क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांचीही मादुरोंसारखी अवस्था होणार का? 'या' आहेत 3 शक्यता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, बर्न्ड डेबुसमन ज्युनिअर
- Role, व्हाइट हाउसमध्ये बीबीसीचे प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
अमेरिकेनं क्युबाचे 94 वर्षीय माजी राष्ट्राध्यक्ष राऊल कॅस्ट्रो यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.
या आरोपानंतर आता अमेरिकेच्या सत्तापालटाच्या यादीत क्युबाचे नाव असू शकते, अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत.
अमेरिकेच्या 'मॅक्सिमम प्रेशर' (जास्तीत जास्त दबाव) धोरणामुळे क्युबामध्ये अनेक दशकांतील सर्वात मोठं इंधन आणि वीज संकट निर्माण झालं आहे.
दरम्यान, अमेरिकेतील काही अधिकारी सातत्याने मागील 66 वर्षांपासून सत्तेत असलेलं कम्युनिस्ट सरकार आता संपायला हवं, असं सांगताना दिसत आहेत.
पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'तणाव वाढवण्याची' गरज भासणार नाही, असं म्हटलं आहे.
अमेरिकेच्या किनाऱ्यापासून अवघ्या 144 किलोमीटर अंतरावर असलेला कोणताही 'बंडखोर देश' अमेरिका सहन करणार नाही, असा इशाराही व्हाईट हाऊसने दिला आहे.
पुढे नेमकं काय होईल, याचा अंदाज नाही. आर्थिक संकट वाढेल, देशात अस्थिरता निर्माण होईल की अमेरिका सैन्य कारवाई करेल, हे अद्याप स्पष्ट नाही.
यातून पुढे काय होऊ शकतं, याचे 3 संभाव्य पर्याय मांडले आहेत.
अमेरिका राऊल कॅस्ट्रो यांना पकडू शकते?
राऊल कॅस्ट्रो यांच्यावर अनेक आरोप आहेत. त्यापैकी एक म्हणजे 1996 मध्ये क्युबाच्या दोन लढाऊ विमानांनी अमेरिकेची विमानं पाडल्याचा आरोप आहे.
अमेरिका सैन्य कारवाई करून त्यांना अटक करू शकते. त्यानंतर त्यांना अमेरिकेत नेऊन त्यांच्यावर खटला चालवला जाऊ शकतो, अशी चर्चा आता जोरात सुरू आहे.
याआधी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या बाबतीत अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती.
यावर्षी जानेवारीमध्ये अमेरिकेनं व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई करून निकोलस मादुरो यांना अटक केली होती. मादुरो हे क्युबाचे जवळचे सहकारी मानले जात होते.
अमेरिकेने त्यांच्यावर अंमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांशी संबंधित आरोप करून त्यांना न्यूयॉर्कला नेलं होतं.
1989 मध्ये अमेरिकेने 'ऑपरेशन जस्ट कॉज' अंतर्गत हजारो सैनिकांसह पनामावर हल्ला केला होता. त्यावेळी पनामाचे तत्कालीन नेते मॅन्यूएल नोरिगा यांना सत्तेतून हटवून अटक करण्यात आली होती.
मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी क्युबामध्येही अशी कारवाई करण्याचा विचार आहे का, हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, अनेक अमेरिकन खासदारांनी अशी कारवाई करण्याची उघडपणे मागणी केली आहे. फ्लोरिडाचे सिनेटर रिक स्कॉट यांनी म्हटलं की, "आम्ही कोणताही पर्याय नाकारू नये. मादुरोंसोबत जे झालं, तेच राऊल कॅस्ट्रो यांच्यासोबतही व्हायला हवं."
तज्ज्ञांच्या मते, सैन्य कारवाई करून कॅस्ट्रो यांना पकडणं शक्य आहे. पण त्यात धोकेही अनेक असतील.
त्यांचं वय खूप जास्त आहे आणि त्यांची सुरक्षा देखील अत्यंत कडक आहे.
वॉशिंग्टन कार्यालयातील लॅटिन अमेरिकेचे तज्ज्ञ ॲडम इसाकसन यांनी सांगितलं की, कॅस्ट्रो यांचं प्रतीकात्मक महत्त्व खूप मोठं असल्यामुळे त्यांची सुरक्षा खूप मजबूत आहे. मात्र, त्यांना पकडणं अशक्य नाही.
मात्र, कॅस्ट्रो यांना अटक झाली तरी क्युबाच्या सत्ताकारणावर फार मोठा परिणाम होणार नाही, असं त्यांचं मत आहे.
कारण त्यांनी 2018 मध्येच राष्ट्राध्यक्षपद सोडलं होतं आणि आता त्यांची भूमिका प्रतीकात्मक मानली जाते.
इसाकसन यांनी म्हटलं की, "कॅस्ट्रो कुटुंबाचा अजूनही प्रभाव आहे, पण ते संपूर्ण व्यवस्थेचे केंद्र नाहीत. मात्र, देशांतर्गत राजकारणाच्या दृष्टीने हे अमेरिकेसाठी मोठं यश मानलं जाऊ शकतं."
ते पुढे म्हणाले, "देशांतर्गत राजकारणांमुळे ही कारवाई यशस्वी ठरू शकते. कॅस्ट्रो कुटुंबाला अपमानित करणं आणि 1959 च्या क्रांतीकारकांपैकी एकाला तुरुंगात पाठवणं, हा त्यामागचा उद्देश असू शकतो. पण रणनीतीच्या दृष्टीने त्याचा मोठा फायदा होणार नाही."
अमेरिका क्युबामध्ये सत्ताबदल घडवू शकते?
