'मुलं म्हणतात, बाबा जेवण द्या...मी कुठून देऊ' अफगाण कुटुंबांवर नाईलाजानं पोटच्या मुलांना विकण्याची वेळ

अब्दुल रशीद अजीमी, इतर मुलांना जेऊ घालता यावं यासाठी त्यांच्या एका मुलीला विकण्यास तयार आहेत

फोटो स्रोत, Imogen Anderson/BBC

फोटो कॅप्शन, अब्दुल रशीद अजीमी, इतर मुलांना जेवू घालता यावं यासाठी त्यांच्या एका मुलीला विकण्यास तयार आहेत
    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तान प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

(इशारा: या लेखातील काही माहिती तुम्हाला अस्वस्थ करू शकते)

सकाळ होताच अफगाणिस्तानातील गोर प्रांताची राजधानी असलेल्या चघचरानमध्ये धुळीनं माखलेल्या एका चौकात शेकडो माणसं गोळा होतात.

त्यांच्या चेहऱ्यावर थकवा असतो. मात्र तरीदेखील कोणीतरी येईल आणि त्यांना काही काम देईल, या आशेनं ते रस्त्याच्या एका बाजूला रांगेत उभे असतात. त्यांना काम मिळालं की नाही, यावरच त्या दिवशी त्यांच्या कुटुंबाच्या पोटात अन्न जाणार की नाही, हे अवलंबून असतं.

अर्थात, त्यांना काम मिळण्याची शक्यता खूप कमी असते.

जुमा खान 45 वर्षांचे आहेत. त्यांना गेल्या 6 आठवड्यांमध्ये फक्त 3 दिवसच काम मिळालं आहे. त्या कामाचे त्यांना रोजचे 150 ते 200 अफगाणी (अंदाजे 225 ते 300 रुपये) मिळत होते.

"माझी मुलं लागोपाठ 3 रात्री उपाशीपोटी झोपली. माझी पत्नी रडत होती. माझी मुलंदेखील रडत होती. त्यामुळे मी पीठ विकत आणण्यासाठी शेजाऱ्याकडे पैसे उसनवार मागितले," असं ते म्हणाले.

"माझी मुलं उपासमारीनं मरतील अशी मला भीती वाटते," असं जुमा खान म्हणाले.

ही काही एकमेव आणि फक्त त्यांच्या एकट्याचीच गोष्ट नाही.

गरीब, कर्जबाजारी आणि असहाय

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

संयुक्त राष्ट्रसंघानुसार आज अफगाणिस्तानातील दर 4 पैकी 3 जण त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत. तिथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. आरोग्य सेवा कोलमडली आहे. बाहेरून देशातून येणाऱ्या मदतीचा ओघ देखील कमी झाला आहे. या मदतीमुळे देशातील लाखो लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण होत असत.

अफगाणिस्तानात उपासमार आता विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. जवळपास 47 लाख लोक, म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या 10 व्या भागांहूनही अधिक, दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहेत.

अफगाणिस्तानातील ज्या प्रांतांमध्ये सर्वात भीषण परिस्थिती आहे, त्यामध्ये गोर प्रांत आहे. तिथले लोक असहाय झालेले आहेत.

दाटून आलेल्या गळ्यानं रबानी म्हणाले, "मला फोन आला की माझी मुलं दोन दिवसांपासून उपाशीपोटी आहेत. मला वाटलं की मी आत्महत्या करावी. मात्र, मग माझ्या मनात विचार आला की त्यामुळे माझ्या कुटुंबाला काय मदत होईल? त्यामुळे मी कामाच्या शोधात इथे उभा आहे."

ख्वाजा अहमद कसेबसे थोडंसं बोलतात आणि त्यांना रडू कोसळतं.

"आम्ही भूकेनं व्याकूळ झालेलो आहोत. माझी मोठी मुलं वारली आहेत. त्यामुळे माझ्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी मला काम करायचं आहे. मात्र मी आता वृद्ध झालो आहे. त्यामुळे मला कोणी काम देत नाही," असं ते म्हणाले.

जुमा खान (मध्यभागी) यांना गेल्या 6 आठवड्यांमध्ये फक्त 3 दिवस काम मिळालं आहे

फोटो स्रोत, Imogen Anderson/BBC

फोटो कॅप्शन, जुमा खान (मध्यभागी) यांना गेल्या 6 आठवड्यांमध्ये फक्त 3 दिवस काम मिळालं आहे

चौकाजवळ एक स्थानिक बेकरी उघडते. त्याचा मालक समोरच्या गर्दीमध्ये शिळ्या रोट्या वाटतो. काही सेकंदातच तिथे झटापटीमध्ये रोट्यांचे तुकडे होतात. काहीजण रोटीच्या त्या मौल्यवान तुकड्यांना घट्ट पकडून ठेवतात.

