विदर्भात उष्णतेची लाट, 'या' जिल्ह्यांना 'रेड अलर्ट'; हवामान विभागानं काय अंदाज वर्तवलाय?

फोटो स्रोत, Getty Images
महाराष्ट्रासह मध्य, आणि वायव्य भारतातील मोठ्या प्रदेशात उष्णतेची लाट आल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं असून विदर्भातील काही जिल्ह्यांत तर तीव्र तापमानासाठी रेड अलर्ट दिला आहे.
वर्धा इथे तर पारा 47 अंश सेल्सियसवर पोहोचला असून, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ इथेही 45 अंश सेल्सियसपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली.
पुढच्या चार पाच दिवसांत विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तीव्र ते अति तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे.
विदर्भातील प्रमुख शहरांचं तापमान
20 मे रोजी वर्धा इथे सर्वाधिक 47.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रातलं हे आज नोंदवलं गेलेलं सर्वाधिक तापमान आहे.

विदर्भात रेड अलर्ट, कोकणात पाऊस
20 मे रोजी मुंबई आणि नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्रांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेची तीव्रता सर्वात जास्त जाणवण्याची शक्यता आहे.
त्यामुळे या तीन जिल्ह्यांत 20 मेची रात्र आणि 21 मे साठी रेड अलर्ट दिला आहे.
या तीनही जिल्ह्यांत काही ठिकाणी दिवसा उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहेच, शिवाय तुरळक ठिकाणी रात्रीचं किमान तापमानही दोन दिवस जास्तच राहील.
यवतमाळमध्येही 20 आणि 21 मे रोजी उष्णतेच्या लाटेसाठी ऑरेंज अलर्ट आहे. तर नागपूर आणि चंद्रपूरमध्ये 20 मे रोजी यलो अलर्ट आणि 21 मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

फोटो स्रोत, IMD
विदर्भातल्या या सर्व जिल्ह्यांमध्ये 21 मे नंतरही किमान तीन दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहील.
दरम्यान, दक्षिण कोकण आणि लगतचा दक्षिण मध्य महाराष्ट्राचा भाग तसंच मराठवाड्याच्या काही भागात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हवामान अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.
सध्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांची उत्तरी सीमा अंदमानमधून जात असून, पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून आगेकूच करण्याची अपेक्षा आहे.
मान्सून कुठे तयार होतो?
मान्सूनची निर्मिती कशामुळे होते, याविषयी काही सिद्धांत आहेत.
पृथ्वी 21 अंशांमध्ये कलली आहे. त्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध सूर्याच्या दिशेला असतो. परिणामी उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो, तेव्हा दक्षिण गोलार्धात थंडी असते.
जास्त तापमान असतं तिथे हवेचा दाब कमी तर कमी तापमानाच्या ठिकाणी हवेचा दाब जास्त असतो. वारे नेहमी जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात.
जमिनीपेक्षा समुद्राचं तापमान थोडं थंड असतं, त्यावेळी समुद्राकडून वारे वाहू लागतात. येताना हे वारे समुद्रावरचं बाष्प आणतात, त्यातून पाऊस पडतो.
पण हे असं चित्र पृथ्वीच्या इतर अनेक ठिकाणी होतं. मात्र भारतीय उपखंडातली स्थिती थोडी खास बनवते.

फोटो स्रोत, BBC Weather
भारतीय द्वीपकल्पाचा आकार मोठा असून उन्हाळ्याच्या दिवसांत इथलं तापमान वेगानं खूप वाढतं आणि जमीनही तापते.
विशेषतः मे महिन्यापर्यंत राजस्थानच्या वाळवंटात उष्णता वाढते. त्याचवेळी अरबी समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात म्हणजे आफ्रिका, सौदी अरेबियन द्वीपकल्प यांचं तापमानही वाढतं.
परिणामी हिंदी महासागरातून उत्तर गोलार्धात आलेले वारे भारतीय द्वीपकल्पाकडे वाहू लागतात. या वाऱ्यांसोबत मोठ्या प्रमाणात बाष्पही येतं. त्यातून ढगांची निर्मिती होते आणि पाऊस पडतो.
ऑक्टोबर उजाडेपर्यंत तापमान आणि वाऱ्यांच्या दिशेचं गणित बदलतं, वारे ईशान्येकडून वाहू लागतात.
मान्सून हा शब्द कुठून आला? मान्सूनचे प्रकार कोणते?
काही भाषातज्ज्ञांच्या मते, मान्सून या शब्दाचं मूळ अरबी भाषेतल्या मौसीम या शब्दात आहे. मौसीम म्हणजे मोसमी वारे किंवा ऋतूनुसार वाहणारे वारे.
दक्षिण आशियात ठराविक काळात मोसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. इतका की त्या काळाला पावसाळ्याचा ऋतू म्हणून इथे स्वतंत्र ओळख मिळाली आहे.
याच मोसमी वाऱ्यांसाठी मान्सून हा शब्द ब्रिटिशकालीन भारतात वापरला जाऊ लागला.

