प्राणी नेमकं काय आणि कसं बोलतात? प्राण्यांची भाषा समजण्याच्या दिशेने तंत्रज्ञान किती पुढं गेलं आहे?

फोटो स्रोत, Vicki Jauron, Babylon and Beyond Photography via Getty Images
प्राण्यांशी कसं बोलावं, कशाप्रकारे संवाद साधावा यावरची एक स्पर्धा 2025 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
'कॉलर डूलिटल चॅलेंज' असं या स्पर्धेचं नाव होतं. प्राण्यांशी संवाद साधण्यासंदर्भातील वैज्ञानिक संशोधनासाठी त्यात बक्षीसं दिली जाणार होती.
अमेरिकेतील एक टीम या स्पर्धेची विजेती ठरली. डॉल्फिनच्या काही विशिष्ट शिट्ट्या मानवी शब्दांसारखंच काम करतात, असं या टीमनं शोधून काढलं होतं.
कधीकाळी प्राण्यांशी बोलणं, संवाद साधणं हे फक्त पुस्तकं आणि चित्रपटांमधूनच दिसायचं.
अर्थात ते अजूनही एक दिवास्वप्नचं आहे की लवकरच ही गोष्ट प्रत्यक्षात येऊ शकते? आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यात आपल्याला कशाप्रकारे मदत करू शकतं?
नवीन आवाजांचं विश्व
प्राण्यांच्या संवादाबद्दलची आपली समज, जाण तंत्रज्ञानामुळे आधीच वाढली आहे. विशिष्ट प्रकारे मायक्रोफोन मानवी कानाला ऐकू न येणारे आवाज ओळखण्यात मदत करू शकतात. उदाहरणार्थ, वटवाघळांचे अल्ट्रासॉनिक आवाज.
"मानवाचा कान जवळपास 20 किलोहर्ट्झपर्यंतच्या फ्रिक्वेन्सीचे आवाज ऐकू शकतो. तर काही वटवाघळं '212 किलोहर्ट्झ'पर्यंतच्या मोठ्या फ्रिक्वेन्सीचे' आवाज काढू शकतात," असं केट जोन्स म्हणाल्या.
त्या युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमध्ये इकॉलॉजी आणि बायोडायव्हर्सिटीच्या प्राध्यापिका आहेत.
"इतर कोणताही सस्तन प्राणी आवाजाचा वापर करतो, त्याप्रमाणेच ते आवाजाचा वापर करतात. ते अस्वस्थ आहेत किंवा घाबरलेले आहेत, हे एकमेकांना सांगण्यासाठी ते आवाजाचा वापर करतात. तसंच मिलनाच्या वेळेस जोडीदाराला आवाज देतात," असं त्यांनी बीबीसीच्या 'द डॉक्युमेंटरी पॉडकास्ट'ला सांगितलं.
मानव म्हणून आपल्या इंद्रियांना जे जाणवतं, त्याच्यातून जे आकलन होतं, त्यावर अवलंबून राहण्याची किंवा त्याच विश्वात राहण्याची आपल्याला सवय असते. मात्र नवीन तंत्रज्ञानामुळे आपलं हे विश्व, आकलन विस्तारू शकतं.
"यामुळे तुम्ही निसर्ग आणि आकलनाबद्दल तुम्ही कसा विचार करता, ते बदलतं. कारण यात अजून बरंच काही आहे, हे मला माहिती असतं," असं जोन्स म्हणाल्या.
तंत्रज्ञानामुळे मानवाला ऐकू येणार नाहीत इतक्या कमी तीव्रता किंवा फ्रिक्वेन्सीचे आवाजदेखील टिपणं किंवा जाणून घेणं शक्य झालं आहे. उदाहरणार्थ, हत्तींनी काढलेले आवाज.

फोटो स्रोत, Henrik Karlsson via Getty Images
कॅटी पेन या 1980 च्या दशकाच्या मध्यात, अमेरिकेतील पोर्टलँडमधील एका प्राणीसंग्रहालयात गेल्या होत्या. तिथे त्या जेव्हा हत्तींच्या जवळ होत्या, तेव्हा त्यांना एक विचित्र संवेदना जाणवली.
"मला सर्व प्रकारचं विस्मयकारक सामाजिक वर्तन दिसलं. हळूहळू माझ्या लक्षात आलं की मलादेखील काहीतरी विचित्र गोष्ट जाणवते आहे. हवेत एक स्पंदन किंवा धडधडणं जाणवतं आहे," असं त्यांनी 2013 मध्ये बीबीसीला सांगितलं.
रेकॉर्डिंगसाठीच्या उपकरणांचा वापर केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की हत्ती कमी तीव्रतेच्या इन्फ्रासाऊंड पट्टीत आवाज काढत होते. हत्ती एकमेकांशी कसा संवाद साधतात किंवा संभाषण करतात, हे समजून घेण्याच्या बाबतीत हा एक क्रांतिकारक शोध ठरला.
