'जगाचा नकाशा बदलण्याचा' प्रस्ताव संयुक्त राष्ट्रात मंजूर; 164 देशांचा पाठिंबा, मग अमेरिकेचाच विरोध का?

जगाचा नकाशा
    • Author, थॉमस मुखवाना
    • Role, आफ्रिका प्रतिनिधी
    • Author, वायक्लिफ मुइया
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

संयुक्त राष्ट्राच्या महासभेने जगाचा सध्याचा नकाशा बदलण्याच्या बाजूने मतदान केले आहे. नव्या नकाशात आफ्रिकेचा आकार अधिक अचूकपणे दर्शवण्यात आलेला आहे.

या ठरावाला एकट्या अमेरिकेने विरोध केला. फ्रान्स आणि ब्रिटनसह 164 देशांनी याला पाठिंबा दिला, तर सहा देश तटस्थ राहिले.

याच्या विरोधात मतदान करताना अमेरिकेच्या प्रतिनिधींनी यामुळं संयुक्त राष्ट्रांच्या कार्याचा आणि उद्देशाचा उपहास होत असल्याचा आरोप केला.

टोगोनं प्रस्तावाचं समर्थन केलं आणि आफ्रिकन युनियनच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.

संयुक्त राष्ट्रांत झालेलं हे मतदान बंधनकारक नाही. पण त्यामुळं जगभरातील संस्थांद्वारे वापरल्या जाणाऱ्या जगाच्या नकाशात बदल घडतील.

16 व्या शतकापासून वापरल्या जाणाऱ्या जगाच्या नकाशावर या टीका केली जात आहे. त्याचं कारण म्हणजे, त्यात आफ्रिकेचा आकार ग्रीनलँडच्या एवढा दाखवला आहे, पण प्रत्यक्षात तो त्यापेक्षा 14 पट मोठा आहे.

टीकाकारांच्या मते, यामुळं विषुववृत्ताजवळ असलेल्या देशांच्या विकासाशी संबंधित गरजा आणि क्षमता कमी लेखल्या जातात.

फ्लेमिश नकाशाकार गेरार्डस मर्केटर यांनी 1559 मध्ये मर्केटर नकाशा तयार केला होता.

युरोपियन अभ्यासकांना जगभर प्रवास करण्यासाठी मदत व्हावी, या उद्देशानं हा नकाशा तयार करण्यात आला होता.

सध्याच्या नकाशात काय चूक आहे?

गेरार्डस मर्केटरचे नकाशे अचूक नाहीत, त्याचं कारण म्हणजे पृथ्वीगोलाचा पृष्ठभाग द्विमितीय (टुडी) नकाशावर अचूकपणे दर्शवणे अशक्य आहे.

त्यामुळं कधीही जगाचा नकाशा बनवताना काही तरी तडजोड करावीच लागते.

मर्केटर नकाशात पृथ्वीचा वक्रभाग दाखवला आहे. त्यात विषुववृत्ताजवळील देश त्यांच्या वास्तविक आकारापेक्षा लहान, तर ध्रुवांजवळील देश मोठे दिसतात.

अफ़्रीका
फोटो कॅप्शन, मर्केटर प्रोजेक्शन असा नकाशा आहे ज्याचा वापर जगभरात व्यापक प्रमाणात केला जातो. पण त्यात खंड आणि देशांचे आकार चुकीचे आहेत.

यावर तोडगा काढण्याच्या प्रयत्नात, नकाशा तज्ज्ञांच्या एका टीमनं 2018 मध्ये समान-क्षेत्रफळ असलेला एक नकाशा तयार केला. त्याला त्यांनी 'इक्वल अर्थ प्रोजेक्शन' असं नाव दिलं.

आफ्रिकन युनियनच्या 54 सदस्य राष्ट्रांनी फेब्रुवारीमध्ये तो स्वीकारला आणि त्यात "सर्व खंडांचा, विशेषतः आफ्रिकेचा आकार अधिक अचूकपणे दर्शवला", असं म्हटलं.

