ट्रम्प यांनी भारताबाबत केलेल्या वक्तव्यांबाबत मार्को रुबिओ यांचं स्पष्टीकरण, दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल काय म्हणाले?

फोटो स्रोत, Julia Demaree Nikhinson / POOL / AFP via Getty Images
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी भारत-अमेरिका संबंधांबद्दल स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की दोन्ही देशांमधील संबंधांमधील 'वेग मंदावलेला नाही'.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या अलीकडच्या वक्तव्यांवर देखील रुबिओ यांनी प्रतिक्रिया दिली.
मार्को रुबिओ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत रविवारी (24 मे) नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली.
यावेळेस त्यांनी भारत-अमेरिका संबंधांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.
"अमेरिका-भारत संबंधांतील वेग थोडीही कमी झालेला नाही. काहीजण असं का म्हणत आहेत, हे मी समजू शकतो. मात्र मी याच्याशी सहमत नाही. हा भारताबद्दलचा मुद्दा नाही. ही व्यापाराबद्दलची आणि अमेरिकेबद्दलची बाब आहे," असं मार्को रुबिओ म्हणाले.
रुबिओ यांनी ट्रम्प यांच्या वक्तव्यांबद्दल स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष असं म्हणालेले नाहीत की 'भारताबरोबरच्या व्यापाराबाबत तणाव निर्माण करण्याचा एखादा मार्ग शोधूया.' राष्ट्राध्यक्ष म्हणाले, 'अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत सध्याची जी व्यापार व्यवस्था आहे, ती अशीच पुढे सुरू राहू शकत नाही. एक मोठं असंतुलन निर्माण झालं आहे. त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे'."
"त्यांनी हे जागतिक दृष्टीकोनातून पुढे नेलं. जगात क्वचितच असा देश असेल, जिथे मी गेलो आणि व्यापाराचा मुद्दा उपस्थित झाला नाही. कारण आम्ही ते जागतिक दृष्टीकोनातून केलं आहे," असं ते पुढे म्हणाले.

फोटो स्रोत, Julia Demaree Nikhinson / POOL / AFP via Getty Images
ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीपासूनच व्यापाराबाबत वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांनी भारतासह जगभरातील देशांवर टॅरिफ लागू केले आहेत.
भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात करण्यासंदर्भातही ट्रम्प यांनी आक्षेप घेतला होता. तसंच त्यासाठीचा दंड म्हणून त्यांनी भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता. त्यामुळे अमेरिकेनं भारतावर लावलेला एकूण टॅरिफ 50 टक्के झाला होता. अर्थात नंतर टॅरिफ कमी करण्यात आला होता.
भारताबरोबर लवकरच व्यापार करार होण्याची आशा मार्को रुबिओ यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की यासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेत मोठी प्रगती झाली आहे. ते पुढे म्हणाले की हा संभाव्य करार दोन्ही देशांसाठी फायदेशीर आणि टिकाऊ ठरेल.
अमेरिका-इराणमधील करार आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?
मार्को रुबिओ यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत इराणबरोबरच्या संभाव्य कराराचे संकेत दिले.
"कदाचित आज थोड्या वेळानं आणखी माहिती समोर येईल," असं ते म्हणाले.
अर्थात, ते असंही म्हणाले की याबाबत पुढील घोषणा 'राष्ट्राध्यक्ष (डोनाल्ड ट्रम्प) करतील.'
"वाटाघाटींमध्ये काही प्रगती झाली आहे. बरीच महत्त्वाची प्रगती झाली आहे. मात्र अद्याप अंतिम टप्प्यापर्यंत वाटाघाटी पोहोचलेल्या नाहीत," असं ते म्हणाले.
होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत मार्को रुबिओ यांनी 'चांगल्या बातमी'चे संकेत दिले. मात्र त्यांनी हेदेखील मान्य केलं की अजून यासंदर्भातील 'काम पूर्ण व्हायचं' आहे.

फोटो स्रोत, Julia Demaree Nikhinson / POOL / AFP via Getty Images
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री म्हणाले की पुढील काही तासांमध्ये जगाला 'किमान होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या बाबतीत' काही चांगली बातमी मिळू शकते.
अर्थात, ते असंही म्हणाले, "आम्हाला याबाबतीत अजून काही काम करायचं आहे. बातमी चांगली आहे, मात्र अजून गोष्टी अंतिम टप्प्यात गेलेल्या नाहीत."
मार्को रुबिओ असंही म्हणाले की इराणला कधीही अण्वस्त्र बाळगता येणार नाहीत. ते म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची या मुद्द्याबाबत स्पष्ट भूमिका राहिली आहे.
रुबिओ यांच्या वक्तव्याआधी डोनाल्ड ट्रम्प नेमकं काय म्हणाले होते?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की इराणबरोबरच्या कराराच्या 'बहुतांश वाटाघाटी' झाल्या आहेत आणि त्यासंदर्भातील तपशील लवकरच जाहीर केले जातील.
ट्रूथ सोशलवर शनिवारी (23 मे) टाकलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले होते की या करारामध्ये होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याच्या मुद्द्याचा समावेश असेल.
24 मे (रविवार) रोजी सकाळी, तस्निम या इराणच्या निम-सरकारी वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी 30 दिवसांच्या आत युद्धापूर्वीच्या स्थितीत पूर्ववत होईल. तसंच या संभाव्य करारामुळे सर्व आघाड्यांवरील हल्ले थांबतील.

फोटो स्रोत, Getty Images
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बागाई यांनी शनिवारी (23 मे) सरकारी वाहिनीला सांगितलं होतं की गेल्या आठवडाभरात अमेरिका आणि इराणच्या भूमिकांमध्ये सहमती निर्माण होते आहे.
मात्र त्यांनी इशारा दिला की याचा अर्थ असा होत नाही की महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत सहमती होईल. तसंच त्यांनी अमेरिकन नेत्यांवर 'विसंगत वक्तव्यं' केल्याचा आरोपदेखील केला.
ट्रम्प असंही म्हणाले होते की 'शांततेशी संबंधित सामंजस्य कराराबाबत' (मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग पर्टेनिंग टू पीस) त्यांची सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), कतार आणि इतर देशांच्या नेत्यांबरोबर त्यांची 'अतिशय चांगली चर्चा' झाली.
"कराराबाबत बहुतांश वाटाघाटी पूर्णत्वास गेल्या आहेत. मात्र तरीदेखील त्याला अमेरिका, इराण आणि इतर नमूद केलेल्या देशांची त्याला संमती मिळणं आणि त्याचं अंतिम स्वरुप निश्चित होणं अद्याप बाकी आहे," असं ट्रम्प म्हणाले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






















