इस्रायली सैन्यानं केला बंदुकीच्या धाकावर BBC च्या टीमचा 7 तास छळ, नेमकं काय घडलं?

- Author, फेरास किलानी
- Role, बीबीसी अरेबिक, विशेष प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
9 मे 2025 च्या सकाळी मी बीबीसी अरेबिकच्या टीमसोबत होतो. आमची टीम सीरियाची राजधानी दमास्कस येथून दक्षिणेकडील डेरा प्रांताकडे निघाली होती. तिथून आम्ही इस्रायलने कब्जा केलेल्या गोलान टेकड्यांच्या सीमेवर जाण्याची योजना आखली होती.
बशर अल-असद यांच्या राजवटीच्या पतनानंतर डिसेंबरपासून इस्रायली लष्करानं ज्या सीरियन भूभागाचा ताबा घेतला आहे, त्या भागाच्या जवळ जाण्याची आमची योजना होती.
इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले होते की, 'हा निःशस्त्रीकरण (डिमिलिटराइज्ड) केलेली बफर झोन आणि शेजारचा भाग अनिश्चित काळासाठी ताब्यात घेतला आहे."
आमची सात जणांची टीम होती. मी स्वतः (ब्रिटिश नागरिक), दोन इराकी बीबीसी कर्मचारी आणि चार सीरियन, तीन फ्रीलान्सर आणि एक बीबीसी कॅमेरामन अशी आमची टीम होती.
आम्ही अल-राफीद या शहराजवळ, यूएन डिसएंगेजमेंट ऑब्झर्व्हर फोर्सच्या (यूएनडीओएफ) एका निरीक्षण पोस्टजवळ चित्रीकरण करत होतो.
त्यावेळी यूएनच्या एका अधिकाऱ्यानं इस्रायली बाजूने आमची ओळख विचारण्यात आली होती, असं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी त्यांना आम्ही बीबीसीचे कर्मचारी आहोत, हे कळवलं असल्याचंही म्हटलं.
यानंतर आम्ही उत्तर दिशेने कुनेत्रा शहराकडे निघालो, जे 1974 मध्ये सिरिया आणि इस्रायल यांच्यात झालेल्या सैन्य माघार करारापासून बफर झोनमध्ये येते. इस्रायलने 1967 च्या मध्यपूर्व युद्धात गोलान प्रदेश ताब्यात घेतला होता.
'आमचे फोन, लॅपटॉप ताब्यात घेतले'
शहरापासून सुमारे 200 मीटर (600 फूट) अंतरावर, एका चौकीवर (चेकपॉइंट) आम्हाला अडवण्यात आलं. त्या चौकीच्या बाजूला आम्हाला मर्कावा टँक्स (रणगाडा) दिसले. त्यापैकी एका टँकवर इस्रायली झेंडा फडकत होता.
जवळच्याच एका टॉवरवरून दोन इस्रायली सैनिक आम्हाला पाहत होते. त्यापैकी एक जण दुर्बिणीतून पाहत होता. त्यावेळी माझ्या एका सहकाऱ्यानं त्यांना दिसावं म्हणून आपलं बीबीसीचं ओळखपत्र वर धरलं.
माझ्या टीमसोबत जे पुढं घडलं त्याबाबत बीबीसीनं इस्रायली लष्कराकडे तक्रार केली आहे. परंतु, अद्याप त्याला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
जसं आम्ही त्या भागात चित्रीकरण सुरू केलं, त्याच्या एका मिनिटाच्या आत चेकपोस्टच्या दुसऱ्या बाजूनं एक पांढरी कार आमच्याकडे येताना दिसली.

