दररोज इन्सुलीन इंजेक्शन घेणाऱ्यांना 'अविकली'चा दिलासा? डायबेटीसच्या रुग्णांसाठी महत्त्वाची माहिती

फोटो स्रोत, Getty Images
- Author, डिंकल पोपली
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
डॅनिश औषध कंपनी नोव्हा नॉर्डिस्कने 9 जुलै 2026 रोजी भारतात 'अविकली' नावाचे इन्सुलीन इंजेक्शन लाँच केले आहे.
हे जगातील पहिले असे बेसल इन्सुलीन इंजेक्शन आहे, ज्याला आठवड्यातून एकदा वापरण्यासाठी मंजुरी मिळाली आहे.
टाइप-1 मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरात नैसर्गिकरित्या इन्सुलीन तयार होत नाही. त्यामुळे त्यांना रोज इन्सुलीनची इंजेक्शनं घ्यावी लागतात.
त्याचबरोबर, टाइप 2 मधुमेह किंवा गर्भावस्थेतील मधुमेहात गोळ्या आणि जीवनशैलीतील बदलांचा अपेक्षित परिणाम होत नसेल, तर इन्शुलीनची गरज भासू शकते. परंतु, प्रत्येक रुग्णासाठी इन्सुलीनची मात्रा वेगवेगळी असते.
इन्सुलीन शरीरात कसं काम करते आणि हे नवीन साप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून एकदा घेण्याचे इंजेक्शन मधुमेहाच्या उपचारात कशी मदत करू शकतं, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी न्यूज पंजाबीने तज्ज्ञांशी संवाद साधला.
यासाठी लुधियानातील दयानंद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे एंडोक्राइनॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. नवीन मित्तल आणि मुंबईतील सैफी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट एंडोक्राइनॉलॉजिस्ट डॉ. शेहला शेख यांच्याशी संवाद साधला.
'अविकली' म्हणजे काय आणि त्याची किंमत किती?
अविकली (याचे जेनेरिक नाव इन्शुलीन आयकोडेक आहे) हे टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांसाठी दीर्घकाळ परिणाम करणारे बेसल इन्सुलीन आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, या इंजेक्शनमुळे व्यक्तीला वर्षभरात 365 ऐवजी केवळ 52 इंजेक्शन्स घ्यावी लागतील.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, नोव्हो नॉर्डिस्क इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत श्रोत्रिय यांनी सांगितलं की, अविकलीच्या 70 युनिटच्या डोसची किंमत 261 रुपये आहे.
हे इंजेक्शन दोन प्रकारच्या पेनमध्ये उपलब्ध आहे. 1 मिलीच्या पेनमध्ये 700 युनिट असून त्याची किंमत 2611 रुपये आहे, तर 3 मिली पेनमध्ये 2100 युनिट असून त्याची किंमत 7833 रुपये आहे.
या तुलनेत, भारतात सध्या उपलब्ध असलेल्या दैनंदिन बेसल इन्सुलीनच्या 70 युनिट्सची किंमत 345 ते 453 रुपयांच्या दरम्यान आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि युरोपियन युनियननंतर अविकली लाँच करणारा भारत हा जगातील सातवा देश ठरला आहे.
नोव्हो नॉर्डिस्कच्या अंदाजानुसार, भारतात 10.1 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत, तर 13.6 कोटी लोक प्री-डायबेटीजच्या (मधुमेहपूर्व) अवस्थेत आहेत.
सुईची भीती आणि आर्थिक अडचणींमुळे भारतात अनेक लोक इन्सुलीन उपचार सुरू करण्यास 7 ते 9 वर्षांचा उशीर करतात.
सध्या भारतात सुमारे 60 लाख लोक इन्शुलीन घेत आहेत.
आठवड्यातून एकदा घेण्यात येणारे इन्सुलीन कसं काम करतं?
डॉ. मित्तल सांगतात की, ग्लार्जिन किंवा डिग्लुडेकसारखी दैनंदिन इन्सुलीन 18 ते 24 तास काम करतात. परंतु, इन्सुलीन आयकोडेकची रचना वेगळी असल्याने ते शरीरात हळूहळू आणि दीर्घकाळ कार्यरत राहते.

फोटो स्रोत, Getty Images
नैसर्गिक इन्सुलीनचा परिणाम साधारण 4 ते 6 तास टिकून राहतो. परंतु, वैज्ञानिकांनी जनुकीय तंत्रज्ञानाच्या मदतीने इन्शुलीनच्या रेणूत बदल केले आहेत. त्यामुळे इंजेक्शन घेतल्यानंतर इन्सुलीन आयकोडेक रक्तातील अल्ब्युमिनशी जोडले जाते. त्यानंतर ते 7 दिवस हळूहळू शरीरात सोडले जाते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

डॉ. शेख यांच्या मते, "हे इन्सुलीन आठवड्यातून एकदा घेतलं जातं. आठवड्याचा डोस ठरवताना रोजच्या इन्सुलीनच्या डोसला 7 ने गुणले जाते. ज्या रुग्णांवर गोळ्यांचा पुरेसा परिणाम होत नाही किंवा जे रोज इंजेक्शन घेऊन त्रस्त आहेत, त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो."
हे कोणत्या रुग्णांसाठी योग्य आहे?
भारतात 'अविकली' हे इंजेक्शन केवळ 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या प्रौढांसाठीच मंजूर करण्यात आलंय.
डॉ. मित्तल यांच्या मते, "ज्या टाइप-2 मधुमेहाच्या प्रौढ रुग्णांची साखर गोळ्यांनी नियंत्रणात येत नाही आणि ज्यांना रोज इंजेक्शन घेण्याची इच्छा नसते, त्यांच्यासाठी हे इन्शुलीन उपयुक्त ठरू शकते. तसेच, रोजच्या इंजेक्शनपासून सुटका हवी असलेल्या रुग्णांसाठीही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो."