पेन यांनी नंतर 'एलिफंट लिसनिंग प्रोजेक्ट'ची सह-स्थापना केली. यात आफ्रिकेतील जंगली हत्तींच्या जीवनाची त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून नोंद ठेवली जायची. वैज्ञानिक आजही या प्रोजेक्टमधील डेटाबेस किंवा माहिती वापरत आहेत.
ही माहिती अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात अजूनही ठेवण्यात आलेली आहे. ही माहिती ते आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)बरोबर जोडत आहेत.
रिअल-टाइममध्ये प्रक्रिया
ॲलेस्टेअर पिकरिंग संशोधक आहेत. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनबरोबर काम केलं आहे. यात त्यांनी हत्तींचं वय, लिंग, वर्तन आणि अगदी भावनिक स्थितीनुसार नोंद केलेल्या आवाजाच्या डेटाबेस किंवा माहितीच्या संग्रहाचा वापर करून एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अल्गोरिदमला प्रशिक्षित केलं आहे.
"आम्ही तो ऑडिओ किंवा आवाज याचा अभ्यास करतो आणि सांगतो की, 'प्रतिमेच्या या भागात, एक नर हत्ती त्रासलेला आहे किंवा संकटात आहे'. मग एआय त्या प्रतिमांमधील नमुन्यांना त्या विशिष्ट लेबल्स किंवा हत्तीशी जोडायला शिकतं," असं ते म्हणाले.
पारंपरिक पद्धतीचं रेकॉर्डिंगसाठीचं उपकरण, ऑडिओ किंवा आवाजावर प्रक्रिया करण्यापूर्वी अनेक महिने फील्डवर ठेवावं लागतं. तर एआयच्या टूल्सचा वापर हत्तींच्या आवाजांचं विश्लेषण रिअल-टाइममध्ये म्हणजे त्याच क्षणी करण्यासाठी केला जाऊ शकतो, असं पिकरिंग म्हणाले.
याची आपल्याला मदत होऊ शकते. उदाहरणार्थ, हत्ती गावांमध्ये आणि शहरांमध्ये शिरण्याच्या, पिकं उदध्वस्त करण्याच्या वाढत्या घटनांचा अंदाज बांधण्यासाठी ते उपयोगी ठरू शकतं.
"ते टूल अजून ही गोष्ट करत नाही. मात्र एक दिवस ते तणाव किंवा तीव्र स्वरुपाच्या भावनिक उत्तेजना दाखवणाऱ्या आवाजांचे नमुने ओळखू शकेल. त्याचा वापर आपण हत्तींकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांची पूर्वसूचना म्हणून करू शकतो," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Oscar Wong via Getty Images
मात्र एआय टूल परिपूर्ण नाहीत. अचूक माहिती मिळवण्यासाठी त्यात मानवी हस्तक्षेपाची म्हणजे मानवी सहभागाची आवश्यकता भासू शकते.
"जर तुम्ही ध्वनीचं रेकॉर्डिंग करणारं असं उपकरण लावलं असेल, तर ते उपकरण सर्वच आवाज रेकॉर्ड करतं. टूकन पक्ष्यांचा आवाज, पावसाच्या थेंबांचा आवाज असे पार्श्वभूमीला असणारे आवाजही ते रेकॉर्ड करतं," असं पिकरिंग म्हणाले.
या टूल किंवा उपकरणाला यातील कोणता आवाज महत्त्वाचा आहे हे कदाचित कळणार नाही. जर प्रत्येक वेळेस हत्ती आवाज काढत असताना तोच टुकन पक्षी आवाज काढत असेल, तर हे उपकरण नकळतपणे त्या टुकन पक्षाच्या आवाजाला हत्तीच्या आवाजाशी जोडू शकतं.
"त्यामुळे या नेटवर्कद्वारे योग्य माहिती किंवा नोंद घेतली जावी यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात," असं ते म्हणाले.
प्राण्यांच्या आवाजाचं भाषांतर करणारे एआय टूल
हत्तींचं वर्तन समजून घेण्यास आणि त्यांच्या वर्तनाबद्दल अंदाज बांधण्यास मदत करण्याबरोबरच एआयचा वापर वटवाघळांच्या आवाजावरून त्यांची प्रजाती ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो, असं जोन्स म्हणाल्या.
"तुम्ही मशीनला म्हणजे एआयला प्रशिक्षण देता आणि फरक ओळखायला शिकवता. सिरीला तुमचा आवाज ओळखायला शिकवण्यासारखंच हे आहे. त्यामुळे आपण या अल्गोरिदमला वटवाघळांच्या प्रजाती ओळखायला शिकवतो," असं त्या म्हणाल्या.
सिरी हे एक व्हर्च्युअल असिस्टंट आणि चॅटबॉट आहे.
स्पर्म व्हेल माशांचे (व्हेल माशांची एक प्रजाती) आवाज ओळखण्याबाबत, त्या आवाजांच्या संदर्भातील विविध गोष्टींचा उलगडा करण्यासाठी देखील एआयची मदत होऊ शकेल असं दिसतं आहे. स्पर्म व्हेल क्लिक्सच्या आवाजानं संवाद साधतात.
