व्याघ्र प्रकल्पात सापडलेल्या हंड्यात काय आहे? सोनं, हिरे की आदिमानवांचे सांगाडे?

फोटो स्रोत, UGC
- Author, गरिकिपती उमाकांत
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
आंध्र प्रदेशात एक अनोखी घटना समोर आली आहे. मरकापुरम जिल्ह्यातील गिद्दलूर व्याघ्र प्रकल्पात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीच गुप्तधन शोधण्यासाठी खोदकाम केल्याचे आरोप करण्यात आले आहेत.
या उत्खननात सोनं आणि इतर खजिना सापडल्याची स्थानिक पातळीवर चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, या आरोपांची चौकशी सुरू असल्याचे प्रकाशम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्षवर्धन राजू आणि गिद्दलूर वन विभागाच्या उपसंचालिका निशाकुमारी यांनी बीबीसीला सांगितलं.
सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल
नल्लामला जंगलातील गिद्दलूर व्याघ्र प्रकल्प विभागांतर्गत आणि तुरिमेला जंगल परिसरातील अरावेटिकोटा भागात उत्खनन झाल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
अरावेटिकोटा विभाग आणि यरगरुंटला परिसरातील जमिनीत असलेल्या 'बेगिनापल्ली कुंड'च्या भागात शेकडो वर्षांपासून गुप्तधन असल्याची एक जुनी अफवा आहे.
या पार्श्वभूमीवर एप्रिल महिन्यात मरकापूरम जिल्ह्यातील गिद्दलूर व्याघ्र प्रकल्पाच्या तुरिमेलाचे वन परिक्षेत्र अधिकारी, वेलागलपाया वन बीट अधिकारी आणि आदिवासी निरीक्षक या सर्वांनी मिळून गुप्तधनासाठी खोदकाम केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.
यासाठी थेट जेसीबी मशीनचा वापर करून खोदकाम करण्यात आल्याचे वृत्त समोर आले होते.

फोटो स्रोत, UGC
उत्खननादरम्यान 2 मोठे मातीचे हंडे सापडले. त्यात हिरे आणि सोनं असल्याची अफवा पसरली होती.
यानंतर अशीही चर्चा होती की, सापडलेलं सोनं आणि हिरे आधी हैदराबादमध्ये विकण्याचा प्रयत्न झाला, पण तो अयशस्वी झाल्यावर वन अधिकाऱ्यांनी ते बंगळुरूमध्ये विकले.
खोदकाम केल्याचा आरोप असलेल्या वन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी बोलण्याचा बीबीसीने प्रयत्न केला, पण ते उपलब्ध झाले नाहीत.
आरोप असलेल्या एफआरओशी संपर्क साधण्याचा बीबीसीने प्रयत्न केला, परंतु तेही फोनवर उपलब्ध झाले नाहीत. तसेच फॉरेस्ट बीट अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही.
बीबीसीने या प्रकरणाबाबत वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आणि पोलीस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
तपास सुरू आहे - पोलीस अधीक्षक
याबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत तपास सुरू असल्याचे प्रकाशम जिल्ह्याचे एसपी हर्षवर्धन राजू यांनी बीबीसीला सांगितले.
तपास पूर्ण झाल्याशिवाय नेमकं काय घडलं, हे स्पष्ट होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
2 हंडे सापडल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितलं - डीएसपी
या प्रकरणाचा तपास करणारे मरकापूरमचे पोलीस उपअधीक्षक नागराजू यांनी बीबीसीशी संवाद साधला.
नागराजू म्हणाले, "उन्हाळ्यात जनावरांना पाणी मिळावे म्हणून जंगलात खड्डा खोदताना 2 हंडे सापडल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं. त्यांनी ते हंडे तिथेच पुन्हा पुरल्याचे ते म्हणाले."

फोटो स्रोत, UCG
"पण सोशल मीडियावर त्या हंड्यांमध्ये हिरे आणि सोनं असल्याची अफवा पसरली. आमच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, पण तोपर्यंत ते हंडे पुन्हा पुरले होते. त्यामुळे तपासात आम्ही पुरातत्त्व विभागाची मदत घेत आहोत. ज्यांनी ते हंडे तिथेच पुरले आहेत, त्यांच्याकडूनच पुन्हा उत्खनन करून सविस्तर तपास करू," असे नागराजू यांनी स्पष्ट केलं.
तपास अजून प्राथमिक टप्प्यात असल्याने अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे डीएसपी नागराजू यांनी नमूद केले..
चर्चा खोटी, पण तपास सुरू - वन विभाग
गिद्दलूर वन विभागाच्या उपसंचालिका निशाकुमारी म्हणाल्या, "वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खोदकाम सुरू असताना हंडे सापडले. पण त्यात सोनं, हिरे सापडल्याची चर्चा चुकीची आहे."
"नेमकं काय घडलं याचा तपास सुरू आहे. जर काही चूक झाल्याचे आढळून आलं, तर निश्चितच कारवाई केली जाईल," असंह त्यांनी सांगितलं.
'चौकशीनंतरच सत्य समोर येईल'
या विषयावर पुरातत्त्व विभागाचे संचालक पी. सुरेश यांनी बीबीसीशी संवाद साधला.
ते म्हणाले, "तपासासाठी आमची टीम गुरुवारी (21 मे) त्या ठिकाणी गेली होती. चौकशी पूर्ण झाल्यावरच खरी वस्तुस्थिती समोर येईल. पण व्हीडिओंमध्ये दिसणाऱ्या कबरी आणि हंडे पाहता त्या आदिमानवांच्या काळातील असल्यासारखे वाटतात."
"त्या काळात सोनं आणि हिरे वापरात नव्हते. मी सध्या फक्त व्हीडिओंमध्ये दिसलेल्या गोष्टींवरच बोलत आहे. तपासानंतरच पूर्ण सत्य समोर येईल," असं सुरेश यांनी स्पष्ट केलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