अचानक एका बाजूला गोंधळ उडतो. मोटरसायकलवर एक माणूस येतो. त्याला विटा वाहण्यासाठी एक मजूर हवा आहे. अनेकजण त्याच्या दिशेनं पळतात.

आम्ही तिथे 2 तास होतो. यादरम्यान तिथे फक्त 3 जणांना काम मिळालं.

जवळच्या वस्त्यांच्या मागच्या बाजूला सियाह कोह पर्वतरांगेची बर्फाच्छादित शिखरं आहेत. त्याच्या पुढे ओसाड, तपकिरी डोंगरांवर विखुरलेल्या मातीच्या घरांमधून बेरोजगारीचे विनाशकारी परिणाम स्पष्टपणे दिसून येतात.

अब्दुल रशीद अजीमी आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. ते त्यांची 2 मुलं, रोकिया आणि रोहिला या 7 वर्षांच्या जुळ्या मुलींना आमच्या समोर आणतात. ते या मुलांना घट्टपणे जवळ ओढतात. त्यांना असहायपणे नाईलाजानं किती निर्णय घ्यावे लागणार आहेत, हे सांगण्यास ते अधीर आहेत.

"मी माझ्या मुलींना विकण्यास तयार आहे. मी गरीब आहे. कर्जबाजारी आहे आणि असहाय आहे," असं ते रडत सांगतात.

"मी कामावरून घरी परततो, तेव्हा ओठ सुकलेले असतात. उपाशी, त्रस्त आणि गोंधळलेलो, विचारात पडलेलो असतो. माझी मुलं माझ्याकडे येऊन म्हणतात, 'बाबा आम्हाला रोटी द्या.' मात्र मी काय देऊ? काम कुठे मिळतंय?" असं ते व्याकुळ होऊन सांगतात.

कामाच्या प्रतीक्षेत असलेले गरीब अफगाण लोक, मात्र काम मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे

फोटो स्रोत, Imogen Anderson/BBC

फोटो कॅप्शन, कामाच्या प्रतीक्षेत असलेले गरीब अफगाण लोक, मात्र काम मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे

अब्दुल म्हणाले की ते त्यांच्या मुलींनी लग्नासाठी किंवा घरातील काम करण्यासाठी विकण्यास तयार आहेत. ते म्हणतात, "जर मी एक मुलगी विकली, तर मी माझ्या उरलेल्या मुलांना किमान 4 वर्षे जेऊ घालू शकतो."

ते रोहिला या त्यांच्या मुलीला जवळ घेतात आणि रडत तिचं चुंबन घेतात. "या विचारानं माझं मन व्याकूळ होतं, मात्र हाच एक मार्ग आहे," असं ते म्हणतात.

या मुलांची आई कायहान म्हणतात, "आमच्याकडे खायला फक्त रोटी आणि गरम पाणी आहे. चहासुद्धा नाही."

मुलांऐवजी मुलींना विकण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण तिथे सांस्कृतिकदृष्ट्या मुलांना भविष्यात कमाई करणारा मानलं जातं. अफगाणिस्तानात महिला आणि मुलींच्या शिक्षण आणि कामावर तालिबाननं निर्बंध घातल्यामुळे हा विचार आणखी घट्ट रुजला आहे.

याव्यतिरिक्त, लग्नात मुलाच्या कुटुंबाकडून मुलीच्या कुटुंबाला भेटवस्तू दिल्या जातात, ही परंपरादेखील आहे.

अब्दुल आणि कायहान यांची दोन किशोरवयीन मुलं शहरात बूट पॉलिश करण्याचं काम करतात. आणखी एक मुलगा कचरा गोळा करतो. कायहान या कचऱ्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी इंधन म्हणून करतो.

मुलीला विकलं...किमान ती जिवंत तरी राहील

सईद अहमद म्हणाले की शाइका या त्यांच्या 5 वर्षांच्या मुलीला जेव्हा अपेंडिसायटिस आणि लिव्हरमध्ये सिस्ट झाली होती, तेव्हा त्यांना नाईलाजानं तिला विकावं लागलं.

