मान्सून ब्रेक : पाऊस अचानक थांबण्यामागे आहेत 'ही' कारणं, तज्ज्ञांनी पावसाबाबत दिली महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- Author, चंदन कुमार जजवाडे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनच्या जोरदार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालेलं गेल्या काही दिवसांत दिसलं.
पण आता 'मान्सून ब्रेक'मुळे वायव्य आणि मध्य भारतात पुढील काही दिवस पाऊस पडण्याची शक्यता नाही, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
हवामानात अचानक झालेल्या या बदलांबाबत तज्ज्ञ चिंता व्यक्त करत आहेत. विशेषतः, देशात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा खूपच कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना याबाबत अधिक चिंता वाटते आहे.
हवामान विभागाने शनिवारी असंही नमूद केलंय की, पुढील 6–7 दिवसांमध्ये वायव्य भारत, पश्चिम-मध्य भारत आणि द्वीपकल्पीय भारतातील मैदानी प्रदेशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या हंगामातील अशा प्रकारचा बदल नेमका किती गंभीर आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू.
'लाइव्ह वेदर ऑफ इंडिया' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक नवदीप दहिया यांनी 'एक्स' (X) वर लिहिलं की, "जुलैच्या दुसऱ्या आठवड्यातील सॅटेलाईट इमेजेस अत्यंत चिंताजनक परिस्थिती दर्शवत आहेत."
पश्चिम घाटापासून ते देशांतर्गत भागातील मान्सूनच्या प्रमुख क्षेत्रांपर्यंत, कुठेही पावसाची चिन्हं जवळपास दिसत नाहीत. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर या दोन्ही ठिकाणी ढगांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. ही परिस्थिती 12 जुलैऐवजी 12 एप्रिलच्या सकाळसारखी वाटत आहे.
त्यांच्या मते, "18 जुलैपूर्वी मान्सूनच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता नाही."
हवामान तज्ज्ञांच्या मते, दिल्ली-एनसीआर आणि देशातील इतर अनेक भागांत सध्या सुरू असलेला पाऊस आगामी दिवसांत ओसरण्याची शक्यता आहे.
खरं तर, हवामानातील हा बदल 'मान्सून ब्रेक'मुळे झाला आहे. ही एक सामान्य घटना असली, तरी या वर्षी ती काहीशी असामान्य आहे.
हवामानातील बदल किती महत्त्वाची घटना?
'स्कायमेट वेदर'चे प्रमुख आणि हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितलं आहे की, 19-20 जुलैपर्यंत वायव्य आणि मध्य भारतात पावसाची शक्यता नाही.
यामुळे, दिल्ली-एनसीआरसह अनेक भागांतील पावसावर मोठा परिणाम होईल. त्याच वेळी, दिल्ली आणि आसपासच्या परिसरातील तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.
महेश पलावत म्हणतात की, "जुलै आणि ऑगस्ट महिन्यांत मान्सूनमध्ये एकदा किंवा दोनदा खंड पडणं ही एक स्वाभाविक बाब आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांत मान्सूनमध्ये असा पूर्ण खंड पडलेला नाही. सध्या वायव्य आणि मध्य भारतात पावसाचा खंड (कोरडं हवामान) दिसून येत आहे, तर पूर्व भारतात पाऊस पडत आहे."

फोटो स्रोत, IMD
खरं तर, हा खरीप हंगाम आहे आणि या हंगामातील शेती अधिकतर मान्सूनवर अवलंबून असते. त्यामुळे, शेतकऱ्यांचीही चिंता वाढताना दिसत आहे.
मात्र, महेश पालावत यांच्या मते, मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच या भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
त्यांच्या मते, "या परिस्थितीत पर्वतांच्या पायथ्याशी मुसळधार पाऊस पडतो, तर मध्य आणि पश्चिम भारतातील हवामान जवळपास पूर्णपणे कोरडं होतं. या काळात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होतं. पाऊस थांबतो आणि हवेत ओलावा नसल्यामुळे आकाश बऱ्याच अंशी निरभ्र होतं."
जेव्हा हा मान्सून दक्षिणेकडे सरकेल, तेव्हा या भागांत पुन्हा पाऊस पडू शकेल. हे 19-20 जुलैच्या सुमारास घडू शकते.
किती मोठी चिंतेची बाब आहे?
मान्सून ब्रेकमुळे अनेक लोकांनी चिंता व्यक्त करण्यासही सुरुवात केली आहे.
टीएमसीच्या राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी 'एक्स' (X) वर लिहिलंय की, "ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. जुलै महिन्यातील कमकुवत मान्सूनमुळे शेती, जलसुरक्षा आणि ग्रामीण भागातील लोकांच्या उपजीविकेवर संकट ओढवलं आहे. मोदी सरकारकडे यावर काही योजना आहे का? मी हा मुद्दा संसदेत मांडेन."
संसदेचं पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होऊन 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. तोपर्यंत मान्सूनचा पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता असली, तरी तसं न झाल्यास संसदेत हा मुद्दा उपस्थित केला जाऊ शकतो.

