असे टॉप-5 देश, जे काही काळासाठी स्थायिक होण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लिंडसे गॅलोवे
- Published
- वाचन वेळ: 8 मिनिटे
सगळं सोडून एखाद्या सुंदर देशात जाऊन नवं आयुष्य सुरू करावं, असं कधी वाटतं का?
'इंटरनेशन्स'च्या 2026 'एक्स्पॅट इनसाइडर' सर्व्हेने जगभरातील 31 भन्नाट ठिकाणांची एक खास यादी जाहीर केली आहे.
राहणीमानाचा दर्जा, नवीन वातावरणात रुळणे, नोकरी आणि करिअरच्या संधी, आर्थिक स्थैर्य आणि बचत, घर आणि डिजिटल सेवा यांसारख्या रोजच्या अत्यावश्यक सुविधा या निकषांवर ही यादी तयार करण्यात आली आहे.
या वर्षी आघाडीवर राहिलेल्या देशांसाठी तिथल्या लोकांचा 'मोकळा स्वभाव' आणि 'परवडणारा खर्च' या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या ठरल्या.
टॉप-10 देशांपैकी 7 देशांमध्ये नवीन माणसाला रुळणे आणि स्थायिक होणे सर्वात सोपे ठरले, तर पैशांचे नियोजन आणि बचतीच्या बाबतीत 5 देश जगात आघाडीवर राहिले. सर्वात वरचे मानांकन मिळालेल्या पहिल्या 5 देशांत राहणाऱ्या लोकांशी आम्ही प्रत्यक्ष चर्चा केली. ते तिथे का गेले, तिथे कसे रमले आणि नव्याने तिथे जाऊ इच्छिणाऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, हे त्यांनी सांगितले.
2026 मध्ये अनिवासी नागरिकांसाठी जगातील टॉप 10 देश :
1. पनामा
2. मेक्सिको
3. थायलंड
4. यूएई (संयुक्त अरब अमिराती)
5. ब्राझील
6. स्पेन
7. सिंगापूर
8. पोर्तुगाल
9. मलेशिया
10. लक्झेंबर्ग
1. पनामा
पनामाने सलग तिसऱ्या वर्षी या यादीत पहिले स्थान कायम राखले आहे. परदेशात काम करणे आणि खर्चाचे व्यवस्थापन या दोन्ही बाबतीत पनामा जगात नंबर 1 ठरला आहे. जगभरातील सरासरी 70% च्या तुलनेत, पनामामध्ये राहणाऱ्या तब्बल 87% लोकांनी आपल्या स्थलांतरित आयुष्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे; तसेच 90% लोकांच्या मते इथे भाड्याने किंवा स्वतःचे घर मिळणे खूप सोपे आहे.
अरिअल बारिओन्युएव्हो 8 वर्षांपूर्वी अर्जेंटिनामधून पनामाच्या निळ्याशार कॅरिबियन समुद्रकिनाऱ्यालगत स्थलांतरित झाले. तिथे त्यांना समुद्राच्या लाटांचा तो मंद आवाज, गाढ आणि शांत लागणारी झोप, दररोज सकाळी अंगात भिनणारा एक नवा उत्साह आणि क्षणाक्षणाला येणारा जगण्याचा खरा आनंद अनुभवता आला.
सध्या इस्ला कोलोन बेटावरील 'ला कोरालिना आयलंड हाऊस' हॉटेलचे संचालक असलेले बारिओन्युएव्हो सांगतात, "मला हळूहळू उमगलं की, हा केवळ काही दिवसांच्या व्हेकेशनचा मूड नव्हता. तर या ठिकाणाची स्वतःचीच एक निवांत, संथ आणि कमालीची सुरेल जीवनशैली आहे."

फोटो स्रोत, Getty Images
समुद्रकिनाऱ्यावर जरा वेळ रेंगाळणे, हिरव्यागार बागेत फिरणे आणि पक्ष्यांची किलबिल ऐकणे हा त्यांच्या रोजच्या दिवसाचा भाग असतो. ते सांगतात, "हा फार साधा दिनक्रम वाटेल, पण आपण इथे का राहायला आलो याची जाणीव मला यातून रोज होते."
अर्जेंटिनापेक्षा पनामामध्ये राहण्याचा खर्च त्यांना कमी वाटतो. शिवाय इथली अर्थव्यवस्था स्थिर असल्यामुळे कोणताही व्यवसाय चालवणे आणि भविष्याचे नियोजन करणे खूप सोपे जाते.