फोटो स्रोत, Getty Images
भारतात जून ते सप्टेंबर या काळात वारे नैऋत्य दिशेकडून म्हणजे साधारण अरबी समुद्राकडून हिमालयाकडे वाहतात. या वाऱ्यांना नैऋत्य मोसमी वारे किंवा नैऋत्य मान्सून (साऊथ-वेस्ट मान्सून) म्हणून ओळखतात.
तर ऑक्टोबर महिन्यात वारे याच्या उलट दिशेने म्हणजे ईशान्येकडून वाहतात. त्यांना ईशान्य मोसमी वारे किंवा ईशान्य मान्सून (नॉर्थ वेस्ट मान्सून) म्हणतात. या वाऱ्यांमुळे ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात दक्षिण भारतात, प्रामुख्यानं तामिळनाडूमध्ये पाऊस पडतो.
नैऋत्य मान्सूनच्याही 2 शाखा आहेत – एक अरबी समुद्रातली आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली.
मान्सून आपल्यासारखं कॅलेंडर मानत नाही, पण आकडेवारीसाठी सोयीचं म्हणून भारतीय हवामान विभागातर्फे 1 जून ते 30 सप्टेंबर हा नैऋत्य मान्सूनचा कालावधी म्हणून गणला जातो.
तर ईशान्य मान्सून साधारण 20 ऑक्टोबरच्या आसपास सक्रीय होतो.
मान्सूनमुळे किती पाऊस पडतो?
भारतात साधारण 80 टक्के पाऊस हा नैऋत्य मान्सूनमुळे पडतो, तर साधारण 11 टक्के पाऊस ईशान्य मान्सूनमुळे पडतो असं हवामान खात्याच्या नोंदी सांगतात.
भारतात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी 87 सेंटीमीटर एवढा पाऊस पडतो.
मान्सून का महत्त्वाचा?
जून- सप्टेंबर या मान्सूनच्या काळात साधारणपणे वर्षभरातील 70 टक्के पाऊस पडतो. यामुळे शेतीसोबतच, नद्या, धरणं, तलाव, विहिरी भरण्यासाठी मान्सून महत्त्वाचा ठरतो.
मान्सूनमुळे पडणाऱ्या पावसामुळे तीव्र उष्णतेपासून सुटका होते. पण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनंही मान्सून महत्त्वाचा आहे. दक्षिण आशियातल्या अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
भारतासारख्या शेतीप्रधान देशात आजही अनेक गणितं पावसावर अवलंबून असतात. एका रिपोर्टनुसार भारतातील जवळपास अर्धी शेती ही मान्सूनवरच्या पावसावर अवलंबून आहे.
भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेसाठी मान्सून ही लाइफलाईन मानली जाते. कमी किंवा जास्त पावसानं शेतीचं नुकसान होतं.
1925 मध्ये ब्रिटनच्या रॉयल कममिशन ऑन अॅग्रिल्चर इन इंडियानं एका अहवालात भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे मान्सूनचा जुगार असल्याचं म्हटलं होतं. 100 वर्षांनंतरही परिस्थिती बदललेली नाही.
एल निनो, ला निना आणि मान्सून
एल-निनो आणि ला-निना ही पॅसिफिक महासागरातल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ट स्थितींची नावं आहेत.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.

या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
पण फक्त एकट्या एल निनोमुळे मान्सूनवर परिणाम होत नाही. तर एल निनोसारखाच हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा प्रवाहही महत्त्वाचा ठरतो.
मान्सूनचा दीर्घकालीन अंदाज असा वर्तवला जातो
मान्सूनचा अंदाज वर्तवण्यासाठी काही प्रमुख गोष्टींचा आधार घेतला जातो. त्यातल्या 4 गोष्टी आहेत :
1. इंडियन ओशन डायपोल (IOD) म्हणजेच हिंदी महासागरातील द्विध्रुव. अर्थात या महासागराच्या पूर्व आण पश्चिम भागांतील पाण्याचं असमान तापमान.
IOD सकारात्मक असतो, म्हणजे पश्चिम हिंदी महासागराचं तापमान पूर्वेपेक्षा जास्त असतं, तेव्हा ती स्थिती भारतात मान्सूनला पोषक ठरताना दिसते.
2. एल निनो सदर्न ऑसिलेशन (ENSO) म्हणजे पॅसिफिक महासागरातील एल निनो प्रवाहाची स्थिती.
पॅसिफिक महासागरात दक्षिण अमेरिकेच्या आसपास पाण्याचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा वाढते आणि ते गरम पाणी पश्चिमेला आशियाकडे सरकते, तेव्हा त्या स्थितीला 'एल-निनो' असं संबोधलं जातं. ला निना ही त्याउलट स्थिती आहे.
या एल निनो आणि ला निना प्रवाहांचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवरही परिणाम होताना दिसतो. साधारणपणे भारतात एल निनोच्या काळात कमी तर ला निनाच्या काळात जास्त पाऊस पडताना दिसतो.
3. उत्तर गोलार्धात हिवाळा आणि वसंत ऋतूत झालेला हिमवर्षाव कमी असतो, तेव्हा त्या वर्षी मान्सूनच्या काळात भारतात पाऊस सहसा जास्त पडतो.
4. जेट स्ट्रीम या वातावरणाच्या वरच्या थरातील हवेच्या प्रवाहाचाही मान्सूनवर, विशेषतः मान्सूनच्या आगमनावर परिणाम होतो.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.


















