डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेला संबोधन, इराणसंबंधित कोणते महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले?

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प
वाचन वेळ: 4 मिनिटे

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच राष्ट्राला संबोधित केले. सध्या सुरू असलेल्या इराण युद्धाबाबत त्यांनी महत्त्वाचे अपडेट दिले.

इराणची मोहीम संपण्याच्या टप्प्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात म्हटलं आहे की, 'इराण युद्धातली उद्दिष्टे आता पूर्ततेच्या जवळ आली आहेत' आणि नजीकच्या काळात हे युद्ध संपवण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पेट्रोलच्या वाढलेल्या दरांसाठी इराण जबाबदार असल्याचं देखील त्यांनी सुचवलं आहे. अमेरिकेत पेट्रोलच्या दरांचा मुद्दा महत्त्वाचा बनलेला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचा 'ऐतिहासिक विजय' होत असल्याचं देखील म्हटलं आहे.

'इराणने त्यांचा अणु कार्यक्रम सोडलेला नव्हता आणि ते अतिशय वेगाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र बनवत होते,' असं ट्रम्प म्हणाले. 'इराण अण्वस्त्र बनवण्याच्या अगदी उंबरठ्यावर उभा होता,' असं देखील त्यांनी सांगितलं.

याआधी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते की, 'इराणच्या नव्या राजवटीतील राष्ट्राध्यक्षांनी युद्धबंदी करण्याची विनंती केली होती.' इराणच्या सरकारी माध्यमांनी मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावला होता.

डोनाल्ड ट्रम्प 19 मिनिटांच्या या भाषणात शेवटी म्हणाले, "आज प्रत्येक अमेरिकन नागरिकासाठी इराणच्या आक्रमक दुष्टपणातून आणि आण्विक धमकीपासून मुक्त होण्याचा दिवस जवळ आलेला आहे."

डोनाल्ड ट्रम्प यांनी या भाषणात आश्वासन दिलं की, "हे युद्ध संपेल तेव्हा अमेरिका पूर्वी कधीही नव्हता त्यापेक्षा अधिक सुरक्षित, अधिक सामर्थ्यवान, अधिक समृद्ध आणि अधिक महान देश असेल."

युद्ध ही भविष्यासाठीची 'खरी गुंतवणूक' - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिकेच्या लष्करी ताकदीला कुणीही रोखू शकत नाही. अमेरिकेतील लहान मुलं आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी ही 'खरी गुंतवणूक' असल्याचं ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी या भाषणात विसाव्या आणि एकविसाव्या शतकात झालेल्या प्रदीर्घ युद्धांचा दाखला दिला. ते म्हणाले, 'याआधी वर्षानुवर्षे युद्ध चालायची मात्र हे युद्ध फक्त 32 दिवस चाललं.'

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'इराणच्या आक्रमणाची आता अमेरिकेला भीती असण्याचं कारण नाही.'

डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

आखाती देशांमधील तेलावर अवलंबून असणाऱ्या देशांनी सहभागी व्हावं - ट्रम्प

अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये होणाऱ्या तेल उत्पादनामुळे अमेरिकेला बाहेरून तेल आयात करण्याची गरज नसल्याचं देखील ट्रम्प म्हणाले. त्यामुळे तेलासाठी आखाती देशांवर अवलंबून असणाऱ्या देशांनी आता होर्मुझची सामुद्रधुनी उघण्यात पुढाकार घेण्याचं आवाहन डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं आहे.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने, महत्त्वाचा व्यापारी जलमार्ग असलेल्या होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर, आखाती देशांमधून होणारी ऊर्जेची वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली आहे.

ट्रम्प म्हणाले, "ज्या देशांना इंधन मिळत नाही आणि ज्या देशांनी आतापर्यंत इराणला नेस्तनाबूत करण्याच्या मोहिमेत सहभाग घेतला नाही. त्यांनी आता जरा उशिरा का होईना, पण हिंमत एकवटावी; सामुद्रधुनीपाशी जावे आणि ते (इंधन) सरळ ताब्यात घ्यावे. त्याचे रक्षण करावे."