या वर्षी कॅनडा सोडून पनामा सिटीत आलेल्या रझा मोतालेबपूर सांगतात की, घरात आणि बाहेरच्या को-वर्किंग ऑफिसेसमध्ये उत्तम इंटरनेट मिळत असल्याने 'रिमोट वर्किंग' म्हणजे घरी बसून किंवा कुठूनही काम करणे अत्यंत सोपे झाले आहे. पनामात डॉलरचे चलन चालत असल्याने बँकांची कामे करणेही खूप सोपे जाते. करन्सी रेटमुळे कॅनडातील लोकांना सुरुवातीला हा देश थोडा महाग वाटू शकतो, पण वीज-पाण्याचे कमी बिल, विम्याचा कमी खर्च आणि मालमत्ता करातील सूट यामुळे इथे राहण्याचा एकंदर खर्च खिशाला चांगलाच परवडतो.
इथे राहताना काही अडचणी नक्कीच येतात. डिलिव्हरीला वेळ लागणे आणि अनपेक्षित हवामानामुळे अचानक प्लॅन्स फिस्कटणे, अशी उदाहरणे बारिओन्युएव्हो देतात. पण धावपळीपासून दूर निवांत जगण्याचा हा निर्णय अजिबात चुकला नाही, असे ते ठामपणे सांगतात. आणि इथे येणाऱ्या प्रवाशांनी किंवा नव्याने राहायला येणाऱ्यांनीही हा शांत जीवनमार्ग स्वीकारायला हवा, असे त्यांना वाटते. त्यांच्या मते, इथल्या ब्लफ बीचला नक्की भेट द्यावी, रस्त्यावर मिळणारी ताजी फळे चाखावीत आणि पॉन्च बीचवर सर्फिंग करणाऱ्यांना पाहत निवांत दुपार घालवावी.
"इथे येताना मी केवळ एका सुंदर ठिकाणी चाललो आहे असा माझा समज होता," ते सांगतात. "पण आज मागे वळून पाहताना जाणवते की, मी जगण्याच्या एका पूर्णपणे नव्या पद्धतीकडे आलो होतो. अशी जीवनशैली जिथे पळापळीपेक्षा निवांत वेळेला, वस्तू जमवण्यापेक्षा छान अनुभवांना आणि सततच्या धावपळीपेक्षा एकमेकांशी जोडले जाण्याला जास्त मोल दिले जाते."
2. मेक्सिको
नवीन ठिकाणी सहज रुळण्याच्या बाबतीत मेक्सिकोने जगात नंबर 1 स्थान मिळवले असून एकूण क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले आहे.
परदेशी नागरिकांना आपल्याच घरात असल्याचा भास करून देण्यात मेक्सिकोचा हात कोणीच धरू शकत नाही. जगभरातील सरासरी 39% च्या तुलनेत मेक्सिकोमधील 73% लोकांना वाटते की इथे स्थानिक लोकांशी पटकन मैत्री होते.
तर जागतिक सरासरीच्या दुप्पट अनिवासी नागरिकांनी सांगितले की त्यांच्या मित्रपरिवारात प्रामुख्याने स्थानिक मेक्सिकन लोकांचाच समावेश आहे.
'सँड इन माय कर्ल्स' या ब्लॉगच्या लेखिका कर्स्टन राकुइया सांगतात, "मला शिकागोमध्ये आयुष्यभरात जेवढे चांगले मित्र मिळाले नाहीत त्यापेक्षा कितीतरी चांगले मित्र मला इथे मिळाले."
2022 मध्ये त्या आणि त्यांचे पती पुएर्तो व्हालार्टा येथे राहायला आले. इथली आपुलकीची माणसे आणि खिशाला परवडणारा खर्च यामुळेच ते इथे कायमचे स्थिरावले. त्या सांगतात की इथे रस्त्यावर मिळणारा टाको केवळ एका डॉलरमध्ये (सुमारे 85 ते 90 रुपये) मिळतो. तर नुकतीच अचानक करावी लागलेली अपेंडिक्सची शस्त्रक्रिया आणि हॉस्पिटलचा सर्व खर्च मिळून 4,000 डॉलर्सपेक्षाही (सुमारे 3.4 लाख रुपये) कमी खर्च आला. अमेरिकेत एवढ्या कमी खर्चाचा विचारही करता येत नाही.