जगाचा सध्याचा नकाशा तयार करणारे गेरार्डस मर्केटर.
फोटो कॅप्शन, जगाचा सध्याचा नकाशा तयार करणारे गेरार्डस मर्केटर.

"अमेरिका, चीन, भारत, जपान, मेक्सिको आणि युरोपचा मोठा भाग आफ्रिकेत सामावला तरीही काही जमीन शिल्लक राहील," असं #CorrectTheMap या ऑनलाइन मोहीम गटानं म्हटले आहे.

शुक्रवारच्या मतदानापूर्वी, टोगोचे परराष्ट्र मंत्री रॉबर्ट ड्युसी यांनी रॉयटर्सशी बोलताना म्हटलं की, "एका न्याय्य जगाची सुरुवात एका न्याय्य नकाशानं होते."

यापूर्वी, "नकाशा कधीही तटस्थ नसतो. तो धारणा घडवतो. जगातील लोक आणि खंडांचे स्थान आपण कसे समजतो यावर त्याचा परिणाम होतो," असं त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या एका पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन-नोएल बॅरोट यांनी त्याला पाठिंबा दिला आणि त्यांचे मंत्रालय मर्कॅटर नकाशाचा वापर थांबवणार आहे, असं सांगितलं.

नकाशा

"नकाशा बदलल्याने अर्थातच जग बदलत नाही. पण बिघडलेला नकाशा दुरुस्त करणे महत्त्वाचे आहे," असं ते म्हणाले.

पण संयुक्त राष्ट्रांमधील अमेरिकेच्या प्रतिनिधी यारिना फेरेन्सेविच म्हणाल्या की, हा ठराव संयुक्त राष्ट्र महासभेच्या कार्याची आणि उद्देशाची थट्टा करतो.

"आंतरराष्ट्रीय शांतता, समृद्धी किंवा चांगल्या संबंधांच्या खऱ्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, ही संस्था 16 व्या शतकातील नकाशा प्रकल्प, नुकसानभरपाई आणि 'बौद्धिक न्याया'ला प्रोत्साहन देण्यामधील भूमिकेवर चर्चा करत आहे," असे ते म्हणाले.

मार्चमध्ये अटलांटिकपार गुलाम व्यापाराला "मानवतेविरुद्धचा सर्वात गंभीर गुन्हा" घोषित करणारा ठराव मंजूर करण्यात आला, तेव्हाही अमेरिकेनं त्यावर तीव्र टीका केली होती.

नकाशावर आफ्रिका इतका लहान का दिसतो?

"जागतिक नकाशांवर आफ्रिकेचा आकार कमी दाखवणे ही केवळ एक चूक नाही, तर हा नरेटिव्हचा भाग आहे," असं मर्केटर नकाशा विरोधातील मोहिमेत सहभागी असलेल्या 'आफ्रिका नो फिल्टर' गटाचे लेरोटो मोगोएथेले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.

आफ्रिकेबद्दल पसरणारी "जगातील सर्वात दीर्घकाळ चाललेली चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती" थांबवण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग असल्याचं त्यांनी सांगितलं.

आफ्रिका
फोटो कॅप्शन, आफ्रिकेचा आकार कमी दाखवणे ही केवळ एक चूक नाही, तर हा नरेटिव्हचा भाग आहे, असं काही कार्यकर्त्यांचं मत आहे.

केनियाचे भूगोलशास्त्रज्ञ किओको मुएन्डो यांच्या मते, मर्केटर नकाशाने आफ्रिका खंडातील प्रचंड साधन संपत्ती, लोकसंख्या आणि गुंतवणुकीच्या संधी यांचे अप्रत्यक्षपणे कमी मूल्यांकन केले आहे.

"नकाशे हे प्रवाशांसाठी केवळ मार्गदर्शक नसतात. ते प्रदेशांकडे राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कसे पाहिले जाते, हे ठरवतात," असं त्यांनी बीबीसीला सांगितले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन