तुर्कीच्या 'सोनगार ड्रोन'चं वैशिष्ट्य काय आहे, जे पाकिस्ताननं वापरल्याचा भारतानं आरोप केलाय?

8 मे रोजी पाकिस्तानने मोठ्या संख्येने ड्रोनने हल्ले केले असा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. हे तुर्कीकडून तयार केले जाणारे सोनगार ड्रोन्स होते.
फोटो कॅप्शन, 8 मे रोजी पाकिस्तानने मोठ्या संख्येने ड्रोनने हल्ले केले असा दावा भारतीय अधिकाऱ्यांनी केला आहे. हे तुर्कीकडून तयार केले जाणारे सोनगार ड्रोन्स होते.
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पाकिस्तानने गुरूवारी (8 मे) रात्री सीमेजवळच्या वेगवेगळ्या भागांवर ड्रोन हल्ले केल्याचा आरोप भारताने केला आहे.

शुक्रवारी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत बोलताना कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "पाकिस्तानी लष्कराने गुरूवारी(8 मे)रात्री भारतीय लष्करी तळांना लक्ष्य केलं. पाकिस्तानकडून 300 ते 400 ड्रोन सोडले गेले."

पाकिस्तानी संरक्षण मंत्रालयाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

कर्नल सोफिया पुढे म्हणाल्या, "लेहपासून ते सर क्रीकपर्यंत 36 जागांवर 300-400 ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरीचे प्रयत्न करण्यात आले. भारतीय संरक्षण दलाने कायनेटिक आणि नॉन कायनेटिक साधनांचा वापर करत यापैकी अनेक ड्रोन्स खाली पाडले."

एवढ्या मोठ्या प्रमाणात हवाईमार्गे घुसखोरी करण्यामागचा उद्देश भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची परिक्षा घेणं आणि गुप्त माहिती जमा करणं हा असावा, असंही कुरेशी म्हणाल्या.

"ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. प्राथमिक तपासणीतून हे तुर्कीमधले आसिसगॉर्ड सोनगार ड्रोन असल्याचं समोर आलं आहे," त्या म्हणाल्या.

काय आहेत सोनगार ड्रोन?

सोनगर ड्रोन हे शस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेले मानवविरहित हवाई वाहन (यूएव्ही) आहेत. ते तुर्कीमधल्या आसिसगॉर्ड या संरक्षण कंपनीने डिझाइन आणि विकसित केलेत.

या कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, सोनगारजवळ टार्गेट ओळखण्याची आणि ते नष्ट करण्याची विशेष क्षमता आहे. ही तुर्कीमधली पहिली राष्ट्रीय शस्त्रसज्ज ड्रोन प्रणाली आहे.

2020 मध्ये तुर्कीने पहिल्यांदा याचा सशस्त्र सैन्यात समावेश केला होता.

कार्ड

वेबसाइटचा दावा आहे की, सोनगारचा वापर सीमारेषेवरील आणि सीमापार लष्करी मोहिमांमध्ये केला जाऊ शकतो. हे ड्रोन जमिनीवरील सैनिकी वाहनांबरोबर समन्वय साधून काम करतात.

हे लपून बसलेल्या हल्लेखोरांवर किंवा इतर धोक्यांवर हवेतून गोळ्यांचा मारा करू शकतात.

गरज पडल्यास हे आक्रमक कारवायांसाठीही वापरता येतात.

यावर कॅमेरे बसवण्यात आलेत. त्यातून त्यावर लक्ष ठेवता येतं आणि फोटो घेता येतात. याशिवाय, गरज पडली तर लगेचच हल्ला करता येतो.

याची रेंज 5 ते 10 किलोमीटरपर्यंत आहे. हे ड्रोन स्वतःहून उड्डाण घेऊ शकतात आणि जमिनीवर उतरूही शकतात.

सोनगार ड्रोन कसं काम करतं?

सोनगार स्वयंचलित मशीनगनने सुसज्ज आहे, असा कंपनीचा दावा आहे. हे दिवसा किंवा रात्रीच्या लष्करी मोहिमांमध्येही उत्तमरीत्या वापरता येऊ शकतात.

सोनगार ड्रोन्सवर असॉल्ट रायफल ही गन बसवता येऊ शकते. शिवाय ग्रेनेड, ड्रम ग्रेनेड, अश्रू गोळे फेकता येतं आणि मोर्टार ग्रिपरही बसवता येऊ शकते. तीन किलोमीटर दूर असतानाच ते निशाणा साधतात.

