'डिव्होर्स रिंग' अन् मिडल फिंगर याचा नवा ट्रेंड, घटस्फोटानंतर महिला अशी करत आहेत नवी सुरुवात

"मी आता ही अंगठी मधल्या बोटात घालते"…घटस्फोटानंतर महिलांमध्ये वाढतोय 'डिव्होर्स रिंग'चा क्रेझ
    • Author, लुसी हूकर,
    • Role, बिझनेस रिपोर्टर 
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

डेब मरिना यांच्या बोटात हिऱ्यांनी मढवलेली एक सुंदर सोन्याची अंगठी चमकत आहे.

फ्लोरिडाच्या या ब्लॉगरने आपल्या टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करत म्हटलं, "हो, ही मधल्या बोटात घालायचीच अंगठी आहे, तसं न करायला काय कारण आहे?"

आपल्या एंगेजमेंटची अंगठी काढून टाकण्याचा अर्थ असा झाला असता की त्यांना आपल्या जुन्या नात्याबद्दल काहीतरी पश्चात्ताप आहे. पण 34 वर्षांच्या डेब यांच्या मनात अशी कोणतीही भावना नव्हती.

याच नात्यातून त्यांना त्यांची गोड मुलगी मिळाली होती. शिवाय अंगठी तशीच कपाटात पडून राहणं म्हणजे त्यांना निव्वळ पैशांचा अपव्यय वाटत होता.

"मला ती अंगठी कुठेतरी कपाटात बंद करून ठेवायची नव्हती, शेवटी हिरे मौल्यवान असतात.." असं डेब म्हणतात.

तसंही, लग्न मोडल्यानंतर कधीकधी समोरच्याला मधलं बोट (मिडल फिंगर) दाखवून आपला राग व्यक्त करण्याचा जो आनंद असतो तोही यातून मिळत होता.

जगभरातील ज्वेलर्स कडून सध्या एका नवीन ट्रेंडला प्रोत्साहन दिलं जात आहे. डेब देखील त्याच वाढत्या ट्रेंडचा एक भाग आहेत.

यामध्ये महिला आपल्या आयुष्याची ही नवी सुरुवात एका खास दागिन्यासह करत आहेत. ज्याला 'डिव्होर्स रिंग' (घटस्फोटाची अंगठी) असं म्हटलं जात आहे.

डेब यांनी त्यांच्या साखरपुड्याच्या अंगठीतील हिरा एका खुल्या वर्तुळाकार अंगठीच्या एका टोकाला जडवून घेतला आणि दुसऱ्या टोकाला मुलीच्या नावाचा एक छानसा नीलमणी जोडला.

यासाठी त्यांना 3,000 डॉलर्स (अंदाजे 2,50,000 ते 2,55,000 रुपये) खर्च आला. घटस्फोटाचा खर्च आधीच खूप जास्त असतो. त्यात इतके पैसे खर्च करणे ही खरं तर मोठी गोष्ट आहे.

पण अंगठी परत विकायला गेल्यास मूळ किंमतीच्या फक्त 30 % रक्कमच हाती येते. त्यामुळे अनेकांना जुनीच ज्वेलरी मोडून तिला नवं रूप देण्याचा हा ट्रेंड पैशांचा अधिक योग्य वापर केल्यासारखा वाटतो.

डेब यांनी मधल्या बोटात घातलेली ही अंगठी फॅशन जगतातील 'हॉट डिव्होर्सी समर'शी अगदी मिळतीजुळती आहे.

हा ट्रेंड म्हणजे बंधनमुक्त राहण्याचा, स्टाईलमध्ये जगण्याचा आणि 'मला कोणाची पर्वा नाही' हा तोरा मिरवण्याचा एक सोहळाच आहे.

"मी आता ही अंगठी मधल्या बोटात घालते"…घटस्फोटानंतर महिलांमध्ये वाढतोय 'डिव्होर्स रिंग'चा क्रेझ
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

युकेमध्ये घटस्फोटाच्या कायदेशीर प्रक्रियेत मदत करणाऱ्या 'अॅमिकेबल' कंपनीच्या सह-संस्थापक केट डॅली यांच्या मते, ही घटस्फोटाची अंगठी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याची आणि स्वावलंबनाची नवी ओळख करून देण्याचा एक मार्ग असू शकते.

त्या म्हणतात, "घटस्फोटामुळे तुमचं संपूर्ण आयुष्य विस्कळीत होतं. तुमच्या आर्थिक स्थितीवर प्रचंड ताण येतो."

केट डॅली यांच्या मते, जर अशा कठीण परिस्थितीत एखादी महिला नवीन अंगठी खरेदी करण्याचा निर्णय घेत असेल, तर ते याचं प्रतीक आहे की ती तिचे आर्थिक निर्णय स्वतः घेत आहे आणि "आता तिला कोणाच्याही परवानगीची गरज नाही."

ते पुढे म्हणतात, "या गोष्टीला केवळ एक फॅशन म्हणून किरकोळ लेखणं खूप सोपं आहे. पण कदाचित खूप वर्षांनंतर तिने स्वतःच्या हिंमतीवर घेतलेला हा पैशांचा पहिला मोठा निर्णय असतो. कित्येक वर्षांनंतर कोणत्याही मदतीशिवाय एकटीने घेतलेला हा नक्कीच सर्वात मोठा निर्णय असू शकतो."

