'चिरैया' ही वेबसीरिज सध्या चर्चेत का आहे? 'मॅरिटल रेप'चा मुद्दा महिलांच्या हक्कांबाबत की पुरुष विरोधी?

'चिरैया' या वेब सीरिजमध्ये प्रसन्ना बिष्ट यांनी पूजाची भूमिका केली आहे, जिच्यावर लग्नाच्या रात्री तिचा पती बलात्कार करतो

फोटो स्रोत, Jiostar

फोटो कॅप्शन, 'चिरैया' या वेब सीरिजमध्ये प्रसन्ना बिष्ट यांनी पूजाची भूमिका केली आहे, जिच्यावर लग्नाच्या रात्री तिचा पती बलात्कार करतो
    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

अलीकडेच प्रदर्शित झालेल्या एका वेब सीरीजमुळे भारतातील मॅरिटल रेप (पत्नीवरील बलात्कार किंवा वैवाहिक बलात्कार) सारख्या गंभीर मुद्द्याकडे पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधलं गेलं आहे.

आतापर्यंत याला गुन्हा म्हणून जाहीर करण्यास भारतात काहीसा संकोच पाहायला मिळाला आहे.

अलीकडेच जिओहॉटस्टारवर 'चिरैया' नावाची वेब सीरीज प्रदर्शित झाली आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी ही वेबसीरीज पाहिली आहे.

ती या प्लॅटफॉर्मवरील अलीकडच्या काळातील सर्वात लोकप्रिय हिंदी वेब सीरीजपैकी एक ठरली आहे.

माध्यमांमधील समीक्षकांनी या वेब सीरिजचं कौतुक केलं आहे. कारण समाजात सहसा लपवून ठेवला जाणारा विषय या वेब सीरीजमधून मांडण्यात आला आहे. यावरून सोशल मीडियामध्ये संमती आणि महिला विरोधी विचारसरणी यावर चर्चा सुरू झाली आहे.

अर्थात काहीजणांनी हा 'पुरुषविरोधी' आणि 'विवाहाच्या पावित्र्या'ला कमकुवत करण्याचा 'प्रयत्न' असल्याचंदेखील म्हटलं आहे.

या वेबसीरीजच्या पटकथा लेखिका दिवी निधी शर्मा म्हणाल्या की याची कथा कमलेश आणि पूजा या दोन महिलांभोवती गुंफलेली आहे.

कमलेशची भूमिका अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी केली आहे. ती एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे. तिला वाटतं की महिलांनी घर, कुटुंबं आणि स्वयंपाकघरापर्यंत मर्यादित राहिलं पाहिजे.

तर पूजा (ही भूमिका अभिनेत्री प्रसन्ना बिष्ट यांनी केली आहे) शिकलेली, जागरूक आणि समानतेवर विश्वास ठेवणारी महिला आहे.

पूजाचं लग्न कमलेशचा दीर अरुणशी झाल्यावर या दोघांमध्ये संघर्ष होतो. कमलेशनं अरुणला मुलाप्रमाणे सांभाळलेलं असतं.

अरुण हा एक आदर्श पती वाटतो. मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री तो पूजावर बलात्कार करतो. यामुळे तिच्या स्वप्नांचा चुराडा होतो.

पूजानं याला विरोध केल्यावर अरुण म्हणतो, "मी माझा जो अधिकार होता, तेच केलं."

तो असंही म्हणतो की, "भारतात मॅरिटल रेप हा गुन्हा नाही. त्यामुळे याच्यासंदर्भात कोणताही कायदा नाही."

समंतीचं महत्त्व अधोरेखित करणारी वेबसीरीज

ही वेबसीरीज संमतीचं महत्त्व मांडते, असं अभिनेत्री दिव्या दत्ता म्हणाल्या. विशेषकरून लग्नासारख्या पवित्र मानलं जाणाऱ्या नात्याच्या बाबतीत ते आवश्यक ठरतं.

