कॅन्सर, अकाली मेनोपॉज, तरीही मातृत्वाचं स्वप्न पूर्ण; 23 वर्षे जतन केलेल्या स्त्रीबीजांमधून बाळाचा जन्म

फोटो स्रोत, Sara Matthews
- Author, रेबेका थॉर्न
- Role, ग्लोबल हेल्थ
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
कसांद्रा बेकन 17 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांना हॉजकिन लिम्फोमा हा रक्ताच्या कॅन्सरचा एक दुर्मीळ प्रकार असल्याचं निदान झालं.
सुरुवातीला केमोथेरपीच्या उपचारांनंतर त्यांचा कॅन्सर नियंत्रणात आला होता. परंतु, एका वर्षानंतर पुन्हा कॅन्सर झाला. यावेळी तो आधीपेक्षा जास्त गंभीर होता.
डॉक्टरांनी बेकन यांना सांगितलं की, त्यांना लगेचच पूर्वीपेक्षा अधिक तीव्र केमोथेरपीचे उपचार घ्यावे लागतील.
त्या बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या 'न्यूजअवर' या कार्यक्रमात म्हणाल्या, "ज्या वयात तुम्ही गाडी चालवायला शिकत असता आणि शाळेच्या अंतिम परीक्षांची तयारी करत असता, त्या वयात अशा परिस्थितीतून जाणं खूप कठीण असतं. माझ्यासाठी तो काळ खूप त्रासदायक होता."
ऊतींचे नमुने 23 वर्षे गोठवून जतन केले
बेकन तेव्हा किशोरवयीन होत्या. तरीही, उपचारांचा त्यांच्या शरीरावर भविष्यात काय परिणाम होईल आणि पुढे आई होण्याची शक्यता कशी टिकवून ठेवता येईल, याचा त्या सातत्याने विचार करत होत्या.
मासिक पाळी येईपर्यंत थांबण्याइतकाही त्यांच्याकडे वेळ नव्हता. स्त्रीबीज (अंडी) काढून गोठवून ठेवण्याच्या प्रक्रियेसाठी मासिक पाळीची वाट पाहणं आवश्यक होतं.
त्यामुळे बेकन यांनी दुसरी पद्धत वापरण्याचा आग्रह धरला. त्यावेळी ही पद्धत प्रायोगिक अवस्थेत होती.
या पद्धतीत अंडाशयातील स्त्रीबीज तयार करणाऱ्या ऊतींचे काही भाग काढून गोठवून ठेवले जातात. नंतर हे ऊतींचे भाग पुन्हा शरीरात बसवले जातात.
बेकन यांच्या अंडाशयातून काढलेले ऊतींचे नमुने 23 वर्षे गोठवून ठेवण्यात आले.
वयाच्या 44व्या वर्षी बेकन यांच्या शरीरात हे ऊती पुन्हा प्रत्यारोपित करण्यात आले. त्यानंतर गेल्या महिन्यात त्यांनी आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. त्यांच्या मुलाचं नाव लँडन आहे.
20 वर्षांहून अधिक काळ गोठवून ठेवलेले अंडाशयाचे ऊती पुन्हा शरीरात बसवल्यानंतर जन्मलेलं लँडन हे जगातील पहिलं बाळ असल्याचं मानलं जात आहे.
अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया
किशोरवयातील दिवसांची आठवण सांगताना बेकन म्हणतात की, त्यांना नेहमीच आई व्हावं असं वाटत होतं.
आपल्याला स्वतःच्या बाळाला जन्म देता येणार नाही, अशी शक्यता वाटल्यावर बेकन यांना खूप वाईट वाटलं. तरीही, आई होण्याची आशा कायम ठेवण्यासाठी त्या काहीही करायला तयार होत्या.
त्या म्हणतात, "मला माहीत नाही का, पण भविष्यात मला भीती वाटत होती तसंच घडलं आणि मला नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करता आली नाही, तरीही आशा सोडण्याशिवाय दुसरा कोणताच मार्ग नाही, हे मला मान्य नव्हतं."

फोटो स्रोत, Kassandra Bacon
भविष्यामध्ये नैसर्गिकरीत्या गर्भधारणा करण्यात अडचण येऊ शकते, अशा महिलांसाठी स्त्रीबीज गोठवून (एग फ्रीझिंग) ठेवण्याची पद्धत वापरली जाते.
मात्र, स्त्रीबीज काढण्यापूर्वी काही आठवडे हार्मोन्सची इंजेक्शन्स घ्यावी लागतात. पण बेकन यांच्याकडे इतका वेळ नाही, असं डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं.
