आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या घरी कन्येचं आगमन

आलिया-रणबीर
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर आता आई-बाबा झाले आहेत. रविवारी (6 नोव्हेंबर) रणबीर-आलियाच्या घरी कन्येचं आगमन झालं.

आलियाने जून महिन्यात तिच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत "our baby coming soon" अशी पोस्ट लिहिली होती.

आलियाचे वडील आणि ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांनी आलियाच्या या पोस्टनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मी आलिया आणि रणबीरसाठी खूप आनंदी आहे. आता मला माझ्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या भूमिकेसाठी तयार व्हायचं आहे. आजोबांच्या भूमिकेसाठी. हे खूप ग्रँड असेल.

आलियाच्या आई सोनी राजदान यांनी या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागतासाठी आपण उत्सुक असल्याचं म्हटलं होतं.

आलिया-रणबीर

आलियाने ही पोस्ट शेअर केल्यानंतर आलिया आणि रणबीरचे मित्र-मैत्रिणी तसंच सहकलाकारांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं.

यावर्षी 14 एप्रिलला आलिया आणि रणबीर कपूर विवाहबद्ध झाले होते.

ऋषी आणि नीतू कपूर यांची लाडकी आलिया

आलिया भट्टचं कपूर कुटुंबासोबतचं नातं सुरुवातीपासूनच विशेष राहिलं आहे. आलियाने स्टुडंट ऑफ द ईयर या आपल्या पहिल्या चित्रपटात रणबीर कपूरचे वडील ऋषि कपूर यांच्यासोबत काम केलं होतं.

यानंतर ऋषि कपूर यांच्यासोबतच 'कपूर अँड सन्स' चित्रपटातही तिने भूमिका साकारली. दिवंगत ऋषि कपूर हे पहिल्या चित्रपटापासूनच आलिया भट्टचं कौतुक करताना दिसायचे.

आलिया-रणबीर

आलिया ही आजच्या तरुण कलाकारांमध्ये सर्वाधिक प्रभावी अभिनेत्रींपैकी एक आहे, असं ते नेहमी म्हणायचे. ऋषि कपूर यांच्याप्रमाणेच आलियाचं रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांच्याशीही खूप जवळचं नातं आहे.

आलिया कपूरचं कौतुक करताना नीतू कपूर म्हणतात, "मला आलिया खूप आवडते. ती माणूस म्हणून खूप चांगली आहे. अत्यंत गोड आहे."

'कॉफी विथ करण'मध्ये प्रेम असल्याचं मान्य केलं

आलिया चित्रपटसृष्टीत दाखल होण्याच्या पूर्वीपासून तिच्या मनात रणबीरबद्दल प्रेमभावना होत्या, ही गोष्ट फारच कमी लोकांना माहीत आहे.

रणबीरच्या 'सांवरिया' या पहिल्या चित्रपटापासून ते बर्फी, रॉकस्टार यांच्यासारख्या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे ती त्याच्या प्रेमात पडली.

दोघांपैकी आलिया भट्टनेच तिचं रणबीरवरचं प्रेम सार्वजनिकरित्या मान्य केलं होतं.

निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण'मध्ये आलिया भट्ट 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली होती.

आलिया-रणबीर

त्यावेळी आलियाने म्हटलं की, रणबीर कपूर तिला प्रचंड आवडतो. त्या कार्यक्रमात आलियाला विचारण्यात आलं की, जर तिचं स्वयंवर झालं तर कोणत्या तीन अभिनेत्यांना ती त्याठिकाणी पाहू इच्छिते?

तेव्हा आलियाने पहिलं नाव रणबीर कपूरचं घेतलं. त्यानंतर सलमान खान आणि आदित्य रॉय कपूर या अभिनेत्यांचं नाव तिने घेतलं होतं.

आलिया भट्टची चेष्टा झाली, पण...

'कॉफी विथ करण' कार्यक्रमात करण जोहरने आलिया भट्टला आणखी एक प्रश्न विचारण्यात आला - प्रणय दृश्य कोणासोबत करायला आवडतील?

तेव्हा इतर कोणत्याही गोष्टीचा विचार न करता आलियाच्या तोंडून एकच नाव निघालं होतं, ते म्हणजे रणबीर कपूरचंच. चेष्टामस्करीदरम्यान आलिया भट्टला लग्नाबद्दलही विचारण्यात आलं. तेव्हा तिने लग्नही रणबीर कपूरसोबतच करायचं असल्याचं सांगितलं होतं, हे विशेष.

पण आलिया भट्टने चेष्टेच सांगितलेली हीच इच्छा पूर्ण झाली.

कुठे आणि कशी झाली रणबीर-आलियाची भेट?

अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांची लव्ह स्टोरी दिग्दर्शक संजय लीला भन्साली यांच्या चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली होती, हे आपल्याला माहिती आहे.

पण रणबीर-आलिया यांच्या लव्हस्टोरीची सुरुवातसुद्धा संजय लीला भन्साली यांच्या सेटवरच झाली होती.

रणबीर-आलिया

याविषयी आलिया भट्टने सांगितलं, "2005 मध्ये मी पहिल्यांदा रणबीर कपूरला पाहिलं होतं. त्याचवेळी मला रणबीर आवडू लागला. मी तेव्हा 'ब्लॅक' चित्रपटासाठी ऑडिशन देण्यासाठी गेले होते. तिथं रणबीर कपूर सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याला पाहताक्षणीच प्रेमात पडले."

पहिल्यांदा 'या' कार्यक्रमात दिसले एकत्र

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या अफेअरची चर्चा 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या घोषणेपासून सुरू झाली.

अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटात दोघांना घेण्यात आल्यानंतर सुरुवातीला हा केवळ प्रमोशन फंडा असल्याचं सर्वांना वाटत होतं.

चित्रपटाच्या शूटिंगवेळी दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचंही ऐकण्यात आलं.

यानंतर सोनम कपूरच्या लग्नात ते चक्क एकमेकांचा हात धरून कार्यक्रमात पोहोचले. कॅमेऱ्यांनी ही गोष्ट नेमकी टिपली.

रणबीर कपूरचं नाव आतापर्यंत दीपिका पदुकोन, कॅटरिना कैफ आणि सोनम कपूर यांच्याशी जोडलं गेलं होतं. पण पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबीयांच्या कार्यक्रमात रणबीरच्या प्रेयसीची उपस्थिती दिसू लागली ती आलियाच्या स्वरुपात.

केवळ आलिया भट्टच नव्हे तर आलियाचे वडील महेश भट्ट, आई सोनी राजदान आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा कपूर कुटुंबाच्या कार्यक्रमात एकत्र दिसू लागले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)