कमळाच्या देठानं श्वास घेऊन 5 तास तलावात लपला, तरीही पोलिसांनी मोस्ट वाँटेड चोर कसा पकडला?

चोरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र
    • Author, विष्णुकांत तिवारी
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी, भोपाळ
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

तलावात तब्बल पाच तास पाण्याखाली लपून बसलेला एक चोर अखेर पोलिसांच्या हाती लागला.

कमळाच्या देठानं श्वास घेत तो पोलिसांचा पाठलाग टाळत होता.

मात्र अनुभव, संयम आणि सतर्कतेस पुढे त्याची चलाखी चालली नाही.

400 हून अधिक चोऱ्या करणारा रेल्वेचा मोस्ट वॉन्टेड आरोपी कसा पकडला गेला?

मंगळवारी (7 एप्रिल) संध्याकाळी साधारण 5 वाजता खितौला रेल्वे स्टेशनमधून एक माणूस पळत बाहेर पडत होता. आरपीएफ म्हणजे रेल्वे पोलीस त्याचा पाठलाग करत होते. थोड्याच वेळात त्या माणसानं जवळच्याच एका तलावात उडी मारली.

पोलीस त्या तलावाजवळ आल्यावर त्यांना तिथेच काही आढळलं नाही. पोलीस तलावाच्या अवतीभोवती त्या माणसाचा शोध घेत होते. त्याचवेळेस तो माणूस तलावातील पाण्याखाली लपला होता.

तो तलावामधील कमळाच्या देठाच्या मदतीनं श्वास घेत होता. जवळपास तासाभरानं आरपीएफच्या टीमनं खितौला पोलिसांकडे मदत मागितली. आरपीएफनं पोलिसांना माहिती दिली की एक चोर ट्रेनमध्ये महिलेची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न करत होता. त्याचा पाठलाग केला असता त्यानं तलावात उडी मारली आहे.

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन टाउन इन्स्पेक्टर रमण सिंह मरकाम त्यांची टीम आणि पाणबुड्यांसह (डायव्हर्स) घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर 5 तास चोराचा शोध घेण्यात आला. त्यानंतर तलावाच्या पाण्याखाली लपून बसलेला हा चोर त्यांच्या हाती आला.

पोलिसांनी चौकशी केल्यावर या चोरानं सांगितलं की कमळाच्या देठाच्या मदतीनं तो पाण्याखाली श्वास घेत होता. त्यानंतर खितौला पोलिसांनी चोराला आरपीएफच्या ताब्यात दिलं.

या चोराचं नाव हरविंदर असं आहे. तलावातून बाहेर काढल्यानंतर खितौला पोलिसांनी त्याला आरपीएफच्या ताब्यात दिलं.

नेमकी काय घटना घडली होती?

मंगळवारी रीवा-इतवारी स्टेशन (नेताजी सुभाष चंद्र बोस इतवारी जंक्शन, नागपूर) ट्रेनमधून एक महिला एसी डब्यामधून प्रवास करत होती. ट्रेन सिहोरा रेल्वे स्टेशनजवळ येताच, एका माणसानं अचानक या महिलेची पर्स हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्याला यात यश आलं नाही. मात्र आरपीएफचं लक्ष त्याच्याकडे गेलं.

पोलिसांच्या ताब्यात सापडू नये म्हणून तो माणूस स्टेशनबाहेर पळाला. कॉन्स्टेबल आशीष यादव आणि विनय मौर्य यांनी त्याचा पाठलाग केला. त्यावेळेस तो माणूस स्टेशनपासून जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतरावरील एका तलावाच्या पाण्यात जाऊन लपला.

त्या तलावात सर्वत्र शेवाळ, जलपर्णी होत्या. तिथे काहीही दिसत नव्हतं. आरपीएफच्या या दोन्ही कॉन्स्टेबलनं तलावात त्याचा बराच वेळ शोध घेतला. मात्र तो सापडला नाही.

