'फोन करण्याऐवजी मेसेज कर', यामागे फोन कॉलची भीती की नव्या पिढीची सवय?

'फोन करण्याऐवजी मेसेज कर', यामागे फोन कॉलची भीती की नव्या पिढीची सवय?
फोटो कॅप्शन, स्क्रीनवर नाव दिसतं, आणि मनात प्रश्न उभा राहतो, 'आता उचलायचा का?' (प्रातिनिधिक छायाचित्र)
  • Published
  • वाचन वेळ: 12 मिनिटे

फोन वाजतो... स्क्रीनवर नाव दिसतं... आणि अनेक जणांच्या मनात पहिला विचार येतो, "आता उचलायचा का?"

मेसेज, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम डीएम किंवा व्हॉइस नोट्सच्या युगात वाढलेल्या अनेक तरुणांसाठी फोन कॉल हा साधा संवाद नसून तणाव निर्माण करणारा अनुभव ठरत आहे.

काही लोक फोन करण्यापूर्वी मनात अनेकदा संवादाची उजळणी करतात, तर काहीजण रिंग वाजत असतानाही कॉल उचलण्याऐवजी मेसेज पाठवणं पसंत करतात. मानसशास्त्रज्ञ या प्रवृत्तीला 'टेलिफोन अँग्झायटी' किंवा फोन कॉलविषयीची चिंता असं संबोधतात.

काही काळापूर्वी प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्याशिवाय पर्याय नव्हता. एखादं पोस्टाचं कार्ड टाकता आलं तर टाकता यायचं किंवा मग तसंच त्या घरी जाऊन धडकायचं. टेलिफोन-मोबाईल आल्यापासून संवाद सोपा झालाच तसंच प्रत्यक्ष भेटीआधी फोनवरुन वेळ ठरवता यायला लागली. यामागे सर्वांची सोयही पाहाता यायची.

आता मात्र या प्रकारानं पुढचा टप्पा गाठलाय असं दिसतं. आता संवादात फोनवर बोलायलाही नको अशा टप्प्यापर्यंत प्रवास झाला आहे. दिवसभर सोशल मीडियावर कार्यरत असणारे तरुण किंवा कोणत्याही पिढीतले लोक फोनवर बोलायची वेळ आली की डळमळल्यासारखे होतात. त्यातून प्रत्यक्ष भेटायची वेळ आली तर त्यांना जास्त त्रास वाटू शकतो.

या सगळ्या प्रकारानं आणखी एक पायरी पार केलीय. ती म्हणजे फोन करण्याआधी मेसेज करण्याची. फोनवर बोलण्यासाठी वेळ आहे का असं विचारणं, हा शिष्टाचाराचा भागही आहे. पण काही लोकांना अचानक आलेला फोन अडथळ्यासारखा, हस्तक्षेपासारखा वाटू शकतो.

ही 'शब्देविण संवादू'ची वाटचाल आता रिल्सपर्यंतत गेलेली आहे. एकमेकाला फक्त रिल्स पाठवणं हाच केवळ संवाद राहू शकतो. त्यातूनच एकमेकांशी संपर्क ठेवणं अशी एक पद्धत उदयाला आली आहे.

अनेक लोक दीर्घकाळ एकमेकांशी न बोलता फक्त रिल्समधून संपर्कात राहू शकतात. याला गंमतीनं 'Reelationship' असंही म्हटलं जातं.

ही केवळ लाजाळूपणाची किंवा अबोल स्वभावाची गोष्ट नाही. फोनवर बोलताना समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया लगेच मिळते, विचार करण्यासाठी वेळ नसतो आणि चुकीचं बोलण्याची भीती अधिक जाणवू शकते.

त्याउलट मेसेजमध्ये शब्द निवडण्यासाठी आणि उत्तर देण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे अनेकांना मजकूरावरधारित संवाद अधिक सुरक्षित वाटतो.

