'माझ्या बहिणीशी प्रेमविवाह केला, आता तुला संपवणार', दलित तरुणाची हत्या; पत्नीने केली 'ही' मागणी

विमल वाणिया
    • Author, गोपाल कटेशिया
    • Role, बीबीसी गुजराती
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

राजकोट शहरात एका 27 वर्षीय दलित तरुणाची तिघांनी हत्या केली. ही घटना गुरुवारी (24 सप्टेंबर) दुपारी शहरातील मध्यवर्ती आणि नेहमी वर्दळ असलेल्या भक्तिनगर सर्कल येथे घडली.

विमल वाणिया असं या हल्ल्यात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला झाल्यानंतर काही मिनिटांतच विमलचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर 3 आरोपी 2 मोटारसायकलींवरून घटनास्थळावरून पसार झाले.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, विमलवर हल्ला करणाऱ्यांमध्ये त्याची पत्नी शीतलचा सख्खा भाऊ कमलेश उर्फ कानो घांघल आणि त्याचे 2 मित्र होते.

विमल वाणिया
फोटो कॅप्शन, विमल वाणिया

पोलिसांनी सांगितलं की, सुमारे 7 वर्षांपूर्वी विमल आणि शीतल यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. या नात्याची माहिती शीतलच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर तिचा भाऊ या संबंधाच्या विरोधात होता. तो विमलला वारंवार धमकावत असत.

पोलीस पुढे म्हणाले की, विमल दलित कुटुंबातील होता, तर शीतल दुसऱ्या समाजातील होती. शीतलच्या कुटुंबीयांना विमलसोबतचे तिचे नाते मान्य नव्हते.

आरसी बुक घेताना विमलवर कसा हल्ला झाला?

विमलवर हल्ला झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शीतलने सांगितलं की, पती विमल वाहनाची आरसी (नोंदणी प्रमाणपत्र) बुक घेण्यासाठी जातो, असं सांगून घरातून निघाला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 सप्टेंबरला दुपारी 2.15 च्या सुमारास विमल भक्तिनगर सर्कलजवळील एका पानाच्या दुकानात उभा होता. त्यावेळी कमलेशने मागून त्याची मान पकडली आणि त्याला थोड्या अंतरावर ओढत नेऊन त्याच्यावर धारधार शस्त्राने वार केले.

या प्रकरणी विमलची आई भारतीबेन यांनी तक्रार दिली. त्या तक्रारीवरून भक्तिनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत भारतीबेन यांनी म्हटलं आहे की, विमलवर हल्ला झाला तेव्हा त्याचा मित्र त्रृशाल अग्रवत त्याच्यासोबत होता.

पोलिसांनी सांगितलं की, त्रिशालने दुपारी 2.45 सुमारास भारतीबेन यांना फोन करून विमलवर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली.

विमल आणि शीतल यांचे कुटुंब राजकोट शहरातील वेगवेगळ्या भागात राहतं, असं पोलिसांनी सांगितलं.
फोटो कॅप्शन, विमल आणि शीतल यांचे कुटुंब राजकोट शहरातील वेगवेगळ्या भागात राहतं, असं पोलिसांनी सांगितलं.

तृशालने दिलेल्या माहितीनुसार, भारतीबेन यांनी तक्रारीत सांगितलं की, कमलेश आणि आणखी एक व्यक्ती मोटारसायकलवरून भक्तिनगर सर्कलवर आले. तिसरा हल्लेखोर बुलेटवरून तिथे पोहोचला.

भारतीबेन यांच्या म्हणण्यानुसार, कमलेश आणि त्याच्यासोबत आलेल्या पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेल्या व्यक्तीने आधी विमलला शिवीगाळ केली आणि त्याच्याशी झटापट केली.

भारतीबेन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, कमलेश उर्फ कानो विमलला म्हणाला की, तू माझ्या बहिणीशी प्रेमविवाह केला आहेस, आता तुला संपवायचं आहे.

त्याने विमलला मारहाण केली आणि खाली पाडलं. त्यानंतर विमलवर धारधार शस्त्राने वार केले. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी बुलेट आणि स्प्लेंडर मोटारसायकलवरून पळून गेले.

मित्रच एकमेकांच्या प्रेमात कसे पडले?

भारतीबेन यांच्या तक्रारीवरून भक्तिनगर पोलिसांनी कमलेश उर्फ कानो घांघल आणि त्याच्या 2 मित्रांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

त्यांच्यावर हत्या, हत्येची धमकी, शांतता भंग करण्यास प्रवृत्त करणे आणि अॅट्रॉसिटी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

विमल वानियाची पत्नी शीतलबेन.
फोटो कॅप्शन, विमल वानियाची पत्नी शीतलबेन.