फोटो स्रोत, Getty Images
हे शहर खऱ्या अर्थाने अनुभवायचे असेल तर इथल्या स्थानिक मार्केटमध्ये जाऊन गरमागरम नाश्ता करावा आणि रविवारी सगळ्यांचे कुटुंबीय एकत्र येतात तेव्हा समुद्रकिनाऱ्यावर नक्की फेरफटका मारा, असा सल्ला राकुइया देतात. त्या सांगतात, "हे ठिकाण पर्यटकांनी भरलेले वाटेल पण खरा मेक्सिको आणि तिथल्या लोकांचं अस्सल जगणं इथेच पाहायला मिळतं."
पण एक छोटीशी काळजी नक्की घ्या. कारण सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मात्र मेक्सिको 31 देशांच्या यादीत 25 व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. जिथे जगभरात सरासरी 81% लोक स्वतःच्या सुरक्षिततेबाबत निर्धास्त असतात, तिथे मेक्सिकोमधील केवळ 68% लोकांनी स्वतःला इथे सुरक्षित वाटत असल्याचे सांगितले आहे.
3. थायलंड
या जागतिक क्रमवारीत थायलंडने तिसरं स्थान पटकावलं असून जगभरातून आलेले लोक इथे सर्वात जास्त खूश आणि समाधानी आहेत. तब्बल 86% लोकांनी थायलंडमधील आपल्या आयुष्यावर समाधान व्यक्त केलं आहे.
इथल्या जगण्याला चारचाँद लावणारी सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कमी खर्चात मिळणारी लक्झरी आणि दर्जेदार लाईफस्टाईल.
खिशाला परवडणाऱ्या राहणीमानाच्या बाबतीत थायलंडला या सर्व्हेमध्ये जगात जास्त गुण मिळाले आहेत. 85% लोकांनी इथल्या माफक खर्चाचे कौतुक केले आहे जे जगातील सरासरीच्या दुप्पट आहे.
बँकॉकमध्ये पहिल्यांदा स्ट्रीट फूड खाण्याचा अनुभव सांगताना बेथन जीनतिप्राफेत सांगतात, "आम्ही चौघांनी अवघ्या 1 पौंड म्हणजेच 1.35 डॉलरच्या (सुमारे 115 ते 120 रुपये) आसपास पोटभर जेवण केले."
दोन मुलांची ब्रिटिश आई असलेल्या बेथन या 2024 मध्ये आपल्या थाई पतीसह ब्रिटनमधील डेव्हॉन येथून केवळ 1 वर्षासाठी राहण्याच्या उद्देशाने थायलंडला आल्या होत्या. "पण अवघ्या दोन आठवड्यांत मी ठरवून टाकले की मी आता परत जाणार नाही," असे त्या म्हणाल्या.
आपल्या मुलामध्ये जो चांगला बदल झाला त्याचे श्रेय त्या तिथल्या शाळा आणि शिक्षण पद्धतीला देतात. त्या सांगतात, "थायलंडच्या संस्कृतीत आदराची भावना खूप मोठी आहे आणि इथली मुले शिक्षणाला मनापासून मान देतात. माझा मुलगा तर आता पूर्णपणे सुधारला आणि बदलला आहे."

फोटो स्रोत, Getty Images
11 वर्षांपूर्वी लॉस एंजेलिसवरून बँकॉकमध्ये राहायला आलेले आरोन हेन्री सांगतात की, या शहराने आपली संस्कृती तशीच ठेवून आधुनिकतेचा स्वीकार केला आहे. "गेल्या दहा वर्षांत इकडे जगभरातले फूड ऑप्शन्स, सुंदर उद्याने, आर्ट गॅलरीज आणि मोठे मॉल्स खूप वाढले आहेत पण तरीही थाई संस्कृतीचा मूळ ठेवा त्यांनी उत्तम जपला आहे," असे ते सांगतात. तिथल्या रहिवाशांच्या नजरेतून शहर कसे दिसते हे अनुभवण्यासाठी जिथे जास्त गर्दी नसते आणि आरामात पायी फिरता येते अशा 'अरी' आणि 'फ्रा खानोंग' या भागांत फिरण्याचा सल्ला ते देतात.
