देशात दररोज 16 हुंडाबळी, या हिंसेचं मूळ कशात? संसार, लग्न ही बळजबरीने टिकवून ठेवायची गोष्ट नाही - ब्लॉग

फोटो स्रोत, AFP via Getty Images
- Author, नासिरुद्दीन
- Role, बीबीसी हिंदी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
लग्न म्हणजे जबरदस्तीनं टिकवून ठेवण्याची गोष्ट नाही. तसंच लग्नसंबंध टिकवण्याची जबाबदारी फक्त एकाच व्यक्तीवर नसते. लग्न म्हणजे दोन व्यक्तींमधील भागीदारी आणि नातं असतं. त्यामुळे ते टिकवून ठेवण्याची, वाचवण्याची जबाबदारी दोघांवरही असते.
त्यामुळेच, लग्न वाचवण्यासाठी, टिकवण्यासाठी, संसार टिकवण्यासाठी किंवा घर विखुरण्यापासून वाचवण्यासाठी मुली-भगिनी किंवा कोणत्याही महिलेनं आपला जीव गमावणं हा गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी आपण सर्वच दोषी आहोत.
दिल्लीजवळच्या नोएडामधील दीपिका आता हयात नाही. भोपाळमधील त्विषा राहिली नाही. कर्नाटकातील बेल्लारीच्या ऐश्वर्याचा जीव गेला. दिल्लीतील वीणा कुमारीदेखील राहिली नाही.
या सर्व गेल्या काही दिवसांमधील बातम्या आहेत.
स्वत:ची कहाणी सांगण्यासाठी निक्कीदेखील राहिली नाही. ती काही महिन्यांपूर्वीच या जगातून निघून गेली. तिच्या आधी, लखनौमध्ये मधू तिच्या घरी मृतावस्थेत सापडली होती.
या सर्व तरुण होत्या. काही महिन्यांचाच संसार होता. वृत्तांनुसार, यापैकी कोणाचाही मृत्यू नैसर्गिक नव्हता. हे असामान्य आहे.

सर्वच प्रकरणांमध्ये पती आणि सासरच्या इतर मंडळींनी हुंड्यासाठी हिंसा केल्याचा आरोप होतो आहे. गुन्हादेखील याचसंदर्भात दाखल झाला आहे.
या तरुणींचा जीव घेण्यात आला की त्यांनी जीव दिला, ही चर्चा थोडावेळ आपण बाजूला ठेवूया. यातील महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता त्या या जगात नाहीत. त्यांच्या मृत्यूच्या मुळाशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे त्याचं महिला असणं.
विवाह हे एक असमान नातं आहे
आपल्या सध्याच्या समाजात लग्न हे एक असमानतेचं नातं आहे. एका बाजूला मुलीकडचे आणि एका बाजूला मुलाकडचे आहेत. सर्वसाधारणपणे लग्नामध्ये या गोष्टीवरूनच त्यांची सामाजिक स्थिती ठरते.
यात तराजूची दोन्ही पारडी समान पातळीवर नसतात. एकाचा बाजूचं पारडं खूपच जड असतं. हुंड्याद्वारे दुसऱ्या बाजूचं पारडं बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला जातो.
मात्र तसं होत नाही. कारण जड पारड्यात बसलेल्या व्यक्तीचं नाव मुलगा, नवरदेव किंवा मुलाकडचे असं असतं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
कोणत्या तरी मार्गानं बरोबरी झाली तर ठीक, नाहीतर टोमणे, अत्याचार आणि हिंसेची मालिका जीव जाईपर्यंत सुरूच राहते. मग हे प्रश्न विचारले जाऊ शकतात का?
लग्नात दोन व्यक्तींचा समावेश असतो. हुंडा ही कोणाची कल्पना आहे? तो कोणाला, कोणाकडून हवा आहे? हुंड्यामुळे कोणाचं मन आणि शरीर जखमी होत असतं? कोण मन:शांती गमावतं? हुंड्याच्या आगीमध्ये कोण होरपळून निघतं? हुंड्यामुळे कोणाचा बळी जातो?
खरे मुद्दे तर हेच आहेत. यातूनच निश्चित झालं पाहिजे की, या मृत्यूंचा दोषी कोण आहे?
दररोज 16 मुलींचा हुंड्यामुळे मृत्यू
यातील महत्त्वाची बाब म्हणजे या काही चार-पाच वेगवेगळ्या घटना नाहीत. हुंडाबळी हा भारतीय दंड संहिते (आयपीसी)नुसार कलम 304 बी आणि आता भारतीय न्याय संहिता (बीएनएस)नुसार कलम 80 अंतर्गत येतो.