"मॅरिटल रेपवर बोलणं, चर्चा करणं खूपच कठीण आहे. ज्या प्रत्येक महिलेला हे सहन करावं लागतं, तिला वाटतं की ही फक्त तिचीच कहाणी आहे. जर ती याबाबतीत बोलली तर तिची बदनामी होईल आणि कुटुंब, संसार मोडेल अशी भीती तिला वाटते," असं त्या म्हणाल्या.

वेबसीरीजमध्ये जेव्हा जखमी आणि त्रस्त झालेली पूजा तिच्याशी होणाऱ्या वर्तणुकीबद्दल बोलते, तेव्हा तिच्याच कुटुंबाकडून तिला 'तडजोड करण्या'चा सल्ला दिला जातो. सत्य बोलल्यामुळे फक्त बदनामी होईल असं तिला सांगितलं जातं.

कमलेशला सुरुवातीला वाटत असतं की, लग्नामुळे सेक्ससाठी आपोआपच संमती मिळते.

मात्र जसजशी ही कथा पुढे सरकते, तसतसा तिचा दृष्टिकोन बदलत जातो. ती सत्याची साथ देण्याचा निर्णय घेते. मग भलेही तिला तिच्या 'कम्फर्ट झोन'च्या बाहेर यायची गरज असली तर ती तयार असते. अखेरीस ती पूजाला साथ देते.

'चिरैया' या वेब सीरिजमध्ये अवॉर्ड विनर अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी कमलेशची भूमिका केली आहे

फोटो स्रोत, Jiohotstar

फोटो कॅप्शन, 'चिरैया' या वेब सीरिजमध्ये अवॉर्ड विनर अभिनेत्री दिव्या दत्ता यांनी कमलेशची भूमिका केली आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सरकारी आकडेवारीनुसार, भारतात विवाहित महिलांपैकी जवळपास 6.1 टक्के महिलांना कधी ना कधी लैंगिक हिंसेला तोंड द्यावं लागतं.

मात्र वर्षानुवर्षे आंदोलन होऊनदेखील भारत अशा अनेक देशांपैकी एक आहे, जिथे मॅरिटल रेपला गुन्हा मानलं जात नाही.

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि सौदी अरेबियासारख्या देशांमध्येदेखील याला गुन्हा मानलं जात नाही.

याच मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र सरकार, धार्मिक संघटना आणि पुरुष हक्क संघटनांनी कायद्यात बदल करण्यास विरोध केला आहे.

याबाबतीत सध्या असलेला कायदा, वसाहतवादाच्या काळातील आहे. जर पत्नी अल्पवयीन नसेल, तर या कायद्यानुसार पतीनं पत्नीशी जबरदस्तीनं लैंगिक संबंध ठेवल्यास त्याला गुन्हा मानलं जात नाही.

गेल्या वर्षी एका प्रकरणाबाबत खूप संताप व्यक्त करण्यात आला होता.

त्या प्रकरणात पत्नीवर 'बलात्कार केल्याबद्दल दोषी' असलेल्या पुरुषाची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली होती. भारतात मॅरिटल रेपला गुन्हा मानलं जात नसल्यामुळे ही मुक्तता करण्यात आली होती.

या वेबसीरीजच्या पटकथा लेखिका दिवी निधि शर्मा म्हणाल्या, "आपल्या घरांमध्ये आणि अवतीभोवतीच हा अन्याय होतो आहे.

या अन्यायाच्या विरोधात कोणताही कायदा किंवा सामाजिक आधार नाही, ही सर्वात त्रासदायक गोष्ट आहे. त्यामुळेच एक लेखक म्हणून मी यावर काम करणं आवश्यक मानलं."