डेव्हिड ग्रुबर न्यूयॉर्कमधील सिटी युनिव्हर्सिटीमध्ये जीवशास्त्राचे प्राध्यापक आहेत. तसंच ते सेटेशियन ट्रान्सलेशन इनिशिएटिव्ह (सेटी)चे संस्थापकआहेत.
मानवी भाषेचं भाषांतर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रान्सलेशन सॉफ्टवेअरसारख्या एआय टूलचा वापर करून व्हेलच्या क्लिक्समधील पॅटर्न आणि त्यांची रचना शोधून, व्हेल मासे पुढे कोणतं क्लिक करतील म्हणजे काय म्हणतील याचा अंदाज बांधण्यात त्यांना काही प्रमाणात यश आलं आहे.

फोटो स्रोत, by wildestanimal via Getty Images
"अशी अनेक नवीन तंत्रज्ञानं आहेत, ज्यांचा वापर आपण सुरू करत आहोत. मला वाटतं की आपल्याला खरोखरंच एक रोमांचक काळ अनुभवयाला मिळणार आहे. यात आपण त्यांच्या संवाद साधण्याच्या व्यवस्थेमधील अधिकाधिक घटक जाणून घेणार आहोत," असं ते म्हणाले.
कोणतीही संवाद प्रणाली उलगडू शकणारं, भाषांतरचं टूल तयार करणं, हे त्यांचं अंतिम ध्येय आहे.
"याचा अभ्यास करण्यासाठी, आकलन करण्यासाठी नवीन टूलची आणि याकडे पाहण्याच्या नवीन दृष्टीकोनांची आवश्यकता असेल. त्याचा वापर विविध प्रजातींच्या बाबतीत केला जाऊ शकेल.
अगदी आपल्याला जर दुसऱ्या एखाद्या आकाशगंगा किंवा दीर्घिकेत जीवसृष्टी सापडली, तर तिथेही याचा वापर करता येईल," असं ग्रुबर म्हणाले.
डॉल्फिनची भाषा शिकताना काय दृष्टीकोन असावा?
या टूलमुळे आपल्याला प्राण्यांच्या भाषेचं आकलन करता येईल. मात्र त्याचा वापर करून प्राण्यांची भाषा जाणून घेऊन आपल्याला त्यांच्याशी संवाददेखील साधता येईल का? म्हणजे दोन्ही बाजूनं संवाद प्रस्थापित करता येईल की नाही, हा एक वेगळा मुद्दा आहे.
सेटी प्रोजेक्टचा विचार करता, याचं उद्दिष्ट स्पर्म व्हेल माशांशी बोलणं किंवा संवाद साधणं हे नसून त्यांची भाषा समजून घेणं हा आहे, असं ग्रुबर म्हणाले.
"एका अर्थानं, आपल्या बोटींच्या आवाजांच्या माध्यमातून आपण व्हेल माशांशी आधीच बोलत आहोत, संवाद साधत आहोत. आपण खूपच गोंगाट करत आलो आहोत. हा प्रकल्प, शक्य तितकं अनामिक राहत, त्यांच्या आवाजांचं भाषांतर करण्यासाठी म्हणजे ती समजून घेण्यासाठी आहे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, George Karbus Photography via Getty Images
प्राध्यापक विन्सेंट जानिक, सेंट अँड्रूयूज विद्यापीठातील डॉल्फिनचे संशोधक आहेत. ज्या संशोधकांच्या टीमनं पहिलं कॉलर डूलिटल चॅलेंज जिंकलं, त्या टीमचा ते एक भाग होते. त्यांनीदेखील प्राण्यांशी संवाद साधण्याबद्दल आश्वासक असलेल्या तंत्रज्ञानाबाबत इशारा दिला आहे.
आपल्याला खरोखरंच प्राण्यांशी बोलायचं असेल तर आपण त्यांच्याशी नक्की काय बोलू, याचा विचार करण्याचं आव्हान ते आपल्यासमोर मांडतात.
"त्यांचा आवडता रंग कोणता आहे, हे आपल्याला त्यांना विचारायचं आहे का? खूपच लवकर तुम्ही ते कशाप्रकारे विचार करतात, गोष्टी कशाप्रकारे समजून घेतात आणि त्यांच्या सभोवतालच्या पर्यावरणाकडे कशाप्रकारे पाहतात, याबद्दलच तुम्ही विचार करू लागाल," असं ते म्हणाले.
आपण एखादी परकीय भाषा शिकण्याचा ज्याप्रमाणे प्रयत्न करतो, त्याचप्रकारे आपण 'डॉल्फिन'ची भाषा शिकण्याचा प्रयत्न करण्याबद्दल विचार करू नये.
"प्राण्यांची संवेदना किंवा इंद्रिय-रचना मानवाप्रमाणे नसते. त्यांचा जगाबद्दल अनुभव आपल्यापेक्षा वेगळा असतो. त्यांची जीवशास्त्रीय रचनादेखील आपल्यापेक्षा वेगळी असते. त्यामुळे त्यांच्यात आपसात जो संवाद सुरू असतो, तो देखील आपल्यापेक्षा पूर्णपणे वेगळ्या स्वरुपाचा असतो," असं ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