मात्र या बदलामागे केवळ चिंता आहे की संवादाच्या पद्धतीत होत असलेला मोठा सामाजिक बदल? डिजिटल माध्यमांनी आपल्या अपेक्षा, उपलब्धता आणि संवादाची शैली कशी बदलली आहे? फोन टाळण्यामागे मानसिक आरोग्याचे प्रश्न आहेत का, की ही नव्या पिढीची नैसर्गिक संवाद पसंती आहे? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.

ही समस्या फक्त Gen Z ची?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

सायकॉलॉजी टुडे या मानसशास्त्रीय विषयावर माहिती प्रसिद्ध करणाऱ्या संकेतस्थळावर मानसिक आरोग्य आणि वर्तनविषयक विषयांवर लेखन करणाऱ्या डियान एन. सोलोमन लिहितात, "आज अनेकांना फोनची भीती ही फक्त मिलेनियल्स किंवा Gen Z ची समस्या वाटते. पण प्रत्यक्षात 'टेलिफोन फोबिया' किंवा फोनवर बोलण्याची भीती ही नवीन गोष्ट नाही.

मोबाईल फोन आणि स्मार्टफोन सर्वत्र पोहोचण्याच्या आधीपासूनच या विषयावर चर्चा होत होती. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीलाच याबाबत लेखन झाल्याचं आढळतं."

त्या पुढं सांगतात, "या भीतीचा अनुभव केवळ तरुणांनाच येतो असंही नाही. यूकेमधील एका अभ्यासात जवळपास 40 टक्के बेबी बूमर्स आणि 70 टक्के मिलेनियल्सनी फोनची रिंग वाजल्यावर चिंता किंवा तणाव जाणवत असल्याचं सांगितलं. तर 2024 मध्ये 300 हून अधिक विद्यार्थ्यांवर झालेल्या एका अभ्यासात सुमारे 9 टक्के विद्यार्थ्यांमध्ये मध्यम ते गंभीर स्वरूपाचा टेलिफोन फोबिया आढळला, तर एक तृतीयांश विद्यार्थ्यांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणं दिसून आली."

(बेबी बूमर्स म्हणजे साधारणपणे 1946 ते 1964 दरम्यान जन्मलेली पिढी, ही पिढी दुसऱ्या महायुद्धानंतरच्या लोकसंख्या वाढीच्या काळात वाढली. मिलेनियल्स म्हणजे साधारणपणे 1981 ते 1996 दरम्यान जन्मलेली पिढी, या पिढीनं इंटरनेट आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या उदयासोबत तारुण्यात प्रवेश केला.)

ही समस्या फक्त Gen Z ची? फोनवर बोलणारी महिला
फोटो कॅप्शन, मेसेजला लगेच उत्तर, पण फोन कॉलचं काय?....(प्रातिनिधिक छायाचित्र)

म्हणजेच फोन कॉलची भीती ही केवळ डिजिटल पिढीची सवय नसून विविध वयोगटांमध्ये आढळणारी एक मानसिक आणि सामाजिक प्रवृत्ती असल्याचं दिसून येतं.

यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे खरंच तरुण पिढी प्रत्यक्ष संभाषणापासून दूर जात आहे का?

तज्ज्ञांच्या मते, याचं उत्तर सरळ हो किंवा नाही असं नाही. अनेकदा फोन टाळणं हे सामाजिक चिंतेचं लक्षण असू शकतं. पण प्रत्येक वेळी तसं नसतं. मेसेजमध्ये उत्तर देण्यावर स्वतःचं नियंत्रण असतं, तर फोनमध्ये तात्काळ प्रतिसाद द्यावा लागतो. त्यामुळे काही जणांसाठी हा केवळ संवादाचा पर्याय असू शकतो.

तथापि, संवादाचं वाढतं डिजिटलकरण काही प्रश्नही उपस्थित करतं. मजकूरामध्ये आवाजातील चढ-उतार, भावना आणि सूक्ष्म संकेत हरवू शकतात. गैरसमज वाढण्याची शक्यता असते. दुसरीकडे, फोनवरील संवाद लोकांमधील जवळीक, विश्वास आणि भावनिक जोड अधिक मजबूत करू शकतो.