नव्याने राहायला येणाऱ्यांनी इथल्या परंपरा समजून घेऊन त्यांचा आदर करायला हवा, असे जीनतिप्राफेत सांगतात. जसे की कोणाच्याही घरात जाताना चपला बाहेर काढणे किंवा रोज सकाळी आठ आणि संध्याकाळी सहा वाजता सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत सुरू झाल्यावर आदराने उभे राहणे. त्या म्हणतात, "जे लोक थाई संस्कृतीचा मनापासून स्वीकार करतात आणि इथल्या पद्धतींशी जुळवून घेतात त्यांच्यासाठी थायलंडमध्ये राहण्याचा अनुभव खूपच सुखद आणि उत्तम ठरू शकतो."
4. युनायटेड अरब अमिराती (UAE)
करिअरमधील प्रगतीच्या संधी आणि 'अनिवासी नागरिकांच्या प्राथमिक गरजा' ज्यामध्ये व्हिसा आणि भाषा यांसारख्या सोयींचा समावेश आहे, या घटकांमध्ये सर्वोच्च गुण मिळवत, परदेशी नागरिकांना स्थायिक होणे आणि आपले करिअर घडवणे UAE ने अत्यंत सोपे केले आहे. हे सर्वेक्षण फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये अमेरिका-इराण तणाव सुरू होण्याआधी आणि नंतर करण्यात आले होते. त्यामुळे त्या संघर्षाचा परिणाम या निकालांवर फार कमी दिसतो. तरीसुद्धा तिथे सध्या राहत असलेले लोक सांगतात की, काही लहान-सहान तडजोडी वगळता त्यांचे रोजचे आयुष्य पूर्वीसारखेच सामान्य आणि सुरळीत चालू आहे.
काही काळ दुबई तर काही काळ अमेरिकेत राहणाऱ्या, पण सध्या दुबईलाच जास्त पसंती देणाऱ्या इमेज कन्सल्टंट मिशेल स्टर्लिंग म्हणाल्या, "दुबईतील रोजचे दैनंदिन आयुष्य अगदी सामान्य आणि सुरळीत वाटते. माझ्या मते दुबई अशी जीवनशैली देते जी अधिक सुरक्षित, अधिक सुखकर आणि खिशाला परवडणारी आहे."
याच वर्षी लंडन सोडून दुबईमध्ये नोकरीसाठी आलेल्या निकिता ओरुगंटी सांगतात की, इथल्या लोकांच्या आणि सरकारच्या खुल्या विचारसरणीमुळे हा देश सगळ्यांना खूप आवडतो. त्या म्हणतात, "इतर देश इमिग्रेशनचे नियम कडक करत असताना युएईने मात्र नेहमीच बाहेरच्या लोकांचे स्वागत केले आहे." अडचणीच्या किंवा तणावाच्या काळातही इथल्या सरकारने सुरक्षा व्यवस्था आणि माहिती देण्याची पद्धत उत्तम सांभाळली याबद्दल त्या समाधान व्यक्त करतात. "कुटुंबापासून लांब दुसऱ्या देशात एकटे राहताना अशी सुरक्षितता आणि शांतता मनाला खूप मोठा आधार देते."
इथल्या लोकांचे खरे आयुष्य कसे असते हे पाहायचे असेल तर कमीत कमी 1 दिवस तरी चकचकीत आणि महागड्या दुबईपासून लांब घालवावा असा सल्ला ओरुगंटी देतात. त्या सांगतात की, ऑफिस सुटण्याच्या गर्दीच्या वेळी मेट्रोने प्रवास करा, बुर दुबई आणि देईरा या जुन्या भागांतून पायी फिरा, अब्रा नावाच्या लाकडी नावेतून दुबई क्रीक ओलांडा आणि स्थानिक भारतीय, फिलिपिनो किंवा लेबनीज हॉटेल्समध्ये जेवून पाहा. त्या म्हणतात, "हे ते ठिकाण आहे जिथे दुबईचे रोजचे जगणे दिसते, जे त्याच्या जगभरातल्या ग्लॅमरस प्रतिमेपेक्षा खूप साधे आणि सर्वसामान्य आहे."

फोटो स्रोत, Getty Images
दुबई सोडून इतर शहरांचा विचार केला, तर रास अल खैमाह शहरात गेल्या 8 वर्षांपासून राहणाऱ्या ब्रिटिश नागरिक शेरॉन मॅककर्नन सांगतात की, हा निर्णय घेतल्यानंतर त्यांना कधीही पश्चात्ताप झाला नाही. त्या म्हणतात, "इथले साधे, शांत आणि निवांत जगणे मला फार भावते. कसलीही घाईगडबड नाही, ट्रॅफिकची डोकेदुखी नाही आणि रोजची दगदगही कमी आहे. त्यामुळे आम्हाला कुटुंबासोबत पूलवर किंवा समुद्रकिनाऱ्यावर बसायला आणि इथल्या डोंगराळ भागात फिरायला चांगला वेळ मिळतो." इथली हॉस्पिटल सिस्टीमही खूप वेगवान आणि उत्तम आहे. जगभरातून आलेल्या लोकांशी माझी पटकन मैत्री झाली, असेही त्या सांगतात.