सेरी इव्हान्स यांच्या घटस्फोटाची अंगठी ही जुन्या अंगठीचे केवळ नवीन डिझाईन नव्हती तर ती एका नवीन आयुष्याची सुरुवात होती. त्यांच्या उजव्या हाताच्या अनामिकेत तीन मोठ्या हिऱ्यांनी मढवलेली 'आर्ट डेको' (Art Deco) शैलीतील प्लॅटिनमची अंगठी आहे.

ती हसत हसत सांगते, 'मी याला माझी युएसए (USA) रिंग म्हणते, कारण ही अंगठी म्हणजे मी माझ्या स्वातंत्र्याची केलेली मोठी घोषणा आहे."

"मी आता ही अंगठी मधल्या बोटात घालते"…घटस्फोटानंतर महिलांमध्ये वाढतोय 'डिव्होर्स रिंग'चा क्रेझ

गेल्या वर्षी पतीपासून अखेर वेगळे झाल्यानंतर सेरी यांनी £3,000 पाउंडची (3,30,000 ते 3,35,000 रुपये) ही अंगठी खरेदी केली होती.

वेल्समधील 58 वर्षीय सेरी म्हणतात की, त्यांनी ही अंगठी घटस्फोटाच्या सेटलमेंटमधून मिळालेल्या पैशांनी नव्हे तर 'एक आव्हान म्हणून' स्वतःच्या कष्टाच्या पैशांनी विकत घेतली होती.

पेनसिल्व्हेनियाच्या अॅलेक्स प्रोई यांनी लग्नाच्या 5 व्या वाढदिवसाला घेतलेली अंगठी मोडून सोन्या-हिऱ्यांची एक नवीन अंगठी बनवली. दोन आठवड्यांपूर्वीच ही अंगठी त्यांच्या हातात आली आहे. पण अजूनही ती पाहताना त्यांच्या मनात अनेक वेगवेगळ्या भावना दाटून येत आहेत.

वयाच्या 31 व्या वर्षी त्या स्वतः समलैंगिक असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर 7 वर्षांचं हे लग्न मोडून त्या आपल्या पतीपासून वेगळ्या झाल्या.

अॅलेक्स सांगतात, "माझे एक्स-हजबंड माझ्या तरुणपणाच्या त्या सुरुवातीच्या दिवसांमधील माझ्या व्यक्तीमत्त्व घडण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या काळात मोठा हिस्सा होते."

"ही अशी आठवण आहे जी मला आयुष्यभर माझ्यासोबत ठेवायची आहे," त्या म्हणतात.

"मी आता ही अंगठी मधल्या बोटात घालते"…घटस्फोटानंतर महिलांमध्ये वाढतोय 'डिव्होर्स रिंग'चा क्रेझ

यांच्या या अंगठीत सात छोटे हिरे आहेत आणि तिची डिझाईन लहरींसारखी आहे. अॅलेक्स यांच्या मते, ही डिझाईन आयुष्यात येणारे चढ-उतार दाखवते.

घटस्फोटानंतर खर्च भागवण्यासाठी आणि जास्त पैसे कमवण्यासाठी त्यांना पुन्हा सेल्सची नोकरी सुरू करावी लागली होती. ही नवी अंगठी त्यांना सतत याची जाणीव करून देते की त्यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून स्वतःला कसं परत सावरलं आणि नवी सुरुवात केली.

त्या म्हणतात, "घटस्फोट ही अतिशय कठीण गोष्ट आहे आणि जेव्हा तुम्ही नव्याने सुरुवात करता तेव्हा तुमचं पुढे आयुष्य कसं वळण घेईल हे तुम्हाला ठाऊक नसतं. शिवाय स्वतःसाठी अशा गोष्टी करण्याइतपत तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल की नाही, हेही माहिती नसतं."

रेडिट (Reddit) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोक त्यांच्या लग्नाच्या आणि साखरपुड्याच्या अंगठ्यांचं त्यांनी काय केलं, यावर चर्चा करत आहेत. त्यातील काहींचं म्हणणं आहे की ते आजही आपली अंगठी घालतात, कधीकधी अनोळखी किंवा नको असलेल्या लोकांचे लक्ष टाळण्यासाठी तर कधी ती फक्त कपाटात कुठेतरी नजरेआड ठेवून देतात.

तर काहींनी असंही शेअर केलं की त्यांनी आपली अंगठी थेट कचऱ्याच्या डब्यात, समुद्रात किंवा चालत्या गाडीच्या खिडकीतून बाहेर फेकून दिली.

पण अनेकांचं असं म्हणणं आहे की त्यांना त्यांच्या नवीन आयुष्याची सुरुवात काहीतरी वेगळा खर्च करून साजरी करायची असते. यामध्ये ट्रिपला जाणं, टॅटू काढणं, 'जिमी चू' (Jimmy Choo) ब्रँडचे नवीन बूट खरेदी करणं, घराची बाग छान करून घेणं.

नुकताच घटस्फोट झालेल्या एका महिलेने तर शेअर केलं की तिने तिच्या बेडरूमचा सगळा लूकच बदलून टाकला.

तिने सोशल मीडियावर लिहिलं, 'ज्या अंगठीचे पैसे मिळाले. त्यातूनच मी हा बेड घेतला आणि आता या बेडवर मी माझ्या नवीन पार्टनर्ससोबत अप्रतिम क्षणांचा आनंद घेतेय."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.