म्हणूनच फोन कॉल टाळण्याची सवय ही केवळ तंत्रज्ञानातील बदलाची गोष्ट नसून, आधुनिक तणाव, सामाजिक अपेक्षा आणि बदलत्या मानवी संवादसंस्कृतीचं प्रतिबिंब म्हणूनही पाहता येतं.

फोनवर बोलणारी महिला
फोटो कॅप्शन, फोन टाळणं ही फक्त सवय नसून काही वेळा 'टेलिफोन अँक्झायटी'ही असू शकते. (प्रातिनिधिक छायाचित्र)

आता आपण आणखी एक संशोधनाची माहिती घेऊ. अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन (APA) समोर सादर करण्यात आलेल्या संशोधनानुसार, टेक्स्टिंगमुळे लोक एकमेकांच्या अधिक जवळ येऊही शकतात आणि दुरावूही शकतात.

ज्या जोडप्यांच्या टेक्स्टिंगच्या सवयी एकसारख्या असतात, त्यांच्यात नातेसंबंध अधिक समाधानकारक असतात आणि आनंदी असता . दुसरीकडे, अनेकजण फक्त संपर्कात राहण्यासाठीच नव्हे तर अवघड किंवा अस्वस्थ करणाऱ्या परिस्थितींपासून दूर राहण्यासाठीही टेक्स्टिंगचा वापर करतात.

संशोधकांना आढळलं की काही लोक कंटाळा आल्यावर, एकटेपणा वाटल्यावर किंवा फोनवर किंवा प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा मजकुरातून स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करता येतं म्हणून मेसेजिंगला प्राधान्य देतात. मात्र, टेक्स्टिंग हा संवादाचा आधारस्तंभ बनला तर तो अर्थपूर्ण मानवी संवादात अडथळाही ठरू शकतो.

संशोधकांच्या मते, सतत मेसेजवर अवलंबून राहिल्यास काही वेळा सामाजिकदृष्ट्या बाजूला पडल्यासारखं होऊ शकतं आणि एकटेपणा वाढवू शकतं. म्हणजेच, टेक्स्टिंग हे सोयीचं आणि उपयुक्त माध्यम असलं तरी ते संवाद अधिक सशक्त करेल की कमकुवत, हे त्यामागच्या उद्देशावर आणि वापराच्या पद्धतीवर अवलंबून असतं.

टेक्स्टिंग
फोटो कॅप्शन, तुम्हालाही फोनवर बोलण्यापेक्षा मेसेज करणं अधिक सोयीचं वाटतं?

प्यू रिसर्च सेंटरच्या सर्वेक्षणानुसार, तरुणांमध्ये टेक्स्टिंग हे संवादाचं सर्वात लोकप्रिय माध्यम असलं तरी फोन कॉल पूर्णपणे मागे पडलेले नाहीत. नवीन मित्र झाल्यानंतर बहुतांश किशोरवयीन मुलं सर्वप्रथम टेक्स्टिंगसाठीचा फोन नंबर शेअर करतात. फोनवर बोलण्यासाठीचा नंबर लगेच देण्याबाबत त्यांचा कल कमी असतो. नव्याने ओळख झालेल्या व्यक्तीशी फोनवर बोलणं काहींना विचित्र किंवा अवघडल्यासारखं वाटतं. काही तरुणांना फोन नंबर देणं म्हणजे स्वतःबद्दल खूप जास्त वैयक्तिक माहिती देणं असंही वाटतं.

मात्र मैत्री अधिक घट्ट होत गेली की फोन कॉलचं महत्त्व वाढतं.

या सर्वेक्षणात अनेक किशोरवयीन मुलांनी त्यांच्या जिवलग मित्रांशी संपर्क साधण्यासाठी टेक्स्ट मेसेजिंग पहिल्या क्रमांकावर असलं, तरी फोन कॉल दुसऱ्या क्रमांकाचं पसंतीचं माध्यम आहे, असं सांगितलं.

