मूत्राशयातून काढला 3.1 किलोचा खडा; शहामृगाच्या अंड्यासारखा आकार, नवजात बाळाएवढं वजन

श्रीलंकेत डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्राशयातून हा खडा काढला आहे.

फोटो स्रोत, Trincomalee General Hospital

फोटो कॅप्शन, श्रीलंकेत डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्राशयातून हा खडा काढला आहे.
    • Author, बीबीसी सिंहला आणि कोह इव्ह
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

श्रीलंकेत डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या मूत्राशयातून (ब्लॅडरमधून) 3.1 किलोग्रॅम वजनाचा खडा काढला आहे. डॉक्टरांच्या मते, हा आतापर्यंत नोंद झालेला आपल्या प्रकारातील सर्वात मोठा खडा असू शकतो.

ही शस्त्रक्रिया गेल्या आठवड्यात श्रीलंकेच्या पूर्व भागातील त्रिंकोमाली येथील रुग्णालयात करण्यात आली.

55 वर्षीय रुग्णाला स्ट्रोक आल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला लघवी करण्यास अडचण येत असल्याचं उपचारादरम्यान डॉक्टरांच्या लक्षात आलं.

तपासणी केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मूत्राशयात खडा असल्याचे आढळले.

डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे हा खडा काढला. या खड्याचे वजन नवजात बाळाच्या वजनाइतकं होतं. त्याचा आकार शहामृगाच्या अंड्यासारखा होता.

शहामृगाच्या अंड्याच्या आकाराचा हा दगड सुमारे 17 सेंटीमीटर रुंद होता.

फोटो स्रोत, Trincomalee General Hospital

फोटो कॅप्शन, शहामृगाच्या अंड्याच्या आकाराचा हा दगड सुमारे 17 सेंटीमीटर रुंद होता.

शस्त्रक्रियेचं नेतृत्व करणारे डॉ. बालकृष्णन यांनी बीबीसी सिंहलाशी बोलताना सांगितले, "उपलब्ध नोंदींनुसार, हा आतापर्यंत नोंदवण्यात आलेला आणि शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आलेला सर्वात मोठा मूत्राशयातील खडा आहे."

ते पुढे म्हणाले की रुग्णाची प्रकृती 'अत्यंत चांगली' आहे.

डॉक्टरांनी सांगितले की रुग्ण अद्याप रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ. बालकृष्णन यांच्या अंदाजानुसार, हा खडा सुमारे 5 ते 10 वर्षे रुग्णाच्या मूत्राशयात असावा.

मूत्रातील खनिजांचे स्फटिकीकरण होऊन ते घनगाठींमध्ये रूपांतरित झाल्यावर मूत्राशयातील खडे तयार होतात.

ही समस्या सहसा मूत्राशय पूर्णपणे रिकामं न झाल्यास उद्भवते. अशावेळी मूत्राशयात राहिलेले दाट मूत्र पुढे स्फटिकांमध्ये रुपांतरित होऊ शकतं.

वाळूच्या कणाएवढ्या आकाराचे लहान खडे नैसर्गिकरित्या बाहेर पडू शकतात.

मात्र 1 सेंटीमीटरपेक्षा मोठे खडे अनेकदा मूत्रप्रवाहात अडथळा निर्माण करतात आणि त्यासाठी वैद्यकीय हस्तक्षेपाची आवश्यकता भासते.

खड्याचा आकार 4 सेंटीमीटरपेक्षा मोठा असल्यास तो 'मोठा' मानला जातो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, यापूर्वीचा सर्वात मोठा मूत्राशयातील खडा 2003 मध्ये ब्राझीलमधील एका रुग्णामधून काढण्यात आला होता. त्याचे वजन 1.9 किलोग्रॅम (4.2 पाउंड) होते आणि त्याची लांबी 17.9 सेंटीमीटर (7 इंच) होती.

गेल्या आठवड्यात श्रीलंकेत मूत्राशयातून काढण्यात आलेला खडा सुमारे 17 सेंटीमीटर लांब होता.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.