'अशा कहाण्यांमुळे जग बदलू शकतं'

बंगाली शो 'संपूर्णा'वर ही वेबसीरिज आधारित आहे. या वेबसीरीजमध्ये उत्तर भारतातील सामाजिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कथेची मांडणी करण्यात आली आहे. तिथे पितृसत्ता अधिक खोलवर रुजलेली आहे.

शर्मा म्हणाल्या, "संपूर्णामधील मुख्य पात्र एक फेमिनिस्ट आहे."

"आमची नायिका कमलेश ही एक अशी महिला आहे, जिला महिला-विरोधाबाबत काहीही माहिती नाही. ती पितृसत्ताक विचारसरणीत इतकी गुंतली आहे की, तिला स्वतंत्र असा वैचारिक दृष्टीकोनच नाही," असं त्या म्हणाल्या.

"मात्र शेवटी, ती याविरोधात उभी राहते आणि अन्यायाच्या विरोधात लढते," असं त्या म्हणाल्या.

या वेबसीरीजचे दिग्दर्शक शशांत शाह म्हणाले की कमलेशचं पात्र अशाप्रकारे सादर करण्यात आलं आहे की भारतातील अनेक महिला त्याच्याशी जोडल्या जातील. त्यांना ते आपलंसं वाटेल.

"तिचा कुटुंबावर विश्वास आहे. मात्र हळूहळू तिच्या लक्षात येतं की हा सर्व देखावा आहे. इथे लोक आतून खूप पीडित, दु:खी आहेत," असं ते म्हणाले.

दिग्दर्शक शशांत शाह म्हणाले की चिरैयामध्ये पुरुषांना खलनायक म्हणून सादर केलं जाऊ नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली

फोटो स्रोत, Jiohotstar

फोटो कॅप्शन, दिग्दर्शक शशांत शाह म्हणाले की चिरैयामध्ये पुरुषांना खलनायक म्हणून सादर केलं जाऊ नये याची त्यांनी विशेष काळजी घेतली

या वेबसीरीजचा हेतू सरकार किंवा कायद्याबाबत प्रश्न उपस्थित करण्याचा नाही. तर समाजाला या मुद्द्यावर विचार करण्यास प्रवृत्त करण्याचा आहे, असं ते म्हणाले.

"पुरुष पात्रांना खलनायक म्हणून सादर केलं जाऊ नये, याचीही आम्ही काळजी घेतली आहे. आपण रोज पाहतो तसेच ते सर्वसामान्य लोक आहेत. पितृसत्ताक पद्धती इतकी खोलवर रुजली आहे की आपण काही चुकीचं करत आहोत, हेच लोकांच्या लक्षात येत नाही," असं शाह म्हणाले.

तर दिव्या दत्ता म्हणाल्या की, या वेबसीरीजला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. त्यांना मध्यरात्रीदेखील लोकांचे मेसेज आणि कॉल येतात. लोक आभार व्यक्त करत आहेत. कविता लिहून पाठवत आहेत.

अर्थात काही नकारात्मक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत.

काहीजण याला "पुरुषांची चुकीच्या पद्धतीनं मांडणी करणारी" वेब सीरिज मानतात, असं शर्मा म्हणाल्या.

"आमचा हेतू फक्त हा मुद्दा मांडण्याचा होता. आम्ही कायदा बनवू शकत नाही. मात्र कलेच्या माध्यमातून आम्ही असे मुद्दे समाजासमोर मांडू शकतो," असं त्या म्हणाल्या.

दिव्या दत्ता म्हणाल्या की त्या नकारात्मक प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करत आहेत आणि सकारात्मक प्रतिक्रियांवर लक्ष देत आहेत.

"मला वाटतं की अशा कहाण्यांमुळे जग बदलू शकतं. यातून आपल्याला दिसतं की आपण कुठे चुकतो आहोत. बदलाची सुरुवात आपल्याला आपल्या घरापासूनच करावी लागेल. तेच पहिलं आणि सर्वात भक्कम पाऊल आहे," असं त्या शेवटी म्हणाल्या.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.