राष्ट्रीय गुन्हेगारी रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी)च्या ताज्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये या दोन कलमाअंतर्गत हुंडाबळीच्या 5,737 घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
यात 2024 मध्ये हुंडाबळीच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेश(2,038), बिहार(1,078), मध्य प्रदेश(450), राजस्थान(386), पश्चिम बंगाल (337) मध्ये घडल्या आहेत.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
पती आणि सासरच्या लोकांनी केलेला छळ बीएनएसच्या कलम 85 आणि आयपीसीच्या कलम 498 ए अंतर्गत नोंदवला जातो.
एनसीआरबीनुसार, 2024 मध्ये अशा 1 लाख 20 हजार 227 घटना नोंदवल्या गेल्या आहेत. म्हणजे 2024 मध्ये देशात दररोज जवळपास 16 तरुणींचा जीव हुंड्यामुळे गेला.

तर, दररोज जवळपास 330 मुलींनी सासरच्या लोकांकडून होत असलेल्या छळ, अत्याचाराच्या विरोधात तक्रार दाखल केली.
मात्र यात आपल्याला फक्त ज्यांचा जीव गेला किंवा ज्या प्रकरणांमध्ये प्रसारमाध्यमांचं लक्ष वेधलं जातं, त्यांच्याबद्दलच माहिती होतं.
बहुतांश घटना आपल्यासमोर येतच नाहीत. जरी आल्या, तरी त्या सहजपणे नाहीशा होतात. आपल्या आयुष्याच्या कोणत्याही पैलूवर, कशावरही त्यांचा काहीही परिणाम होत नाही.
पितृसत्ता, असमानता आणि हिंसा
सामर्थ्यवान लोक विशेषत: पितृसत्तेच्या शक्तीची मानसिकता बाळगणारे लोक, आपल्याला प्रत्येक असमानतेवर आणि हिंसेवर संशय घ्यायला शिकवतात.
इतकंच नाही तर पीडित आणि इतर लोक असमानता आणि हिंसेला सामान्य गोष्ट मानून, तो आयुष्याचा एक भाग आहे असं सहजपणे स्वीकारतात.
बाहेरही हेच होतं आणि घरातदेखील हेच होतं. जात आणि लिंगावर आधारित भेदभावात ही गोष्ट स्पष्टपणे दिसून येते.
विवाहित आयुष्यात टोमणा असो, की शारीरिक हिंसा असो याला महिलेच्या आयुष्याचा एक भाग म्हणून सामान्य गोष्ट मानलं जाऊ लागलं आहे. त्याबद्दल बोलणं किंवा चिंता व्यक्त करणं अनावश्यक मानलं जातं.
हुंड्याची मागणी, अत्याचार आणि हिंसेला आयुष्याचा एक भाग मानून त्याकडे दुर्लक्ष करण्याचं आणि त्याच्याशी जुळवून घेण्यास किंवा 'ॲडजस्ट' करण्याचा सल्ला आपण आपल्या मुलींना आणि भगिनींना देतो.
जेव्हा आपल्या मुली किंवा बहिणी त्यांचा जीव गमावतात, तेव्हाच आपल्याला याची जाणीव होते.
महिला हे सर्व सहन का करतात?
एक प्रश्न वारंवार विचारला जातो की, अखेर मुली हे सर्व सहन का करतात? अशा हिंसक नात्यांमधून त्या बाहेर का पडत नाहीत?
हे सर्व सहन करणाऱ्यांमध्ये फक्त ग्रामीण भागातील कमी शिकलेल्या महिलाच नाहीत. तर शहरं-महानगरांमधील उच्च मध्यमवर्गीय वर्गातील सुशिक्षित मुलीदेखील मोठ्या संख्येनं आहेत.
त्या हे सर्व सहन करतात, कारण त्या जन्माला येताच, त्यांनी डोळे उघडताच, आपण त्यांना सहन करायलाच शिकवतो. तर मुलांना आपण इतरांवर नियंत्रण ठेवायला आणि त्यांना सहन करायला भाग पाडायला शिकवतो.
फक्त कायद्याद्वारे हुंडा थांबवता आला असता, तर आतापर्यंत तो बंद झाला असता. यासाठी आपल्याला समाजात ज्या सामाजिक-सांस्कृतिक बदलाची, सुधारणेची आवश्यकता आहे, ती अद्याप आपल्या समाजात दिसत नाही.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. जन्माला येताच मुलींचं आयुष्य विवाहाशी जोडलेलं असतं. मुली आणि त्यांच्या कुटुंबांकडे यावर एक उपाय आहे.
त्यांनी पुढाकार घेतल्याशिवाय पुरुषप्रधान व्यवस्थेच्या या हिंसक स्वरुपावर मात करणं शक्य नाही. कारण त्यादेखील या व्यवस्थेचा एक अविभाज्य भाग आहेत.
जर घरातील लोक मुलींना ओझं समजत असतील किंवा त्यांना परक्याचं किंवा दुसऱ्याचं धन मानत असतील, तर ते लग्नालाच त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय मानतील.
जर ते मुलींना मुलांपेक्षा कमी लेखत असतील, तर त्या विषमतेच्या ओझ्याखाली नेहमीच दबलेल्या राहतील. त्याचा परिणाम असा आहे की ते हुंड्याच्या माध्यमातून त्यातून सुटका करून घेण्याचा किंवा मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात.
याच्या आधी ते मुलींना लहानपणापासूनच सर्वप्रकारची असमानता आणि हिंसा सहन करण्याची सवय लावत असतात.
त्यामुळे जेव्हा तिच्याबरोबर हिंसा होते आणि ती त्याबद्दल सांगते, तेव्हा ते स्वत:देखील सहन करतात आणि तिलाही तोच सल्ला देतात.
मग काय घडायला हवं?
मुलींच्या आयुष्याचा उद्देशही तोच असला पाहिजे जो मुलांच्या आयुष्याचा असतो. मुलांच्या आयुष्याचा एकमेव उद्देश लग्न करणं हा नसतो.
मग मुलींच्या बाबतीत असं का? लग्नाची आवश्यकतादेखील मुलगा आणि मुलींसाठी एकसमान मानली जात नाही.
जोपर्यंत दोन्ही उद्देश आणि आवश्यकता समान नसतील, तोपर्यंत विवाह विसंगत मानले जातील. लग्न हे असमानतेचं घर बनून राहील, आणि जर असमानता असेल तर हिंसा त्यासोबत सुरू राहील. मग त्याचं स्वरुप काहीही असेल.
आम्हाला हिंसेचं बीज, मूळ ओळखायला शिकावं लागेल. त्याला खत-पाणी मिळेल, याच्या आधीच ते मुळापासून नष्ट करावं लागेल. त्याला कोणत्याही परिस्थितीत अस्वीकार्ह आणि असह्य मानावं लागेल आणि तसं सांगावं लागेल.
मुलीला विश्वास द्यावा लागेल की लग्न झालं म्हणजे ती परक्याचं धन किंवा मालमत्ता झालेली नाही. तिनं सहन करायचं नाही, त्याविरोधात आवाज उठवायचा आहे. ती जेव्हा सांगेल तेव्हा त्यावर विश्वास ठेवायचा आहे. तिच्या पाठीशी उभं राहायचं आहे.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
आपण अनेकदा लग्न वाचवण्याच्या प्रयत्नांमध्ये एवढे गुंतलेले असतो की मुलीची सुरक्षितता आणि जीवनाचा प्रश्न मागे पडतो. अनेकवेळा तर खूप उशीर झाल्यावरच आपल्याला त्याची जाणीव होते.
लग्न वाचवणं, संसार टिकवणं याला प्राधान्य आहे की, मुलीच्या आयुष्याला प्राधान्य आहे, हे आपल्याला स्पष्टपणे ठरवावं लागेल. हिंसेनं व्यापलेल्या आयुष्यात सुरक्षितता नसते.

