व्हॅनेसा" नावाची महिला असल्याचं सांगत असे आणि त्यासाठी एका सुंदर गोऱ्या महिलेचा चोरलेला फोटो वापरत असे.

सुरुवातीला त्याला यश मिळालं नाही. त्याचं इंग्रजी कमकुवत होतं. शिवाय त्याची कधी मैत्रीणही नव्हती आणि तो कधी अमेरिकेतही गेला नव्हता.

बिगीने कार्लोसला इकोटुनच्या नाईटलाईफशी ओळख करून दिली (बिगी या फोटोमध्ये नाही).

फोटो स्रोत, Carlos Barragán

फोटो कॅप्शन, बिगीने कार्लोसला इकोटुनच्या नाईटलाईफशी ओळख करून दिली (बिगी या फोटोमध्ये नाही).

कार्लोस सांगतात, "पाश्चिमात्य जगाबद्दल फारशी माहिती नसते, अशा मुलांबद्दल आपण बोलतो आहोत."

शेवटी अझीझला पहिलं मोठं यश मिळालं आणि त्याला पाच डॉलर मिळाले. त्या पैशांत त्यानं एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन चिकन खाल्लं. त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तो एअर-कंडिशन्ड इमारतीत गेला होता.

पण अझीझची आई आणि आजी दोघीही अशिक्षित होत्या आणि रस्त्याच्याकडेला अन्न विकत होत्या. तो जे करतोय ते चुकीचं आहे हे त्यांना माहिती होतं. "फसवणूक बंद कर, नाहीतर घराबाहेर काढलं जाईल", असा इशारा त्याच्या आजीनं दिला होता.

तेव्हापासून त्यानं हे काम थांबवलं आहे.

कार्लोस सांगतात की जेव्हा ते नायजेरियात आले, तेव्हा त्यांचा ठाम विश्वास होता की हे ठग एखाद्या धूर्त गुन्हेगारी टोळीचा भाग आहेत. पण अझीझसोबतच्या नात्यामुळे त्यांना त्या समजुतीचा फेरविचार करावा लागला.

ते म्हणतात, "पश्चिम आफ्रिकेतलं एखादं शक्तिशाली गुन्हेगारी जाळं आपल्याला लक्ष्य करत आहे, असं मानणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात कदाचित एखादी व्यक्ती आपल्या फोनवरून हे सगळं करत असते."

त्यांनी हेही पाहिलं की अनेक तरुण ठग स्वतःही कधी ना कधी बळी ठरतात. स्वतःच्या कमाईचं प्रदर्शन करून ते अधिक शक्तिशाली गुन्हेगारांचं लक्ष वेधून घेतात.

कार्लोसची ओळख अझीझ नावाच्या आणखी एका याहू बॉयशी झाली.
फोटो कॅप्शन, कार्लोसची ओळख अझीझ नावाच्या आणखी एका याहू बॉयशी झाली.

पण एक प्रश्न मात्र कायम राहिला. असे तरुण, ज्यांपैकी काहींनी शालेय शिक्षणही पूर्ण केलं नव्हतं, ते कार्लोसच्या आईसारख्या प्रौढ व्यक्तींना स्वतःवर विश्वास ठेवायला कसं भाग पाडत होते?

ज्याची कमतरता असते अशी गोष्ट आपण लोकांना देतो असं या ठगांनी कार्लोस यांना सांगितलं. ती गोष्ट होती, जिव्हाळा आणि कोणाशी तरी जोडलं गेल्याची भावना.

"तुम्हाला फक्त त्यांना हे जाणवून द्यायचं असतं की तुमचं लक्ष त्यांच्याकडे आहे. जसं, गुड मॉर्निंग, कसे आहात डिअर? दुपारच्या जेवणात काय खाल्लंत?" असं ते सांगत.

एकटेपणामुळे निर्माण झालेली सोबतीची ही गरज फसवणुकीच्या बळींशी झालेल्या संवादांत स्पष्टपणे दिसून येते, असं कार्लोस सांगतात.

एका व्यक्तीनं कार्लोसला सांगितलं, "हा जगातील सर्वात दुःखद गुन्हा आहे कारण ते फक्त तुमचे पैसेच घेत नाहीत."

"ते तुम्हाला भावनिकदृष्ट्याही उद्ध्वस्त करतात. आणि जेव्हा ती व्यक्ती अचानक गायब होते, तेव्हा तुम्या आत एक रिकामेपण निर्माण होतं. त्यानंतर समाज तुम्हालाच मूर्ख म्हणतो आणि ही तुमचीच चूक असल्याचं सांगतो."

कार्लोस यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित 'द याहू बॉईज' नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

हा लेख BBC World Service वरील Outlook या कार्यक्रमाच्या एका भागावर आधारित आहे. हा मजकूर बेक्का जॉन्स आणि ग्लोबल जर्नलिझम यांनी लिहिला आहे.