"माझ्याकडे उपचार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे मी माझ्या मुलीला एका नातेवाईकाला विकलं," असं ते म्हणाले.

शाइकावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया झाली. यासाठीचा पैसा तिला विकून जी रक्कम मिळाली होती, त्यातून आला. तिला 2 लाख अफगाणी (3,200 डॉलर) (अंदाजे 3,06,240 रुपये) ला विकण्यात आलं होतं.

"जर मी त्यावेळेस पूर्ण रक्कम घेतली असती, तर तो तिला त्याच्यासोबत घेऊन गेला असता. त्यामुळे मी त्याला सांगितलं की आता उपचारांसाठी जितके पैसे हवे आहेत तितके दे आणि बाकीचे पैसे पुढील 5 वर्षांमध्ये दे. त्यानंतर तू तिला तुझ्यासोबत घेऊन जाऊ शकतोस. ती त्याची सून होईल," असं सईद म्हणाले.

शाइका तिचे छोटेसे हात त्यांच्या गळ्याभोवती टाकते. दोघांमधील प्रेम स्पष्टपणे दिसतं. मात्र 5 वर्षांनी ती फक्त 10 वर्षांची होईल. त्यावेळेस तिला त्या नातेवाईकाच्या घरी जाऊन त्याच्या एखाद्या मुलाशी लग्न करावं लागेल.

"जर माझ्याकडे पैसे असते, तर मी हा निर्णय कधीच घेतला नसता. मात्र मी विचार केला की जर शस्त्रक्रिया न होताच ती मेली तर?" असं सईद म्हणाले.

"इतक्या लहान वयाच्या आपल्या मुलांना देणं, खूप चिंताजनक गोष्ट आहे. लहान वयात लग्न केल्याच्या वेगळ्या समस्या असतात. मात्र तिच्यावर उपचार करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मी हाच विचार केला की किमान ती जिवंत तरी राहील," असं ते पुढे म्हणाले.

सईद अहमद म्हणाले की त्यांनी शाइका या त्यांच्या 5 वर्षांच्या मुलीला विकलं आहे

फोटो स्रोत, Imogen Anderson/BBC

फोटो कॅप्शन, सईद अहमद म्हणाले की त्यांनी शाइका या त्यांच्या 5 वर्षांच्या मुलीला विकलं आहे

अफगाणिस्तानात बालविवाह करण्याची पद्धत अजूनही मोठ्या प्रमाणात आहे. तालिबान सरकारनं मुलींच्या शिक्षणावर बंदी घातल्यामुळे ही प्रथा आणखी वाढते आहे.

फक्त 2 वर्षांपूर्वीपर्यंत सईदला काही मदत मिळत होती.

त्यावेळेस अफगाणिस्तानातील लाखो लोकांप्रमाणेच, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला अन्नधान्याची मदत मिळत होती. त्यांना पीठ, खाद्यतेल, डाळी आणि मुलांसाठी पोषक सप्लीमेंट मिळत होतं.

मात्र गेल्या काही वर्षांमध्ये मिळणाऱ्या मदतीत मोठी कपात झाली आहे. त्यामुळे या जीवनावश्यक मदतीपासून मोठ्या संख्येनं लोक वंचित झाले आहेत.

कधीकाळी अमेरिका अफगाणिस्तान सर्वाधिक मदत करणारा देश होता. मात्र गेल्या वर्षी अमेरिकेनं अफगाणिस्तानला दिली जाणारी जवळपास सर्व मदत थांबवली आहे. इतर काही प्रमुख मदत करणाऱ्या देशांनी देखील त्यांच्या मदतीत मोठी कपात केली आहे. यात ब्रिटनचाही समावेश आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सध्याच्या आकडेवारीनुसार, या वर्षी अफगाणिस्तानला आतापर्यंत मिळालेली 2025 च्या तुलनेत 70 टक्क्यांनी कमी आहे.

अफगाणिस्तानच्या निम्म्याहून अधिक प्रांतांना भयंकर दुष्काळाचा फटका बसला आहे. या दुष्काळामुळे परिस्थिती आणखी भीषण होते आहे.

अब्दुल मलिक हे गावकरी म्हणाले, "आम्हाला कोणाकडूनच मदत मिळाली नाही. सरकारकडून नाही, स्वयंसेवी संस्थाकडून देखील नाही."