त्याच्या ऑटोमॅटिक मशीन गनमधे 200 राऊंड्स गोळ्या चालवण्याची क्षमता आहे.

यात रियल टाइममध्ये व्हीडिओ पाठवण्याचीही सुविधा आहे आणि त्यावर जमिनीवरून नियंत्रणही ठेवता येऊ शकतं. शिवाय, जीपीएसच्या माध्यमातून हे ड्रोन हव्या त्या ठिकाणी स्वयंचलितरित्या किंवा रिमोटच्या माध्यमातून नियंत्रित करूनही पाठवता येऊ शकतात.

ग्रेनेड ग्रिपर असलेला सोनगार ड्रोन
फोटो कॅप्शन, ग्रेनेड ग्रिपर असलेला सोनगार ड्रोन

हा लष्करी उपयोगासाठी बनवलेला ड्रोन असल्याने कंपनी ते अतिशय अचूक असल्याचाही दावा करते.

याची आणखी एक खासियत म्हणजे फिरण्यात अडथळा आला किंवा त्याची बॅटरी खराब झाली तर ड्रोन स्वतः परत येतात.

हे ड्रोन जमिनीवर वाहनांनाही लावता येतात आणि त्याला कोणत्याही माणसाशिवाय एकटंच मोहिमेवरही पाठवता येऊ शकतात असंही कंपनीने म्हटलंय.

2020 मध्ये हे ड्रोन 4x4 कवचयुक्त लष्करी वाहनावर लावले गेले होते. जवळ आलेल्या शत्रूला हाणून पाडण्यासाठी आणि आसपास नजर ठेवण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता.

2024 मध्ये रेपकॉन डिफेन्स सिस्टिम्स कंपनीने आसिसगॉर्डसोबत मिळून 40 मिमी मल्टीपल ग्रेनेड लाँचर सोनगार ड्रोनवर बसवला. त्यामुळे त्याची मारक क्षमता आणखीनच वाढली आहे.

पाकिस्तानला तुर्कीची साथ?

पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर सुरू झालेल्या दक्षिण आशियातल्या दोन अण्वस्त्रसंपन्न देशांच्या संघर्षात तुर्कीनं उघडपणे पाकिस्तानची बाजू घेतली आहे.

7 मे रोजी भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेचप तैय्यप अर्देआन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी चर्चा केली होती.

तुर्की राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने सांगितल्याप्रमाणे, "अर्दोआन यांनी सांगितलं की, तणाव वाढू नये यासाठी तुर्की जे शक्य असेल ते करेल आणि या संदर्भात त्यांचे राजनैतिक संबंध सुरू राहतील."

पहलगामवर झालेल्या हल्ल्याची स्वतंत्र्य आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यात यावी या पाकिस्तानच्या मागणीचंही तुर्की राष्ट्राध्यक्षांनी समर्थन केलं.

"भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे मोठ्या संघर्षाकडे जाऊ शकतो अशी काळजी आम्हाला वाटते. अनेक नागरिकांचे मृत्यू होत आहेत," अर्दोआन सोशल मीडियावर म्हणाले होते.

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गेल्या महिन्यात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्देआन यांची भेट घेतली होती.
फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गेल्या महिन्यात तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष अर्देआन यांची भेट घेतली होती.

"हल्ल्यात जीव गमावलेल्या आमच्या बांधवांसाठी मी अल्लाहकडे दयेची याचना करतो. आणि पुन्हा एकदा पाकिस्तानमधील बंधुभाव जपणाऱ्या लोकांप्रती आणि तेथील सरकारप्रती माझी सहवेदना व्यक्त करतो," असंही ते म्हणालेत.

22 एप्रिलला जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यात 26 लोकांंचा मृत्यू झाल्यानंतर भारताने 7 मे ला पाकिस्तानात 9 ठिकाणी हवाई हल्ले केले.

हे हल्ले लष्करी तळांवर किंवा नागरी वसाहतीत नाही तर दहशतवादी ठिकाणांवर केले गेले, असं भारत सरकारचं म्हणणं आहे.

गुरूवारी म्हणजे 8 मेला जम्मूसह पश्चिमेकडच्या अनेक सीमा क्षेत्रात पाकिस्तानने ड्रोन्स आणि क्षेपणास्त्राने हल्ले केले असं भारत सरकारने म्हटलं.

पाकिस्तानने भारताच्या या आरोपांचं खंडन केलं आहे.

दरम्यान, अमेरिकेसह संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)