क्रिकेटच्या खेळपट्टीएवढी लांब मान, 15 कोटी वर्षांपूर्वीचा हा विशाल डायनोसॉर नेमका कसा होता?

थायलंडमध्ये क्रिकेटच्या खेळपट्टीएवढी लांब मान असलेल्या डायनोसॉरची नवी प्रजाती सापडली

फोटो स्रोत, Artwork by Pakorn Chotchaiyaporn

    • Author, ॲमी वॉकर
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

थायलंडमधील जीवाश्मशास्त्रज्ञांनी थायलंडच्या ईशान्येकडील कालासिन प्रांतात सापडलेल्या जीवाश्मांच्या आधारे डायनोसॉरची एक नवी प्रजाती शोधल्याचं सांगितलं आहे.

वनस्पती खाणारा हा डायनोसॉर, ज्याला ऊरागासोरस कालासिनिस (Uragasaurus kalasinensis) असं नाव देण्यात आलं आहे, तो सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी जगत होता, असं मानलं जातं.

त्याची मान अत्यंत लांब होती आणि त्याची लांबी सुमारे 20m (66ft) होती. म्हणजे साधारण क्रिकेटच्या खेळपट्टीएवढी ती होती.

या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि थायलंडच्या महासाराखाम विद्यापीठातील डॉ. अपिरात निल्फानाफान यांनी बीबीसी थाईला सांगितलं की, हा नमुना 2008 मध्ये प्रथम ओळखल्या गेलेल्या स्थळावरील एका मोठ्या जीवाश्मसंग्रहाचा भाग होता.

त्या वेळी एका स्थानिक व्यक्तीला सापाच्या खवल्यांसारखे दिसणारे काही तुकडे सापडले होते.

डायनोसॉरची वैशिष्ट्ये

ज्या फू नोई (Phu Noi) स्थळी ही शोधमोहीम झाली, तिथे उत्तर जुरासिक (Late Jurassic) काळातील विविध प्रकारचे जीवाश्म आढळले.

या ठिकाणाहून उत्खननात मिळालेल्या जीवाश्मांपैकी 90% हून अधिक जीवाश्म हे डायनोसॉरचे तुकडे होते.

सर्वेक्षण पथक जेव्हा या भागाचा शोध घेण्यासाठी गेलं, तेव्हा त्यांना डायनोसॉरचे दात आणि हाडांसारखे इतर जीवाश्मही सापडले.

मात्र, नव्या प्रजातीचा शोध लागण्यामागील मुख्य जीवाश्म म्हणजे पाठीच्या मधल्या किंवा वरच्या भागातील मणक्याचं हाड (dorsal vertebra) होतं, ज्यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म दिसून आले.

सीटी स्कॅनमधून हे स्पष्ट झालं की हा डायनोसॉर सॉरोपॉड (sauropod) गटातील मामेंचीसॉरीडी Mamenchisauridae कुटुंबातील होता.

या कुटुंबातील डायनोसॉर त्यांच्या अत्यंत लांब मानेसाठी ओळखले जातात, ज्यामुळे त्यांना विविध उंचींवरील वनस्पतींपर्यंत पोहोचणं शक्य होत असावं.

इतर डायनोसॉरपेक्षा वेगळी रचना

नागटायटन हा आग्नेय आशियात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा डायनोसॉर आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, नागटायटन हा आग्नेय आशियात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा डायनोसॉर आहे.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मामेंचीसॉरीडी कुटुंबातील बहुतांश जीवाश्म चीनमध्ये सापडले असले, तरी थायलंडमध्ये अशा प्रकारचा हा पहिलाच शोध आहे.

स्कॅनमधून Y आकारात मांडलेली आधार देणारी हाडांची रचना (laminae) यांसह काही खास वैशिष्ट्यंही समोर आली.

निल्फानाफान यांनी बीबीसी थायला सांगितलं की, विशेषतः पोकळ्यांची (air-cavity) रचना "जगातील इतर कोणत्याही डायनोसॉरसारखी नाही, हेच त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवतं."

नव्या प्रजातीचा शोध लागल्याची खात्री झाल्यानंतर आपण इतके उत्साहित झालो की आपण कीबोर्डच फोडला, असं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांना "प्रचंड आनंद आणि दिलासा" मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं.

हा अभ्यास याच आठवड्यात नेचर या वैज्ञानिक नियतकालिकात प्रकाशित झाला.

मे महिन्यात थायलंडमध्ये सापडलेल्या अवशेषांच्या आधारे लांब मान असलेल्या आणखी एका शाकाहारी डायनोसॉरची नागटायटनची (Nagatitan) ओळख शास्त्रज्ञांनी पटवली होती.

नागटायटन हा आग्नेय आशियात सापडलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा डायनोसॉर आहे. त्याचं वजन 27 टन इतकं होतं म्हणजे 9 प्रौढ आशियाई हत्तींच्या वजनाइतकं आणि त्याची लांबी 27m (88ft) होती.

अतिरिक्त वृत्तांकन : जिरापोर्न स्रिजेम.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.