मुंबईतील गरीब नगरमध्ये अतिक्रमणविरोधी कारवाईत दगडफेक करणाऱ्या 15 जणांना पोलीस कोठडी, आतापर्यंत काय घडलं?

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मुंबईतील वांद्रे पूर्व परिसरातील गरीबनगर इथे रेल्वे प्रशासनाकडून अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. या कारवाईदरम्यान बुधवारी (20 मे) दगडफेक झाली होती. या दगडफेक प्रकरणातील 15 संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
या सर्व संशयित आरोपींना गुरुवारी (21 मे) न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ही दंगल पूर्वनियोजित होती आणि या दंगलीच्या सूत्रधाराचा शोध घ्यायचा आहे, असं सांगत पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली.
या युक्तिवादानंतर न्यायालयाने यातील 15 जणांना पोलीस कोठडी सुनावली. तर एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दगडफेक करणाऱ्या जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
"अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यानंतर जे दगडफेक करणारे लोक होते त्यांना अटक करण्यात आली," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
नेमकं काय घडलं होतं?
दोन दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रेल्वे प्रशासनाने ही कारवाई हाती घेतली आहे. गरीब नगर येथील रेल्वेच्या 5,200 चौरस मीटर परिसरात मोठ्या प्रमाणात ही मोहीम राबवण्यात येत आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू होती त्यावेळी परिसरात तणावाची परिस्थिती होती. अचानक अतिक्रमण काढणारे कर्मचारी आणि पोलिसांवर दगडफेक आणि भांडीही फेकण्यात येऊ लागली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.
काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक सुरू केली. त्यामुळे बलाचा वापर करावा लागला, असं पोलिसांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
याप्रकरणी काही जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना दिली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
रेल्वे प्रशासनाने नियमानुसार आणि कोर्टाच्या निर्णयानुसार ही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असल्याचे सांगितले. ही मोहीम शनिवार म्हणजेच 23 मे पर्यंत चालणार आहे.
दगडफेक पूर्वनियोजित- पोलीस
अतिक्रमण हटवत असताना झालेली दगडफेक ही पूर्वनियोजित होती. त्यामुळे या दगडफेकीमागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे, असा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला.
ही कारवाई होऊ नये यासाठी दगड आणि पेव्हर ब्लॉक साठवले आणि ते फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
आरोपींनी कट कसा रचला, या कटामागील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. त्यामुळे आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी, पोलिसांनी न्यायालयाला केली होती.
परंतु, आरोपींच्या वकिलांनी पोलिसांचा आरोप फेटाळत, घडलेली घटना ही अकस्मात होती असं सांगितलं.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने 15 आरोपींना 26 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तर एका अल्पवयीन संशयिताची बालसुधारगृहात रवानगी केली.
घराच्या बदल्यात घर देण्याची मागणी
बीबीसीने इथल्या नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी प्रशासनाच्या या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली.
अनेक वर्षांपासून आम्ही इथे राहत असून याबाबतची कागदपत्रे आम्ही बीएमसीकडे दाखल केले आहेत. पण आम्हाला अजून घरं दिली नाहीत. आम्ही रस्त्यावर आलो आहोत. आमच्या घरातील महिला, लहान मुलं रस्त्यावर आल्याचे नागरिकांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Shardul Kadam/BBC
140 घरांचा सर्व्हे झाला होता. पण अचानक संपूर्ण गरीब नगरच हटवण्यात येत आहे. याप्रकरणी कोणतीही सुनावणी झाली नाही, आम्ही बेघर झालोत, आमच्याकडे पैसेही नाहीत, आम्हाला घराच्या बदल्यात घर द्या अशी मागणी इथल्या महिला करत होत्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.





