डोनाल्ड ट्रम्प यांनी आखाताऐवजी अमेरिकेकडून तेल खरेदी करण्याचं आवाहन देखील केलं आहे.

क्रॉस हॉल

फोटो स्रोत, /EPA/Shutterstock

ट्रम्प जेव्हा राष्ट्राला उद्देशून भाषण देत होते, तेव्हा व्हाईट हाऊसच्या 'क्रॉस हॉल'मध्ये लष्करी प्रमुखांचा एक गट बसून ते भाषण ऐकत होता.

यामध्ये अमेरिकेच्या 'जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ'चे अध्यक्ष जनरल डॅन केन आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचा समावेश होता.

परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ हे देखील ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांसह तिथे उपस्थित होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणानंतर जगभरातील तेलाच्या किमती वाढल्या

पीटर हॉस्किन्स, बिजनेस रिपोर्टर

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या भाषणानंतरही जागतिक तेलाच्या बाजारपेठेत होर्मुझबाबत अविश्वास दिसून आला.

येणाऱ्या काही दिवसांमध्ये येथील वाहतूक सुरळीत होईल यावर या बाजाराचा विश्वास नसल्याचं दिसून येत आहे.

युद्धामुळे जागतिक इंधन संकट निर्माण झाले असून, अनेक देशांनी वाढत्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत.

फोटो स्रोत, Getty Images/BBC

फोटो कॅप्शन, युद्धामुळे जागतिक इंधन संकट निर्माण झाले असून, अनेक देशांनी वाढत्या किमतींपासून दिलासा देण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना केल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाला सुरुवात झाली तेव्हा ब्रेंट क्रूडचा भाव प्रति बॅरल सुमारे १०० डॉलर्सवर होता. भाषण सुरु असताना तेलाची किंमत अस्थिर होती पण अखेर भाषण संपल्यानंतर कच्च्या तेलाची किंमत सुमारे 4 टक्क्यांनी वाढून 105.38 डॉलर्सवर पोहोचली.

होर्मुझचा मार्ग जागतिक अर्थव्यवस्थांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. एकूण तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या वाहतुकीपैकी 20 टक्के वाहतूक या मार्गाने होत असते. 28 फेब्रुवारी पासून हा मार्ग बंद आहे.

'ट्रम्प यांची मोहीम अमेरिकेच्या धोरणात्मक इतिहासातील घोडचूक'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणावर अमेरिकन नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर केलेली कारवाई ही अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी धोरणात्मक घोडचूक असेल असे सिनेट मायनॉरिटी लीडर चक शुमर यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क येथील डेमोक्रेटिक पक्षाचे नेते शुमर यांनी म्हटले, ट्रम्प यांना आपली उद्दिष्टे काय आहेत हे सांगण्यात अपयश आले आहे. त्यांनी आपल्या सहकारी राष्ट्रांना बाजूला सारले आहे तसेच अमेरिकन नागरिकांना येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष केले आहे.

रिपब्लिकन पक्षाचे नेते लिंडसे ग्राहम यांनी ट्रम्प यांच्या भाषणावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. फॉक्स न्यूजशी बोलताना ते म्हणाले इराणकडे करार करण्याचा पर्याय आहे किंवा त्यांना जास्त हल्ल्यांना तोंड द्यावे लागेल.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कोणत्या ठिकाणांना लक्ष्य करायचे याची योजना आखली आहे. ते नष्ट केल्यावर तेथील सत्ता काही काळातच उलथेल, असे ग्राहम म्हणाले.

याआधी, इराणमधील इलेक्ट्रिक ग्रीडला लक्ष्य केले जाईल याचा ट्रम्प यांनी इशारा दिला होता. त्या संदर्भात ग्राहम बोलत होते.

जर तुम्ही करार केला नाही तर आम्ही सारे काही उडवून देऊ ज्याची तुम्हाला आवश्यकता आहे. हा या मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा होता असे ग्राहम यांनी म्हटले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)