विशेषतः जवळचे मित्र, भावनिकदृष्ट्या महत्त्वाची नाती किंवा जास्त वेळ गप्पा मारायच्या असतील तेव्हा फोनचा वापर वाढतो. एका विद्यार्थिनीनं संशोधकांना सांगितलं, "जिवलग मित्र असेल तर तुम्ही त्याच्याशी फोनवर बोलता, कारण बोलण्यासारखं खूप काही असतं. पण एखादा फक्त ओळखीचा मित्र असेल तर बहुतेक वेळा मेसेज पुरेसा ठरतो." यावरून फोन कॉल कमी झाले असले तरी ते अजूनही जवळच्या आणि अधिक वैयक्तिक नात्यांमध्ये महत्त्वाचं स्थान राखून आहेत.

फोन अँग्झायचीटी लक्षणं काय?

पुढील लक्षणं दिसत असली तर तुम्हाला फोन अँग्झायटीची शक्यता असू शकते...

  • फोन कॉल करणं टाळणं आणि दुसऱ्यांचे फोनही घेणं टाळणं
  • फोन कॉल करायला आणि दुसऱ्यांचे फोन घ्यायला वेळ लावणं
  • आपल्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाईल अशी भीती वाटणं
  • आपण काहीतरीच बोलून जाऊ अशी भीती वाटणं
  • मळमळल्यासारखं वाटणं, थरथरणं किंवा एकाग्र होता न येणं
फोन अँग्झायटी
फोटो कॅप्शन, मेसेज, डीएम आणि व्हॉइस नोट्सच्या युगात फोन कॉल अनेकांसाठी तणावाचं कारण ठरत आहेत. (प्रातिनिधिक छायाचित्र)

टेलिफोन अँग्झायटीबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आम्ही ऋतिका अग्रवाल यांच्याशी संपर्क केला. त्या मुंबईच्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर इथं कन्सल्टंट सायकॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

चिंता, नैराश्य आणि मद्याधीनता अशा विविध समस्यांबद्दल त्या रुग्णांचं समुपदेशन करतात.

टेलिफोन अँग्झायटी ही खरंच मानसशास्त्रीय संकल्पना आहे का असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावर त्या म्हणाल्या, "होय. फोन करण्याची किंवा फोन उचलण्याची भीती अथवा तीव्र अस्वस्थता याला टेलिफोन अँग्झायटी म्हटलं जातं. ही संकल्पना मानसशास्त्रज्ञांनी ओळखलेली बाब आहे. तरी ती स्वतंत्र मानसिक आजार म्हणून वर्गीकृत केलेली नाही.

अनेकदा ती सामाजिक चिंता, सर्वसाधारण चिंताविकार किंवा एखाद्या विशिष्ट संवाद पद्धतीबद्दल निर्माण झालेल्या अस्वस्थतेचा भाग असू शकते."

फोन घेतलेला मुलगा
फोटो कॅप्शन, फोन टाळणं ही सवय आहे की चिंतेचं लक्षण? हे शोधणं गरजेचं आहे. (प्रातिनिधिक छायाचित्र)

पण टेलिफोन अँग्झायटी आणि सोशल अँग्झायटी यात फरक आहे का हा प्रश्न उरतोच. यात काही फरक आहे का हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.

यावर ऋतिका अग्रवाल म्हणाल्या, "सामाजिक चिंताविकार/चिंतारोग (सोशल अँग्झायटी) हा अधिक व्यापक प्रकार आहे. इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील, आपल्याला नाकारतील किंवा आपला अपमान होईल, अशा भीतीशी ती संबंधित असते. ही चिंता प्रत्यक्ष भेटीगाठी, सार्वजनिकरीत्या बोलणं, इतरांसमोर जेवणं किंवा ऑनलाइन संवाद अशा अनेक प्रसंगांत जाणवू शकते."

