शाळेत गेल्यानंतर 6 वर्षांच्या मुलाचा वर्गातच झाला मृत्यू; सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं 'असं' दृश्य

 केजीएच शवगृहाबाहेर प्रणय तेजाचे आई-वडील
फोटो कॅप्शन, केजीएच शवगृहाबाहेर प्रणय तेजाचे आई-वडील
    • Author, लक्कोजू श्रीनिवास
    • Role, बीबीसीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

(या बातमीतील काही मजकूर अस्वस्थ करणारा असू शकतो.)

विशाखापट्टणममधील एका खासगी शाळेत शिकणाऱ्या 6 वर्षांच्या मुलाचा शाळेतच मृत्यू झाला. कुटुंबीयांनी मुलाला शिक्षिकेने मारल्याचा आरोप केला आहे.

मुलगा वर्गातच अचानक कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

त्या दिवशी वर्गात नेमकं काय घडलं? मुलगा का कोसळला? शाळेच्या कर्मचाऱ्यांनी लगेच काय केलं? पोलिसांचं काय म्हणणं आहे?, हे आपण जाणून घेऊया.

मुलाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?

सहा वर्षांचा प्रणय तेजा नेहमीप्रमाणे गुरुवारी (20 ऑगस्ट) सकाळी शाळेत गेला.

वर्गशिक्षिका (शाळा प्रशासनाने शिक्षिकेचे नाव जाहीर केलेलं नाही) सकाळी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास सर्व मुलांचा गृहपाठ तपासत होत्या. त्यानंतर प्रणय तेजाचा नंबर आला.

गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे शिक्षिका त्याच्यावर ओरडत होत्या. त्याच वेळी प्रणय तेजा शिक्षिकेच्या अंगावरच कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे.

शाळेच्या कर्मचाऱ्यांनी मुलाला लगेचच रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

विशाखापट्टणममध्ये 6 वर्षांच्या मुलाचा वर्गातच मृत्यू; शिक्षिकेने मारल्याचा पालकांचा आरोप

शिक्षिकेच्या कृतीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी आंदोलन केलं.

"या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करत आहोत. पण, मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदन आणि वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल," असं विशाखा वन टाऊन पोलिसांनी बीबीसीला सांगितलं.

गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून शिक्षिका मुलावर ओरडल्या आणि त्यांनी त्याला मारल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी दुपारी 3 च्या सुमारास केजीएच रुग्णालयात आंदोलन केलं.

या प्रकरणी आरोप असलेल्या शिक्षिकेची बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसीने प्रयत्न केला. परंतु, शाळा व्यवस्थापनाने किंवा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिक्षिकेबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे बीबीसीला शिक्षिका किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधता आला नाही.

'बाहेरगावी गेल्यामुळे मुलाला होमवर्क करता आला नव्हता'

गुरुवारी केजीएचच्या शवगृहाबाहेर मुलाचे वडील बीबीसीशी बोलले. ते केटरिंगचं काम करतात, तर मुलाची आई गृहिणी आहे.

कृष्णप्रसाद बीबीसीला म्हणाले, "आम्ही 3 दिवस देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलो होतो. त्यामुळे आमचा मुलगा 3 दिवस शाळेत जाऊ शकला नाही. त्यामुळे त्याचा गृहपाठ पूर्ण झाला नाही. गुरुवारी वर्गशिक्षिकांनी गृहपाठाबद्दल विचारलं."

मृत मुलाचे वडील
फोटो कॅप्शन, मृत मुलाचे वडील

"गृहपाठ पूर्ण केला नसल्यामुळे शिक्षिकेने मुलाला ओरडून मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आम्ही बाहेरगावी गेल्यामुळेच त्याचा गृहपाठ राहिला होता आणि त्याच कारणामुळे शिक्षिकेने त्याला मारलं."

विशाखापट्टणमचे आरडीओ दिलीप चक्रवर्ती यांनी बीबीसीला सांगितलं, "शिक्षिका मुलावर ओरडत असतानाच तो तिथेच बेशुद्ध होऊन पडला. त्याला रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता, असे डॉक्टरांनी सांगितले. आता आम्ही शवविच्छेदनाच्या अहवालाची वाट पाहत आहोत. त्या अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल."

आधी आंदोलन, नंतर गुन्हा दाखल न करण्याची मागणी

घटना घडल्यानंतर शाळा प्रशासनाने मुलाला जवळच्या केजीएच रुग्णालयात नेलं. परंतु, डॉक्टरांनी त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर आई-वडिलांनी रुग्णालयाबाहेरच आंदोलन सुरू केलं.

त्यानंतर प्रसारमाध्यमं तिथे पोहोचली आणि आंदोलन आणखी तीव्र झालं. त्यानंतर अधिकारी एक-एक करून केजीएचच्या शवगृहाकडे येऊ लागले.

त्याच वेळी शाळा प्रशासनाकडूनही काही जण तिथे आले. त्यांनी कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

कुटुंबीयांसोबत प्रणय तेजा (फाइल फोटो)

फोटो स्रोत, UGC

फोटो कॅप्शन, कुटुंबीयांसोबत प्रणय तेजा (फाइल फोटो)

सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तिथे असलेल्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासाठी आई-वडिलांशी संपर्क साधला.

पण, "आम्हाला कोणताही गुन्हा दाखल करायचा नाही. आमच्या मुलाचा मृतदेह आम्हाला द्या, इतकं पुरेसं आहे," असं त्यांनी पोलिसांना सांगितलं.

