मुंबईतील गर्जना मोर्चात नागरिकांनी ज्ञानेश कुमार यांच्यावरील राग कसा व्यक्त केला? पाहा 10 फोटोंमधून

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वात रविवारी (4 ऑक्टोबर) गर्जना मोर्चा आयोजित करण्यात आला.
भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मुख्य मागणीसह एसआयआरसंदर्भातील इतर मागण्यांसाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर असलेला नागरिकांचा राग या मोर्चाच्या निमित्ताने पोस्टर्सच्या माध्यमातूनही पाहायला मिळाला.
या मोर्चामध्ये नागरिक कशाप्रकारे सहभागी झाले होते आणि त्यांनी कशा भावना मांडल्या हे काही फोटोंच्या माध्यमातून पाहुयात.

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
एसआयआरच्या प्रक्रियेत ज्यांना मतदार यादीतील नावासंबंधी अडचणी निर्माण झाल्या असे अनेक नागरिक मोर्चात सहभागी होत असल्याचं पाहायला मिळालं.

या मोर्चात सर्वपक्षीयांनी सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. कोणत्याही पक्षाचा झेंडा न घेता तिरंगा हाती घेऊन हा मोर्चा काढण्यात आला.

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
नागरिकांनी या मोर्चामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स घेऊन त्यांच्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टरद्वारे ज्ञानेश कुमार यांच्यासह केंद्र सरकारलाही लक्ष्य करण्यात आलं.

अडवाणी, केजरीवाल, नीलेकनी यांच्या नावांमध्ये अडचणी येत असतील, तर शोषित वंचितांबाबत काय होईल. त्यामुळं मी विरोध दर्शवण्यासाठी आलो आहे, असं वरील फोटोत दिसणाऱ्या कृष्णन यानं म्हटलं.

फोटो स्रोत, BBC/Shahid Sheikh
वोटिंग मशीन बंद होऊन बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे. हे झालं तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल. मग कोणाचीही सत्ता आली तर हरकत नाही, असं मोर्चानंतर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, BBC/Shahid Sheikh
"ज्ञानेश कुमार यांची नेमणूक ही पक्षपातीपणे झाली आहे. राहुल गांधी यांनी नियुक्तीला विरोध केला होता. ज्ञानेश कुमारला जे संरक्षण आहे ते देशाच्या पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही देण्यात आलेलं नाही," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, BBC/Shardul Kadam
मतदार यादीतलं नाव काढलं आहे. म्हणजे आमची देशातली ओळख संपत चालली आहे. आम्ही महाराष्ट्रीय आहोत, भारतीय आहोत की बांगलादेशी आहोत याचं उत्तर ज्ञानेश कुमारांनी द्यावं, अशी प्रतिक्रिया मोर्चात सहभागी झालेले प्रशांत गुप्ते यांनी दिली.

फोटो स्रोत, BBC/Shahid Sheikh
मुंबईतील मेट्रो सिनेमा परिसरातील या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. मेट्रो सिनेमा ते महानरपालिका मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

फोटो स्रोत, BBC/Shahid Sheikh
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबरच अमित ठाकरे, बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यासह महाविकास आघाडीतील इतरही काही नेते मोर्चासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