"टेलिफोन अँग्झायटी मात्र विशिष्ट परिस्थितीशी संबंधित असते. एखादी व्यक्ती मित्रांशी प्रत्यक्ष भेटून सहज गप्पा मारू शकते, पण त्याच मित्राचा अचानक फोन आला तर तिला तणाव जाणवू शकतो. मात्र फोनची भीती ही लोक काय विचार करतील किंवा आपण काही चुकीचं बोलू अशी व्यापक भीतीतून निर्माण होत असेल, तर ती सामाजिक चिंतेचंच एक लक्षण असू शकते."

टेक्स्टिंग
फोटो कॅप्शन, संवाद कमी झालेला नाही, त्याचं माध्यम बदललं आहे.

फोन टाळण्याची सवय मानसिक आरोग्याचा प्रश्न कधी बनते? असं विचारल्यावर ऋतिका अग्रवाल म्हणाल्या, "जेव्हा फोन टाळणं सतत सुरू राहतं, त्यातून मानसिक त्रास होतो किंवा त्याचा वैयक्तिक, सामाजिक आणि व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होऊ लागतो, तेव्हा ते गंभीरपणे घेण्याची गरज असते.

उदाहरणार्थ, महत्त्वाचे कॉल वारंवार टाळणं, फोन घ्यावा लागला तर तीव्र चिंता निर्माण होणं किंवा फोनवर बोलणं टाळण्यासाठी दैनंदिन आयुष्याची आखणी करणं ही चिंतेची चिन्हं असू शकतात.

या संदर्भात स्वतःला विचारायचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे, "फोन टाळल्यामुळे माझं आयुष्य मर्यादित होत आहे का?"

त्रस्त मुलगा
फोटो कॅप्शन, चिंता वाढत असेल तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत उपयुक्त ठरू शकते. (प्रातिनिधिक छायाचित्र)

फोन टाळण्याचा काम, नातेसंबंध आणि दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? असा प्रश्न आम्ही अग्रवाल यांना विचारला. त्यावर त्यांनी याचा परिणाम लक्षणीय असू शकतो असं सांगितलं.

या अँग्झायटीनं, "कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या संधी हुकू शकतात, निर्णय घेण्यास विलंब होऊ शकतो, गैरसमज वाढू शकतात आणि संबंधित व्यक्ती प्रतिसाद देत नाही अशी प्रतिमा तयार होऊ शकते. हे दीर्घकाळ सुरू राहिल्यास करिअरच्या प्रगतीवरही परिणाम होऊ शकतो."

"नातेसंबंधांमध्येही अशा वर्तनाचा अर्थ उदासीनता, नकार किंवा भावनिक दुरावा असा लावला जाऊ शकतो, जरी त्यामागे खरी कारणं चिंता असली तरी. याशिवाय अपॉइंटमेंट ठरवणं, सेवा पुरवणाऱ्यांशी संपर्क साधणं, आरोग्यविषयक संवाद करणं यांसारख्या दैनंदिन गोष्टीही कठीण होऊ शकतात."

सर्वात जास्त परिणाम करणारी गोष्ट त्या सांगतात. ती म्हणजे, जितके कॉल आपण टाळतो, तितका पुढचा कॉल अधिक भीतीदायक वाटू लागतो.

टेक्स्टिंग

फोन कॉल टाळल्यानं काही लोकांच्याबाबतीत एकटेपणा येऊ शकतो. मात्र फोनवर बोलणं टाळणं आणि डिजिटल संवादाला प्राधान्य देणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मेसेज, व्हीडिओ कॉल आणि प्रत्यक्ष भेटींमधून एखाद्या व्यक्तीचं समृद्ध सामाजिक आयुष्य असू शकतं आणि तरीही तिला फोनवर बोलायला आवडत नसू शकतं.

मात्र फोन टाळणं हे व्यापक सामाजिक दुराव्याचं लक्षण असेल, तर त्यातून एकटेपणा वाढू शकतो. अनेकदा चिंतेचं एक दुष्टचक्र तयार होतं. फोन टाळल्यावर तात्पुरता दिलासा मिळतो, पण त्यामुळे पुढच्या वेळी चिंता अधिक वाढते.