कुपोषणामुळे वाढला बाल मृत्यूदर

तालिबान सरकार 2021 मध्ये सत्तेत आलं. अफगाणिस्तानातील या परिस्थितीसाठी तालिबान सरकार आधीच्या सरकारला जबाबदार ठरवतं. परदेशी सैन्यानं अफगाणिस्तान सोडल्यानंतर तालिबाननं त्या सरकारला सत्तेतून हटवलं होतं.

तालिबान सरकारचे उप-प्रवक्ते हम्दुल्लाह फित्रत बीबीसीला म्हणाले, "अमेरिकेनं अफगाणिस्तानवर केलेल्या 20 वर्षांच्या आक्रमणाच्या काळात डॉलरच्या पुरवठ्यामुळे इथे एक कृत्रिम अर्थव्यवस्था तयार झाली होती."

"अमेरिकेनं आक्रमण संपल्यानंतर आम्हाला गरीबी, अडचणी, बेरोजगारी आणि इतर समस्या वारशाच्या स्वरूपात मिळाल्या."

अर्थात, मदत करणाऱ्या देशांनी हात आखडते घेण्यामागचं एक मुख्य कारण तालिबान सरकारची धोरणंदेखील आहे. विशेषकरून त्यांनी महिलांवर घातलेली बंधनं.

याबद्दल विचारलं असता, तालिबान सरकारनं मदत करणाऱ्यांनी हात आखडते घेण्याबाबत कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला. ते म्हणाले की, "मानवतावादी मदतीचं राजकारण करायला नको."

फित्रत असंही म्हणाले की तालिबान "मोठ्या आर्थिक योजना लागू करून गरीबी दूर करण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी" योजना तयार करतं आहे. यासाठी त्यांनी काही पायाभूत सुविधा आणि खाणउद्योगातील योजनांचा उल्लेखदेखील केला.

नर्स फातिमा म्हणाल्या की बालकांचा मृत्यू होताना पाहणं ही आता जवळपास सामान्य बाब झाली आहे

फोटो स्रोत, Imogen Anderson/BBC

फोटो कॅप्शन, नर्स फातिमा म्हणाल्या की बालकांचा मृत्यू होताना पाहणं ही आता जवळपास सामान्य बाब झाली आहे

भलेही दीर्घकालीन योजना कधीतरी उपयुक्त ठरतील. मात्र हे स्पष्ट आहे की जर तात्काळ मदत मिळाली नाही, तर लाखो लोक जिवंत राहू शकणार नाहीत.

असंच, मोहम्मद हाशेम यांच्या 14 महिन्यांच्या मुलीचा काही आठवड्यांपूर्वी मृत्यू झाला.

"माझी मुलगी उपासमार आणि औषधांच्या अभावामुळे मरण पावली...जेव्हा एखादा मूल आजारी आणि उपाशी असतं, तेव्हा त्याचा मृत्यू होणार हे स्पष्ट असतं," असं ते म्हणाले.

एका स्थानिक वृद्धानं सांगितलं की गेल्या 2 वर्षांमध्ये बाल मृत्यूदर 'खरोखरंच खूप वाढला आहे.' विशेषकरून कुपोषणामुळे त्यात वाढ झाली आहे.

अर्थात, इथे मृत्यूची कोणतीही औपचारिक किंवा अधिकृत नोंद ठेवली जात नाही. मुलांच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे पुरावे फक्त कब्रस्तानातच मिळतात. त्यासाठी आम्ही छोट्या आणि मोठ्या कबरींची वेगवेगळी मोजदाद केली. आम्ही आधीदेखील असं केलं आहे.

छोट्या कबरींची संख्या मोठ्या कबरींच्या संख्येच्या जवळपास दुप्पट होती. यातून असं दिसून येतं की मरणाऱ्या मुलांची संख्या प्रौढांपेक्षा जवळपास दुप्पट आहे.

चघचरानच्या मुख्य प्रांतीय हॉस्पिटलमध्ये देखील असेच पुरावे मिळाले.

'मृत्यूदर 10 टक्क्यांपर्यंत पोहोचतो, हे स्वीकारार्ह नाही'

नवजात बाळांसाठीचा विभाग सर्वात व्यग्र आहे. तिथे प्रत्येक अंथरुण भरलेलं आहे. काहींवर दोन-दोन मुलं आहेत. यातील बहुतांश बाळं कमी वजनाची आहेत. बहुतांश बालकांना स्वत:हून श्वास घेण्यामध्ये अडचण येते आहे.

एक परिचारिका एक छोटासा पाळणा घेऊन येते. त्यामध्ये नवजात जुळ्या मुली आहेत. त्या अकाली म्हणजे 2 महिने आधीच जन्माला आल्या. एकीचं वजन 2 किलो आहे, तर दुसरीचं वजन फक्त 1 किलो आहे.