उपचार सुरू करण्यापूर्वी आपल्या अंडाशयातील काही ऊती काढून घेण्यासाठी बेकन यांनी डॉक्टरांचं मन वळवलं.
यानंतर त्यांची भेट डॉ. सारा मॅथ्यूज यांच्याशी झाली. ब्रिटनमध्ये अशा प्रकारची शस्त्रक्रिया करणाऱ्या मोजक्या डॉक्टरांमध्ये त्यांचा समावेश होता.
डॉ. मॅथ्यूज यांनी बेकन यांच्या अंडाशयातून ऊतींचे 4 छोटे नमुने काढले.
मात्र, या ऊतींच्या मदतीने भविष्यात बाळ होऊ शकेलच, याची त्यावेळी कोणतीही हमी नव्हती.
'माझी एकमेव आशा'
बेकन यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या बोन मॅरोचं (अस्थिमज्जेचं) प्रत्यारोपण करण्यात आलं आणि त्यांना केमोथेरपी देण्यात आली. हे उपचार यशस्वी ठरले आणि त्या पुन्हा एकदा कॅन्सरमुक्त झाल्या.
पण, डॉक्टरांना भीती होती तसंच झालं. या तीव्र उपचारांमुळे त्यांच्या अंडाशयाचं मोठं नुकसान झालं. वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षीच त्यांची मासिक पाळी बंद झाली. यालाच अकाली मेनोपॉज म्हणतात.
आता त्यांना बाळ हवं होतं. त्यासाठी त्यांनी गोठवून ठेवलेलं निरोगी ऊतक पुन्हा शरीरात बसवणारा डॉक्टर शोधण्यासाठी तब्बल 10 वर्षे प्रयत्न केले.
जेव्हा बेकन यांच्या अंडाशयातून ऊती काढण्यात आली, तेव्हा ब्रिटनमध्ये या प्रक्रियेसाठी कोणताही कायदा तयार झालेला नव्हता.
याचा अर्थ, 20 वर्षांनंतर अंडाशयाचे ऊतक शरीरात पुन्हा बसवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रं त्यांच्याकडे नव्हती.
या संपूर्ण काळात डॉ. मॅथ्यूज यांनी बेकन यांना साथ दिली. अखेर, ही प्रक्रिया करण्यास तयार असलेलं इस्रायलमधील एक क्लिनिक शोधण्यात त्यांनी बेकन यांना मोठी मदत केली.
गोठवून ठेवलेले ऊतक इस्रायलमधील रमत गान शहरात असलेल्या शेबा मेडिकल सेंटरमध्ये पाठवण्यात आल होते. मात्र, बेकन ज्या प्रक्रियेची अनेक वर्षांपासून वाट पाहत होत्या, त्याला आणखी उशीर झाला. 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर ही प्रक्रिया लांबणीवर पडली.
यानंतर इस्रायलने गाझामध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू केली.
'माझी शेवटची आशाही संपेल, असं वाटलं'
बेकन यांनी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसला सांगितलं, "माझी शेवटची आशाही संपून जाईल का, असा विचारही माझ्या मनात आला."
मे 2024 मध्ये काही काळासाठी युद्धविराम झाला. त्यामुळे बेकन यांना इस्रायलला जाता आलं आणि त्यांचे गोठवून ठेवलेले ऊतक पुन्हा शरीरात सुरक्षितपणे प्रत्यारोपित करण्यात आले.
बेकन ब्रिटनला परतण्यासाठी विमानात बसल्यानंतर काही तासांतच युद्धविराम संपुष्टात आला.
त्या म्हणतात, "अशी गोष्ट तुम्ही लिहू पण शकणार नाही."

फोटो स्रोत, Kassandra Bacon
अंडाशयातील ऊती पुन्हा शरीरात कसे प्रत्यारोपित केले जातात? यासाठी शस्त्रक्रियेद्वारे अंडाशयातून अंडी तयार करणाऱ्या ऊतकाचे काही भाग काढले जातात.
हे ऊतक प्रयोगशाळेत गोठवून ठेवले जातात. जेव्हा महिलेला बाळ हवं असतं, तेव्हा ते पुन्हा शरीरात प्रत्यारोपित केले जातात.
हे ऊतक पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्याची प्रक्रिया म्हणजे त्वचेचा एक भाग काढून तो शरीराच्या दुसऱ्या ठिकाणी बसवण्यासारखीच असते.