फोटो स्रोत, Firdous Nazir/NurPhoto via Getty Images
भारतात या वर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा सुमारे 40 टक्के कमी पाऊस झाला. मात्र, त्यानंतर 9 जुलैपर्यंत देशात चांगला पाऊस झाला आहे.
त्यामुळे, 9 जुलैपर्यंत पावसाची तूट केवळ 12 टक्क्यांपर्यंत खाली आली होती. मात्र, मान्सून ब्रेकमुळे पावसाची तूट पुन्हा एकदा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचू शकते.
महेश पलावत म्हणतात ती, "मान्सून ब्रेक ही एक नेहमीचीच बाब आहे, पण यावेळी 'एल निनो'चा प्रभाव दिसून येत आहे. मान्सून आधीच कमकुवत आहे आणि हा खंड दीर्घकाळ टिकणारा आहे. मान्सून ब्रेक सहसा इतके दीर्घ नसतात."
"साधारणपणे, पाऊस पुन्हा खाली सरकण्यापूर्वी 4-5 दिवस वरच्या भागाकडे वळतो. पण यावेळी तो दहा दिवस तसाच राहणार आहे. त्यामुळे पावसाचा मोठा खंड पडेल. तो इतका काळ लांबायला नको."
त्यांनी सांगितलं की, यामुळे मान्सूनच्या पावसाची आकडेवारी आणखी कमकुवत होईल.
'एल निनो' ही एक नैसर्गिक आणि गुंतागुंतीची हवामानविषयक घटना आहे. जेव्हा मध्य आणि पूर्व पॅसिफिक महासागरातील समुद्राचं पाणी नेहमीपेक्षा अधिक उबदार होतं, तेव्हा ही घटना घडते.
याचा परिणाम म्हणून जागतिक तापमान वाढतं आणि 'ट्रेड विंड्स' कमकुवत होतात. याचा परिणाम जगभरातील पावसाच्या पद्धतींवर होतो.
'एल निनो'चा भारतीय उपखंडातील हवेच्या दाबावर परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा मान्सून कमकुवत होतो आणि देशाच्या अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते.
मान्सूनमध्ये खंड का पडतो?
मान्सून ब्रेक ही एक सामान्य हवामानशास्त्रीय घटना आहे. जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये खंड पडणं ही काही असामान्य बाब नाही.
महेश पलावत म्हणतात की, "वाऱ्याच्या दिशेमुळे मान्सूनमध्ये खंड पडतो. जर पश्चिमेकडील वारे अधिक प्रभावी झाले, तर ते मान्सूनचा पट्टा (ट्रफ) उत्तरेकडे ढकलतात."

फोटो स्रोत, Getty Images
असं म्हटलं जातं की, जर एखादी नवीन हवामान प्रणाली, विशेषतः अधिक तीव्र चक्रीवादळी कमी दाबाचा पट्टा तयार झाला, तर ती मान्सूनला स्वतःकडे खेचून घेते.
ते म्हणतात की, "जेव्हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची प्रणाली तयार होऊन ती भूभागाकडे सरकते, तेव्हा ती मान्सूनला आपल्याकडे खेचून घेते. यामुळे पावसाला पुन्हा सुरुवात होईल."
सध्या मान्सूनचा पश्चिम भाग पर्वतीय क्षेत्रांवर आहे, तर पूर्व भाग दक्षिणेकडे आहे. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये पाऊस पडत राहील, परंतु, अनेक भाग कोरडेच राहतील.
एल निनोचा प्रभाव 2027 पर्यंत टिकून राहू शकतो
या वर्षी आतापर्यंत झालेल्या सरासरीपेक्षा कमी पावसाचं कारण 'एल निनो' चा प्रभाव असल्याचं मानलं जात आहे.
11 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या बीबीसीच्या एका अहवालानुसार, अमेरिकेच्या 'नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन'ने (NOAA) म्हटले आहे की, 2026 च्या उर्वरित महिन्यांत 'एल निनो'ची स्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
अनेक अंदाजांनुसार, ही घटना आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या सर्वात शक्तिशाली 'एल निनो' घटनांपैकी एक असू शकते.
गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे जागतिक तापमानात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, 2027 हे वर्ष आतापर्यंतच्या नोंदींमधील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरू शकते. याचा परिणाम हवामानाची स्थिती, अन्नपुरवठा आणि अर्थव्यवस्थांवर होण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Kevin Carter/Getty Images
मध्य उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सामान्य तापमानापेक्षा 0.5 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक असल्याचं नोंदवल्यानंतर, 'एन निनो'च्या नवीन टप्प्याची सुरुवात झाल्याचं 'एनओएए' (NOAA) च्या शास्त्रज्ञांनी निश्चित केलं आहे.
शास्त्रज्ञांनी वातावरणीय स्थितीतील बदलही निदर्शनास आणले आहेत. त्यानुसार, पश्चिम पॅसिफिक क्षेत्राच्या तुलनेत मध्य पॅसिफिक क्षेत्रात हवेचा दाब कमी असल्याचं दिसून आलं.
जपान हवामान विभागानेही 'एल निनो'ची स्थिती निर्माण झाल्याचं स्पष्ट केलं आहे.
एनओएए (NOAA) च्या मते, हा 'एल निनो' 'अत्यंत तीव्र' स्वरूप धारण करण्याची 63 टक्के शक्यता आहे.
संस्थेनं नमूद केलं आहे की, असं घडल्यास 1950 नंतर नोंदवल्या गेलेल्या सर्वात महत्त्वपूर्ण 'एल निनो' घटनांपैकी ही एक घटना ठरेल.
ही स्थिती किमान 2027 च्या सुरुवातीपर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