त्यानंतर आरपीएफचे स्टेशन इन्चार्ज राजीव खरब यांना याची माहिती देण्यात आली. खितौला पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या मदतीनं चोराला पकडण्यात आरपीएफला यश आलं. त्यानंतर चोराला जबलपूरला नेण्यात आलं.

हा चलाख चोर कोण आहे?

या चोराला सिहोराहून जबलपूरला आणण्यात आल्यानंतर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज राजीव खरब यांनी त्याची चौकशी केली. त्यावेळेस हा चोर वारंवार त्याचं नाव आणि पत्ता बदलत होता. यादरम्यान पोलीस स्टेशन इन्चार्जना या चोराचा चेहरा ओळखीचा वाटला.

त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये ठेवलेला, एक इंग्रजी वृत्तपत्रात आलेला फोटो पाहिला. त्या फोटोतील व्यक्ती आणि हा चोर एकच होते. ते लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.

तो तरुण कुख्यात चोर हरविंदर सिंह (32 वर्षे) असल्याची ओळख पटली. तो उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यातील हल्दौर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या निवासी मोहल्ला खेडाचा रहिवासी होती.

चोरी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक छायाचित्र

जीआरपी भोपाळ, जीआरपी इटारसी, जीआरपी उज्जैन, जीआरपी इगतपुरी, पोलीस स्टेशन राजगड, पोलीस स्टेशन वालचंद नगर (पुणे), पोलीस स्टेशन एमआयडीसी (मुंबई), जीआरपी/पीएस विशाखापट्टणम आणि जीआरपी गुडीवाडा पोलीस अनेक महिन्यांपासून या चोराच्या शोधात होते.

पोलीस स्टेशन इंचार्जनं फोटो पाहून चोराची ओळख पटवली.

रेल्वेचा मोस्ट वॉन्टेड चोर कशी करायचा चोरी

हरविंदर सिंहनं (32 वर्षे) आतापर्यंत तब्बल 400 हून अधिक चोऱ्या केल्या आहेत. या चोरीची एकूण रक्कम कोट्यवधींची आहे. तो इतका धूर्त, चलाख आहे की त्यानं अनेकदा प्रवाशांव्यतिरिक्त आरपीएफ आणि जीआरपी यांना देखील फसवलं आहे.

हरविंदर चोरी करताना नेहमीच एसी कोचमध्ये करायचा. आधी तो इतर प्रवाशांप्रमाणेच तिकिट घेऊन प्रवास करायचा. मात्र ट्रेनमध्ये कॅमेरे बसवण्यात आल्यानंतर आणि नंतर ऑनलाइन स्वरुपात तिकीट विक्री होऊ लागल्यानंतर त्यानं तिकीट काढणं बंद केलं. ट्रेनमध्ये चढताच त्याचं लक्ष टीसीवर असायचं.

सांकेतिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सांकेतिक फोटो

तो ज्या डब्यात असायचा, तिथे टीसी येताच तो बाथरूममध्ये जाऊन लपायचा. टीसी जाताच तो त्या डब्यात एकट्यानं प्रवास करत असलेल्या महिलांना लक्ष्य करायचा.

हरविंदरनं 2010-11 मध्ये उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये पहिल्यांदा चोरी केल्याचं सांगितलं जातं. तेव्हापासून आतापर्यंत त्यानं जवळपास 400 हून अधिक चोऱ्या केल्या आहेत.

विजयवाडा पोलिसांनी 2018 मध्ये त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती.

सन्नी हे नाव पोलिसांच्या तोंडून ऐकताच चोराला बसला धक्का

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

आरपीएफची टीम हरविंदरला सिहोराहून जबलपूरला घेऊन आली. तिथे चौकशीदरम्यान त्यानं अनेकदा त्याचं नाव बदललं. तो कधी त्याचं नाव बबलू सांगायचा. तर कधी सांगायचा तो चंदीगडचा रहिवासी आहे.

आरपीएफचे स्टेशन इन्चार्ज राजीव खरब यांनी सांगितलं की ते 2018 मध्ये कोटाच्या रेल्वे इंटेलिजन्समध्ये म्हणजे रेल्वेच्या गुप्तचर विभागात होते. त्यावेळेस या चोराशी मिळता जुळता फोटो एका इंग्रजी वृत्तपत्रात छापून आल्याचं त्यांनी पाहिलं होतं.

