राहुल गांधी : काँग्रेसचं काळे कपडे परिधान करून मोदींविरोधात आंदोलन

काँग्रेस

फोटो स्रोत, InC

Published
वाचन वेळ: 6 मिनिटे

राहुल गांधीची यांची खासदारकी रद्द केल्याप्रकरणी काँग्रेस देशभरात आंदोलन करत आहे.

सोमवारी, 27 मार्चला, काँग्रेसच्या सदस्यांच्या विरोधामुळे दोन्ही सदनांची कार्यवाही सुरू झाल्यानंतर एकाच मिनिटात स्थगित करण्यात आली.

लोकसभेत जशी कार्यवाही सुरू झाली, काँग्रेसचे खासदार घोषणा देत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ जाऊन पोचले. काही नेते हातातले कागदाचे कपटे लोकसभा अध्यक्षांच्या दिशेने फेकताना दिसले.

काँग्रेसचे नेते आणि खासदार काळे कपडे घालून आपला विरोध दर्शवत आहेत.

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधीही काळ्या कपड्यांमध्ये दिसल्या.

दुसरीकडे तृणमुल काँग्रेसच्या ममता बँनर्जीही राहुल गांधीच्या मुद्द्यावरून काँग्रेसला समर्थन देताना दिसल्या. आतापर्यंत विरोध पक्षांच्या एकजुटीमध्ये ममता बॅनर्जी काँग्रेसपासून हातचं अंतर राखून होत्या, पण आता तसं घडताना दिसत नाहीये.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं की, "लोकशाहीच्या रक्षणासाठी जे कोणी पुढे येतील आम्ही त्यांचं स्वागत करतो."

राहुल गांधी प्रकरणावरून विरोधी पक्षांच्या झालेल्या बैठकीत डीएमके, समाजवादी पार्टी, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, जनता दल (युनायडेट), भारत राष्ट्र समिती, सीपीआय, इंडियन यूनियन मुस्लीम लीग, एमडीएमके, केरळ काँग्रेस, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेससारख्या पक्षांचे नेते सहभागी झाले.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरून ट्विट केलं गेलं की, "हुकमशाही सरकारविरोधात आम्ही आमचा आवाज बुलंद करत राहू. अदानी महाघोटाळ्याबद्दल प्रश्न विचारत राहू."

खरगेंनी म्हटलं की, "या आधी कधी अशा गोष्टी झाल्या नाहीत. मोदी सरकारने लोकसभा अध्यक्षांना सांगून राहुल गांधींची खासदारकी काही मिनिटांत रद्द केली जेणेकरून ते अदानीच्या मुद्द्यावर संसदेत बोलू शकणार नाहीत."

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी सावरकरांवर निशाणा साधल्याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.

अनुराग ठाकूर यांनी म्हटलं, "राहुल गांधी कधीच सावरकर होऊ शकत नाहीत. सावरकर परदेशात फिरायला जात नव्हते. ते देशाप्रति समर्पित होते. राहुल गांधींनी कमीत कमी इंदिरा गांधी आणि नेहरूंची इज्जत वाचवायला हवी. इंदिरा गांधींनी स्वतः पत्र लिहून सावरकरांच्या योगदानाचा उल्लेख केला होता."

राहुल गांधींनी ट्विटरच्या बायोमध्ये लिहिलं 'अपात्र खासदार'

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर त्यांनी ट्विटरवरील आपल्या ओळखीच्या रकानात्यात 'डिसक्वालिफाईड एमपी' (अपात्र खासदार) असं लिहिलंय.

25 मार्चला राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली.

राहुल गांधी

मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, तुरुंगात टाका, तरी मी घाबरणार नाही, असं वक्तव्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी केलं.

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांनी 25 मार्चला दिल्लीत पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला.

परदेशातील भाषणावर भाजपने माफीची मागणी केल्याचा प्रश्न राहुल गांधींना विचारला असता, ते म्हणाले, "माझं नाव सावरकर नाहीय. माझं नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही."

या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी मोदी-अदानी संबंधांवर भाष्य केलं. राहुल गांधी म्हणाले, "अदानींच्या शेल कंपनी आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपयांची कुणी गुतंवणूक केली? अदानींचा पैसा नाहीये, तो दुसऱ्या कुणाचा आहे. मग तो कुणाचा आहे?