भक्तिनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे. डी. परमार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, विमल आणि शीतल यांचं कुटुंब राजकोट शहरातील वेगवेगळ्या भागात राहतं. दोघांची ओळख त्यांच्या मित्रांमार्फत झाली होती.

जे. डी. परमार म्हणाले, "विमलच्या एका मित्राचे शीतलच्या मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यामुळे ते दोघे भेटायला जात असताना विमल आपल्या मित्रासोबत आणि शीतल आपल्या मैत्रिणीसोबत जात असे. याच भेटींतून विमल आणि शीतलची ओळख झाली आणि नंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले."

कुटुंबाचा विरोध असतानाही शीतलने लग्न कसं केलं?

पोलीस निरीक्षक जे. डी. परमार यांनी सांगितलं की, एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर विमल आणि शीतल घरातून पळून गेले होते. परंतु, शीतलच्या भावाने त्यांना शोधून काढलं आणि शीतलला घरी परत आणलं होतं.

"शीतलला घरी आणल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिले. पण, शीतलला हे लग्न मान्य नव्हतं. त्यामुळे ती पुन्हा घरातून निघून गेली आणि आश्रमात राहू लागली. त्यानंतर तिने विमलसोबत विवाह केला."

विमलच्या मृत्यूनंतर घटनास्थळी दाखल झालेली पोलिसांची वाहने.
फोटो कॅप्शन, घटनास्थळी तपासणी करताना राजकोट शहर पोलिसांच्या झोन-1च्या पोलीस उपायुक्त हेतल पटेल.

विमलची आई भारतीबेन यांनी तक्रारीत म्हटलं की, विमल आणि शीतल पहिल्यांदा घरातून पळून गेल्यानंतर कडी येथे राहायला गेले होते.

एफआयआरमध्ये भारतीबेन यांच्या तक्रारीचा हवाला देत म्हटलं, "तिथे शीतलचा भाऊ कमलेश उर्फ कानो लाखाभाई घांघल आला. त्याने विमलला मारहाण केली आणि शीतलला आपल्यासोबत घेऊन गेला. त्यानंतर शीतलचे दुसऱ्या तरुणासोबत लग्न लावून दिले."

"या घटनेनंतर 1 वर्षाने शीतल पुन्हा घरातून पळून गेली आणि विमलसोबत राहू लागली."

वडील झाल्यानंतर 11 महिन्यांत विमलची हत्या; पत्नीची मागणी काय?

भक्तिनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जे. डी. परमार यांनी सांगितलं की, विमल वाणिया सीएनसी मशीन ऑपरेटर म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याची बहीण विवाहित आहे. विमल लहान असतानाच त्याच्या वडिलांचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केलं होतं.

आरोपी कमलेश हा वाहनचालक म्हणून काम करतो, असं परमार यांनी सांगितलं.

परमार पुढे म्हणाले, "विमलवर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहे. या फुटेजवरून तिघांपैकी एक हल्लेखोर कमलेश उर्फ कानो असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतर 2 आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. सध्या तिन्ही आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी आमचे पथक प्रयत्न करत आहे."

विमलच्या मृत्यूनंतर घटनास्थळी दाखल झालेली पोलिसांची वाहने.
फोटो कॅप्शन, विमलच्या मृत्यूनंतर घटनास्थळी दाखल झालेली पोलिसांची वाहने.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मात्र, माध्यमांशी बोलताना शीतलने सांगितलं की, विमलसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिचा भाऊ तिला सतत धमकावत होता.

"मी घरातून पळून गेले तेव्हा माझ्या भावाने मला धमकी दिली होती की, 'तू ज्या दिवशी मला सापडशील, त्या दिवशी मी तुला मारून टाकीन.' आज मी माझ्या पतीसोबत असते, तर कदाचित आज त्याने मलाही मारून टाकले असते."

"त्याने मला, माझ्या मुलाला आणि आमच्या सर्वांना मारून टाकले असते. मी प्रेमविवाह केला होता. घरातून पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नाला 7 वर्षे झाली आणि आज त्याने माझ्या नवऱ्याला मारून टाकलं."

शीतलने सांगितलं की, 11 महिन्यांपूर्वी त्यांना मुलगा झाला आणि त्यामुळे ती आणि विमल आई-वडील झाले होते.

"मी कधीही कोणाला त्रास दिला नाही किंवा कोणाच्या वाटेला गेली नाही. मी कधीही कोणाकडे काहीही मागितलं नाही."

"पण त्याने अशा प्रकारे माझ्या नवऱ्याला मारून टाकलं. वडिलांशिवाय इतक्या लहान मुलाचं कसं होणार? त्याला फाशीची शिक्षा मिळावी, इतकीच माझी मागणी आहे."

कमलेश उर्फ कानो घांघल किंवा त्याच्या वकिलाशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर येथे अपडेट करण्यात येईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)