ट्रम्प यांच्यासह अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांनी क्युबामध्ये नेतृत्वाची नवीन व्यवस्था तयार होऊ शकते, असे संकेत दिले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, हे व्हेनेझुएलासारखं मॉडेल असू शकतं. तिथे सरकार पूर्णपणे बदलेलं नाही, पण नवीन व्यवस्थेने ट्रम्प प्रशासनाशी थेट चर्चा सुरू केली आहे.
ट्रम्प यांनी अनेकदा असं म्हटलं आहे की, ते क्युबातील काही लोकांच्या संपर्कात आहेत. आर्थिक संकटाच्या काळात हे लोक अमेरिकेकडून मदत मिळावी, अशी इच्छा व्यक्त करत आहेत.
12 मे रोजी ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर लिहिलं होतं की, "क्युबा मदत मागत आहे आणि आम्ही त्यांच्याशी चर्चा करू."
काही दिवसांनंतर सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी क्युबाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली.
या बैठकीमध्ये कॅस्ट्रो यांचे नातू राऊल गिलेर्मो रॉड्रिग्ज कॅस्ट्रो आणि गृहमंत्री लाझारो अल्वारेझ कासास यांचाही समावेश होता.
"आम्ही क्युबाशी चर्चा करू. पण शेवटी निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल. त्यांची सध्याची व्यवस्था आता काम करत नाही," असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेचं प्राधान्य 'चर्चेच्या माध्यमातून तोडगा' काढण्यावर आहे, असंही त्यांनी सांगितलं.
अमेरिकेला क्युबामध्ये अनेक बदल होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये अर्थव्यवस्था अधिक खुली करणं, परदेशी गुंतवणूक वाढवणं, देशाबाहेर राहणाऱ्या क्यूबन लोकांना सहभागी करून घेणं आणि क्युबातील रशियन किंवा चिनी गुप्तचर संस्थांची उपस्थिती संपवणं, अशा गोष्टींचा समावेश असू शकतो.
मात्र, हे बदल झाले तरी क्युबाचं सध्याचं सरकार बऱ्याच अंशी शाबूत राहू शकतं.
जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मायकेल शिफ्टर म्हणाले की, "जसं व्हेनेझुएलामध्ये अस्थिरता टाळण्याचा प्रयत्न झाला, तसाच प्रयत्न क्युबामध्येही अस्थिरता टाळण्यासाठी केला जाईल. जबरदस्तीने सत्ताबदल घडवणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं."
तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प प्रशासनासमोरचं सर्वात मोठं आव्हान म्हणजे क्युबामध्ये असा कोणताही नेता सध्या दिसत नाही, ज्याला नवीन व्यवस्थेचं नेतृत्व देता येईल.
आर्थिक दबावाखाली क्युबा स्वतःच कोसळू शकतो?
तिसरी शक्यता अशी आहे की, मोठ्या आर्थिक दबावाखाली क्युबा स्वतःच कोसळू शकतो. सध्या तिथे दीर्घकाळ वीज कपात होत आहे आणि अन्नधान्याचाही मोठा तुटवडा आहे.
ट्रम्प या आठवड्यात म्हणाले की, "तणाव वाढवण्याची गरज नाही. तो देश (क्युबा) स्वतःच ढासळत आहे. तिथली परिस्थिती खराब आहे आणि सरकारचं नियंत्रणही कमकुवत झालं आहे."
परंतु, तज्ज्ञांच्या मते परिस्थिती आणखी जास्त गुंतागुंतीची आहे. आर्थिक संकट असलं तरी क्युबाचं सरकार आणि सुरक्षा यंत्रणा अजूनही मोठ्या प्रमाणात नियंत्रण ठेवून आहेत.
मायकेल शिफ्टर यांनी सांगितलं की, "क्युबाची अर्थव्यवस्था आणि सरकार स्वतंत्रपणे समजून घेतलं पाहिजे. अर्थव्यवस्था कोसळू शकते आणि सध्या ती अडचणीतही आहे. परंतु सरकारची व्यवस्था, विशेषतः सुरक्षा यंत्रणा, अजूनही काम करत आहे."

फोटो स्रोत, AFP via Getty Images
जर परिस्थिती आणखी बिघडली आणि मोठ्या संख्येने क्युबाचे लोक देश सोडून जाऊ लागले, तर ते ट्रम्प प्रशासनासाठीही मोठं आव्हान ठरू शकतं.
जर क्युबातील लोकांनी मोठ्या प्रमाणात अमेरिकेकडे स्थलांतर सुरू केलं, तर अमेरिकेसमोर खूप मोठी अडचण निर्माण होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, जर व्यवस्था कोलमडली तर मोठ्या संख्येने लोक कोणत्याही मार्गाने देश सोडून जाण्याचा प्रयत्न करतील, जसं अनेक वर्षांपासून हैतीतील लोकांमध्ये दिसून आलं आहे.
ॲडम इसाकसन म्हणाले की,"फ्लोरिडा हे सर्वात जवळचं ठिकाण आहे, पण काही लोक मेक्सिकोच्या दिशेने देखील जाऊ शकतात."
आतापर्यंत इतकं मोठं स्थलांतर सुरू झालं नाही, याचं त्यांना आश्चर्य वाटतं, असं त्यांनी म्हटलं.
त्यांच्या मते, "लोक कदाचित दररोज केवळ 1000 ते 1500 कॅलरीजवर जगत आहेत आणि त्यांना प्राथमिक उपचारही मिळत नाहीत. अशा परिस्थितीत लोकांनी आतापर्यंत स्वतःच्या बोटी तयार करून स्थलांतर सुरू केलं असतं, असं वाटेल."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)























