महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस? पुढचा अंदाज काय?

छत्री खरेदी करणारी महिला

फोटो स्रोत, Praful Gangurde/Hindustan Times via Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

29 जून रोजी कोकणात मुसळधार पावसाची नोंद झाली असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे पावसाने अक्षरशः झोडपून काढले.

याउलट उत्तर महाराष्ट्र, ठाणे आणि मराठवाड्यात बहुतांश तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस, तर काही ठिकाणी पावसाची नोंदच झाली नाही.

सध्या कोकण आणि विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात पाऊस होण्याची शक्यता असल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांतील एकूण पाणीसाठा 6.93 टक्के इतका नोंदवला गेला आहे.

शहरात पावसाने हजेरी लावली असली, तरी तलावांच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात अद्याप लक्षणीय वाढ झालेली नाही. त्यामुळे मुंबईवर पाणीकपातीची टांगती तलवार अजूनही कायम आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस?

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली येथे 193 मिमी, वाकवली येथे 186.2 मिमी, मंडणगड येथे 180 मिमी, खेड येथे 172 मिमी, चिपळूण येथे 135 मिमी, गुहागर येथे 83 मिमी, संगमेश्वर आणि राजापूर येथे प्रत्येकी 104 मिमी, तर लांजा येथे 84 मिमी पावसाची नोंद झाली. खेड तालुक्यातील कुलवंडी सर्कलमध्ये 203 मिमी पावसाची नोंद झाली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलदे कृषी केंद्रात 112.8 मिमी, वैभववाडी 98 मिमी, कुडाळ 92 मिमी, कणकवली 59 मिमी, रामेश्वर कृषी केंद्र 56.4 मिमी, मालवण 50 मिमी, देवगड 47 मिमी, दोडामार्ग 38 मिमी, सावंतवाडी 20 मिमी आणि वेंगुर्ला येथे 15 मिमी पाऊस झाला.

ठाणे जिल्ह्यात ठाणे तालुक्यात 84 मिमी, कल्याण 28 मिमी, उल्हासनगर 16 मिमी, शहापूर 12 मिमी, मुरबाड 12 मिमी, भिवंडी 11 मिमी आणि अंबरनाथ येथे 11 मिमी पावसाची नोंद झाली.

पाऊस

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत येथे 29.6 मिमी, निफाड 21.8 मिमी, चांदवड 21 मिमी, येवला 12 मिमी, सटाणा-बागलाण 6.1 मिमी, त्र्यंबकेश्वर 4 मिमी, दिंडोरी आणि इगतपुरी येथे प्रत्येकी 3 मिमी, नांदगाव 2 मिमी पाऊस झाला. तर कळवण, सुरगाणा, सिन्नर, पेठ आणि देवळा येथे पावसाची नोंद झाली नाही.

अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा येथे 49 मिमी, श्रीरामपूर आणि श्रीगोंदा येथे प्रत्येकी 45 मिमी, संगमनेर 35 मिमी, कोपरगाव 24 मिमी, चास 21.2 मिमी, पाथर्डी 14 मिमी, अकोले आणि राहुरी येथे प्रत्येकी 13 मिमी, सावळीविहीर 12 मिमी, कर्जत 7 मिमी, जामखेड आणि पारनेर येथे प्रत्येकी 2 मिमी पावसाची नोंद झाली. शेवगावची आकडेवारी उपलब्ध नव्हती.

लातूर जिल्ह्यात रेणापूर येथे 35 मिमी, अहमदपूर 28 मिमी, जळकोट 26 मिमी, लातूर 25 मिमी, शिरूर अनंतपाळ 23 मिमी, निलंगा 7 मिमी, औसा 6 मिमी, चाकूर 3 मिमी, तर देवणी येथे पावसाची नोंद झाली नाही.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर येथे 48 मिमी, गंगापूर 18 मिमी, खुलताबाद 8 मिमी आणि फुलंब्री येथे 5 मिमी पाऊस झाला. तर कन्नड, सिल्लोड, सोयगाव आणि पैठण येथे पावसाची नोंद झाली नाही.

पुढचा अंदाज काय?

हवामान विभागाच्या मॉडेल गायडन्सनुसार, 29 ते 2 जुलैदरम्यान कोकणात किनारपट्टीवरील भागात तसंच घाटभागात हळूहळू पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. इथेकाही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली तयार होत असून तिच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढू शकतो.

मुंबई, रायगड, रत्नागिरीमध्ये जोरदार पावसासाठी यलो अलर्ट आहे.

ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, संभाजीनगर, अहिल्यानगर, बीड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला जिल्ह्यांमध्ये थंडरस्टॉर्मसाठी यलो अलर्ट आहे.

1 आणि 2 तारखेला कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे.

1 आणि 2 जुलैला तळकोकणात, तसंच मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाचा जोर जास्त राहू शकतो. 3 आणि 4 जुलैपर्यंत पावसात वेगानं वाढ होऊन मुंबई परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)