जर ही पद्धत केवळ फोनपुरती मर्यादित न राहता मैत्री, सामाजिक कार्यक्रम किंवा इतर नातेसंबंधांमध्येही दिसू लागली, तर एकाकीपणा आणि सामाजिक विलगीकरणाची शक्यता वाढू शकते.

तरुण पिढीतले लोक फोन कॉल अधिक टाळतात का?

आता संवादाच्या सवयींमध्ये पिढ्यानुसार बदल झालेला दिसतो. विशेषतः इन्स्टंट मेसेजिंग, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या वातावरणात वाढलेल्या तरुणांमध्ये हा बदल अधिक ठळकपणे जाणवतो. पण त्यामुळे संपूर्ण तरुण पिढीला फोनची भीती आहे, असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही.

अनेक तरुणांसाठी मजकूराधारित संवाद हीच नैसर्गिक संवादपद्धती आहे. त्यामुळे फोन कॉल त्यांना काहीसा औपचारिक, अनपेक्षित किंवा हस्तक्षेप करणारा वाटू शकतो.

याचबरोबर सततच्या डिजिटल संवादामुळे उत्स्फूर्त तोंडी संभाषणाची सवय कमी होत असल्याचंही दिसून येतं. मात्र याचा अर्थ तरुण कमी सामाजिक झाले आहेत असा नाही. त्यांचं सामाजिक आयुष्य सुरूच असतं, फक्त संवादाची माध्यमं बदलली आहेत.

ऋतिका अग्रवाल सांगतात," सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅप्सनी संवादाविषयीच्या आपल्या अपेक्षाच बदलून टाकल्या आहेत. आता प्रत्येक वेळी तातडीनं उत्तर देण्याची गरज नसते. लोक स्वतःला सोयीचं वाटेल तेव्हा प्रतिसाद देतात."

"या माध्यमांमध्ये स्वतःचं सादरीकरणही अधिक नियंत्रित करता येतं. शब्द निवडण्यासाठी वेळ मिळतो, संदेशाचा सूर ठरवता येतो आणि गरज पडल्यास इमोजीचाही वापर करता येतो. फोन कॉलमध्ये हा पर्याय नसतो. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीवर राग असला तरी सभ्यपणे बोलण्याचा प्रयत्न मजकुरातून करणं तुलनेनं सोपं असू शकतं; फोनवर बोलताना मात्र भावनांवर नियंत्रण ठेवणं अधिक कठीण जाऊ शकतं."

तरुण पिढी
फोटो कॅप्शन, तरुण पिढीतले लोक फोन टाळतात की संवादाची नवी पद्धत निवडतात? (प्रातिनिधिक छायाचित्र)

माहिम इथल्या पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमधमध्ये सायकॉलॉजिस्ट आणि कौन्सिलर म्हणून कार्यरत असलेल्या शीना सूद यांच्यामते, "टेक्स्टिंगचे स्वतःचे असे फायदे आणि तोटे आहेत. त्याचा एक मोठा फायदा म्हणजे संवाद जलदपणे आणि लिखित स्वरूपात करता येतो. त्यामुळे बोलण्यातला कोणताही मुद्दा विसरला जाण्याची शक्यता कमी असते, कारण त्याची नोंद आपल्याकडे राहते.

उदाहरणार्थ, किराणा सामानाची यादी आपल्याला मेसेजद्वारे पाठवता येते आणि त्यामुळे कोणतीही वस्तू विसरण्याची शक्यता कमी होते. फोनवरील संभाषणात प्रत्येक मुद्द्याची नोंद नसल्यामुळे काही गोष्टी विसरल्या जाऊ शकतात."

"याशिवाय, टेक्स्टिंग करताना इतर कामेही एकाच वेळी करता येतात. फोन कॉलसाठी लागणारा वेळ आणि मानसिक एकाग्रता टेक्स्टिंगसाठी तुलनेने कमी आवश्यक असते."