"मी हाच प्रश्न विचारला. संसदेत पुरावे दिले. अदानी आणि मोदींच्या नात्याविषयी मी सविस्तर बोललो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून या दोघांचं नातं आहे. दोघांचं नातं जुनं आहे. माझ्या भाषणाला थांबवण्यात आलं. मी अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिलं. विमानतळं अदानींनी कायद्याला धाब्यावर बसवून देण्यात आले. मी चिठ्ठी लिहिली. पण काहीच फरक पडला नाही."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्याच्या घडामोडीवर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, मला तुरुंगात टाका, पण मी घाबरणार नाही, बोलत राहणार."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून मोदींनी मला अपात्र केलं. ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली, असंही राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे -

  • मी तुम्हा सगळ्यांना वारंवार म्हटलंय की देशात लोकशाहीवर आक्रमण होत आहे आणि याचं आम्हाला दररोज उदाहरण भेटत आहे.
  • अदानींच्या शेल कंपनी आहेत. त्यात 20 हजार कोटी रुपयांची कुणी गुतंवणूक केली? अदानींचा पैसा नाहीये, तो दुसऱ्या कुणाचा आहे. मग तो कुणाचा आहे?
  • मी हाच प्रश्न विचारला. संसदेत पुरावे दिले. अदानी आणि मोदींच्या नात्याविषयी मी सविस्तर बोललो. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून या दोघांचं नातं आहे. दोघांचं नातं जुनं आहे. माझ्या भाषणाला थांबवण्यात आलं. मी अध्यक्षांना सविस्तर पत्र लिहिलं. विमानतळं अदानींनी कायद्याला धाब्यावर बसवून देण्यात आले. मी चिठ्ठी लिहिली. पण काहीच फरक पडला नाही.
  • माझ्याविषयी मंत्र्यांनी संसदेत खोटं बोलले. मी विदेशी ताकदीची मदत मागितली, असं सांगितलं गेलं. पण हे खोटं आहे.
  • माझी खासदारकी रद्द करून मला थांबवू शकत नाही. मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.
  • राहुल गांधी भारत जोडो यात्रेदरम्यान साडेचार महिने जनतेच्या मध्ये राहिले होते, ते माझे काम आहे आणि ते मी करत राहीन.
  • हा प्रश्न ओबीसींचा नाहीय, हा प्रश्न नरेंद्र मोदी आणि अदानींच्या संबंधांचा आहे. मी तर भारत जोडोत कायम सांगत आलोय की, सर्व समाजांनी एकत्र राहायला हवं, बंधुभाव असायला हवा.
  • माझ्या विरोधात कुणीही असलं तरी मी फक्त खरं ते पाहतो, खरं ते बोलतो. राजकारणात ही फॅशनेबल गोष्ट नसली तरी ते माझ्या रक्तात आहे. या देशानं मला सगळं काही दिलंय. प्रेम दिलंय, आदर दिलाय.
  • वायनाडच्या लोकांसोबत माझे कौटुंबिक संबंध आहे. त्यामुळे मी त्यांच्यासाठी चिठ्ठी लिहिणार आहे. भाजपचे सगळे नेते मोदींना घाबरतात. कारण तुम्हाला माहिती आहे.
  • माझ्या पुढच्या भाषणाची भीती वाटली म्हणून मोदींनी मला अपात्र केलं. ती भीती मी त्यांच्या डोळ्यात पाहिली.
  • मला माझी सदस्यता मिळाली नाही मिळाली, तरी मी माझं काम करत राहीन. मी संसदेत आहे की बाहेर याचा मला काही फरक पडत नाही.
  • मला आयुष्यभरासाठी अपात्र करा, मला तुरुंगात टाका, पण मी घाबरणार नाही, बोलत राहणार.
  • माझं नाव सावरकर नाहीये. माझं नाव गांधी आहे. गांधी कुणाची माफी मागत नाही

काँग्रेसची देशव्यापी जनआंदोलनाची घोषणा

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या विरोधात काँग्रेसनं देशभरात 'जनआंदोलन' सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी (24 मार्च) संध्याकाळी नवी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

देशभरात राबवण्यात येणारे हे आंदोलन सोमवारपासून (27 मार्च) सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

'हाथ से हाथ जोडो' या मोहिमेसोबतच राहुल गांधींच्या अपात्रतेबाबत जनजागृती कार्यक्रम, राज्यघटना वाचवण्याचा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

काल (24 मार्च) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक पक्षाच्या मुख्यालयात पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी सोनिया गांधीही बैठकीला उपस्थित होत्या.