इथे भेट देणाऱ्यांनी युएईमधल्या सर्वात उंच डोंगरावर म्हणजेच 'जेबेल जैस'वर जाऊन सूर्यास्त पाहावा किंवा जुन्या 'अल जझिरा अल हमरा हेरिटेज व्हिलेज' ची सफर करण्याचा सल्ला देतात. "इथे आल्यावर युएईचे एक वेगळे आणि अनेकांना माहिती नसलेले अनोखे रूप पाहायला मिळते."
5. ब्राझील
या वर्षी ब्राझीलने पहिल्यांदाच टॉप 5 देशांच्या यादीत धडक मारली आहे. आनंद, नवीन ठिकाणी रुळणे, स्थानिक माणसांचा गोड स्वभाव आणि तिथली समृद्ध संस्कृती या बाबतीत ब्राझीलला खूप चांगले रँकिंग मिळाले आहे. इथल्या लोकांच्या आपुलकीमुळे आणि प्रेमळ स्वभावामुळे इथे घरासारखा आपलेपणा वाटतो, असे अनेक अनिवासी नागरिकांनी नमूद केले आहे.
बार्बाडोस सोडून साओ पावलोमध्ये स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी आलेले क्लिंट मॅनिंग सांगतात, "इथे एखाद्या नवीन माणसाशी गुरुवारी पहिली ओळख झाली तरी शनिवार येईपर्यंत तुम्ही थेट त्यांच्या घरी बसून चुरास्को (बार्बेक्यू मीट) आस्वाद घेत पोहचता. मी बार्बाडोसचा असून तिथेही अशाच प्रकारची जीवनपद्धत असल्याने मला ब्राझीलमध्ये अजिबात परके वाटले नाही. फक्त इथला आवाका तिथल्यापेक्षा खूप मोठा आहे."
इथे फारसे लोक इंग्रजी बोलत नाहीत आणि ही गोष्ट खूप चांगली आहे, असे ते सांगतात. त्यांच्या मते, "ज्याला खरोखर नवीन भाषा शिकायची आवड आहे त्याच्यासाठी हा उत्तम अनुभव आहे. कारण कामासाठी आणि रोजच्या गरजेसाठी तुम्हाला पोर्तुगीजमध्येच बोलावे लागते. मी जर डेन्मार्क किंवा जर्मनीमध्ये जाऊन तिथली भाषा शिकायचा प्रयत्न केला असता तर जेवढा वेळ लागला असता, त्यापेक्षा खूप कमी वेळात मी इथे सफाईदारपणे पोर्तुगीज बोलायला शिकलो."

फोटो स्रोत, Getty Images
साओ पावलो शहराची खरी मजा अनुभवायची असेल, तर व्हिला मादालेना आणि बेला व्हिस्टा येथील बार्स तसेच स्थानिक बेकऱ्यांमध्ये (पदारियास) जावे, लिबरदादे या जपानी भागात जाऊन सुशी खावी, आणि लॅटिन अमेरिकेतील सर्वात मोठ्या पार्क्सपैकी एक असलेल्या इबिरापुएरा पार्कमध्ये व्यायाम करावा, असा सल्ला ते देतात.
पण कोणत्याही निसर्गाच्या सुंदर देखाव्यापेक्षा किंवा प्रसिद्ध ठिकाणांपेक्षा इथली स्थानिक माणसेच सगळ्यात जास्त आपलेपणा देतात, असे परदेशातून आलेल्या लोकांचे म्हणणे आहे. तब्बल 12 वर्षे साओ पावलोमध्ये राहिलेले ख्रिस कोल सांगतात, "माझी ओळख करून घेण्यात त्यांना मनापासून रस होता आणि पहिल्या दिवसापासूनच त्यांनी मला स्वतःच्या कुटुंबासारखे सामावून घेतले. मला परकेपणा जाणवू देण्याऐवजी ब्राझीलच्या लोकांनी मला कायम आपल्यातलंच एक मानले."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























