पुण्यात कर्फ्यूच्या चर्चांना उधाण; जाणून घ्या जमावबंदी आणि संचारबंदी यातील नेमका फरक

संग्रहित फोटो

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, कलम 144 लागू केल्यानंतर अनेक ठिकाणी बंदोबस्त तैनात असतो. (संग्रहित छायाचित्र)
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

पुण्यात लागू करण्यात आलेल्या जमावबंदीच्या आदेशानंतर तिथं सोशल मीडियावर कर्फ्यू लागल्याच्या चर्चांना उधाण झालं. पण नंतर पोलिसांनी हे फक्त नेहमीप्रमाणे जमावबंदीचे आदेश असल्याचं स्पष्ट केलं.

सरकार आवश्यकता असेल त्यानुसार जमावबंदी किंवा संचारबंदीचे आदेश देतं. पण, या दोन्हीचा अर्थ एकच आहे की वेगवेगळा? बरेच जणांना यात गोंधळही होतो.

जमावबंदी आणि संचारबंदी नेमकं काय असतं? या दोन्हींमध्ये नेमका फरक काय, ते पाहूयात.

भारतातल्या फौजदारी दंडसंहितेतील कलम 144 हे जमावबंदी आणि संचारबंदी विषयी माहिती देतं.

जमावबंदी आणि संचारबंदी यातील फरक

कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे कलम लागू केलं जातं. या कलमाच्या वेगवेगळ्या तरतुदींनुसार सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध येतात.

संचारबंदीलाच कर्फ्यू असं म्हटलं जातं. त्यामुळं साधारणपणे जमावबंदी म्हणजे कर्फ्यू नसतो.

ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना जमावबंदी आणि संचारबंदी यांच्यातील फरक स्पष्ट करून सांगितला.

संचारबंदी म्हणजे कुणालाही पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही. तर जमावबंदी म्हणजे तीन किंवा तीनपेक्षा अधिक लोकांना एकत्रितरीत्या बाहेर फिरता येत नाही.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर यांनी मराठी विश्वकोशात अधिक सोप्या भाषेत संचारबंदीबाबत माहिती दिलीय.

"दोन गटांत सुरू झालेला हिंसक संघर्ष, जातीय किंवा इतर कारणाने निर्माण झालेला तणाव, यांमुळे नागरिकांच्या जीविताला वा मालमत्तेला धोका निर्माण झाल्यास, जमावबंदीचा किंवा संचारबंदीचा दिलेला हुकूम," अशी व्याख्या न्या. चपळगावकरांनी मराठी विश्वकोशात दिलीय.

संचारबंदी

फोटो स्रोत, Getty Images

संचारबंदीचा आदेश देण्याचा अधिकार विशिष्ट दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि दंडाधिकाऱ्यांना असतो.

सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर उद्दिष्टानं नागरिकांनी जमाव केल्यास त्यामुळं सार्वजनिक शांततेला धोका पोहोचतो, असं संचारबंदीचा कायदा मानतो. सभा, मिरवणुका काढण्यासही या कायद्यानुसार बंदी घातली जाते.

मुळातच सार्वजनिक शांतता राखण्याच्या हेतूसाठी संचारबंदी ही सर्वांत प्रभावी समजली जाते. संचारबंदीचा भंग करणाऱ्यास शिक्षा होऊ शकते.

संचारबंदीच्या काळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाता येत नाही. पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लोकांना रस्त्यार येता येत नाही.

"सामान्य नागरिकांची संचारबंदीमुळे गैरसोय आणि कुचंबणा होते. म्हणून अशी उपाययोजना कमीत कमी वेळेसाठी करावयाची असते," असं न्या. चपळगावकर मराठी विश्वाकोशातील माहितीत सांगतात.

शिक्षा काय होते?

अ‍ॅड. असीम सरोदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपत्तीच्या काळात कुठले निर्णय घ्यायचे, याचे साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 आणि बॉम्बे पोलीस कायदा, 1951 यानुसार सरकारला अधिकचे अधिकार मिळतात.

त्यानुसार, सरकार कुठल्याही आपत्तीच्या वेळी संचारबंदी लागू करू शकतं. समाजाचं व्यापक हित आणि सार्वजनिक स्वास्थ्यासाठी सरकार अशी पावलं उचलू शकतं.

संचारबंदीचं उल्लंघन केल्यास कोणती शिक्षा केली जाते, याबाबत बोलताना असीम सरोद सांगतात, "संचारबंदीचे नियम मोडल्यास कुठलीही अशी ठोस शिक्षा नाही. पोलीस समज देऊनही सोडू शकतात, दुसरीकडे नेऊन सोडतात, समजपत्र लिहून देतात किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो."

संचारबंदी

फोटो स्रोत, Getty Images

'संचारबंदी कायद्याच्या दोन बाजू'

सार्वजनिक शांतता राखण्यासाठीचा हा कायदा असला, तरी या कायद्याच्या दोन बाजू असल्याचं दिल्लीस्थित वकील सरीम नावेद म्हणतात. त्यांनी द वायरवर यासंदर्भातील लेख लिहिलाय.

"या कायद्याच्या अन्य बाजू आहेत. त्या म्हणजे जिल्हाधिकारी हे कलम लावून कोणाही व्यक्तीस एखादी कृती करण्यास प्रतिबंध करू शकतो किंवा एखादी मालमत्ता ताब्यात घेऊन किंवा ती मालमत्ता स्वत:च्या देखरेखीखाली ठेवू शकतो.

एखाद्या शहरातील वा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था परिस्थिती बिघडल्यास किंवा ती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येता 144 कलम लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांकडे असतात," असं सरीम नावेद त्यांच्या लेखात म्हणतात.

काय आहे कलम 144?

संचारबंदी
  • कलम 144 हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrPC) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.
  • एखाद्या परिसरात जमाव एकत्र येऊन तिथली शांतता भंग करून दंगल माजवण्याची शक्यता असते, अशा ठिकाणी हे कलम लागू करतात.
  • सोप्या शब्दात सांगायचं तर, जमावाने एकत्र येत कायदा हातात घेऊन हिंसाचार घडवू नये, यासाठी हे कलम लावलं जातं.
  • या कलमाला जमावबंदी किंवा संचारबंदी किंवा कर्फ्यू असंही म्हणतात.
  • जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी नोटिफिकेशन जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
  • कलम 144 लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावरही बंदी असते.
  • वर उल्लेख केलेले अधिकारी एखाद्या विशिष्ट परिसरातील कुठल्याही व्यक्तीला किंवा तिथल्या लोकांना किंवा त्या भागाला भेट देणाऱ्या लोकांना नोटीस बजावून एखादी कृती करण्यापासून रोखू शकतात. अर्थात अशी नोटीस बजावण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.
  • कलम 144 चं उल्लंघन करणाऱ्या किंवा पालन न करणाऱ्याला पोलीस अटक करू शकते. कलम 107 किंवा कलम 151 अंतर्गत ही अटक करता येते. कलम 144 अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
  • या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात 2 महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार 6 महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)