अमेरिका-इराण युद्धविरामाचा लगेच परिणाम; तेलाच्या किंमती घसरल्या, शेअर बाजारातही उसळी

इंधन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ऑसमंड चिया आणि पीटर हॉस्किन्स
    • Role, बिझनेस रिपोर्टर
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिका आणि इराण यांनी दोन आठवड्यांसाठी सशर्त युद्धविराम करण्याचा करार केला.

या करारामुळे सगळ्या जगासाठी महत्त्वाची असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू होणार आहे.

यामुळे तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या आहेत. आणि शेअर बाजाराने उसळी मारली आहे.

ब्रेंट क्रूड तेलाची किंमत सुमारे 13 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 94.80 डॉलर (सुमारे 8775 रुपये) झाली. तर अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या तेलाच्या किंमतीत 15 टक्क्यांपेक्षा जास्त घट होऊन ती 95.75 डॉलरवर (सुमारे 8863 रुपये) आली आहे.

परंतु, तरीही तेलाच्या किंमती युद्ध सुरू होण्यापूर्वीपेक्षा अजूनही जास्त आहेत. 28 फेब्रुवारीला संघर्ष सुरू होण्याच्या वेळी तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 70 डॉलर (सुमारे 6480 रुपये) होती.

मध्य पूर्वेतून येणाऱ्या तेल आणि गॅसच्या पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे, त्यामुळे ऊर्जेच्या किंमतीत वाढ झाली आहे. कारण अमेरिका आणि इस्रायलच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिली होती.

बुधवारी (8 एप्रिल) सकाळी आशिया-पॅसिफिक भागातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक वाढल्याचे दिसून आले.

शेअर बाजार वधारला

जपानचा निक्केई 225 निर्देशांक 5 टक्क्यांनी वाढला, तर दक्षिण कोरियाच्या कोस्पीने जवळपास 6 टक्क्यांनी उसळी घेतली. हाँगकाँगचा हँग सेंग 2.8 टक्क्यांनी वाढला, तर ऑस्ट्रेलियाचा एएसएक्स 200, 2.7 टक्क्यांनी वधारला.

अमेरिकेतील शेअर बाजार फ्युचर्सनेही वॉल स्ट्रीटचा बाजार उघडल्यानंतर वाढ होण्याची शक्यता दाखवली आहे.

युद्धविरामाच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजार वधारला आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, युद्धविरामाच्या घोषणेमुळे भारतीय शेअर बाजार वधारला आहे.

फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे एखादी गोष्ट ठरवलेल्या किमतीत नंतर खरेदी करण्याचा करार. अमेरिकेतील शेअर बाजार फ्युचर्सच्या बाबतीत, हे बाजार उघडण्यापूर्वी त्याचा कल कुठे जाईल हे दाखवू शकतात.

मंगळवारी (7 एप्रिल) सायंकाळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं की, "मी इराणवर होणारी बॉम्बफेक आणि हल्ले दोन आठवड्यांसाठी स्थगित करायला तयार आहे. पण हे फक्त तेव्हाच होईल जेव्हा इराण होर्मुझची सामुद्रधुनी 'पूर्णपणे, तात्काळ आणि सुरक्षितपणे उघडण्यास सहमत होईल'."

त्यांनी मंगळवारी सायंकाळी 8 ची (बुधवारी मध्यरात्री जीएमटी 00:00) अंतिम वेळ निश्चित केली होती आणि इशारा दिला होता की, जर करार झाला नाही तर "एक संपूर्ण संस्कृती आज रात्री नष्ट होईल".

'ट्रम्प कदाचित काळजीपूर्वक वागत असावेत'

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सोशल मीडियावर म्हटलं की, जर 'इराणवर होणारे हल्ले थांबवले गेले', तर ते युद्धविरामाला सहमती दर्शवतील. आणि त्याचबरोबर होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित मार्गासाठी 'तेव्हाच उपलब्ध' होईल, असंही त्यांनी म्हटलं.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

त्यांच्या धमक्यांनंतरही, युद्ध वाढून ऊर्जा किंमती आकाशाला भिडू नयेत म्हणून ट्रम्प कदाचित काळजीपूर्वक वागत असावेत, असं मार्केट रिसर्च फर्म 'अल्फासेन्स'चे झेवियर स्मिथ यांनी सांगितलं.

स्मिथ म्हणाले की, त्यामुळे ट्रम्प 'स्वतःला आर्थिक नुकसान पोहोचवू शकतात', आणि असा धोका फार कुणीही घेणार नाही. विशेष करून ट्रम्प यांच्या नेतृत्वावरील मान्यतेवर दबाव असताना.

एमएसटी मार्की येथील सॉल कावोनिक म्हणाले की, युद्धविरामादरम्यान होर्मुझ सामुद्रधुनीत अडकलेले आणखी काही तेल टँकर जहाजे पुढे जाऊ शकतील. त्यामुळे पुढील काही आठवड्यांत बाजारपेठांना थोडासा दिलासा मिळू शकतो.

