लैंगिक छळाच्या प्रकरणात प्रशिक्षणार्थी IPS निलंबित, नेमके प्रकरण काय?

 प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी उदय कृष्णा रेड्डी

फोटो स्रोत, Instagram/Udaykrishnareddy.ips

फोटो कॅप्शन, प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी उदय कृष्णा रेड्डी
    • Author, बल्ला सतीश
    • Role, बीबीसी तेलुगू
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

लैंगिक छळाच्या प्रकरणात न्यायालयाने प्रशिक्षणार्थी IPS उदय कृष्णा रेड्डी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हैदराबादमधील शिवरामपल्ली येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या एका महिला IPS प्रशिक्षणार्थीने तक्रार दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आलं.

18 जुलै रोजी संबंधित महिला प्रशिक्षणार्थीने अत्तापूर पोलीस ठाण्यात उदय कृष्णा रेड्डी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

तक्रारीत त्यांनी म्हटलं आहे की, 'सहकारी प्रशिक्षणार्थी उदय कृष्णा रेड्डी काही काळापासून त्रास देत होते. व्हॉट्सअॅपवर लैंगिक स्वरुपाचे संदेश पाठवले, तसेच अकादमीतील मित्र-मैत्रिणींसमोर अपमानास्पद टिप्पणी केली.'

त्यांनी पुढे म्हटलं की, "दुसऱ्या एका प्रशिक्षणार्थीसोबत माझे शारीरिक संबंध असल्याचा खोटा आरोप करण्यात आला आणि तो कबूल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकण्यात आला. तसेच, मला शिवीगाळही करण्यात आली."

एफआयआरमध्ये काय आहे?

संबंधित प्रशिक्षणार्थी महिला IPS अधिकाऱ्याच्या तक्रारीनुसार, "त्याने धमक्या आणि ब्लॅकमेल करून मला माझे वैयक्तिक संदेश दाखवण्यास भाग पाडले. 8 जुलै रोजी त्याने माझा मोबाईल घेऊन आपल्या खोलीत नेला आणि त्याचा पासवर्ड सांगण्यास भाग पाडले.

एफआयआरमधील माहितीनुसार, उदय कृष्णा रेड्डी यांनी नकळत महिलेचा खासगी व्हीडिओ तयार करून तो तिच्या पतीला पाठवला आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप महिलेनं केला आहे.

महिलेच्या या तक्रारीतील तपशील FIR मध्ये नमूद करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

या तक्रारीच्या आधारे अत्तापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील कलम 74, 75, 77, 78, 79, 127(2), 115(2), 351(2) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 66 E आणि 67 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

उदय कृष्णा रेड्डींनी आरोप फेटाळले

ज्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत, ते प्रशिक्षणार्थी IPS अधिकारी उदय कृष्णा रेड्डी हे उपचारासाठी हैदराबादमधील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांना रुग्णालयात का दाखल करण्यात आले, याचे नेमके कारण समोर आलेले नाही.

मात्र, त्यावेळी त्यांनी लिहिल्याचा दावा करण्यात आलेले एक पत्र समोर आले असून, त्यांच्या कुटुंबीयांनी ते पत्र त्यांचेच असल्याचे सांगितले आहे.

उदय कृष्णा रेड्डींनी ते आणि महिला चांगले मित्र होते, पण आता त्यांनी आरोप केले आहेत, असं या पत्रात म्हटल्याचं सांगण्यात आलं आहे.

महिला

फोटो स्रोत, Getty Images

पत्राच्या शेवटी त्यांनी "सत्यमेव जयते, एम. उदय कृष्णा रेड्डी" असे लिहिले आहे. जून 2025 पासून आजपर्यंत त्यांच्या नात्याशई संबंधित सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

19 जुलै रोजी त्यांनी आणखी एक पोस्ट शेअर केली. त्याचा अर्थ असा होता की, "जे माझ्या पाठीमागे बोलतात, ते कायम माझ्या मागेच राहिले."

केंद्रीय गृहमंत्रालयाची कारवाई

या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने उदय कृष्णा रेड्डी यांना IPS प्रशिक्षणातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

त्यानंतर पोलिसांनी ते फरार असल्याचे सांगत त्यांचा शोध सुरू केला. मात्र, ही बातमी समोर आल्यानंतर त्यांनी NTV या तेलुगू वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

28 जुलै रोजी प्रसारित झालेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "या वादामुळे माझी आजी आजारी पडल्याचे मला समजले. त्यामुळे मी तिला भेटण्यासाठी माझ्या गावी आलो. मी तपासात सहभागी होईन आणि पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन.

पोलिसांनी हैदराबादमधील माझ्या तात्पुरत्या पत्त्यावर नोटीस बजावली आहे, मात्र माझ्या मूळ गावी नाही. मी फरार नाही. आजच मी हैदराबादला जात आहे. माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत."

वादाच्या भोवऱ्यात आलेला प्रवास

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

28 जुलै रोजी आंध्र प्रदेशातून हैदराबादकडे येत असताना तेलंगणा पोलिसांनी उदय कृष्णा रेड्डी यांना अटक केली.

त्यानंतर हैदराबादमधील उप्परपल्ली न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली, अशी माहिती अत्तापूर पोलीस निरीक्षकांनी बीबीसीला दिली.

उदय कृष्णा रेड्डी यांनी 2019 मध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिला होता आणि 2024 मध्ये त्यांची आयपीएससाठी निवड झाली होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणारा अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी कॉन्स्टेबलची नोकरी सोडून आयपीएसची तयारी केली, असा त्यांचा प्रवास अनेक माध्यमांनी प्रेरणादायी म्हणून प्रसिद्ध केला होता. बीबीसी तेलुगूनेही त्यावेळी त्यावर वृत्त दिले होते.

मात्र, सध्याच्या घडामोडींमुळे हे प्रकरण व्यापक चर्चेचा विषय बनले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद येथील राष्ट्रीय पोलीस अकादमीतील वातावरण आणि प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

(ही बातमी प्रथम प्रसिद्ध झाल्यानंतर बीबीसीच्या संपादकीय निर्देशांनुसार पुन्हा संपादीत करण्यात आली आहे.)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)