फोटो स्रोत, AFP
त्या कारमधून चार इस्रायली सैनिक उतरले आणि त्यांनी आम्हाला घेरलं. त्यांनी आमच्या डोक्यावर रायफल्स रोखल्या आणि कॅमेरा रस्त्याच्या कडेला ठेवण्यास सांगितलं.
आम्ही बीबीसीची टीम आहोत, हे मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण परिस्थिती अनपेक्षितपणे लवकरच चिघळली.
मी लंडनमधील माझ्या बीबीसीच्या सहकाऱ्यांना इस्त्रायली सैनिकांनी आम्हाला थांबवलं आहे, असा एक संदेश पाठवू शकलो. त्यानंतर आमचे फोन आणि सर्व उपकरणं जप्त करण्यात आली. आणखी इस्रायली सैनिक लष्करी वाहनात आले आणि आमच्या कारची कसून तपासणी केली.
सैनिकांनी आम्हाला बॅरियर पार करून कुनेत्रा शहरात नेलं आणि तिथे गोलानपासून वेगळं करणाऱ्या क्रॉसिंग पॉइंटवर थांबवलं. तिथे सैनिकांनी आम्हाला आमच्या कारमध्ये बसवलं.
माझ्या डोक्यापासून सैनिकानं त्याची रायफल ताणून फुटेज तपासायला सुरुवात केली. दोन तासांहून अधिक वेळ गेल्यानंतर, एका सैनिकानं मला कारमधून उतरून मोबाइलवर बोलायला सांगितलं.
डोळ्यावर पट्ट्या अन् हातात बेड्या
माझ्याशी फोनवर कोण बोलतोय हे माहीत नव्हतं. तो तुटक अरबी भाषेत बोलत होता. त्यानं आम्ही इस्रायली सैन्याच्या स्थानांचं चित्रीकरण का करत आहोत, असं विचारलं.
मी त्याला सांगितलं की, मी ब्रिटिश बीबीसी पत्रकार आहे आणि आमच्या कामाचं स्वरूप त्याला स्पष्ट केलं. त्यानंतर मी माझ्या कारकडे परतलो. पण पुन्हा रायफल माझ्या डोक्यावर ताणण्यात आली होती.
तासाभराच्या प्रतीक्षेनंतर, आणखी एक वाहन आलं. त्यातून काही सुरक्षा कर्मचारी बाहेर पडले, त्यांच्याकडे डोळे झाकण्यासाठी पट्ट्या आणि प्लास्टिकच्या झिप टायझ होते. त्यांनी मला आधी बाहेर पडायला सांगितलं.
पॅलेस्टिनी अरबी भाषा अस्खलित बोलणाऱ्या लीड ऑफिसरनं मला त्या क्रॉसिंग पॉईंटवरील एका खोलीकडे नेलं, जे पूर्वी सीरियन सैन्य वापरत असत.
जमिनीवर फुटलेल्या काचा आणि कचरा पसरलेला होता. मला वेगळी वागणूक दिली जाईल, असं त्यानं मला सांगितलं. माझ्या हातात बेड्या घातल्या नव्हत्या किंवा डोळ्यावर पट्टीही बांधली नव्हती. माझ्या उर्वरित टीमपेक्षा मला वेगळी वागणूक होती.
मला धक्का बसला होता. आम्ही बीबीसीचे कर्मचारी आहोत, हे माहीत असूनही तुम्ही असं का करत आहात?, असं मी त्यांना विचारलं.
तो आम्हाला इथून लवकर बाहेर काढण्यास मदत करू इच्छितो आणि त्यामुळं आम्हाला त्यांच्या सूचना मान्य कराव्या लागतील, असं तो मला म्हणाला.
कपडे काढले, धमकीही दिली
थोड्यावेळानं, दुसरा एक अधिकारी आत आला आणि मला माझ्या अंडरवेअर वगळता बाकीचे सर्व कपडे उतरवण्यास सांगितले. मी सुरुवातीला नकार दिला, पण त्यांनी जबरदस्ती केली आणि धमकी दिली, त्यामुळे मी ते मान्य केलं.
त्याने माझ्या अंडरवेअरच्या आतही, पुढून आणि मागून तपासलं. नंतर परत कपडे घालण्यास सांगितलं आणि माझी चौकशी सुरू केली. या चौकशीत त्यांनी मला वैयक्तिक प्रश्नं विचारली. माझ्या मुलांबाबत आणि त्यांच्या वयाबाबत काही प्रश्नं त्यांनी विचारली.
शेवटी त्यांनी मला खोलीतून सोडलं, तेव्हा मला माझ्या टीमचे सदस्य बांधून ठेवलेल्या आणि डोळ्यांवर पट्टी बांधलेल्या भयानक अवस्थेत दिसले.

मी त्या अधिकाऱ्याला त्यांना सोडण्याची विनंती केली. त्यांनी चौकशीनंतर सोडण्याचं आश्वासन दिलं. त्यांना एक-एक करून त्याच खोलीत नेलं आणि त्यांचेही कपडे काढून तपासणी आणि चौकशी केली गेली.
माझ्या सहकाऱ्यांना नंतर बाहेर आणलं. त्यांचे हात अजूनही बांधलेल्या अवस्थेत होते. परंतु, यावेळी त्यांच्या डोळ्यांवर पट्टी नव्हती. दोन तासांहून अधिक वेळ त्यांची चौकशी करण्यात आली.
यात त्यांनी आमचे सर्व फोन आणि लॅपटॉप तपासले. त्यांनी अनेक फोटो डिलीट केले. आमचे वैयक्तिक फोटोही त्यांनी डिलीट केले.
जर तुम्ही पुन्हा सीरियाचा बाजूने सीमेच्या जवळ गेलो तर त्याचे वाईट परिणाम होतील. तुमच्याबद्दल आमच्याकडे सर्व माहिती आहे आणि कोणताही लपवलेला किंवा डिलीट केलेला फोटो प्रसिद्ध झाला तर आम्ही तुम्हाला शोधून काढू, अशी धमकी त्या अधिकाऱ्यानं आम्हाला दिली.
अखेर सात तासांच्या चौकशीनंतर सुटका
सुमारे सात तासांनी आमच्या अटकेनंतर, रात्री 9 वाजले होते. आम्हाला दोन वाहनांनी नेलं. एक आमच्या कारच्या पुढे आणि दुसरं वाहन आमच्या मागे, कुनेत्राच्या सुमारे 2 किलोमीटर (1.2 मैल) ग्रामीण भागात आम्हाला नेलं.
तेथे वाहनं थांबली आणि आमचे फोन असलेली एका पिशवी आमच्याकडे फेकली, त्यानंतर ती वाहनं तिथून निघून गेली.
आम्ही अंधारात हरवलो होतो, मोबाइलला सिग्नल नाही, इंटरनेट नाही आणि आम्ही कुठं आहोत याची कल्पनाही आम्हाला नव्हती. अशा अवस्थेत आम्ही एक छोटं गाव येईपर्यंत गाडी चालवत राहिलो.
मुलांच्या एका ग्रूपनं आम्हाला महामार्गाचा रस्ता दाखवला आणि आम्हाला सावधही केलं. आम्ही चुकीचं वळण घेतल्यास इस्त्रायलचे सैनिक गोळीबार करू शकतात, असं त्यांनी म्हटलं. ती दहा मिनिटं अत्यंत तणावाची होती. शेवटी रस्ता सापडला आणि त्यानंतर पंचेचाळीस मिनिटांनी आम्ही दमास्कसला पोहोचलो.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