त्यामुळे पोलिसांनीही गुन्हा दाखल केला नाही. आई-वडिलांनी प्रसारमाध्यमांशी बोलणंही टाळलं.

लोकेश यांच्या ट्विटनंतर...

सायंकाळी 6.31 वाजता आंध्र प्रदेशचे शिक्षणमंत्री नारा लोकेश यांनी 'एक्स'वर पोस्ट करत मुलाच्या मृत्यूच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

लोकेश यांनी आपल्या 'एक्स' पोस्टमध्ये म्हटलं की, "विशाखापट्टणममधील शाळेत मुलाचा मृत्यू होणे ही, अत्यंत दुःखद घटना आहे. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल."

लोकेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, "या दुःखद काळात कुटुंबीयांनी धैर्य ठेवावं. त्यांनी गमावलेलं मूल कोणीही परत आणू शकत नाही. त्यांच्या कुटुंबाचं झालेलं नुकसान भरून निघण्यासारखं नाही. सरकार त्यांच्या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे उभे राहिल. त्यांना सर्वतोपरी मदत करेल."

यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विशाखापट्टणममध्ये 6 वर्षांच्या मुलाचा वर्गातच मृत्यू; शिक्षिकेने मारल्याचा पालकांचा आरोप

'पॅथॉलॉजी रिपोर्ट मागवला आहे'

या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे का, अशी विचारणा बीबीसीने शुक्रवारी (21 ऑगस्ट) सकाळी विशाखापट्टणममधील महाराणीपेट वन टाऊन पोलिसांकडे केली.

या घटनेनंतर मुलाचे आई-वडील केजीएच रुग्णालयात आले आणि शाळा व तेथील कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करत आंदोलन केले.

विशाखापट्टणमचे डीईओ प्रेम कुमार
फोटो कॅप्शन, विशाखापट्टणमचे डीईओ प्रेम कुमार

"आम्ही या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. त्यात दिसणारे दृश्य आणि मुलाच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे संशयास्पद मृत्यूचा गुन्हा (बीएनएस 2023 मधील कलम 194) दाखल केला आहे. सध्या पॅथॉलॉजी रिपोर्ट मागवला आहे," असं पोलिसांनी सांगितलं.

वन टाऊनचे पोलीस निरीक्षक वरप्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं, "शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्याच्या आधारे पुढील तपास केला जाईल. घटना घडल्यानंतर पालकांनी त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

पण, संध्याकाळी त्यांनी गुन्हा दाखल न करण्यास सांगितलं. पण अशा घटनेनंतर नेमकं काय घडलं, याचा तपास करण्यासाठी पोलिसांना कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो. सध्या पालकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे."

'शिक्षिकेने मुलाला मारल्याचे दिसून येते'

या घटनेबाबत डीईओ प्रेम कुमार यांनी बीबीसीशी चर्चा केली.

"आम्ही शाळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात शिक्षिका मुलाशी रागाने बोलताना दिसत आहेत. तसेच, त्यांनी मुलाच्या गालावर एकदा मारल्याचेही दिसून आले आहे."

भीती किंवा मारहाणीमुळे मुलाचा मृत्यू झाला का, की त्यामागे इतर काही आरोग्यविषयक कारण होते, हे शवविच्छेदनाच्या अहवालातून स्पष्ट होईल. आम्ही त्या अहवालाची वाट पाहत आहोत, असं ते म्हणाले.

"एकदा अहवाल आल्यानंतर आम्ही अधिकाऱ्यांना सविस्तर माहिती देऊ आणि त्यानुसार शिक्षिका व शाळा व्यवस्थापनावर कारवाई करू," असे डीईओ प्रेम कुमार यांनी बीबीसीला सांगितल.

पोस्टमॉर्टेम रिपोर्टच महत्त्वाचा

शवविच्छेदन अहवाल (पोस्टमॉर्टेम रिपोर्ट) आल्यानंतर या घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं वन टाऊन पोलिसांनी सांगितले. त्यासाठी पॅथॉलॉजी रिपोर्टही मागवला आहे.

साधारणपणे संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणात (बीएनएसएस कलम 194 अंतर्गत) पोलीस तपास सुरू करतात. त्यानंतर पोलिसांच्या विनंतीनुसार डॉक्टर, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी तज्ज्ञ मृतदेहाची तपासणी करून आवश्यक नमुने घेतात.

विशाखापट्टणममध्ये 6 वर्षांच्या मुलाचा वर्गातच मृत्यू; शिक्षिकेने मारल्याचा पालकांचा आरोप

हे नमुने पोलीस संबंधित फॉरेन्सिक किंवा पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवतात. त्याचा अहवाल आल्यानंतर पोस्टमॉर्टेम रिपोर्ट तयार केला जातो. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी साधारण 1 ते 10 दिवस लागू शकतात. मात्र, प्रकरणाच्या गांभीर्यानुसार हा कालावधी कमी-जास्त होऊ शकतो, असं पोलिसांनी सांगितलं.

पोलीस निरीक्षक वरप्रसाद यांनी बीबीसीला सांगितलं, "हे अहवाल आल्यानंतरच मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट होईल. भीतीमुळे हृदय बंद पडले का, मारहाणीमुळे काही दुखापत झाली का किंवा दुसरं काही कारण होतं का, याचा तपास केला जाईल."

"मुलाच्या शरीरावर काही जखमा होत्या का किंवा अचानक काही आरोग्य समस्या उद्भवली होती का, हे जाणून घेण्यासाठी पॅथॉलॉजी रिपोर्ट मागवला आहे. अहवाल आल्यावर त्याआधारे पुढील तपास केला जाईल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)