जयराम रमेश पुढे म्हणाले, "मोदी सरकारविरोधात आवाज उठवल्यामुळे राहुल गांधींना जाणूनबुजून अपात्र ठरवण्यात आलं, हे आम्ही देशभरात जाऊन सांगू. 'भारत जोडो' यात्रा ही एक चळवळ बनल्यामुळे आणि अदानी प्रकरणावर काँग्रेसनं उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे भाजप घाबरला आहे."

सर्व विरोधी पक्षनेत्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ केलेल्या वक्तव्याचं स्वागत करत जयराम रमेश म्हणाले की, आता आपण विरोधी ऐक्याचा मुद्दा पद्धतशीरपणे पुढे नेला पाहिजे.

"काँग्रेस अध्यक्ष संसदेत दररोज विरोधी पक्षांशी समन्वय साधत आहेत. आता हे काम बाहेरही करावे लागेल," असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र विधानसभेच्या पायऱ्यांवर काँग्रेसचं आंदोलन

राहुल गांधींचं लोकसभेचं सदस्यत्व रद्द केल्याचे पडसाद देशभर उमटताना दिसतायेत.

महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदवला.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC

'लोकशाहीची हत्या' असे फलकही काँग्रेस नेत्यांच्या हातात होते.

यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार यांसह अनेक आमदार उपस्थित होते.

मी देशासाठी कुठलीही किंमत चुकवायला तयार - राहुल गांधी

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी घेतला आहे. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी ट्वीट करून त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

"मैं भारत की आवाज़ के लिए लड़ रहा हूं। मैं हर कीमत चुकाने को तैयार हूं," असं राहुल गांधी यांनी लिहिलं आहे.

मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे आणि त्यासाठी मी कुठलीही किंमत चुकवायला तयार आहे, असं त्याचा अर्थ आहे.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Twitter/Rahul Gandhi

सुरत कोर्टाने एका अब्रूनुकसानीच्या प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.

गुजरातमध्ये सुरतच्या न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मानहानीच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आहे.

आदेशात काय म्हटलं?

लोकसभा सचिवालयाने यासंदर्भात काढलेल्या आदेशामध्ये राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाबाबत माहिती देण्यात आली आहे.

सचिव उत्पल कुमार सिंह यांच्या नावाने हे पत्र राहुल गांधी, राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, राज्यसभा, निवडणूक आयोग तसंच सर्व मंत्रालय/विभागांना पाठवण्यात आलं आहे.

Loksabha

फोटो स्रोत, Loksabha

या पत्रानुसार, भारतीय संविधानातील लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मधील कलम 10 (1) (e) अन्वये राहुल गांधी यांची खासदारकी 23 मार्च 2023 पासून रद्द करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

2019 मध्ये त्यांनी मोदी आडनावावर टिप्पणी केली होती. सुनावणीच्या वेळी राहुल गांधी कोर्टात उपस्थित होते.'सगळ्याच चोरांचं आडनाव मोदी कसं असू शकतं?' असं कथित वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यानंतर भाजपा आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.राहुल गांधी वायनाड येथून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणूक प्रचाराच्यावेळी कर्नाटकातील कोलार येथे त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.

भारतीय दंड संहितेच्या कलम 499 नुसार या गुन्ह्यासाठी दोन वर्षांची शिक्षा प्रस्तावित आहे.राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा झाली आणि लगेच जामीनही मिळाला आहे.या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं.

महात्मा गांधींचा एक सुविचार त्यांनी या ट्विट मध्ये मांडला, "माझा धर्म सत्य आणि अहिंसेवर आधारित आहेत. सत्य माझा देव आहे. अहिंसा ते मिळवण्याचं साधन" असं ते म्हणाले होते.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)