मोबाईल वापरणारा मुलगा
फोटो कॅप्शन, (प्रातिनिधिक छायाचित्र)

तरुण पिढीच्या या बदलत्या संवाद सवयीबद्दल त्या एक आणखी पैलू मांडतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "तरुण पिढी जलद आणि अधिक कार्यक्षम संवाद साधण्याची कला शिकत आहे. तसेच, कमी शब्दांत एखाद्या परिस्थितीचा संदर्भ समोरच्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी शॉर्ट फॉर्म्सचा वापर करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे आहे.

त्यामुळे कमीत कमी शब्दांत प्रभावी संवाद साधणं हे त्यांचे एक सामाजिक कौशल्य म्हणता येईल. मात्र, इथं ज्या सामाजिक कौशल्याची कमतरता जाणवते ते म्हणजे मनमोकळा आणि भावनिक संवाद. कारण ते फोन कॉल्सच्या माध्यमातून संवाद साधत मोठे झालेले नाहीत."

फोन कॉलच्या भीतीमुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो?

फोन आल्यावर काही लोकांना लगेच प्रतिसाद देण्याचा ताण जाणवू शकतो. त्यामुळे अस्वस्थता आणि चिंता वाढू शकते. काही जणांमध्ये समोरची व्यक्ती आपल्याबद्दल काय विचार करेल, आपण काही चुकीचं बोलू का, याचीही भीती असते. ही भीती अनेकदा सामाजिक चिंतेशी संबंधित असू शकते हे तर आपण पाहिलंच आहे.

फोन घ्यावा असं वाटत असतानाही स्वतःला थांबवण्यासाठी मानसिक प्रयत्न करावे लागतात. या संघर्षामुळे ताण वाढू शकतो. काही वेळा व्यक्तीला गोंधळल्यासारखं वाटतं, हृदयाची धडधड वाढते, अस्वस्थता जाणवते किंवा काहीतरी वाईट घडणार असल्याची भीती वाटू शकते.

यामागे फोनची भीती ही समोरची व्यक्ती का फोन करत आहे हे माहीत नसल्यामुळे निर्माण होते का? असा प्रश्न आम्ही डॉ. केदार तिळवे यांना विचारला. ते मुलुंड आणि वाशी इथल्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये मानसोपचारतज्ज्ञ सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

काहीतरी वाईट बातमी असेल, अशी भीतीही अनेक लोकांना वाटत असते.
फोटो कॅप्शन, काहीतरी वाईट बातमी असेल, अशी भीतीही अनेक लोकांना वाटत असते.

ते सांगतात, "समोरची व्यक्ती का फोन करत आहे? या अनिश्चिततेचं कारण काही प्रमाणात असतं. पण हे एवढंच कारण नसतं. समोरच्या व्यक्तीकडे एखादी वाईट किंवा अनपेक्षित बातमी असू शकते, त्यासाठी आपण तयार नाही, अशी भीतीही असू शकते. काही लोकांमध्ये इतरांच्या नजरेत कमी ठरण्याची किंवा नकारात्मक मूल्यमापन होण्याची भीतीही असते."

फोन कॉलच्या भीतीमुळे काही वेळा त्यामुळे पॅनिक अटॅक येऊ शकतो. अशा वेळी हृदयाची धडधड वाढणं, काहीतरी भयंकर घडणार असल्याची भावना, घाम येणं किंवा शरीरात मुंग्या आल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. मळमळ किंवा सततची अनामिक भीतीही जाणवू शकते, असं डॉ. तिळवे सांगतात.

फोनवर बोलणारा मुलगा
फोटो कॅप्शन, परफेक्शनिस्ट समजल्या जाणाऱ्या लोकांनाही हा त्रास होऊ शकतो. (प्रातिनिधिक छायाचित्र)

अनेक लोकांना सगळं जिथल्या तिथं, अगदी आखीव-रेखिव आणि स्वतःच्या मनात ठरवलेल्या कल्पनेप्रमाणंच व्हावं असं वाटत असतं. त्यांना सगळं 'परफेक्ट' लागतं. त्यासाठी ते अतिशय प्रयत्नशीलही असतात. पण त्याचे काही तोटेही त्यांना सहन करावे लागतात.