गोठवून ठेवलेले ऊतक वितळवून, अंडाशयाच्या उरलेल्या भागावर किंवा त्याच्या जवळ प्रत्यारोपित केले जाते.
यानंतर हे ऊतक जवळच्या रक्तवाहिन्यांशी पुन्हा जोडले जाऊ शकतात. त्यामुळे अंडाशय पुन्हा दर महिन्याला अंडे सोडू लागते.
2024 मध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, या प्रक्रियेनंतर 94 टक्के महिलांची मासिक पाळी पुन्हा सुरू होते आणि अंडाशयात अंडी तयार होण्याची प्रक्रियाही सुरू होते.
तर, 2022 मध्ये झालेल्या आणखी एका अभ्यासानुसार, अंडाशयाचे ऊतक पुन्हा शरीरात प्रत्यारोपित केल्यानंतर सुमारे 28 टक्के महिलांनी बाळाला जन्म दिला.
2016 मध्ये दुबईतील 24 वर्षांच्या मोआझा अल मतरूशीने बाळाला जन्म देण्यापूर्वीच अंडाशयाचे ऊतक गोठवून ठेवलं होतं. असं करणारी ती जगातील पहिल्या महिला मानली जाते. तिने वयात येण्यापूर्वीच आपल्या अंडाशयाचे ऊतक गोठवून ठेवलं होतं.
जगभरात अंडाशयाचे ऊतक पुन्हा शरीरात बसवल्यानंतर 200 हून अधिक मुलांचा जन्म झाला असल्याचा अंदाज आहे.
'मी स्वतःचे आभार मानले पाहिजेत'
2024 मध्ये ऊतक पुन्हा शरीरात बसवल्यानंतर काही महिन्यांतच बेकन यांची मासिक पाळी पुन्हा सुरू झाली.
त्यांनी नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आलं नाही.

फोटो स्रोत, Sara Matthews
त्यानंतर डॉक्टरांनी बेकन आणि त्यांच्या जोडीदाराला आयव्हीएफ उपचार घेण्याचा सल्ला दिला.
दोघांनी 3 वेळा आयव्हीएफ उपचार घेतले. अखेर, 2025 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी बेकन यांना गर्भधारणा झाल्याची खात्री झाली.
त्या म्हणतात, "वयाच्या 19व्या वर्षी माझ्या शरीरात आई होण्याची जी क्षमता होती, त्याचमुळे वयाच्या 43व्या वर्षी मला नव्याने आयुष्य जगण्याची संधी मिळाली."
बेकनच्या मुलाचा, लँडनचा जन्म याचवर्षी सप्टेंबरमध्ये झाला. बेकन गेल्या 25 वर्षांपासून कॅन्सरमुक्त आहेत.
त्यांच्या जिद्दीचं सर्वांनी केलं कौतुक
आपली कहाणी सांगितल्यानंतर बेकन यांना अनेक महिलांचे संदेश आले. त्यांच्यामुळे आपल्याला धीर मिळाला, असं या महिलांनी सांगितलं.
डॉ. मॅथ्यूज सांगतात की, आजकाल कॅन्सरशी झुंज देणाऱ्या तरुण रुग्णांशी भविष्यात आई-वडील होण्याच्या पर्यायांबद्दल पूर्वीपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे.
याचं एक कारण म्हणजे, लहान वयात होणाऱ्या कॅन्सरमधून बरे होण्याचं प्रमाण आता लक्षणीयरीत्या वाढलं आहे.
त्या म्हणतात, "या मुलांनी मोठं व्हावं आणि इतरांप्रमाणे सामान्य आयुष्य जगावं, अशी आमची इच्छा असते. स्वतःचं कुटुंब असणं हा त्यांच्यासाठी आयुष्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे."
बेकनची कहाणी ऐकणाऱ्या इतरांप्रमाणेच, त्यांनाही आश्चर्य वाटतं की इतक्या कमी वयात त्यांनी किती धैर्य दाखवलं आणि किती ठामपणे संकटांचा सामना केला होता.
त्या म्हणतात, "मी आजही विचार करते की, वयाच्या 18व्या वर्षी मी इतके प्रयत्न कसे करत राहिले? मी माझ्या निर्णयावर इतकी ठाम कशी राहिले?"
"मला वाटतं, त्या वेळी घेतलेल्या निर्णयासाठी मी आज माझ्या स्वतःचेच आभार मानायला हवेत."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























