कोलंबियात सैनिकांना घेऊन जाणारं विमान उड्डाण घेताच कोसळलं; मृतांची संख्या 66 वर

कोलंबिया विमान अपघात
    • Author, आयोन वेल्स आणि व्हॅनेसा बुशश्ल्युटर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

कोलंबियाच्या दक्षिणेकडील भागात सैन्याचं एक विमान कोसळल्याची माहिती तिथल्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोलंबिया हवाई दलाचं हे विमान उड्डाण केल्यानंतर काही वेळातच कोसळलं आणि यामध्ये 66 जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच, अनेकजण जखमी झाले आहेत.

वायुसेनेचे कमांडर कार्लोस फर्नांडो सिल्वा रुएडा यांनी सांगितलं की, या विमानात 114 सैनिक आणि 11 कर्मचारी प्रवास करत होते.

हे अमेरिकन बनावटीचं सी-130 हर्क्युलस विमान होतं. कोलंबियातल्या सैनिकांच्या वाहतुकीसाठी या विमानाचा वापर होत होता.'

कोलंबियाच्या पुटुमायो प्रांतातील प्युएर्तो लेगुइझामो शहराजवळ हे विमान कोसळलं. तेथील आपत्कालीन बचाव पथकाचे लोक घटनास्थळी जाऊन विमानाच्या ढिगाऱ्यात अडकलेल्यांचा शोध घेत होते.

कोलंबियाचे संरक्षण मंत्री पेड्रो सांचेझ म्हणाले की, "लॉकहीड मार्टिनने बनवलेलं हर्क्युलस सी-130 हे विमान सुरक्षा दलाच्या सैनिकांना घेऊन जात होतं. प्युर्टो लेगुइझामो येथून उड्डाण केल्यानंतर या विमानाला एक भीषण अपघात झाला."

पेरूच्या सीमेजवळ झालेली ही घटना 'देशासाठी अत्यंत दुःखद' असल्याचं ते म्हणाले. पेड्रो सांचेझ यांनी माहिती दिली की, विमानाला आग लागल्यामुळे विमानात ठेवलेल्या दारुगोळ्याने पेट घेतला आणि स्फोट झाला.

लष्करातील एका सूत्राने एएफपी या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार या अपघातात एकूण 66 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कोलंबियन हवाई दलाच्या अलीकडच्या इतिहासातील हा सर्वात भीषण अपघात आहे.

स्थानिक माध्यमांनी अपघातस्थळावरून जखमी सैनिकांना लहान मोटरसायकलवरून रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या स्थानिकांचे व्हीडिओ देखील दाखवले आहेत.

कोलंबियामध्ये पेरूच्या सीमेजवळ मोठा विमान अपघात झाला.
फोटो कॅप्शन, कोलंबियामध्ये पेरूच्या सीमेजवळ मोठा विमान अपघात झाला.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

कोलंबियाचे राष्ट्रपती गुस्तावो प्युर्टो यांनी ट्विटरवर लिहिलं की, "हा भीषण अपघात... घडायला नको होता."

त्यांनी केलेल्या एका प्रदीर्घ पोस्टमध्ये, गुस्तावो यांनी म्हटलं आहे की, सशस्त्र दलांची उपकरणं आणि विमानांचं आधुनिकीकरण करण्याच्या योजनांना विलंब होतो आहे कारण तेथील नोकरशाहीत समस्या आहेत.

त्यांनी लिहिलं आहे की, "मी आता आणखी विलंब सहन करणार नाही. आपल्या तरुणांचं आयुष्य धोक्यात आहे." अजूनही या अपघाताचं नेमकं काय कारण आहे हे स्पष्ट झालं नाही.

कोलंबियाच्या लष्कराने 'एक्स'वर पोस्ट करून म्हटलं आहे की, "प्युर्टो लेगुइझामो येथे झालेल्या हर्क्युलस विमान अपघातानंतर जखमींना मदत करण्यासाठी आमचे सैनिक घटनास्थळी दाखल झाले आहेत."

लष्कराने त्यांच्या पोस्टमध्ये अनेक फोटो शेअर केले आहेत आणि जखमींना विशेष उपचारांसाठी नेलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

लष्कराने म्हटलं आहे की, "कोलंबियन लोकांनी दाखवलेली एकजूट आणि बचावकार्यात सहभागी झालेल्या सगळ्या संस्थांचे आभारी आहोत."

दरम्यान, रॉयटर्स या वृत्तसंस्थेने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, "सोमवारी (23 मार्च) कोलंबियाच्या दक्षिणेकडील ॲमेझॉन प्रदेशातून उड्डाण केल्यानंतर थोड्याच वेळात, 125 लोकांना घेऊनजाणारं कोलंबियन हवाई दलाचं विमान कोसळलं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)