फोटो स्रोत, Getty Images
'अविकली'संबंधित महत्त्वाच्या गोष्टी :
बेसल कव्हरेज : 'अविकली' हे केवळ बेसल इन्शुलीन म्हणून काम करतं आणि 24 तास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
जेवणाच्या वेळी लागणारे इन्सुलीन: जेवणानंतर वाढणारी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ज्या रुग्णांना शॉर्ट-ॲक्टिंग (बोलस) इन्शुलीनची आवश्यकता असते, त्यांना 'अविकली'सोबत ते इंजेक्शन वेगळे घ्यावे लागेल.
मुख्य फायदे :
कमी इंजेक्शन्स: वर्षाला 365 ऐवजी केवळ 52 इंजेक्शन्स घ्यावी लागतील.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
नियमितता : आठवड्यातून एकदाच इंजेक्शन घ्यायचं असल्याने डोस विसरण्याची शक्यता कमी होते.
जीवनशैलीत सुधारणा : व्यस्त असलेल्या किंवा सतत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हे अधिक सोयीस्कर ठरू शकतं.
साखरेवर उत्तम नियंत्रण : आकडेवारीनुसार, हे इन्शुलीन रक्तातील साखर अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवण्यास मदत करते आणि साखर खूप कमी होण्याचा (हायपोग्लायसेमिया) धोकाही कमी करू शकते.
उपयुक्त : एकटं राहणाऱ्या किंवा इंजेक्शनची भीती असलेल्या लोकांसाठी हे सोयीस्कर ठरू शकतं. कुटुंबातील एखादी व्यक्ती आठवड्यातून एकदा हे इंजेक्शन देऊ शकते.

संभाव्य धोके आणि नुकसान
डॉ. मित्तल सांगतात की, आठवड्यातून एकदा इंजेक्शन घेणं सोयीचं असलं तरी त्याचा वापर करताना काही खबरदारी घेणं आवश्यक आहे:
दीर्घकाळ हायपोग्लायसेमियाचा धोका: रक्तातील साखर खूप कमी होणे हा इन्शुलीनचा एक मुख्य धोका आहे. रोजच्या इन्सुलीनमध्ये ही समस्या साधारण 24 तासांत नियंत्रणात येऊ शकते. परंतु, आठवड्यातून एकदा घेण्यात येणारे इन्शुलीन शरीरात 7 दिवसांपर्यंत राहू शकते. त्यामुळे रुग्णावर सतत लक्ष ठेवणं गरजेचं असतं.
डोसबाबत टीप : हे इन्शुलीन खूप सांद्र (घट्ट) म्हणजेच 1 मिलीमध्ये 700 युनिट्स इतके असते. त्याच्या खास पेनमध्ये एका क्लिकचा अर्थ 10 युनिट्स असा होतो. त्यामुळे चुकून जास्त क्लिक झाल्यास इन्सुलीनचा डोस जास्त होण्याचाही मोठा धोका असतो.

फोटो स्रोत, Getty Images
डोस चुकणे किंवा दुप्पट घेणे: डोस घ्यायचा विसरल्यास किंवा चुकून तो दोनदा घेतल्यास संपूर्ण आठवड्यासाठी रक्तातील साखरेचं नियंत्रण बिघडू शकते.
यामुळे रक्तातील साखर खूप कमी होणे किंवा वजन वाढणे यांसारखे सामान्य धोके उद्भवू शकतात. परंतु, आयकोडेकमुळे वजन तुलनेने कमी वाढल्याचे दिसून आले आहे.
रक्तातील साखर खूप कमी झाल्यास त्वरीत काहीतरी गोड खावं आणि 15 मिनिटांनंतर पुन्हा रक्तातील साखर तपासावी. यालाच '15 मिनिटांचा नियम' म्हटलं जातं.
कोणत्या लोकांनी साप्ताहिक इन्सुलीन टाळावे?
तज्ज्ञांच्या मते, या व्यक्तींनी इन्सुलीन आयकोडेकचा वापर करू नये:
मुले: 18 वर्षांखालील रुग्णांसाठी परवानगी नाही.
अस्थिर मधुमेह असलेले रुग्ण: ज्या रुग्णांच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार आणि खूप वेगाने कमी-जास्त होते.

फोटो स्रोत, Getty Images
लक्षणं जाणवत नसलेले रुग्ण: ज्यांची रक्तातील साखर कमी झाल्यानंतरही त्यांना त्याची कोणतीही शारीरिक लक्षणे जाणवत नाहीत, असे रुग्ण.
दृष्टीची गंभीर समस्या असलेले: जे इतरांच्या मदतीशिवाय पेनवरील क्लिक नीट पाहू शकत नाहीत, असे रुग्ण.
अचानक आजारपण किंवा जीवनशैलीत बदल: वारंवार रक्तातील साखर कमी होत असेल, खूप कष्टाचा व्यायाम करत असाल किंवा आजारी असाल, तर हे इन्शुलीन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. तसेच, या औषधाची ॲलर्जी असलेल्या लोकांनी हे औषध घेणं टाळावे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