तो फोटो आजही त्यांच्या मोबाईलमध्ये आहे. त्या वृत्तपत्रात या चोराचं नाव हरविंदर सिंह उर्फ सन्नी असं लिहिलेलं होतं. आता चौकशी करत असताना राजीव खरब यांनी तो फोटो पुन्हा पाहिला आणि ते म्हणाले, 'सन्नी आता तू अडकला आहेस. ते ऐकताच त्याला धक्का बसला'

आरपीएफनं चोराची कसून चौकशी केल्यावर त्यानं सांगितलं की विजयवाडा पोलिसांनी 2018 मध्ये त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक केली होती. त्यावेळेस त्याच्याकडून 70,38,500 रुपयांचे हिरे आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले होते. नंतर जामिनावर त्याची सुटका झाली होती.

हरविंदरच्या अटकेनंतर इतर राज्यांमधील पोलीसदेखील चौकशीसाठी येत आहेत.

अपक्ष नगरसेवकही होता हा चलाख चोर

जुलै 2018 मध्ये मुंबई सेंट्रल-इंदूर अवंतिका एक्सप्रेसमधील एक प्रवासी हरविंदरच्या चोरीचा बळी ठरला होता. या प्रवाशाकडून हरविंदरनं 32 बोअरचं परवाना असलेलं एक पिस्तूल, 10 जिवंत काडतूसं, एक भरलेली मॅगेझीन आणि 1.90 लाख रुपयांची रोकड चोरली होती. पीडितानं मुंबई सेंट्रल स्टेशनवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून हरविंदर सिंहची ओळख पटवली होती.

हल्दौर नगरपालिकेचे कार्यकारी अधिकारी अभिषेक कुमार म्हणाले की हरविंदर सिंह हा डिसेंबर 2017 मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवून नगरसेवक म्हणून निवडून आला होता. मात्र त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल घरातील कोणालाही काहीही माहिती नव्हती.

आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 379/411 अंतर्गत मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील वेगवेगळ्या रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये अनेक प्रकरण नोंदवण्यात आलेली आहेत.

प्रत्येक चोरीच्या वेळेस नवीन सिमकार्डचा वापर

हरविंदर सिंह उर्फ सन्नी इतका धूर्त आणि चलाख आहे की तो प्रत्येक वेळेस चोरी करताना मोबाईलच्या नवीन सिमचा वापर करायचा. त्याला माहित होतं की मोबाइलद्वारे लोकेशन ट्रॅक होऊन त्याला अटक होऊ शकते. त्याची खरी ओळख पटू नये म्हणून तो कोणतंही ओळखपत्र सोबत ठेवत नसे.

आरपीएफनुसार, त्याची ओळख पटू नये, कोणताही माग राहू नये म्हणून तो दर 6 महिन्यांनी त्याचा रूट किंवा प्रवासाचा मार्ग बदलायचा. चोरी करण्यासाठी तो कधी दिल्लीहून भोपाळला जायचा. तर कधी कोलकात्याहून बिहारला प्रवास करायचा. तर कधी आणखी वेगळ्याच मार्गानं प्रवास करायचा.

हरविंदर सिंह याला अटक झाल्यानंतर आता इतर राज्यांमधील पोलिसांनीदेखील त्याची चौकशी करण्यासाठी जबलपूरच्या आरपीएफकडे संपर्क करण्यास सुरुवात केली आहे.

आरपीएफचे आयजी राजीव कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला अशी माहिती दिली आहे की, "आता आम्हाला विविध राज्यांमधून त्याच्याबद्दल विचारणा करणारे फोन कॉल्स येत आहेत. चेन्नईतील अधिकाऱ्यांनीदेखील त्याचं व्हीडिओ फुटेज पाठवलं आहे. तपासाचा भाग म्हणून आम्ही त्याची पडताळणी करत आहोत."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.