या परफेक्शनिस्ट लोकांना फोनवरचं अचानक करावं लागणारं संभाषण कठीण वाटू शकतं का? असा प्रश्न आम्ही डॉ. केदार तिळवे यांना विचारला.

ते म्हणाले, "अशा व्यक्तींना संभाषणात आपण अधिक चांगलं बोलू शकलो असतो किंवा काही महत्त्वाचं सांगायचं राहिलं, अशी अपराधी भावना वाटू शकते. तसेच चिंताग्रस्त आणि टाळण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींनाही अचानक होणारे फोन कॉल अधिक कठीण जाऊ शकतात."

फोन अँग्झायटीच्या गोष्टीमधून आपल्या दैनंदिन जीवनात तंत्रज्ञानाचं वाढतं महत्त्व दिसून येतं. साध्या-सोप्या कामांसाठीही आपण तंत्रज्ञानावर किती अवलंबून झालो आहोत, याची जाणीव होते. त्यामुळे नियमितपणे 'डिजिटल डिटॉक्स' करणं आणि स्क्रीनपासून काही काळ दूर राहणं अधिक महत्त्वाचं ठरतं, असं डॉ. तिळवे सुचवतात.

फोनवर बोलणाऱ्या महिला

प्रत्येकानंच फोनवर मोकळेपणानं आणि घडाघडा बोलणारी व्यक्ती झालं पाहिजे असं काही नाही. एखाद्याला मेसेज करणं अधिक पसंत असेल आणि त्याचा आयुष्यावर नकारात्मक परिणाम होत नसेल, तर त्यात काही चुकीचं नाही.

पण ज्या लोकांना खरोखरच फोन कॉलची भीती वाटते, त्यांच्यासाठी हळूहळू त्या परिस्थितीला सामोरं जाण्याची पद्धत उपयुक्त ठरू शकते. सुरुवातीला विश्वासातील व्यक्तीसोबत छोटे आणि कमी तणावाचे फोन कॉल करण्यापासून सुरुवात करून हळूहळू अधिक आव्हानात्मक संभाषणांकडे जाता येऊ शकतं.

याशिवाय पुढील उपाय मदत करू शकतात:

  • संपूर्ण संभाषण पाठ करण्याऐवजी काही महत्त्वाचे मुद्दे आधी ठरवा.
  • फोन करण्यापूर्वी काही दीर्घ आणि संथ श्वास घ्या.
  • प्रत्येक संवाद परिपूर्ण असायलाच हवा असं नाही, हे स्वतःला आठवण करून द्या.
  • सुरुवातीला परिचित आणि अपेक्षित संभाषणांपासून सुरुवात करा.
  • हळूहळू अति-तयारी आणि टाळण्याची सवय कमी करा.
  • "मी मूर्ख वाटेन" यासारखे विचार वास्तववादी आहेत का, याचा विचार करा.
फोनवर तयारीनं आणि आत्मविश्वासानं बोलणारा मुलगा
फोटो कॅप्शन, (प्रातिनिधिक छायाचित्र)

संभाषणाची वेळ आधीच ठरलेली असेल तर अनपेक्षितपणाचा घटक कमी होतो. व्यक्तीला काय बोलायचं याचा आधी विचार करण्याची संधी मिळते. अशा मानसिक तयारीमुळे आत्मविश्वास वाढतो आणि ताण कमी होऊ शकतो.

चिंता तीव्र स्वरूपाची असेल, दीर्घकाळ टिकत असेल किंवा दैनंदिन आयुष्यावर परिणाम करत असेल, तर मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेणं उपयुक्त ठरू शकतं. कॉग्निटिव्ह बिहेव्हियर थेरपी (CBT) सारख्या उपचारपद्धती अशा समस्यांवर प्रभावी ठरतात.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)