आशियातील देशांनी केल्या वाटाघाटी

संघर्ष असूनही काही जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून गेली आहेत. परंतु, ही संख्या नेहमीपेक्षा फारच कमी होती.

आशियातील देशांनी, म्हणजे भारत, मलेशिया आणि फिलिपिन्सने गेल्या काही आठवड्यांत त्यांच्या जहाजांसाठी सुरक्षित मार्ग मिळावा यासाठी वाटाघाटी केल्या आहेत.

युद्ध सुरू झाल्यापासून त्यांच्या अनेक जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडल्याचे चीननेही मान्य केले आहे.

संघर्ष असूनही काही जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून गेली आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संघर्ष असूनही काही जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून गेली आहेत.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, माल्टाचा ध्वज असलेली आणि फ्रेंच कंपनी सीएमए सीजीएमची मालकी असलेल्या मालवाहतूक जहाजाने होर्मुझची सामुद्रधुनी पार केली. ही माहिती माध्यम संस्था बीएफएम टीव्ही (जी या शिपिंग फर्मच्या मालकीची आहे) यांनी शुक्रवारी (3 एप्रिल) दिली.

त्याचबरोबर नैसर्गिक वायू घेऊन जात असलेले जपानी जहाजही होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडले, असे शिपिंग कंपनी एमओएलने सांगितले.

कावोनिक म्हणाले की, जोपर्यंत दीर्घकालीन शांततेचा करार होईल याची खात्री होणार नाही. तोपर्यंत युद्धविराम असला तरी मध्य पूर्वेत ऊर्जा उत्पादन पूर्ण क्षमतेने सुरू होणे अद्याप शक्य नाही.

या भागातील ऊर्जा पायाभूत सुविधांच्या झालेल्या नुकसानीमुळे उत्पादन पुन्हा सुरू होण्यासाठी काही महिने लागू शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

इराणने अमेरिका-इस्रायलला प्रत्युत्तर म्हणून, तेल समृद्ध मध्य पूर्व देशांमधील ऊर्जा, औद्योगिक सुविधा आणि इतर पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे.

रिसर्च संस्था रिस्टॅड एनर्जीच्या म्हणण्यानुसार, या नुकसानीची दुरुस्ती होण्यासाठी काही वर्षे लागू शकतात. आणि त्यासाठी 25 अब्ज डॉलरहून अधिक खर्च येऊ शकतो.

युद्ध थांबले, पण दुरुस्तीसाठी वेळ लागणार

मार्चच्या मध्यात कतारमधील रास लफान औद्योगिक केंद्रावर झालेल्या हल्ल्यांनंतर ऊर्जा किंमतीमध्ये वाढ झाली. हे केंद्र जगातील सुमारे एक पंचमांश द्रवीभूत नैसर्गिक वायूचे (एलएनजी) उत्पादन करते.

या हबचे मालक म्हणाले की, हल्ल्यांमुळे देशाची निर्यात क्षमता 17 टक्क्यांनी कमी झाली आहे. नुकसान दुरुस्त करण्यासाठी पाच वर्षे लागू शकतात.

आशियातील देशांना इराण युद्धाचा मोठा आर्थिक फटका बसला आहे. कारण अनेक देश आखातावरून येणाऱ्या तेल‑गॅसवर खूप अवलंबून आहेत.

इराण

फोटो स्रोत, Getty Images

गेल्या काही आठवड्यांत, या प्रदेशातील सरकारांनी आणि कंपन्यांनी ऊर्जा दर जास्त असणे आणि इंधन तुटवडा हाताळण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्या आहेत.

मध्य पूर्वतून आपल्या गरजेपैकी 98 टक्के तेल आयात करणाऱ्या फिलीपिन्सने 24 मार्च रोजी देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली. अशी घोषणा करणारा फिलीपिन्स हा जगातील पहिला देश ठरला. फिलीपिन्समध्ये पेट्रोलच्या किमती दुपटीपेक्षा जास्त वाढल्या आहेत.

या भागातील अनेक एअरलाईन्सनी जेट इंधनाच्या किंमती वाढल्यामुळे तिकीटांचे दर वाढवले आहेत आणि काहींनी आपली उड्डाणं रद्द केली आहेत.

जपानच्या इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी इकॉनॉमिक्समधील मधील इचिरो कुतानी म्हणाले की, आशियातील विकसनशील देशांना युद्धामुळे मोठा फटका बसला आहे, कारण त्यांच्याकडे स्वतःची तेल प्रक्रिया करणारी फॅक्टरी (रिफायनरी) किंवा पुरेसे तेलाचे साठे नाहीत.

"युद्धविराम ही आशियातील देशांसाठी चांगली बातमी आहे. जर हा युद्धविराम कायम राहिला, तर तेलाच्या किंमती परत सामान्य स्थितीत येऊ शकतात, पण यासाठी थोडा वेळ लागू शकतो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)