त्यांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना लगेच ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं.

त्यांची आई, 22 वर्षांची शकीला, प्रसूती वार्डात आहे.

जुळ्या मुलींच्या आजी, गुलबदन म्हणाल्या, "त्या अशक्त आहेत. कारण गरोदरपणात तिला खायला जवळपास काहीच नव्हतं. तिला फक्त रोटी आणि चहा मिळत होता. त्यामुळेच मुलींची अवस्था अशी आहे."

त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानंतर काही तासांमध्येच, जास्त वजन असणाऱ्या मुलीचा मृत्यू झाला. तिचं अजून नावदेखील ठेवण्यात आलं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी त्यांच्या शोकाकूल आजीनं सांगितलं, "डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र ती वाचू शकली नाही."

"मी तिच्या छोट्याशा शरीराला कापडात गुंडाळलं आणि घरी घेऊन गेली. तिच्या आईला हे माहित होताच ती बेशुद्ध झाली."

गुलबदन त्या जिवंत असलेल्या मुलीकडे खूण करत म्हणाल्या, "किमान ही तरी वाचेल, अशी मला आशा आहे."

नर्स फातिमा हुसैनी म्हणाल्या की, एखाद्या दिवशी तर तीन बालकांचा देखील मृत्यू होतो.

त्या म्हणाल्या, "सुरुवातीला, मी जेव्हा बालकांचे मृत्यू पाहायची, तेव्हा मला खूप त्रास व्हायचा. मात्र आता ही आमच्यासाठी जवळपास सामान्य बाब झाली आहे."

अकाली जन्म झालेल्या जुळ्या मुलींना श्वास घेणंही कठीण झालं होतं

फोटो स्रोत, Imogen Anderson/BBC

फोटो कॅप्शन, अकाली जन्म झालेल्या जुळ्या मुलींना श्वास घेणंही कठीण झालं होतं

नवजात बाळांचं युनिट किंवा विभाग चालवणारे डॉक्टर मोहम्मद मूसा ओलदात म्हणाले की मृत्यूदर 10 टक्क्यांपर्यत पोहोचतो, 'ते स्वीकारार्ह नाही'.

"मात्र गरीबीमुळे दररोज रुग्णांची संख्या वाढते आहे. इथे आमच्याकडे मुलांवर व्यवस्थित उपचार करण्यासाठी पुरेशी सुविधा, साधनंदेखील नाहीत," असं ते म्हणाले.

बालरोग अतिदक्षता विभागात, 6 आठवड्यांचा जमीर मेनिन्जायटिस आणि न्यूमोनिआशी लढतो आहे. या दोन्ही आजारांवर उपचार शक्य आहेत. मात्र डॉक्टरांना एमआरआय स्कॅन करावं लागेल. त्यांच्याकडे यासाठी योग्य उपकरण उपलब्ध नाही.

मात्र डॉक्टरांनी सांगितलेली कदाचित सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, सरकारी हॉस्पिटलमध्ये बहुतांश रुग्णांसाठी औषधंदेखील नव्हती. रुग्णांच्या कुटुंबांना दुकानांमधून औषधं विकत घ्यावी लागतात.

फातिमा म्हणाल्या, "कधी-कधी जर एखाद्या सधन कुटुंबातील बाळाची औषधं जर शिल्लक राहिली, तर जी कुटुंबं औषधं विकत घेऊ शकत नाहीत, त्यांच्या बाळांसाठी आम्ही या औषधांचा वापर करतो."

पैशांचा अभाव, गरीबी यामुळे अनेक कुटुंबांना नाईलाजानं कठीण निर्णय घ्यावे लागत आहेत.

गुलबदन यांच्या वाचलेल्या नातीचं वजन थोडंसं वाढलं आणि तिचा श्वासोच्छवास स्थिर झाला. मात्र थोड्याच दिवसांनी तिचं कुटुंबं तिला घरी घेऊन गेलं. ते तिला हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा खर्च करू शकत नव्हते.

जमीरचे आई-वडीलदेखील याच कारणामुळे त्याला घरी घेऊन गेले.

आता या तान्ह्या बाळांना स्वत:च्या जिवावरच जिवंत राहण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

अतिरिक्त वार्तांकन: इमोजेन अँडरसन, महफूज जुबैदे आणि संजय गांगुली

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.