अनेक मुलींचं लैंगिक शोषण करून व्हीडिओ केले व्हायरल; अमरावतीतील प्रकरण नेमकं काय?

अमरावतीमधील परतवाडा शहरात हे प्रकरण उघडकीस आलं आहे.
फोटो कॅप्शन, अमरावतीमधील परतवाडा शहरात हे प्रकरण उघडकीस आलं आहे.
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमरावती जिल्ह्यातील परतवाडामधील एका 19 वर्षीय तरुणाने अनेक मुलींचे लैंगिक शोषण करून त्यांचे व्हीडिओ व्हायरल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली असून आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

परतवाडामधील मोहम्मद अय्याज मोहम्मद तनवीर असं या आरोपीचं नाव आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

अमरावतीतल्या या प्रकरणाचा तपास कशाप्रकारे पुढे जातो आणि या प्रकरणाची व्याप्ती किती मोठी आहे, हे चौकशीअंतीच स्पष्ट होईल.

मिळालेल्या माहितीनुसार, हा आरोपी तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांना ब्लॅकमेल करत असे तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचा आरोप होतो आहे.

पोलिसांनी मंगळवारी (14 एप्रिल) रात्री उशिरा गुन्हे दाखल करून संबंधित तरुणास अटक केली.

या प्रकरणात संवेदनशील महिला पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करावी, अशी मागणी भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली आहे.

एकीकडे, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची संपूर्ण राज्यात चर्चा असताना, दुसरीकडे अनेक महिलांचं शोषण झाल्याचं आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.
फोटो कॅप्शन, एकीकडे, नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची संपूर्ण राज्यात चर्चा असताना, दुसरीकडे अनेक महिलांचं शोषण झाल्याचं आणखी एक प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ माजली आहे.

पोलिसांकडून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने आरोपीला 21 एप्रिलपर्यंत, म्हणजेच 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून आरोपीचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. त्यात तरुणींसोबतचे अनेक व्हीडिओ आढळल्याची माहिती समोर आलेली आहे.

परतवाडा पोलिसांनी आणखी केली दोन आरोपींना मंगळवारी (14 एप्रिल) रात्री अटक केल्यानंतर एकूण आरोपींची संख्या चारवर गेली आहे.

मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर, उजेर खान इकबाल खान, तरबेज खान तस्लिम खान आणि मोहम्मद साद मोहम्मद सादिक अशा चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी उजेर खान याने त्याच्याकडे असलेले व्हीडिओ हे मोहम्मद साद मोहम्मद सादिक या आरोपीला पाठवल्याची कबुली देण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

यासंदर्भात परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले की, "मोबाईलमधील काही डेटा आरोपीने डिलीट केला असून, तो सायबर सेलच्या मदतीने पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. जवळपास वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याची कबुली आरोपीने दिली आहे."

यासंदर्भात परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली.
फोटो कॅप्शन, यासंदर्भात परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली.

"पीडित महिला या केवळ परतवाडा येथील नसून अमरावती, नागपूर तसेच आजूबाजूच्या गावातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत सात पीडित मुलींची नावे समोर आली असून अद्याप एकही पीडित किंवा त्यांचे नातेवाईक समोर आलेले नाहीत. त्यांनी पुढे यावे, त्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल," असंही आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश मस्के यांनी केलं आहे.

पीडितांनी पुढे यावे; पोलिसांकडून आवाहन

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

या प्रकरणी, माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, "आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये नाशिकसारखं प्रकरण घडतंय, हे प्रचंड धक्कादायक आहे. लोकांना धाक राहिलेला नाहीये, याचं आश्चर्य वाटतं. कुणाला काय वाटेल ते करत आहेत. गृहमंत्रालय नक्की काय करतंय? याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी त्यांचे सोर्सेस आणखी वाढवण्याची गरज आहे. या कोणत्याही गोष्टीत धर्म आणण्यापेक्षा गृहमंत्रालयाने लक्ष देऊन काम करण्याची गरज आहे."

आमदार रवी राणा यांनी म्हटलंय की, "या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. पोलिसांनी यांना ताबडतोब अटक केली पाहिजे. असे प्रकार करणाऱ्यांना चांगला धडा शिकवण्याची गरज आहे."

काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखेडे म्हणाले की, "ही अतिशय गंभीर बाब असून यांच कुणीही समर्थन करणार नाही. ज्या महिलांवर अत्याचार झाल्याचा मोठा आकडा समोर आलाय, तो कुठून आला, हे मला सांगता येणार नाही. पोलिसांच्या चौकशीत सात ते आठ महिलांचा उल्लेख आलेला आहे. त्यासंदर्भात पोलीस अधिक चौकशी करतीलच. या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे."

पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे.
फोटो कॅप्शन, पोलिसांनी एकूण चार आरोपींना अटक केली आहे.

जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही पीडित तरुणींच्या पालकांनी पुढे येऊन तक्रार करावी, असं आवाहन केलं आहे.

पोलिसांकडूनही त्यांचा शोध सुरू आहे. आवश्यक असल्यास साध्या वेशातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबांकडे पाठवण्यात येईल.

या प्रकरणात कुणीही तक्रार करण्यास पुढे आले नसल्याने पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केला आहे, असंही त्यांनी स्पष्ट केले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)