अमेरिकेत व्हाईट हाऊसबाहेर सिक्रेट सर्व्हिस एजंट्सवर गोळीबार, घटनेवेळी आतमध्ये होते डोनाल्ड ट्रम्प

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

अमेरिकेच्या सत्तेचं केंद्र असलेल्या व्हाईट हाऊसबाहेर सिक्रेट सर्व्हिस एजंट्सवर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात एका नागरिकालाही दुखापत झाली आहे.

या घटनेतील एका संशयिताला ठार करण्यात आल्याची माहिती संबंधित यंत्रणेने दिली आहे.

एबीसी न्यूजच्या प्रतिनिधी सेलिना वँग यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, त्या स्वतः बचावासाठी आडोसा घेताना दिसत आहेत, तर व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉन परिसरातून गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत.

गोळीबाराच्या घटनेनंतर व्हाईट हाऊसमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. या घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते.

मात्र, "सुरक्षेत असलेल्या व्यक्तींवर किंवा कोणत्याही अधिकृत कामकाजावर या घटनेचा परिणाम झाला नाही," असे सिक्रेट सर्व्हिसने सांगितले.

सिक्रेट सर्व्हिसनं काय सांगितलं?

सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सवर गोळीबार झाल्यानंतर एका संशयिताला ठार करण्यात आल्याच्या वृत्ताला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

सिक्रेट सर्व्हिसनं दिलेल्या निवेदनानुसार, "शनिवारी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर थोड्याच वेळात सेव्हेन्टिन्थ स्ट्रीट आणि पेन्सिलवेनिया अव्हेन्यू परिसरात एका व्यक्तीने आपल्या बॅगेतून शस्त्र काढले आणि गोळीबार सुरू केला.

"सिक्रेट सर्व्हिस पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यात संशयित जखमी झाला. त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या गोळीबारादरम्यान एका नागरिकालाही गोळी लागली.

"या घटनेत कोणत्याही अधिकाऱ्याला दुखापत झाली नाही. घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते, मात्र कोणत्याही संरक्षित व्यक्तीवर किंवा अधिकृत कामकाजावर परिणाम झाला नाही.

"या घटनेचा तपास सुरू असून, अधिक माहिती उपलब्ध होताच जाहीर करण्यात येईल."

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

या गोळीबाराच्या घटनेबद्दल आतापर्यंत काय माहिती समोर आलीय?

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सुमारे सहा वाजता व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित असलेल्या अनेक पत्रकारांना सलग गोळीबाराचे आवाज ऐकू आले.

यानंतर सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी पत्रकारांना तातडीने इमारतीच्या आत असलेल्या प्रेस ब्रीफिंग रूममध्ये हलवले आणि व्हाईट हाऊसमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला.

BBC ची सहयोगी संस्था सीबीसी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 30 गोळ्या झाडण्यात आल्या. एक हल्लेखोर सीक्रेट सर्व्हिस एजंट्सच्या दिशेनं आला आणि त्यांच्यावर गोळीबार केला, मात्र गोळीबार अयशस्वी ठरला. त्यानंतर एजंट्सनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला.

अमेरिका

फोटो स्रोत, Getty Images

स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता व्हाईट हाऊसमधील लॉकडाऊन हटवण्यात आला.

या संपूर्ण घटनेच्या वेळी अमिरेकेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. मात्र, या गोळीबाराबाबत त्यांची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स डिनरदरम्यानही एका बंदूकधाऱ्याने गोळीबार केला होता.

ही बातमी अपडेट होत आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)