त्यामुळे विचार करा, जर कोणत्याही विवाहित मुलींनी किंवा बहिणींनी किंवा कोणत्याही मुलीनं आपल्याला सांगितलं की तिच्यावर हिंसा होते आहे आणि तिला तिच्या घरी परत जायचं आहे, तर आपलं उत्तर काय असेल? काय असायला हवं?
तसंच मुलींना देखील हे ठरवावं लागेल की हिंसेच्या विरोधात आवाज उठवणं म्हणजे घर मोडणं नाही.
हा गुन्हा नाही. आवश्यकता भासल्यास त्या वातावरणातून बाहेर पडणं आवश्यक आहे. हुंड्याची मागणी किंवा त्यासाठीचे टोमणे किंवा कोणतेही टोमणे म्हणजे हिंसाच आहेत. हिंसा म्हणजे फक्त शरीरावर होणाऱ्या लाल-निळ्या खुणा किंवा वळच नाहीत.
जर नात्यात हिंसा असेल तर गप्प राहणं हा त्यावरचा उपाय नाही. अशावेळी विवाहाआधी स्वत:चं आयुष्य महत्त्वाचं आहे. मुलींना त्यांच्या आयुष्याविषयी आदर करणं, स्वत:चा सन्मान करण्याची सवय लावावी लागेल.
वेळ आल्यास, मान-सन्मानासाठी त्यांना, जे 'घर' त्यांचं असल्याचं सांगून त्यांना पाठवण्यात आलं होतं, त्या 'घरा'चा उंबरठा कोणत्याही संकोचाशिवाय आणि भीतीशिवाय ओलांडता यावा.
ज्या घराबद्दल सांगण्यात आलं होतं की तिथून तिची अंत्ययात्राच निघेल. म्हणून, जीवन संपण्यापूर्वी तिथून निघून जाणं महत्त्वाचं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.






















